'लांडगा न्याय' नको, भिक्खू न्याय' हवा

विवेक मराठी    25-Apr-2020
Total Views |

पालघर येथे दोन साधूंना आणि त्यांच्या एका चालकाला ठार करण्यात आले. न्याय करणारे मार्क्सवादी विचारसरणीचे होते. त्यांचा न्याय असा तत्काळ असतो. ना दाद ना फिर्याद, ना साक्षीपुरावे. केरळमध्ये ते हेच काम करतात. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी तेहतीस वर्षे हेच काम केले.


2020 Palghar mob lynching
ही कथा अगदीच लहान आहे. या कथेत नाट्य नाही, संघर्ष नाही, ज्याला क्लायमॅक्स म्हणतात असे काही नाही. पण अर्थाचा प्रचंड दारूगोळा या कथेत भरलेला आहे. न्यायव्यवस्थेवरील ही कथा आहे.

एका कुत्र्याने एका मेंंढीवर फिर्याद दाखल केली. न्यायाधीश होते लांडगा आणि कोल्हा. कुत्र्याची फिर्याद होती की, मेंढीने त्याच्याकडून कर्ज घेतले आहे आणि ते ती फेडत नाही. न्यायाधीशांनी तक्रार दाखल करून घेतली. आरोपी आणि फिर्यादी दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. कोणताही साक्षीपुरावा न घेता न्यायमूर्तींनी निर्णय दिला की, मेंढी दोषी आहे, तिला देहदंड दिला पाहिजे. लांडग्याने आणि कुत्र्याने तत्काळ शिक्षेची अंमलबजावणी केली. मेंढीला खाऊन टाकले.

पालघर येथे दोन साधूंना आणि त्यांच्या एका चालकाला ठार करण्यात आले. न्याय करणारे मार्क्सवादी विचारसरणीचे होते. त्यांचा न्याय असा तत्काळ असतो. ना दाद ना फिर्याद, ना साक्षीपुरावे. केरळमध्ये ते हेच काम करतात. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी तेहतीस वर्षे हेच काम केले.

पुन्हा इसापच्या कथेकडे येऊ या. इसापच्या कथेत फिर्याद दाखल करणारा कुत्रा आहे. तो मेंढीपेक्षा खूप सशक्त आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर पॉवरफुल आहे. त्या मानाने मेंढी दुर्बळ आहे. न्याय करणारे न्यायमूर्ती सशक्ताच्या पक्षाचे आहेत. दुर्बळ मेंढीला ते न्याय देत नाहीत. साक्षीपुरावेदेखील स्वीकारीत नाहीत आणि तिला दोषी ठरवून मारण्याचा आदेश देतात.

इसापला सांगायचे आहे की, समाजातील दुर्बळ वर्गाला न्याय मिळत नाही. समाजातील सशक्त गट त्याला चिरडून टाकतात. त्याच्या जीवनाचे आणि मालमत्तेचे कशाचेही संरक्षण होऊ शकत नाही. इसापचा कालखंड इ..पूर्वीचा आहे. काळ कितीही पुढे गेला, तरी समाजातील काही गोष्टी बदलत नाहीत.

ही गोष्ट वाचल्यानंतर अनेक आठवणी जाग्या होत गेल्या. नाना पाटेकर यांचा अभिनय असलेला क्रांतिवीर हा चित्रपट आहे. या चित्रपटाची नायिका मेघना दीक्षित (डिंपल कपाडिया) हिच्या कुटुंबाची हत्या गुंडाकडून होते, तिच्यावर बलात्कार होतो. न्यायालयात खटला उभा राहतो. गुन्हेगार पॉवरफुल असतात. न्यायमूर्ती त्यांना साथ देतात. ते सर्व निर्दोष सुटतात. चित्रपटाची ही कथा वास्तवातदेखील अनेक प्रकरणात खरी होते. बलात्कार, खून, वाटमारी यासारखे गंभीर गुन्हे असणारे आरोपी निर्दोष सुटतात. आता प्रत्यक्षात घडलेल्या एका घटनेकडे जाऊ या.

कम्युनिस्टांचे राज्य असलेल्या केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यात दोन बहिणींवर बलात्कार झाला. नंतर त्यांच्या हत्या झाल्या. पोस्टमॉर्टेमध्ये बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले. व्ही. मधू आणि एम. मधू अशी दोघींची नावे होती. पाच जणांवर आरोपपत्र दाखल झाले. खटला उभा राहिला. पुराव्याअभावी आरोपींना दोषमुक्त ठरवून सोडून देण्यात आले. आरोपी सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते होते. २०१८ साली या निर्णयामुळे केरळमधील वातावरण फार तापले होते.

हे एक उदाहरण दिले आहे. गंभीर गुन्ह्यातील साक्षीदार उलटतात किंवा त्यांच्या हत्या होतात. केस दाखल करताना पोलीस त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी ठेवतात. न्यायालयात केस टिकत नाही. गरीब भरडला जातो. शक्तिमान मुक्त होतो.

ज्या समाजाच्या वाटेला हुकूमशाही येते, तेथील न्याय इसापच्या कथेप्रमाणे असतो. लिबियाच्या कर्नल गडाफीने कैक हजार लोकांना विनाचौकशी ठार मारले. ट्रीपोली शहरातील अबू सलीम तुरुंगात १९९६ साली अंदाधुंद गोळीबार करून १२७० कैद्यांना ठार करण्यात आले. हे सर्व राजकीय कैदी होते. सद्दाम हुसेन याने इराकमध्ये हे 'न्यायाचे काम' केले. चीन उल जिंग याने उत्तर कोरियात केले.

कम्युनिस्ट हुकूमशाह स्टॅलिन याने आपल्या कार्यकाळात माणसे मारण्याचा कारखानाच उघडला होता. १९३६ ते १९३८ या कालावधीत त्याने सफाई (purge) मोहीम चालविली. या मोहिमेत बारा लाख रशियन ठार झाले. या काळाला 'दहशतीचे राज्य' असे म्हणतात. कम्युनिस्ट राजवटीला नको असणाऱ्यांना वेचून वेचून पकडण्यात येई. काहींना ठार केले जाई, काहींची रवानगी छळ छावण्यात होत असे. या छळ छावण्यांना नाव पडले 'गुलाग'. निर्णय करणारे न्यायमूर्ती होते स्टॅलिन, बेरिआ, निकोलाई एझ्हाॅव. ज्यांना पकडले जाई, त्यांचे खटले त्याच दिवशी निकाली निघत. इसापच्या कथेतील लांडगा आणि कोल्ह्याचा न्यायनिवाडा होत असे.

मानवी समाजात न्यायव्यवस्थेचा कधी आणि कसा उगम झाला, याविषयी तज्ज्ञांचे ग्रंथ आहेत. समाजात भांडणे होण्याची कारणे अशी असतात -
* कर्जाची परतफेड न करणे
* खोटी साक्ष देणे
* मालकी नसताना दुसऱ्याची वस्तू विकणे
* चोरी, खून, बलात्कार करणे
* मालक व कामगार यांच्यातील भांडणे
* बदनामी करणे
* नवरा-बायकोतील भांडणे

या सर्वांचा न्यायनिवाडा करावा लागतो. न्यायनिवाडा करताना परंपरागत कायदे, धार्मिक कायदे, राजसत्तेचे कायदे इत्यादी कायद्यांचा आधार घ्यावा लागतो. साक्षीपुरावे तपासून पाहावे लागतात. न्याय करण्यासाठी जे बसतात, त्यांच्याकडे कायद्याचे ज्ञान हवे. ते प्रामाणिक हवेत. स्वत:च्या आवडीनिवडी, एवढेच काय, राजकीय विचारांपासून ते अलिप्त असायला हवेत. कुणाच्याही रागलोभाची पर्वा न करता त्यांनी फक्त न्याय द्यावा, अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते. कुत्र्याशी हातमिळवणी करून 'लांडगा न्याय' द्यायचा नसतो.

आपण इसापच्या कथेचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. ब्रह्मदेशाचे न्यायविशारद माॅन्ग हतिन ऑन्ग, 'Burmese law tales' या शीर्षकाचे ब्रह्मदेशातील लोककथांचे पुस्तक आहे. या पुस्तकातील सर्व कथा न्याय या एकाच विषयावर आहेत. माॅन्ग हतिन ऑन्ग म्हणतात की, जर न्यायमूर्तींनी मोहाच्या आहारी जाऊन किंवा अन्य कोणत्या दुर्बळतेच्या आहारी जाऊन न्याय केला, तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागेल. पृथ्वी त्यांना आपल्या पोटात घेईल, मगर त्यांना खाऊन टाकील, त्यांना जलसमाधी मिळेल, वीज अंगावर पडून मृत्यू येईल, वेडाचे झटके येतील.

न्याय कसा करायचा असतो, याच्या अनेक कथा त्यांनी दिल्या आहेत, त्यातील एक कथा. एक गुराखी आपली जनावरे चरण्यासाठी रानात गेला. दुपारी तो जेवला. विश्रांती घेण्यासाठी झाडाच्या सावलीत आडवा झाला. त्याला झोप लागली.

थोड्या वेळाने चोर आला. गुराखी झोपला आहे, हे पाहून तो त्याची गुरे घेऊन गेला. गुराखी जागा झाला. आपली गुरे चोर घेऊन चालला आहे, म्हणून तो त्याच्या मागे गेला. चोर म्हणाला की, "ही सर्व गुरे माझी आहेत". यावर वाद सुरू झाला. निवाड्यासाठी ते एका भिक्खूकडे गेले.

भिक्खूने चोराला विचारले की, "गुरांना खायला काय घातले आहेस?" चोर म्हणाला, "मी त्यांना तांदळाची पेज, गूळ, आणि चांगल्या भाज्या खाऊ घातल्या आहेत." भिक्खूने नंतर गुराख्याला विचारले, "तू गुरांना काय खाऊ घातलेस?" गुराखी म्हणाला, "मी गरीब माणूस आहे. एवढ्या महागड्या वस्तू मी गुरांना देऊ शकत नाही. मी गुरांना गवत खायला घालतो आणि रानात चरायला आणतो." भिक्खूने नंतर उलटी आणणाऱ्या झाडपाल्याचा रस गुरांना पाजला. गुरांनी ओकारी केली. त्यांच्या पोटातून फक्त गवतच बाहेर पडले. चोराची लबाडी उघड झाली. शिपायांनी त्याला धरून नेले

इसापला सुचवायचे आहे की, ज्या समाजात निरपेक्ष न्याय दिला जातो, तो समाज सुखी समाज समजला पाहिजे. म्हणून न्यायनिवाडे करणारे न्यायाधीश, त्यांना मदत करणारे वकील अशी सर्व माणसे प्रामाणिक असतील, न्यायच करणारे असतील, हे समाजानेही पाहिले पाहिजे.

रमेश पतंगे