शिकवण कोरोनाची - 7 (संशोधनाच्या संधी)

विवेक मराठी    30-Apr-2020
Total Views |
आतापर्यंत आपण आढावा घेतला. वास्तविक, कोरोनानंतर काय संधी भारतासमोर उपलब्ध असतील? हाच या लेखमालेचा मूळ उद्देश होता. पण पार्श्वभूमी सांगायला जाताना लक्षात असे आले की बऱ्याच गोष्टी अशा आहेत, जर आम्हाला फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्यायची असेल, तर आधी काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. त्यामुळे 'नमनाला घडीभर तेल' असे काहीसे झाले, पण ते आवश्यक होते असे प्रस्तुत लेखकाचे मत आहे.


corona_1  H x W

कालगणनेचे जे अनेक प्रकार आहेत, त्यात एक प्रचलित पद्धत म्हणजे इसवीसनापूर्वी आणि इसवीसनानंतर. पण आता 'कोविड-१९पूर्व आणि कोविड-१९नंतर' अशी एक नवीन कालगणना जन्माला येते की काय, इतका जागतिक पातळीवर व समाजजीवनावर कोविड-१९चा परिणाम झाला आहे, असे वाटायला लागले आहे.

मनुष्याचे आरोग्य, त्यावर होणारे परिणाम व त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विविध संशोधनांचे आव्हान निर्माण झाले आहे. सर्वप्रथम म्हणजे अशा विषाणूला तोंड देण्यासाठी प्रतिबंधक लस कशी निर्माण करता येईल यावर सर्व प्रयोगशाळांमध्ये संशोधन चालू आहे. सुपर कॉम्प्युटर आणि तत्सम संगणकाच्या मदतीने वेगवेगळी परम्युटेशन-कॉम्बिनेशन वापरून प्रोटीन्स शोधणे चालू आहे. (ज्या देशात सुपर कॉम्प्युटर आहे, तेथे.) भारतातही काही वेगळ्या पद्धतीने संशोधन चालू आहे. असे तंत्रज्ञान शोधण्याची गरज निर्माण झाली आहे, जे प्रभावीपणे कोरोनासारख्या विषाणूबाधित रुग्णांना शोधू शकेल. तापमान मोजताना माणसाच्या शरीराला स्पर्श न करता तापमान मोजणे आवश्यक बनले आहे. समूहामध्ये जाताना, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझेशन कसे करायचे? (भारतात tunnel पद्धतीने शॉवर सॅनिटायझेशनचा प्रयोग केला गेला, पण वैद्यकीय संस्थांनी त्याला अजून मान्यता नाही दिली.) महामारीने बाधित रुग्णांना वाचवण्यासाठी सध्याच्या प्रचलित व्हेंटिलेटरपेक्षा वेगळ्या व्हेंटिलेटरचे संशोधन ही गरज निर्माण झाली आहे. वैद्यकीय उपचार करणाऱ्यांना किंवा सार्वजनिक ठिकाणी संसर्ग होऊ शकणाऱ्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी योग्य प्रकारचे आयुधे (ppe) उपलब्ध करून देण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. संरक्षण करण्यास पुरेसे असणारे आधुनिक प्रकारचे मास्क कमी किमतीत तयार होतील आणि नष्ट करण्यास सोपे जातील यावर संशोधन होणे गरजेचे आहे. आहे त्या औषधांपैकी कुठली औषधे अशा प्रकारच्या महामारीमध्ये रुग्णांस बरे करू शकतील, यावर संशोधन करण्याची गरज आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट - जी अनन्यसाधारण सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे समाजात समुपदेशन करण्यासाठी आणि लोक नकारात्मक मनःस्थितीत असताना त्यांना सकारात्मक परिस्थितीत आणण्यासाठी काही वेगळे संशोधन करण्याची गरज आहे. आणि आणखी एक - मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या मास्क आणि ppeचे पुनर्चक्रीकरण (रीसायकलिंग) करण्यासाठीसुद्धा संशोधन होणे गरजेचे आहे.

या बाबतीत भारतीय संशोधकांच्या काही यशोगाथा भारतीयांना निश्चितच अभिमान वाटावा अशा आहेत. आम्ही त्यामुळेच ही महामारी काही प्रमाणात रोखू शकलो आहोत. रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत आमचा देश इतर देशांपेक्षा खूप चांगली कामगिरी करत आहे. डीआरडीओ, आयआयटी कानपूर या संस्था तर अशा संशोधनात आघाडीवर आहेत, तसेच मीनल भोसले या मराठमोळ्या वैज्ञानिक तरुणीने स्वदेशी बनावटीचे टेस्टिंग किट १२००/ रुपयात उपलब्ध करून दिले, जे ४५००/ रुपयाला पडत होते. हे संशोधन करून उत्पादन करण्याच्या काळात त्यांनी एका बाळाला जन्म दिला. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की कुठल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत त्यांनी हे काम केले असेल. लवकरात लवकर टेस्टिंग रिझल्ट देणारे किट बनवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, त्यात ही एक मराठमोळी शास्त्रज्ञ मुख्य भूमिका बजावत आहे.

आणखी एक म्हणजे मनुष्याची अंतर्गत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संशोधन होण्याची गरज आहे. यासाठी भारतीय आयुष मंत्रालय खूप संशोधन करत आहे. प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग चालू आहे. त्याला अजून मान्यता नाही, पण कदाचित हा प्रयोग रुग्ण बरे करायला किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढायला उपयोगी पडू शकतो.

आता आपण आगामी काळातील संशोधनाची दिशा आणि त्यात भारताला असणारी संधी यांचा विचार करू.

भारतात संशोधन या विषयाची मुळात काय स्थिती आहे? मुळात संशोधन कशासाठी असते? तर सर्वसामान्य मानवी जीवन अधिक सुखकारक व्हावे यासाठी. जगातील कुठल्याही संशोधनाचा हेतू मुख्यत्वे असा असला पाहिजे. ज्या देशात एखादे संशोधन विकास पावते, त्या देशाला त्याचा व्यापारी फायदा मिळणे स्वाभाविक आहे. संशोधन हे सर्व प्रकारच्या ज्ञानाच्या विभागांत असते. संशोधन हा स्वभाव असतो. संशोधक हा जन्मतः असतो. संशोधन परिस्थितीनिरपेक्ष असते. योगायोगाने नुकताच रामानुजन याचा वाढदिवस झाला. ते म्हणा किंवा ए.पी.जे. अब्दुल कलाम किंवा कार्व्हर यांची उदाहरणे यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांच्या आवतीभोवती असलेली सामाजिक परिस्थिती त्यांना संशोधनाच्या त्यांच्या आवडीपासून थांबवू शकली नाही. कार्व्हर गुलाम होता, अब्दुल कलाम वृत्तपत्र वाटायचे. रामानुजन गरीब होते, प्रकृतीने अत्यंत कृश होते. आपल्याकडे तर कपिल, कणाद यांच्यापासून संशोधनाची परंपरा होती. पुढे पारतंत्र्यात आणि आक्रमणकाळात ती थांबली होती. जगदीशचंद्र बोस, रामानुजन यांनी ती टिकवून ठेवली. वास्तविक शल्यचिकित्सा, धातुशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि आयुर्वेद, हवाई वाहतूक या क्षेत्रात‌ भारतीय संशोधन पुढे गेले होते. पण त्याचे डॉक्युमेंटेशन करणे आम्हाला जमले नाही आणि जे होते ते आक्रमकांनी जाळून टाकले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर संशोधनाची एक दिशा नक्की होऊ लागली. विक्रम साराभाई, डॉ. भाभा, मेघनंद साहा अशा शास्त्रज्ञांनी संशोधन पुढे नेण्याचे वेगवेगळ्या क्षेत्रात प्रयत्न केले.

भारतात तीन स्तरांवर संशोधनाचे काम सुरू झाले.
१) सरकारने स्थापन केलेल्या संशोधन संस्था म्हणजे CSIR.
२) शैक्षणिक संस्था - आयआयटी, NIT किंवा विविध विद्यापीठ केंद्रे
३) औद्योगिक क्षेत्रात खासगी क्षेत्रात उत्पादनासाठी स्थापन झालेले संशोधन केंद्रे.

पण या सर्व ठिकाणी आवश्यक होती ती संशोधन करण्याची वृत्ती असणारे मनुष्यबळ, जी वृत्ती एकतर जन्मतः असते किंवा ती विकसितही करता येते. या संशोधक प्रवृत्तीला प्रोत्साहन देणे किंवा ती वाढीस लावणे यासाठी दुर्दैवाने शालेय शिक्षणात काही गोष्टी अंतर्भूत असाव्या लागतात. संशोधन हे प्रयोगशाळेत सुरू होते. दुर्दैवाने आमच्या माध्यमिक शिक्षणात या विषयाकडे पुरेसे लक्ष न दिल्यामुळे देशातील अनेक विद्यार्थी प्रयोगशाळेपासून वंचित राहिले. त्यातील अनेक मुलांची संशोधक वृत्ती तेथेच संपली. पुढे ज्या संस्था अशा संशोधनाची वृत्ती असणाऱ्या विद्यार्थ्याना शोधत होत्या, तेथे ती आवड असणारे कमी आणि करियरचा एक पर्याय म्हणून पाहणारे जास्त विद्यार्थी पोहोचायला लागले. त्यामुळे भारतातल्या संशोधन संस्था ह्या एका अर्थाने पांढरे हत्ती होऊ घातल्या होत्या. आयआयटी आणि एनआयटी यासारख्या ठिकाणी जाणारे विद्यार्थी पदवीनंतर संशोधनाकडे वळण्याऐवजी भल्यामोठ्या पगाराच्या नोकरीला प्राधान्य देऊ लागले आणि अगदीच ज्यांना संशोधनाची आवड होती, ते बाहेरच्या देशात जाऊन संशोधनाची भूक भागवू लागले. विद्यापीठातील संशोधन हे एम.फिल., आणि पीएच.डी. यासारख्या डिग्रीमध्ये अडकून पडल्याने संशोधनाचे हेतूच नष्ट होऊ लागले. पण यातही गेल्या चार दशकांत क्रमाने काही सकारात्मक बदल होत गेले. संशोधन कशासाठी, तर सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी याची काही उत्तम उदाहरणे भारतात नक्कीच झाली आहेत, हे विसरता येणार नाही. वर्गीस कुरियन यांनी केलेली श्वेत क्रांती, स्वामिनाथन यांनी केलेली हरित क्रांती, श्रीधरन यांनी केलेली वाहतूक क्रांती आणि एपीजे अब्दुल कलाम यांनी केलेली अवकाश क्रांती ही आमच्या स्वातंत्र्यपश्चात संशोधनातील सुवर्णपानेच आहेत. विजय भटकर यांचे परम संगणकातील योगदान, क्रायोजेनिक इंजीन बनवण्यात आलेले यश, पोखरण चाचणी, मंगळ-चंद्रमोहीम हे आमच्या संशोधन इतिहासातील सुवर्णक्षण आहेत. वसंतराव गोवारीकर, रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर हे आधुनिक युगातील संशोधन क्षेत्रातील भारतातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वे होत.

कोरोनानंतरच्या संशोधनाच्या वाटचालीसाठी हे संशोधन आणि ही शास्त्रज्ञांची शक्ती एका अर्थाने आमच्यासाठी 'लॉँचिंग पॅड' ठरू शकते. पण त्यासाठी आम्हाला काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवत काही बदलही करण्याची आवश्यकता आहे.

१) सर्वप्रथम संशोधन आणि त्याची नीती हा विषय संपूर्णतः राजकारणाच्या कक्षेबाहेर ठेवला पाहिजे.
२) लहान वयात संशोधन वृत्ती ओळखून तिचे संवर्धन व विकास करण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून या विषयाकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळेसहित सरकारी, खासगी शाळा कशा उभ्या राहतील हे बघितले पाहिजे.
३) महाविद्यालयीन शिक्षणातील अभ्यासक्रमाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, कारण पुस्तकी ज्ञान (थिअरी) आणि प्रॅक्टिकल यातील जे व्यस्त प्रमाण आहे, ते बदलण्याची गरज आहे.
४) मूलभूत विज्ञान अथवा कुठल्याही शाखेत शिक्षण घेणारा विद्यार्थी आणि व्यवसायिक शिक्षण घेणारा विद्यार्थी यातील लौकिक मान्यतेचे अंतर कमी करून बुद्धिमान विद्यार्थी संशोधनाकडे वळतील यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. (KVPYसारख्या योजना खूपच प्राथमिक अवस्थेत आहेत.)

येथे दोन उदाहरणे देण्याचा प्रयत्न करतो. आज आयआयटीमधून अभियंता झालेला पुढे आयआयएम किंवा आर्थिक शिक्षण संस्थेतून फायनान्स किंवा व्यवस्थापन या क्षेत्राकडे वळतो. संशोधनाची त्याची वृत्ती एक तर अकाली नष्ट होते किंवा तो प्रवेशाच्या स्पर्धेत मानसिकदृष्ट्या इतका थकून जातो की पुढे त्याच्याकडून निर्मिती अथवा संशोधनाची अपेक्षा पूर्ती होतच नाही.

दुसरे उदाहरण आहे प्रशासकीय सेवेचे. करिअर म्हणून आज अनेक हुशार विद्यार्थी त्याकडे बघत आहेत. प्रशासनात हुशार विद्यार्थी येत आहेत ही स्वागतार्ह गोष्ट आहे, पण ते यासाठी विज्ञानात किंवा अभियांत्रिकीमध्ये बेसिक पदवी घेतात. महाराष्ट्रात कृषीविज्ञान पदवी हे अलीकडील मोठे उदाहरण आहे. ही पदवी घेता घेता यूपीएससी किंवा एमपीएससी परीक्षा देतात आणि अधिकारी बनत आहेत.

वरील स्थितीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी संशोधनाच्या धोरणात बदल आवश्यक आहेत. कारण संशोधनासाठी लागणारी मनुष्यशक्ती
ही पुढील काळासाठीच्या संशोधनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. यात मुख्यत्वे
१) शेती उत्पादन, त्यावरील प्रक्रिया, हवामानाचा अंदाज घेऊन उत्पादने, जमीन, पाणी आणि हवामान याला अनुरूप उत्पादने, त्यासाठी बियाणे यावर संशोधन यासाठी संशोधन केंद्रांचा विकास आवश्यक आहे. (जगभरात मांसाहार कमी होण्याची शक्यता आहे, अशा वेळेस त्याला योग्य प्रकारे पर्याय ठरेल अशी वनस्पतिजन्य उत्पादने घेण्यावर संशोधनाची गरज आहे, हे येथे लक्षात घ्यावे लागेल.)
२) माहिती तंत्रज्ञान या विषयात दोन गोष्टींचे मोठे आवाहन आहे, ते म्हणजे सायबर सुरक्षा आणि डाटा सुरक्षितता. नवीन नवीन अॅप्स येत आहेत, पण ती सगळी मूळ परकीय सर्व्हर्सशी जोडलेली आहेत. आपल्याला भारतीय बनावटीचे अॅप निर्माण करणे गरजेचे आहे, जे गूगल मॅप, झूम या सगळ्याची जागा घेऊ शकेल. आज एका अर्थाने माहिती तंत्रज्ञानातील भारतीय मेंदू सिलिकॉन व्हॅलीपासून समस्त अन्य देशांना मोठे करत आहे. कोरोनानंतर कदाचित भारतात परतणाऱ्या ह्या मनुष्यशक्तीला योग्य पद्धतीने आणि प्रतिष्ठेने या संशोधनात सहभागी करून घेता येईल.
३) औद्योगिक क्षेत्रात जसे सीएसआर सक्तीचे केले आहे, तसे संशोधनाकडे लक्ष देत असताना सरकार आणि खासगी क्षेत्र यांच्या सहकार्याने काही संशोधन क्षेत्रे विकसित करता येतील. त्यासाठी राखीव निधी ठेवणे सक्तीचे करता येईल.
४) आपल्या अवकाश क्षेत्रातील उपग्रह संशोधनाचा उपयोग हवामान संशोधनासाठी करता येईल का? अलीकडील काळात शेती व्यवसायात होणाऱ्या नुकसानचे महत्त्वाचे कारण हवामान बदल हे आहे. अवकाश संशोधनाच्या दिशा बदलता येतील का?
५) बायोटेक आणि सूक्ष्मजीवशास्त्र यात संशोधनाचे प्रावधान वाढवणे ही काळाची गरज आहे. कोरोना हे जैविक अस्त्रच आहे, फक्त फसले गेल्यामुळे त्याचे पितृत्व कुणी स्वतःकडे न घेता दुसऱ्यावर ढकलू पाहत आहे. डीआरडीओसारख्या संस्थांमध्ये यावर संशोधन होऊ शकते.
६) शासकीय संशोधन संस्थांचे सतत परीक्षण, निरीक्षण आणि गुणवत्ता चाचणी याची एक पद्धत विकसित करणे गरजेचे आहे. कारण मध्यंतरी शेकटकर समितीने काही संस्थांचा अभ्यास करून अनेक संस्था पांढरा हत्ती झाल्या आहेत आणि त्यात होणारे संशोधन हे कालबाह्य आहे असे म्हटले होते. या समितीच्या शिफारशी स्वीकारल्या होत्या, पण त्यावर कार्यवाही होणे आवश्यक आहे.
७) पाणी हा असा विषय आहे, ज्यात आपण कालपर्यंत संवर्धन एवढाच विचार करत होतो. पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे आव्हान आपण जेमतेम पेलत नाही, तर जमिनीखालील पाणी अशुद्ध होण्याचा मोठा धोका समस्त मानवजातीसमोर येऊ घातला आहे. औद्योगिक आणि घरगुती पाण्याचा निचरा करण्याचे जे चुकीचे धोरण माणसाने अवलंबले, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. यावर संशोधन ही काळाची गरज आहे.
८) विद्युत शक्तीवर वाहने ही काळाची गरज आहे. त्यासाठी लिथियम बॅटरीच्या संशोधनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पर्यावरण आणि परकीय चलन या दोन्हीचे संवर्धन यातून होईल.
उत्पादनाचे सूत्र जसे 'मेक इन इंडिया' आहे, तसे संशोधनाचे सूत्र 'फ्रॉम इंडिया फॉर ग्लोबल ह्युमॅनिटी' असे काहीसे ठरवावे लागेल.

एकूणच मनुष्यशक्तीची संशोधक वृत्ती विकसित करत, योग्य प्रकारचे साधन आणि संसाधन उपलब्ध करून देत एक निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवता आले, तर मनुष्यकल्याणाचे नियतीने दिलेले आपल्या देशासाठीचे कर्तव्य आपण पूर्ण करू शकू, असे वाटते. याबरोबर शासनाने संशोधकांना प्रोत्साहन मिळेल असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. सैन्य पोटावर चालते हे सत्य स्वीकारून आर्थिक प्रावधान तसे करण्याची गरज आहे. साधने आणि वातावरण योग्य निर्माण केल्यास भारतीय संशोधक जगाला एका वेगळ्या संशोधनाच्या वाटेवर नेऊ शकतील. उद्याचे संशोधन जग भारताचे आहे आणि त्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा संकल्प करणे गरजेचे आहे.
(क्रमशः)
नीरकक्षीरविवेक.