साधा माणूस

विवेक मराठी    30-Apr-2020
Total Views |
©प्राजक्ता काणेगावकर

त्याचा साधेपणा, त्याचा सच्चेपणा त्याच्या कामातून जाणवत राहिला. तो जसा होता तसाच तो दिसला आणि वागला. आयुष्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी जिवापाड मेहनत घेतली त्याने. ते गाठल्यावर चार घटका तिथे बसून त्या शिखरावरून आसपास बघण्याचा आनंद मात्र त्याला नियतीने घेऊ दिला नाही. त्याच्या आजाराची बातमी कळली, तेव्हा ऐकणारा प्रत्येक जण हळहळला, चुकचुकला. सत्य स्वीकारले होते फक्त त्याने. तरीही त्याने स्वतःच्या आजाराचा कुठेही बाऊ केला नाही. त्याला जे लख्ख आतून जाणवले, ते त्याने स्पष्ट मांडले.


irfan khan_1  H
एखाद्या स्टारच्या जाण्याने आपल्या डोळ्यात पाणी का येते? हा खूप अवघड प्रश्न आहे उत्तर दयायला. तसे पाहायला गेले तर त्याचे चित्रपट पाहण्यापलीकडे आपला त्याचा काही तसा प्रत्यक्ष संबंध नसतो. कधीतरी गर्दीत उभे राहून टाचा उंचावून त्याची किंवा तिची एक झलक बघायला मिळाली, तरी खूश होतो आपण. फार काही लागत नाही आपल्याला यापेक्षा. पण या सगळ्या झगमगत्या मांदियाळीत एखादी व्यक्ती अशी असते, जिच्याजवळ पोहोचणे, जिच्याशी संवाद साधणे सहज जमेल असे वाटते. आमिर खानचा एक चित्रपट आहे - 'अकेले हम अकेले तुम' नावाचा. त्यात मनीषा कोईराला त्याची पत्नी असते. ती तिचा पाच वर्षांचा मुलगा आणि नवरा यांना सोडून जाते चित्रपटात काम करण्यासाठी. तिचा चित्रपट झळकतो, तेव्हा बापलेक प्रोजेक्शन केबिनमधून तो चित्रपट बघतात. मुलगा निरागसपणे बापाला विचारतो, "आई आता आपल्याला कधी भेटणार?" बाप त्याला कडेवर उचलून घेऊन एक तारा दाखवतो आणि म्हणतो, "तुझी आई त्या चमचमणाऱ्या ताऱ्यासारखी आहे. लांबून दिसते, पण जवळ जाता येत नाही आणि आता ती जवळ येणारही नाही." त्या मुलाला कितपत कळते कुणास ठाऊक, पण तो हो म्हणून मान हलवतो. आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी चित्रपटसृष्टीतले हे तारे असेच असतात. फार थोडे असतात, ज्यांचा प्रकाश मनभर पडतो. कित्येक प्रकाशयोजने पार करून ते मनात चमचमत असतात. मनात अढळ स्थान मिळवतात. त्यातलेच एक नाव म्हणजे इरफान खान.

मी त्याचा पाहिलेला पहिला चित्रपट 'द किलर'. इम्रान हाश्मीचा एक अत्यंत टुकार चित्रपट आहे हा. स्वतः इम्रान हाश्मीलासुद्धा तो आठवत असेल की नाही कुणास ठाऊक? निशा कोठारी त्यात हिरॉईन होती. ह्या चित्रपटातली हिब्बकी, फिरता रहू दरबदर अशी गाणी अफाट गाजत होती, म्हणून मोठ्या उत्साहाने आम्ही हा चित्रपट बघितला. या चित्रपटात व्हिलन होता इरफान खान. सूट-बूट-टाय घालून तो पहिल्यांदा निष्पाप चेहरा करून इम्रानच्या टॅक्सीत बसतो आणि मग चित्रपटभर त्याचा मानसिक छळ करत राहतो. मला तेव्हाही लक्षात राहिला होता त्याचा शांत आविर्भाव. केवळ व्हिलन आहे म्हणून कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता खर्जातल्या संवादफेकीने आणि थंड देहबोलीने तो इम्रानला जेरीस आणतो. आवाजसुद्धा चढवत नाही तो पूर्ण वेळ. त्याचा थंड खुनशीपणा त्याच्या नजरेतून दिसत राहतो. तेव्हा बघताना हा माणूस काहीतरी वेगळा आहे हे जाणवले होते. इरफान खानचा एक चित्रपट निवडून लिहिणे फार अवघड आहे. 'मकबूल' मी केवळ त्याच्यासाठी कित्येक वेळा पाहिला आहे. नेमसेक, लाइफ इन मेट्रो, हासिल, लाइफ ऑफ पाय, लंच बॉक्स, पानसिंग तोमर, इन्फर्नो, तलवार, मदारी, पिकू, कारवां.. सगळेच एक से एक आहेत. एक चित्रपट कसा सांगणार? अभिनय त्याला 'करावा' लागत नव्हता. तो त्याच्या धमन्यांमधून वाहत होता. एखाद्या भूमिकेशी समरस होणे म्हणजे काय, हे त्याच्याकडून भल्याभल्यांनी शिकावे. त्याला पडद्यावर बघताना पानसिंग तोमर दिसायचा, इरफान दिसतच नसे. मकबूलमधला मियाँ समोर उभा असायचा इरफानला अदृश्य करून. स्वतःशीच गोड हळूच हसणारा साजन फर्नांडिस भावायचा ते त्यामुळेच. पण इरफान या सगळ्यापेक्षाही काहीतरी जास्त होता.
 
khan_1  H x W:

आज सहज माझ्या एका विद्यार्थ्याशी बोलत होते. तो बोलता बोलता म्हणाला, "इरफान खान गेला मॅम" मी एकदम शांत झाले. तो पुढे म्हणाला, "पाणी आले डोळ्यात मॅम. फार जबरदस्त ऍक्टर होता आणि मस्त माणूस होता. एकदम आपल्यातला वाटायचा. गॉन टू सून झाले मॅम ऐकून एकदम" मला नीट कळले त्याला काय म्हणायचे होते ते. खरे तर इरफान त्याच्या पिढीचा अभिनेता नव्हता. तो रूढार्थाने धंदेवाईक चित्रपट करणारा नव्हता. आजकालच्या बेगडी रिमिक्सच्या जमान्यात 'सिक्स पॅक' कमावलेला चॉकलेट बॉय तर तो कधीच नव्हता. मग या पिढीला त्याच्याशी इतका कनेक्ट का जाणवला असेल? याच कशाला, माझ्या पिढीलाही आवर्जून त्याचे चित्रपट का बघावेसे वाटले? तो गेल्याची बातमी कळल्यावर आपसूक डोळ्यात पाणी येणे ही जवळपास प्रत्येकाचीच प्रतिक्रिया होती. बातमी ऐकून पोटात पडलेला खड्डा अजूनही भरून आलेला नाहीये. घरातलेच कुणीतरी गेल्यासारखे सुतकी मळभ दाटून आलेले आहे. हे मळभ प्रत्येकाच्या मनावर आहे. त्याचा आजार कळला, तेव्हाच धस्स झाले होते. प्रत्येकाने मनात एकदा तरी त्याच्यासाठी दुवा मागितली असेल. तो यातून लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना केली असेल. माझ्या पुढच्या दोन पिढ्यांपासून मागच्या पिढीपर्यंत प्रत्येकाला त्याने असे बांधून ठेवले होते.

त्याची सक्सेस स्टोरी त्याने स्वतः लिहिली होती. एक अभिनेता म्हणून तो किती धडपडला असेल. त्याच्या अभिनयाला वाव न देता त्याच्या दिसण्यावरून त्याला किती जणांनी नाकारले असेल. चित्रपटांची दुनिया जितकी जादूनगरी, तितकी मायावी आणि क्रूर. एखाद्याचा कणा मोडून पडायला कितीसा वेळ लागत असेल इथे? तरीही तो तरला, टिकला. नुसताच टिकला नाही, तर त्याने यश खेचून आणले. टेलिव्हिजनपासून मोठ्या पडद्यापर्यंत त्याने सगळी माध्यमे तुफान गाजवली. या त्याच्या यशात सगळ्यात जास्त काय भावले असेल, तर त्याचे जमिनीवर घट्ट रोवलेले पाय, त्याची नर्म विनोदबुद्धी, स्वतःला फारसे सिरियसली न घेण्याचा ऍटिट्यूड. त्याच्या प्रत्येक मुलाखतीत त्याने स्वतःच्या तत्त्वांना, प्रामाणिक विचारधारेला अनुसरून उत्तरे दिली. आपण बरे, आपले काम बरे असे करतानाच त्याने कधीही आपण कुणी वेगळे आहोत असा टेंभा मिरवला नाही. वास्तविक तो एनएसडीचा विद्यार्थी. ज्या संस्थेमधून अनेक उच्च अभिनेते बाहेर पडले, तिथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला तो. त्याला यश मिळाल्यावर ते सगळे मिरवत आलेच असते. जिथे भले भले मिळालेल्या छोट्याशा आकाशाच्या तुकड्यामध्ये मिरवतात, खूश होतात, त्यावर स्वामित्व गाजवतात, तिथे त्याला तर सगळे आभाळच मोकळे होते. त्याने अधिकार गाजवला असता त्यावर तर कुणी काही म्हणाले नसते. पण तो तसा नव्हता. तो इंडस्ट्रीत आला तेव्हा तो जितका साधा होता, तितकाच साधा तो यश पदरी पडल्यावरही होता. देशपांडे गुरुजी म्हणतात तसे त्याचे मणके सिमेंट-काँक्रीटचे होते. मान दिला, मान घेतला इतके साधे होते त्याच्यासाठी. त्याला काही प्रश्न विचारला की त्याचे ते लाजरे हसून उडवणे मला स्वतःला फार आवडायचे. त्याला एका मुलाखतीत विचारले होते, "तुमचे आडनाव का लावत नाही तुम्ही?" तो हसून म्हणाला होता, "इतके खान आहेत इथे. त्यात आणखी माझी भर कशाला? मी नुसता इरफानच ठीक आहे" एवढे म्हणून तो हळूच मिस्कील हसला. त्या हसण्यातून आणि त्या एका वाक्यातून त्याने त्याची जागा बरोबर अधोरेखित केली. बुद्धिमान अभिनेत्यांच्या यादीतली त्याची जागा अबाधित होती ती त्यामुळेच.

आजकाल चित्रपटापेक्षा तो गाजण्यासाठी ज्या काँट्रोव्हर्सीज निर्माण केल्या जातात, त्या बघताना चित्रपटाच्या कन्टेन्टचा सहज अंदाज येतो. इरफानचे चित्रपट या सगळ्याला अपवाद आहेत. इरफान आहे म्हणजे चित्रपट चांगलाच असणार हे नक्की होते. त्याने मसाला चित्रपट केले नाहीत असे नाही. पण अशा चित्रपटांमध्येही त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. 'आ जा नच ले'सारख्या चित्रपटात तो ज्या शांतपणे पॉझ घेऊन माधुरीला म्हणतो, "ऐसा है, जो एक बार भागते है वो जिंदगी भर भागतेही रहते है" ते बघण्यासारखे तर आहेच, त्याहीपेक्षा ऐकण्यासारखे आहे. काय आवाज वापरलाय त्याने त्या छोट्याशा सीनमध्ये! यापेक्षा तिला त्याने तिच्या हाताला धरून अंगणाबाहेर काढले असते तरी चालले असते, असे वाटते. शब्द कसे वापरावेत हे त्याच्याकडून शिकावे. कुठेही शब्दांची ओढाताण न करता तो बोलतो. कमालीच्या शांत खर्जात बोलतो. स्टाइल म्हणून डायलॉग मारणे आणि समजून उमजून शब्द वापरत बोलणे यात कमालीचा फरक आहे. तो त्याला ठाऊक होता. भेदक नजर आणि असे तोलून मापून येणारे शब्द ऐकले की अभिनयाचा वस्तुपाठ समोर उभा आहे, हे दिसतेच. पानसिंग तोमरमध्ये त्याला भेटायला आलेल्या पत्रकाराला तो हातही लावत नाही. जेवता जेवता त्याला थंड आवाजात विचारतो, "कसरत करते हो कुछ? करनी चाहिये" एवढे बोलून तो त्याच्याकडे थंड पण भेदक नजरेने बघतो. शारीरिक हिंसा न करताही तो जास्त हिंसक दिसतो अशा वेळी. आता माझ्या मनात आले तर मी तुला मारू शकतो, छळू शकतो, त्रास देऊ शकतो असे सगळे तो फक्त चेहऱ्यावर दाखवतो. मोजके शब्द उच्चारून. गार भीती वाटते त्याची नजर बघून. मी हा चित्रपट थिएटरला पाहिला होता. हा सीन बघताना माझ्या तोंडून पटकन "क्या बात है" निघून गेले हळूच. इरफानवरचे प्रेम हे त्याच्या भूमिकांमुळे तर होतेच, तसेच तो साकारत असलेली प्रत्येक भूमिका बघताना सामान्य प्रेक्षक त्याच्याशी रिलेट करू शकायचा. अगदी निगेटिव्ह रोल असेल तरी. त्याचा साधा सरळ स्वभाव, त्याचे कुणाच्या अध्यात मध्यात नसणे हेही फार आवडायचे. तो बोलायचा त्याच्या भूमिकांमधून. त्याच्या अभिनयातून. जे आपल्याला चांगले जमते ते परफेक्ट करावे, इतकेच ठाऊक असलेला माणूस होता तो. त्याची कारकिर्द त्याने तशीच घडवली.

एखादा अभिनेता असा असतो, ज्याला स्क्रीनवर बघताना प्रत्येक प्रेक्षकाला त्याच्या भूमिकेमध्ये काही ना काही सापडत राहते. इरफान हा असाच एक अभिनेता होता. त्याचे असंख्य चित्रपट बघितलेल्या प्रेक्षकांना त्याच्या कुठल्या न कुठल्या भूमिकेमधले काही ना काही रिलेट झाले असेल आणि ते लक्षात राहिले असेल. प्रत्येकाचाच एखादा तरी आवडता मायक्रो किंवा मेजर सीन नक्की असेल. प्रत्येकाची एक सणसणीत दाद त्या एका मुद्रेला, नजरेला, डायलॉग डिलिव्हरीला, देहबोलीला नक्की गेली असेल. फार थोड्यांच्या वाट्याला हे भाग्य येते. चार घटका करमणूक म्हणून चित्रपट बघणाऱ्यांकडूनही ही दाद मिळवणे त्याला जमले, तिथे आवर्जून त्याला बघायला जाणाऱ्या लोकांची काय कथा?

त्याचा साधेपणा, त्याचा सच्चेपणा त्याच्या कामातून जाणवत राहिला. तो जसा होता तसाच तो दिसला आणि वागला. आयुष्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी जिवापाड मेहनत घेतली त्याने. ते गाठल्यावर चार घटका तिथे बसून त्या शिखरावरून आसपास बघण्याचा आनंद मात्र त्याला नियतीने घेऊ दिला नाही. त्याच्या आजाराची बातमी कळली, तेव्हा ऐकणारा प्रत्येक जण हळहळला, चुकचुकला. सत्य स्वीकारले होते फक्त त्याने. तरीही त्याने स्वतःच्या आजाराचा कुठेही बाऊ केला नाही. त्याला जे लख्ख आतून जाणवले, ते त्याने स्पष्ट मांडले. "आपले स्टेशन लांब आहे अजून, या भ्रमात होतो आणि प्रवास तर संपत आला" अशी स्वच्छ कबुली दिली त्याने. इथे तो आणखीच आपलासा झाला. हसत राहिला, भीतीला टोलवत राहिला. त्याच्या त्या दुर्दम्य इच्छाशक्तीकडे बघून त्याच्यापेक्षा बाकीच्यांनाच दिलासा वाटत राहिला. इरफान यातून नक्कीच बाहेर पडणार अशी खात्रीच होती प्रत्येकाला. त्याला उदंड आयुष्य मिळावे ही सगळ्यांचीच इच्छा होती. त्याने उत्तमोत्तम भूमिका कराव्यात आणि आपण त्या पाहाव्यात हा स्वार्थी विचार तर होताच त्यामागे, तशीच त्याच्या सहज साध्या वागण्यातून, लोभस हसण्यातून आयुष्यातल्या रिक्त काळाबद्दल एकही अवाक्षर न काढता वावरणाऱ्या त्याला आणखी यश मिळावे, आणखी सुख लाभावे आणखी यश मिळावे हीच मनोमन सदिच्छा होती. घरातल्या, आपल्या कुटुंबातल्या माणसासाठी आपण असेच म्हणणार ना!

पण नियती ही फार क्रूर असते खरेच. पटतेच.

©प्राजक्ता काणेगावकर