शिकवण कोरोनाची - 5

विवेक मराठी    25-Apr-2020
Total Views |

आज जगात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी पोकळी निर्माण होणार आहे. ती सर्व क्षेत्रांत असणार आहे. ती विचाराच्या दृष्टीने असणार आहे. मृत्यूच्या ह्या भीषण तांडवानंतर समस्त मनुष्यजात समुपदेशनाच्या शोधात विचार शोधणार आहे. समस्त मनुष्यजातीला समुपदेशन करू शकेल असा 'श्रीमद्भगवद्गीता' नावाचा अमूल्य ग्रंथ आमच्याकडे आहे, ज्यात मनुष्याच्या जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे सामावली आहेत. ही गीता घेऊन आम्ही आत्मविश्वासाने जर समुपदेशन करण्यासाठी बाहेर पडलो, तर संपूर्ण विश्व आपली वाट बघत आहे.


Bhagavad Gita as a Smriti

काल 'विचार' या दृष्टीकोनातून आपण आज निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीचा विचार करत होतो. या परिस्थितीमध्ये उपलब्ध संधी काय आहेत? भारत त्याचा कसा विचार करू शकतो? आणि हे करताना जर आपण आपल्या मूळ तत्त्वज्ञानाचा, विचारधारेचा गाभा पकडून ठेवला नाही तर ती मोठी चूक होऊ शकेल. म्हणून तो गाभा पुन्हा एकदा लक्षात घेण्याची गरज आहे.

'दुरितांचे तिमिर जावो! विश्व स्वधर्म सूर्य पाहो! जो जे वांछील तो ते लाभो प्राणिजात!' असे संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले आहे. वर्षानुवर्षे भारतीय चिंतनाचा हा गाभा आहे. ह्या आधारावर आम्ही जगात 'वसुधैव कुटुंबकम्' ही कल्पना घेऊन गेलो. आमच्या कुटुंबकल्पनेत फक्त मानवी जीवन समाविष्ट नव्हते, तर या सृष्टीतील सर्व जीवसृष्टी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीसुद्धा समाविष्ट होती. एवढी व्यापक कल्पना केल्यामुळे पर्यावरणाचा विचार स्वाभाविक होता. प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या अधिकाराचा सन्मान होता आणि म्हणूनच 'सर्वे भवन्तु सुखिनः! सर्वे सन्तु‌ निरामयाः! सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख माप्नुयात्!' असे आम्ही रोज प्रार्थनेत म्हणत होतो. आणि त्यामुळेच कृण्व्न्तो विश्वम् आर्यम् ! ही आमची कल्पना साम्राज्यवादी कधीच नव्हती, तर सगळ्या जगाने समस्त सृष्टीच्या कल्याणाच्या विचाराची कास धरावी, ही कल्पना होती, आजही तीच आहे. जर ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी आवश्यक तेवढ्या शक्तीचा, संपत्तीचा संचय करणे गरजेचे असेल तर तेवढा संचय करण्याची कल्पना आमच्या विचारात आहे. येथे survival of the fittest नाही, तर विश्वगुरूची संकल्पना आहे. याचा उपासना पद्धतीशी काही संबंध नाही. कारण त्या जगाला नियंत्रित करणाऱ्या शक्तीला शरण जाण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात, यावर आमचा पूर्ण विश्वास होता, आहे आणि असलाही पाहिजे. ही सहिष्णुता मनुष्याला सुखाकडे नेणारी आहे.

मग राष्ट्रवाद या कल्पनेचे काय? राष्ट्रवाद या संकल्पनेची दोन अंगे आहेत. एक आहे सकारात्मक आणि दुसरी बाजू नकारात्मक आहे. हिटलरच्या नेतृत्वाखाली जर्मनीने केलेला ज्यूंचा संहार आणि आज चीनचा किंवा अमेरिकेचा चाललेला जगातला धुमाकूळ हा कम्युनिस्ट किंवा भांडवलशाही व्यवस्थेचा नकारात्मक राष्ट्रवाद आहे. किंवा पूर्वी ब्रिटिश साम्राज्यवादाचे साम्राज्यवादी वागणे आणि रशियातील क्रांतीनंतर रशियाची वाटचाल हे सगळे राष्ट्रवादाचे नकारात्मक पैलू आहेत.

सकारात्मक राष्ट्रवाद समजून घेण्यासाठी रामायणाचा संदर्भ पुरेसा आहे. धर्माच्या स्थापनेसाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी युद्ध केले. पण लंकेच्या राज्यावर बिभीषणाला बसवून 'जननी जनंभूमिश्च स्वर्गदपी गरियासी!' या भावनेने पुन्हा अयोध्येला परतले. देशाच्या सीमा वाढवल्या नाहीत, पण धर्माची सूत्रे दिली आणि त्याप्रमाणे बिभीषणाला राज्य करण्यास सांगितले. भगवान कृष्णाने कंसाचा वध केला, पण स्वतः राजा झाला नाही. ह्या विचारातून येथे मानवी जीवन जगत होते. राष्ट्रवादी विचाराची ही सकारात्मक बाजू सगळ्या जगाला योग्य मार्गाने घेऊन जाऊ शकेल.

विज्ञानातील, गणितातील, वैद्यकशास्त्रातील अनेक विषय येथे पूर्वीच संशोधित झाले होते. पण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आम्हाला त्याच काळाबद्दल प्रश्न विचारण्यात आले, ज्या काळात खैबर खिंडीतून येणाऱ्या आक्रमकांच्या लुटारू टोळ्यांशी संघर्ष करण्यात आमची शक्ती खर्च होत होती. ज्या ग्रंथांच्या आधारावर आम्ही आमची प्रगती केली होती, ती सगळी ग्रंथसंपदा तक्षशीलाच्या आणि नालंदाच्या लावलेल्या आगीत भस्मसात होऊन गेली आणि अस्तित्वाच्या लढाईत आम्ही आमचे विज्ञान, पर्यावरण, गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद विसरून गेलो. नेमक्या त्याच वेळी जगात नवविज्ञान जन्म घेत होते. वेगवेगळे संशोधन जन्म पावत होते. मनुष्य त्या संशोधनातून निर्माण होणाऱ्या ऐहिक सुखाला प्रगती आणि विकास असे नाव देऊन आपले समाधान करून घेत होता. खैबर खिंडीतून येणाऱ्या टोळ्यांपाठोपाठ आमच्याकडे पारतंत्र्य आले आणि मग तर आमच्या बुद्धीला, विचार करण्याला पूर्णपणे कुलूपच लागले.

पारतंत्र्यात निर्माण होणाऱ्या सामाजिक दोषांचे ओझे घेऊन आम्ही स्वतंत्र झालो. मेकॉलेने विकसित केलेल्या शिक्षणपद्धतीतून निर्माण झालेले नवबुद्धिवादी देशाच्या प्रमुख स्थानी प्रस्थापित होते. त्यामुळे देशाला एक संधी होती आम्हाला व देशाला योग्य दिशेने नेण्याची, ती आम्ही काही प्रमाणात गमावून बसलो. ताजमहाल हेच आमचे वैभव समजत बसलो आणि शहाजहान याची मुमताज कितवी बेगम होती हे विसरून रामाने सीतेचा त्याग का केला यावर वाद घालत बसलो. मोठा भाऊ वनवासात गेला, म्हणून स्वतः त्याच्या पादुकांची पूजा करत राजमहालाचे ऐश्वर्य न भोगता कुटीत राहणाऱ्या भरतराजाचें गोडवे गाण्यापेक्षा वडील, भाऊ यांना सत्तेच्या हव्यासापोटी तुरुंगात टाकणारा औरंगजेब हा टोपी विकून चरितार्थ चालवायचा, हे आम्ही शिकवत राहिलो.

जपान, जर्मनी यांचीसुद्धा महायुद्धात राखरांगोळी झाली होती. त्यांच्यापुढेसुद्धा तेच आव्हान होते. पण त्यांनी पराभवाच्या सर्व खुणा पुसत एका विशिष्ट दिशेने वाटचाल करत जगात दबदबा निर्माण केला. भाषा, आचार, विचार, संस्कृती या मूलभूत गोष्टींशी कुठलीही तडजोड न करता जागतिक व्यापार, उद्योग यात आपले स्थान निर्माण केले. त्यासाठी सामाजिक जीवन स्वस्थ ठेवले आणि सर्वांपुढे एक समान उद्दिष्ट ठेवले.
आम्ही पाश्चात्त्यांच्या भूलभुलैय्यात अडकलो गेलो आणि देशात असलेल्या बुद्धिमत्तेला आम्ही जसा हवा तसा न्याय देऊ न शकल्यामुळे आमच्या देशातून बाहेरच्या देशात बुद्धिमत्तेची मोठी निर्यात झाली. आज कोरोना लढाईत वेगवेगळ्या युरोपीय देशांत, अमेरिकेत, ब्रिटनमध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या भारतीय वंशाची संख्या बघितली, म्हणजे याचा अर्थ आपल्याला कळतो. हे सगळे परदेशात पैशाच्या आमिषाने गेले असा आरोप करणे हे अन्याय करणारे ठरेल. आम्ही त्यांना पुरेशा संधी उपलब्ध करून दिल्या नाहीत, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे.

आज जगात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी पोकळी निर्माण होणार आहे. ती सर्व क्षेत्रांत असणार आहे. ती विचाराच्या दृष्टीने असणार आहे. मृत्यूच्या ह्या भीषण तांडवानंतर समस्त मनुष्यजात समुपदेशनाच्या शोधात विचार शोधणार आहे. समस्त मनुष्यजातीला समुपदेशन करू शकेल असा 'श्रीमद्भगवद्गीता' नावाचा अमूल्य ग्रंथ आमच्याकडे आहे, ज्यात मनुष्याच्या जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे सामावली आहेत. ही गीता घेऊन आम्ही आत्मविश्वासाने जर समुपदेशन करण्यासाठी बाहेर पडलो, तर संपूर्ण विश्व आपली वाट बघत आहे. पार्थ संभ्रमित झाला आणि त्यातून हे सर्व जगकल्याणकारक तत्त्वज्ञान निर्माण झाले. आम्ही दुर्दैवाने त्याला धर्मग्रंथ म्हणून बंदिस्त केले. गीतेमध्ये मनुष्याने कसे वागावे आणि कसे वागू नये याचा बोध आहे. मृत्यू आणि जीवन याचा अर्थ आहे. नश्वर शरीर आणि चिरंजीव आत्मा याचे नाते काय असते याचे स्पष्टीकरण आहे. कर्तव्य आणि मोह यातून कर्तव्यनिवडीचे मार्गदर्शन आहे. 'मी, माझे, आपले' यापेक्षा 'समस्त सृष्टीचे' हा व्यापक अर्थ उद्धृत केला आहे. यासाठी कोरोनाच्या निमित्ताने आम्हाला कोर्टात साक्ष देण्यासाठी ज्यावर हात ठेवावा लागतो, एवढ्या मर्यादित अर्थाने माहीत असलेली गीता आणि त्याचे निरूपण करणारी ज्ञानेश्वरीही समजून घेतली, तर संपूर्ण जगाला या परिस्थितीतून आम्ही सावरू शकतो. गीतेचा अभ्यास कुणाची उपासना पद्धती बदलायला सांगत नाही. त्यामुळे विचारात भगवद्गीता, विहारात योग आणि आहारात भारतीय शास्त्रीय खानपान जर सांभाळले, तर विकार होण्याची शक्यता खूप कमी. कारण कोरोना काळात विकारांनी खूप मोठे नुकसान झाले आहे. युरोपीय देश आणि भारत यांच्या कोरोना संक्रमण संख्येत जो फरक आहे, तो या विकारांचा. उद्या या मुद्द्याचा विचार करू.
नीरक्षीरविवेक