तबलिघी जमात ही काय भानगड आहे?

विवेक मराठी    03-Apr-2020
Total Views |


मार्च सरता सरता दिल्लीतील सुप्रसिद्ध निझामुद्दीन दर्ग्याला खेटून असलेल्या तबलिघी जमातीच्या टोलेजंग इमारतीतून शेकडोंच्या संख्येने मुस्लिमांचे तांडे पडताना पाहून सर्व काफिरांनी तोंडात बोटे घातली. शहाण्यासुरत्या समजल्या जाणाऱ्या मोमिनांनी आक्रीत घडविले होते. एकीकडे कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सर्वसामान्य नागरिक स्वत:ला कोंडून घेत असताना तबलिघी मरकझने त्यांच्या अनुयायांना समजून उमजून मरणाच्या दाराशी उभे केले. दोन दिवसात इज्तेमातून धर्मसंमेलनातून कोरोनाभारित होऊन बाहेर पडलेल्यांनी सर्व देशात कोरोनाचे लोण पोहोचविले. एकाएकी पूर्ण देशात तबलिघी जमात सर्वांच्या समोर भस्मासुरासारखी उभी राहिली. आगीत तेल ओतावे त्याप्रमाणे तबलिघींचा जणू बचाव करायचा आहे या मन:स्थितीत असलेल्या तरुण आणि बुरखाधारी मुस्लीम महिलांनी काही ठिकाणी त्यांची चौकशी करायला गेलेल्या डॉक्टर, नर्स आणि पोलिसांवर दगडफेक केली. काय आहे ही तबलिघी भानगड?

Tablighi Jamaat coronavir

 
आपल्याच घरची पैदास

तबलिघी जमात ही भारताची इस्लामला विशेष देणगी आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतात तिचा उगम झाला. सुमारे ७० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात तबलिघी जमात ही संघटना स्थापन करण्यात आली. इस्लामचा शस्त्राविना प्रसार करणे हा त्या संघटनेचा मूळ उद्देश होता. त्याला १९२४ साली केमाल पाशाने मोडीत काढलेल्या खिलाफतीची पार्श्वभूमी होती. त्या वेळी भारतातील मुसलमानांमध्ये दोन विचारप्रवाह होते - बरेलवी आणि देवबंदी. या दोनमध्ये बरेलवी त्यातल्या त्यात मवाळ, तर देवबंदी कडवे होते. देवबंदींशी संलग्न असलेल्या काही मुल्लामौलवींनी इस्लामचा प्रचार करण्यासाठी १९२७-२८च्या दरम्यान तबलिघी जमात ही संघटना स्थापन केली. ही तीच ३-४ वर्षे आहेत, जेंव्हा डॉ. हेडगेवारांनी हिंदूंचे संघटन करण्यासाठी १९२५मध्ये रा.स्व. संघाची स्थापना केली. त्यानंतर काही वर्षांतच नागपूरबाहेर जाऊन संघाचे काम करणारे प्रचारक निघू लागले. त्याच सुमारास काँग्रेसनेही काँग्रेस सेवादल स्थपन केले होते.

मुसलमानांना प्रत्येक काळात इस्लामचे अध:पतन झाले असे वाटत आले आहे. त्यातून बाहेर पडायचे असेल तर पै. मुहंमदांनी पाळलेला इस्लाम तसाच्या तसा पाळला पाहिजे, इस्लामची शिकवण आत्मसात केली पाहिजे अशी त्यांची मानसिकता तयार झोलेली आहे. त्यासाठी लोकांमध्ये योग्य प्रकारच्या इस्लामचे प्रशिक्षण देण्याची आणि प्रसार करण्याची आवश्यकता मुस्लीम नेत्यांना भासू लागली. अशी प्रचार करणाऱ्यांची फौज निर्माण करण्यासाठी तबलिघी जमात ही संघटना काढण्यात आली. जसे तालिबानचे तालिबानी, तसे तबलिघचे तबलिघी. या दोघाचे एकमेकांशी प्रेमाचे संबंध असणे स्वभाविक होते. एक अहवालाप्रमाणे फ्रान्समधून निघालेल्या अतिरेक्यांपैकी ८० टक्के अतिरेकी स्थानिक तबलिघी जमातीच्या संपर्कात होते.

घृणास्पद आणि विकृत मानसिकता

तबलिघींसाठी प्रशिक्षण नियमितपणे सुरू करावे, त्यांचे मेळावे भरवावे हा उद्देश ठेवून त्यात इस्लामची शिकवण देण्यासाठी कुराण शरीफ या मुख्य ग्रंथाबरोबरच पै. महंमदाच्या आठवणींचे संग्रह हदीस यांचा समावेश करण्यात आला. इस्लाममध्ये अनेक संग्राहकांच्या हदीस आहेत. त्यातील काही सर्वमान्य आहेत, तर काहींच्या विश्वसनीयतेबाबत शंका आहेत. तबलिघींनी स्वीकारलेल्या हदीस ग्रंथांची विश्वसनीयता मुस्लीम समाजातच कमी समजली जाते, तरीही स्थापनेपासून त्यात बदल झालेला नाही. सर्व मुसलमानांना पै. महंमदांचे जीवन आदर्श असते. तबलिघी जमातने त्यांच्यासारखे, जशी हदीस ग्रंथांमधून वर्णने आले आली आहेत त्याप्रमाणे वागण्याचा परिपाठ ठेवला आहे. जो तबलिघला वाहून घेतलेला समजतो, ते तो आपल्या दैनंदिन व्यवहारात दर्शवितो. त्यांचा पायजमा गुडघ्याच्या थोडा खाली येणारा, लांडा असतो. त्याचे कारण पै. महंमदांच्या मते पायघोळ पायजमा घालणारा त्याच्या मग्रुरीचे प्रदर्शन करतो. आसपास कोणी असा लांडा पायजमा घालणारा मुस्लीम इसम तबलिघी समजता येईल. तसेच दुसरा दंडक म्हणजे झाकलेली मूठ असते त्या लांबीची दाढी राखणे, पण वरच्या ओठावरची, नाकाखालची मिशी सफाचट करणे. पैगंबर जमिनीवर झोपत म्हणून हे प्रचारकही जमिनीवर झोपतात. ते जेव्हा धर्मप्रसारासाठी जातात, तेव्हा ते स्थानिक मशिदीत मुक्काम ठोकतात. तिथून धर्मप्रचार करतात. निझामुद्दीनवरून बाहेर पडलेले जमाती ठिकठिकाणी मशिदींमध्ये सापडले, त्याचे हेच कारण आहे. इस्लामची पाच प्रमुख तत्त्वे ठरलेली आहेत. तबलिघींनी आपली वेगळी सहा तत्त्वे ठरविली आहेत. कलमा प्रार्थना, इल्म--जिक्र माहिती किंवा ज्ञान, इक्रम--मुस्लीम दुसऱ्या मुस्लिमाचा आदर, इक्लास--निय्यत संस्थेच्या उद्देशाविषयी प्रामाणिकपणा, जिहादची मनोभूमिका, आणि धर्मांतरण अशी ती कलमे आहेत. तबलिघींच्या सदस्यांचे प्रशिक्षण तीन दिवसांपासून पाच महिन्यापर्यंत अवधीचे असते. असे प्रशिक्षण देणारे मदरसे देश-विदेशात स्थापन झाले आहेत. या प्रशिक्षणादरम्यान भाग घेणाऱ्यांत इतर धर्म, परंपरा आणि समाज यांच्या बाबतीत आत्यंतिक घृणेची मानसिकता बिंबविली जाते. अमिराचा शब्द शेवटचा, तो म्हणेल ती पूर्व हे गळी उतरविले जाते. याचे प्रत्यंतर आपण सर्व घेतो आहोत. एकीकडे मक्का-मदीनाच्या मशिदी बंद झालेल्या असतानाही १३ ते १५ मार्चच्या तबलिघी इज्तेमाला गर्दी करणाऱ्या स्थानिक आणि इतर राज्यांमधून आलेल्यांनी आपली बुद्धी अमिराकडे गहाण ठेवली होती. त्यानंतर त्यांना तपासणीसाठी नेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर, रस्त्यांवर थुंकण्याचे प्रकार केले, काही ठिकाणी हल्ले केले, शुश्रुषेसाठी गेलेल्या महिला सेविकांसमोर अश्लील चाळे केले. उद्दामपणे एकत्र येऊन नमाज पढणे तर सोडाच, पण परिसरात नागवे होऊन फिरणे हे ते जमातवाले करत होते. काही ठिकाणी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांनी हिंदूंना नामशेष करण्यासाठी कोरोना पसरविणार अशा आरोळ्या ठोकल्या. या प्रकारांत त्यांची घृणास्पद आणि विकृत मानसिकता कशी घडविली गेली, हे सर्व जगाच्या समोर आले. काफिरघृणेचे – Kafirophobiaचे यापेक्षा अधिक घाणेरडे प्रदर्शन काय असू शकेल? अशा मनोवृत्तीचे एक-दोन नव्हे, तर लोखो लोक आपल्यातच आहेत हेही उघड झाले.
 

Tablighi Jamaat coronavir

देश-विदेशात प्रचार

काही मदरशांनी प्रशिक्षण संपल्यावर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी काही महिने ते दोन वर्षपर्यंत दुसऱ्या ठिकाणी राहून धर्मप्रसाराचे काम करणे हा प्रशिक्षणाचा अनिवार्य भाग केला आहे. प्रशिक्षणार्थीचा दर्जा आणि परकीय भाषेत प्रशिक्षित करून देशादेशांत त्याची रवानगी करण्याच्या धोरणामुळे आज जगातील दीडशेहून अधिक देशांत त्यांची प्रशिक्षण केंद्रे चालतात. त्याचे जेथे अस्तित्व आहे, तेथे भव्य मेळावे आयोजन करण्यावर त्यांचा भर असतो. तीन वर्षांपूर्वी वाळपई या जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेल्या गोव्यातील भागात एका मेळाव्याला मी गेलो होतो. तीन दिवसांच्या मेळाव्यात भाग घेणाऱ्यांची संख्या पाच हजारच्या आसपास होती. आताच आलेल्या बातमीप्रमाणे, ते वसईलाही असा मेळावा आयोजित करणार होते. त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. मार्चमध्ये मलेशियात एक मोठा मेळावा आयोजित झाला होता. त्यात भाग घेणारे काही भारतीय मुसलमान होते. तेथून इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना पसरण्यास सुरुवात झाली. दिल्लीच्या इज्तेमाला आलेल्या परदेशांतील लोकांची संख्या शेकडोंनी आहे. त्यात चीनमधून आलेले लोक होते. तसे पाहिले, तर हे लोक जर उघ्यूर मुस्लीम असतील, तर ते बाहेर कसे पडू शकले? कारण त्यांना अंतर्गत शत्रू लेखणाऱ्या चीनने शत्रुदेशात जाण्यासाठी त्यांना परवानगी कशी दिली? हे लोक चीनमधून बाहेर कसे पडू शकले? दुसरे म्हणजे भारताच्या चीनमधील दूतावासाने त्यांना व्हिसा कसा दिला? हा प्रश्न तुम्हा-आम्हाला पडत असला, तरी दूतावासातील भोट अधिकाऱ्यांना पडला नाही, ही वस्तुस्थिती आहे. तसेच मार्चमध्ये मोठा मेळावा आयोजित होणार आहे हे माहीत झाल्यावरही त्यावर पोलिसांनी किंवा दिल्ली प्रशासनाने बंदी घालून ती कडकपणे अंमलात का आणली नाही? याचे कारण गेल्या सत्तर वर्षांत भारतात जोपासले गेलेल्या भोटपणात आहे. १९९०मध्ये प्रकाशित झालेल्या 'हिदू-मुसलमान ऐक्य : भ्रम आणि सत्य' या पुस्तकात ब.ना. जोगांनी अगदी मोजक्या शब्दात त्याचे कारण दिले होते – 'राजकीयदृष्ट्या मुसलमानांना दुखवू नये हा जसा एक प्रकार झाला, त्याचप्रमाणे सांस्कृतिक, धार्मिकदृष्ट्याही दुखवू नये हा विचार प्रबळ झाला. त्यातूनच त्यांच्या शारीरिक आक्रमणाचा प्रतिकार न करण्याची वृत्ती बळावत गेली.' (पृ. १२७). शाहीन बाग किंवा तबलिघी इज्तेमा आयोजनासंदर्भात ते तंतोतंत लागू पडते.

तबलिघच्या जमातच्या सदस्यांबाबत एक दिसते की ते मुस्लीम समाजाच्या आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातून आहेत. ज्या संस्थापक सदस्यांनी १९२०च्या दरम्यान तबलिघ स्थापन केली, ते सर्व उच्चभ्रू होते. १९९०च्या दरम्यान खालच्या जातींच्या मुस्लीम समाजांमध्ये अश्रफ, सय्यद इ.च्या वर्चस्वाला धरून बंडखोरीची लक्षणे होती. त्यानंतर धोरणीपणाने तबलिघींनी खालच्या वर्गात शिरकाव केला. आता ते समाज तबलिघच्या संघटनेचा मोठा भाग झाले आहेत.

तबलिघचा प्रमुख स्वत:ला अमीर म्हणवून घेतो. अमीरचा अर्थ राजा. आखाती देशातील राज्यांना अमीर म्हणतात आणि देशांना अमिरात. तबलिघींचा अमीर स्वत:ला राजासमान समजतो. सध्या जो साद कंधालवी, पोलिसांना चुकवित दडून बसला आहे, त्याने काही वर्षांपूर्वी तबलिघी जमात संघटनेवर कब्जा केला आणि स्वत:ला चौथा अमीर घोषित केले होते. एक गोष्ट तबलिघींच्या नेत्यांनी पाळली, ती म्हणजे त्यांनी संघटना कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या दावणीला बांधली नाही. त्यामुळे निवडणुकीच्या मोसमात दिल्लीला शाही इमामाच्या दाराशी राजकीय नेत्यांची जी रीघ लागत असे आणि त्यामुळे तो प्रकाशझोतात येई, ते या अमिरांच्या बाबतीत घडले नव्हते. तेही बहुसंख्य मुसलमानांना सध्या पटलेले आहे. सध्याच्या घटकेला त्यांचा राजकीय पक्षांबाबत भ्रमनिरास झाल्याचे चित्र आहे. अशा वेळी राजकारणापासून दूर असलेल्या तबलिघी जमातीकडे त्यांचा ओढा दिसतो आहे. म्हणून साद कंधालवीच्या हाकेला त्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. सुमारे दहा हजार लोकांची नावे पोलिसांना मिळाली.

प्रथम तर सादने मोठ्या अडेलतट्टूपणाने मशिदीत मरा असा अनुयायांना आदेश दिला. नंतर मात्र तो शासनाच्या आदेशांना पाळत विजनवासात गेला. त्याच्या ऐशआरामाच्या राहणीतून त्याचे पितळ उघडे पडले आहे. त्याने आपल्या अनुयायांना उघड्यावर सोडले आहे. सामान्य मुल्लावेड्या मुस्लिमाला जागवून मुल्ला-मौलवीच्या विळख्यातून सोडविण्याची हीच वेळ आहे. ज्या प्रमाणात मरकझमधून गेलेल्या लोकांमध्ये कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण झाली, तो मुद्दा उचलून या 'बदमिजाजी दीनी बंद्यां'वरून त्यांचा अतिरेकी विश्वास उडविण्याची आणि सुशिक्षित आणि वैज्ञानिकतेकडे झुकणाऱ्या मुसलमानांचे नेतृत्व पुढे आणण्याची हीच वेळ आहे.