मुस्लिमांनी अंत्यसंस्कार केल्याची धूळफेक

विवेक मराठी    26-Apr-2020
Total Views |
***स्वाती गोयल शर्मा***

प्रकाशन: Swarajyamag.com

आम्ही दोन वर्षांपूर्वी आमची आई गमावली आणि आता पित्याला गमावले. आता ही खोटी बातमी आम्हाला आणखी मनस्ताप देत आहे. माझे नातेवाईक फोन करून आम्हाला विचारत आहेत, की 'तुम्हाला मदत करणारे ते पाच मुस्लीम कोण आहेत?' हे खूप लज्जास्पद आहे. ही खोटी बातमी आहे आणि ते प्रसिद्धीसाठी माझ्या वडिलांच्या मृत्यूचा वापर करत आहेत. माझ्या वस्तीतील लोकांनी मला मदत केलीय, मुस्लिमांनी नाही."

hibdu_1  H x W:

आपल्या कुटुंबीयांपैकी एकाच्या मृत्यूचे संकट कोसळलेल्या तेलंगणातील हिंदू कुटुंबाला आता समाजाच्या उपहासाला सामोरे जावे लागत आहे कारण त्यांचा अंत्यसंस्कार मुस्लीम व्यक्तींनी आयोजित केल्याचे खोटे वृत्त एका वृत्तपत्रात छापून आले होते

तेलंगणात नुकत्याच निधन झालेल्या एका हिंदू व्यक्तीच्या कुटुंबीयांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेली एक बातमी नाकारली आहे. शेजाऱ्यांनी या कुटुंबाला 'वाळीत' टाकल्यामुळे मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार मुस्लीम व्यक्तींनी केले होते, असे या बातमीत म्हटले होते. वेणू मुदिराज नावाची ही मृत व्यक्ती ५० वर्षांची होती आणि ते खैरताबादचे रहिवासी होते. एका रुग्णालयात १६ एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले होते.

प्रीती बिस्वास हिने लिहिलेली ही बातमी २० एप्रिल रोजीच्या या वृत्तपत्राच्या सर्व प्रमुख आवृत्त्यांमध्ये प्रकाशित झाली होती. त्याच्या हैदराबाद आवृत्तीत पहिल्या पानावर ती प्रकाशित झाली होती. 'शेजाऱ्यांनी वाऱ्यावर सोडलेल्या हिंदू व्यक्तीचे अंत्यसंस्कार पाच मुस्लीम पुरुषांनी केले' असा त्याचा मथळा होता.

या बातमीतील दोन उतारे खालीलप्रमाणे होत -

हिंदू असलेल्या एका ऑटो चालकाचे अंत्यसंस्कार पाच मुस्लीम मित्रांनी केले. या व्यक्तीचा मृत्यू क्षयरोगामुळे झाला होता, परंतु शेजाऱ्यांनी हा कोविड-१९मुळे झालेला मृत्यू समजून कुटुंबाला वाळीत टाकले होते.

मुलांकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते आणि शेजाऱ्यांनी वाऱ्यावर सोडलेले. आकाश कोसळलेल्या या कुटुंबाने आशा सोडूनच दिली होती. तितक्यात मोहम्मद मजीद, अब्दुल मुक्तदिर, मोहम्मद अहमद आणि शेख खासिम यांच्यासह सलाम याने पोलिसांकडे परवानगी मागितली आणि अंत्यसंस्कारांची तयारी केली. त्यांनी कुटुंबातील सदस्यांसाठी आणि अंत्यसंस्कारात सामील झालेल्या काही नातेवाइकांसाठी जेवणाची व्यवस्था केली.

या कुटुंबाने ही बातमी खोडून काढली आहे आणि कायदेशीर खटला दाखल करण्याची त्यांची योजना आहे.

सदर लेखिकेला हैदराबाद येथील पत्रकार श्रीधरन सिद्धू यांचा २१ एप्रिल रोजी कॉल आला. ते म्हणाले की मृत वेणू मुदिराज यांच्या कुटुंबाला या खोट्या बातमीमुळे धक्का बसला आहे. माध्यमांमध्ये काही गोष्टी स्पष्ट व्हाव्यात, अशी या कुटुंबाची इच्छा असल्याचे ते म्हणाले.

सदर लेखिकेने मग मृतकाचा धाकट्या भावाशी संपर्क साधला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत विनोदच्या तोंडी खालील वाक्ये होती,

त्यांना क्षयरोगाचा त्रास होत होता आणि लॉकडाउनच्या काळात त्यांची प्रकृती खालावली. पण त्यांच्या मृत्यूनंतर, मुलांची काळजी घेणारे कोणीही उरले नव्हते, कारण त्यांच्या आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता.

ही बातमी खोडून काढताना विनोदने सदर लेखिकेला सांगितले, "मी असे कधीच बोललो नाही. ते चुकीचे आहे. हे पूर्णपणे खोटे आहे."

सध्या ४८ वर्षांचे असलेल्या विनोद यांनी, जे घडले त्याची स्वतःची हकीगत नंतर सांगितली. (त्यांच्याशी झालेल्या संपूर्ण संभाषणाचे ध्वनिमुद्रण स्वराज्यकडे आहे).

"१६ एप्रिल रोजी ५ वाजण्याच्या सुमारास माझ्या भावाचे निधन झाले. काही तासांनी आम्ही त्यांचा मृतदेह घरी आणला. त्याच दिवशी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पाच मुस्लीम पुरुष आमच्या घरी आले. त्यांच्यापैकी एक जण होता मोहम्मद अहमद, तो माझ्या भावाचा मित्र होता. इतर चौघांना मी ओळखत नव्हतो. त्या सर्वांनी शोक व्यक्त केला. ते सगळे जण चांगले वागले आणि निघण्यापूर्वी त्यांनी आम्हाला भोजनाची काही पाकिटेही दिली.


hibdu_1  H x W:

दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळे मला स्मशानघाटावर दिसले. आमच्याकडच्या काही पुरुषांनी पार्थिव उचलले, तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांनी "आम्ही काही मदत करू का?" असे विचारले. आम्ही अर्थातच "हो" म्हणालो. पार्थिव घेऊन जातानाची त्यांची छायाचित्रे केव्हा काढण्यात आली, याची मला कल्पना नाही. अशा प्रसंगी आपल्या आवतीभोवती काय घडत आहे याचे आपल्याला भान नसते."

विनोदने सांगितले की "हे लोक परत दुसऱ्या दिवशी - म्हणजे १८ एप्रिल रोजी आले आणि त्याला फोनवर एका पत्रकाराशी बोलायला लावले. त्यांपैकी एकाने स्वतःचा फोन माझ्या हातात दिला आणि समोर असलेल्या व्यक्तीशी बोलण्याची विनंती केली. त्याने सांगितले की ती व्यक्ती एक पत्रकार आहे आणि या बातमीमुळे आम्हाला सरकारकडून काही आर्थिक मदत मिळण्यास मदत होऊ शकेल," विनोद म्हणाले.

विनोद म्हणाले की त्यांनी चटकन पत्रकारांशी बोलणे केले आणि नातेवाइकांमध्ये आणि विधींमध्ये पुन्हा व्यग्र झाले.

विनोद म्हणाले की दोन दिवसांनी टाइम्स ऑफ इंडियामधील बातमीबद्दल कळाल्यावर कुटुंबाला धक्काच बसला.

"आम्ही आमच्या समाजात चेष्टेची गोष्ट बनलो आहोत. लोक आमची चेष्टा करतायत. ते म्हणतात की आमच्याकडे पार्थिव उचलायला चार माणसेही नाहीत आणि आम्हाला दुसऱ्या समाजावर अवलंबून राहावे लागतेय. माझा भाऊ 'लावारिस' (अनाथ) होता का? असे ते विचारत आहेत.
 

Family of Hindu Man Refut

हे बिलकुल खरे नाही, मॅडम. देवाच्या कृपेने आमचे भले थोरले कुटुंब आहे. फक्त या लॉकडाउनमुळे आम्हाला २० लोकांवर काम भागवावे लागले." ते म्हणाले.

विनोद पुढे म्हणाले, की त्यांनी आपल्या बचतीतून ३५,००० रुपये खर्च केले आणि "काहीही न करतासुद्धा पाच मुस्लिमांनी सगळे श्रेय हिरावून नेण्यामुळे" त्यांना खूप वाईट वाटतेय.

इथे हे सांगणे खूप आवश्यक आहे की जेव्हा सदर लेखिकेने विनोदला फोन केला आणि पत्रकार म्हणून स्वत:ची ओळख करून दिली, तेव्हा त्यांनी लगेच संतापाने विचारले, "असला कचरा छापण्याची तुमही हिंमत कशी होते?" जेव्हा मी दुसरी पत्रकार असल्याचे स्पष्ट करून सांगितले, तेव्हाच विनोद शांत झाले आणि सगळ्या घटनांबद्दल आपली बाजू मांडली.

मृत व्यक्तीचा १८ वर्षीय मुलगा सचिन याने सदर लेखिकेला स्वतःचे ध्वनिचित्रमुद्रित केलेले निवेदन पाठवले. यात तो म्हणतो, (तेलुगूमधून भाषांतर केल्यानुसार)

"हॅलो, माझे नाव सचिन आहे. माझे वडील जी. वेणू यांचे १६ एप्रिल रोजी निधन झाले. सुरुवातीला माझ्या वस्तीतील लोकांनी कोविड-१९च्या भीतीमुळे वस्तीत आमच्या येण्याला आक्षेप घेतला. मग आम्ही पोलिसांना फोन केला आणि त्यांनी त्यांची समजूत घातली. त्यानंतर वस्तीतील लोकांनी आम्हाला हर प्रकारे मदत केली. दरम्यान, माझ्या वडिलांचे मित्र असल्याचा दावा करणारे पाच मुस्लीम पुरुष आले आणि काही वेळ पार्थिव धरण्याची त्यांनी परवानगी मागितली. आम्ही त्यांना बिलकुल ओळखत नाही. पण माझ्या वडिलांचे मित्र असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही त्यांना खांदा द्यायची परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी फोटो घेतले आणि आपण संपूर्ण अंत्यसंस्कार केल्याची बातमी त्यांनी वर्तमानपत्रातून आणि सोशल मीडियावर पसरविली. हे खरे नाही. त्यांनी काहीही केलेले नाही.

आम्ही दोन वर्षांपूर्वी आमची आई गमावली आणि आता पित्याला गमावले. आता ही खोटी बातमी आम्हाला आणखी मनस्ताप देत आहे. माझे नातेवाईक फोन करून आम्हाला विचारत आहेत, की 'तुम्हाला मदत करणारे ते पाच मुस्लीम कोण आहेत?' हे खूप लज्जास्पद आहे. ही खोटी बातमी आहे आणि ते प्रसिद्धीसाठी माझ्या वडिलांच्या मृत्यूचा वापर करत आहेत. माझ्या वस्तीतील लोकांनी मला मदत केलीय, मुस्लिमांनी नाही."

फोनवरून सचिनने हेसुद्धा सांगितले की बातमीत म्हटल्याप्रमाणे त्याच्या वडिलांचा मृत्यू क्षयरोगामुळे नाही, तर 'कमी रक्तदाबामुळे' झाला. "माझ्या वडिलांना क्षयरोगाचा त्रास नव्हता" असे सचिनने सांगितले.


Family of Hindu Man Refut

सचिनने वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या, खाली दिसत असलेल्या, छायाचित्रातील व्यक्तींनासुद्धा ओळखले.

"सगळ्यात पुढे माझे मामा आहेत. त्यांच्या मागचा राखाडी कुर्ता आणि गॉगल घातलेला मनुष्य मुस्लीम आहे, पण मी त्याला ओळखत नाही," सचिन म्हणाला.

सचिनने दोन वर्षांपूर्वी आई गमावली. तो आणि त्याची धाकटी बहीण आता काका विनोद यांच्यासह राहतील, असे त्याने सांगितले. कुटुंबाला सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय, असे तो म्हणाला.

सचिनने सदर लेखिकेला एक ध्वनिमुद्रणही पाठवले. तो म्हणाला की बातमी प्रकाशित झाल्यानंतर त्याचे मामा भारत आणि 'त्यांच्यापैकी एका मुस्लीम व्यक्ती' यांच्यामध्ये हे संभाषण झाले होते.

या ध्वनिमुद्रणात भारत तो कोण आहे आणि त्याने वृत्तपत्रात काय छापून आणलेय, हे पलीकडच्या व्यक्तीला रागाने विचारताना ऐकू येतात. पलीकडचा माणूस बचावात्मक होतो आणि म्हणतो, "काही नाही". भारत तेव्हा त्याला भिडतात आणि विचारतात, की त्याने कोणती मदत केली आणि छायाचित्रे काढून घेणे ही मदत असते काय? तो माणूस कबूल करतो की त्याने मदत केली नाही.

खाली ऑडिओ भागाचा उतारा आणि अनुवाद आहे:

सदर लेखिकेने टाइम्सची बातमीदार प्रीती विश्वास हिच्याशीही संपर्क साधला. आता कुटुंबाने ही बातमी नाकारली असल्यामुळे तिची प्रतिक्रिया विचारली.

बिस्वासने टेक्स्ट संदेशाद्वारे उत्तर पाठवले. ती म्हणाली,

'प्रोटोकॉलनुसार मी श्री. वेणू मुदिराज यांचे भाऊ श्री. जी. विनोद यांच्याशी बोलले होते. त्यात ते म्हणाले, की मुलांनी दोन वर्षांपूर्वीच आई गमावली असल्यामुळे त्यांना आता आधार उरलेला नाही. पाच मुस्लीम पुरुषांनी त्यांना मदत केल्याबद्दल विचारले असता त्यांनी माहिती दिली, की ते खरोखरच त्यांच्या घरी आले होते, कुटुंबातील सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती, पोलीस परवानग्या घेतल्या होत्या आणि एकूण परिस्थितीबद्दल साशंक असलेल्या घरमालकाशीही बोलले होते. त्यांनी मला हेही सांगितले, की या पाच माणसांनी त्यांना पार्थिव स्मशानभूमीत नेण्यास मदत केली होती आणि अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत ते थांबले होते.'

दरम्यान, मृत व्यक्तीच्या कुटुंबियांपैकी एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सदर लेखिकेला सांगितले की या ‘खोट्या बातमी’च्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा ते विचार करत आहेत, कारण यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.

"आमच्याकडे पैसा नाही. पण एका व्यक्तीने या प्रकरणी मदतीचा प्रस्ताव दिला आहे. बघू या." ही व्यक्ती म्हणाली.

- स्वाती गोयल शर्मा या स्वराज्यच्या वरिष्ठ संपादक आहेत. त्या @swati_gsवरून ट्वीट करतात.

अनुवाद - देविदास देशपांडे