गोष्ट... रक्तापलीकडच्या अतूट नात्याची

विवेक मराठी    08-Apr-2020
Total Views |
   

चित्रलिपी 

पालकत्वाची जबाबदारी रक्ताच्या नात्यानेच येते, असा एक समज आहे. दत्तक मूल हा नाइलाजाने स्वीकारलेला पर्याय आहे असाही एक समज आहे. खरे तर दत्तक मूल ही मानसिकता आहे. वात्सल्याला सीमा नसते. जन्मदात्या आईच्या पोटात बाळाची आणि आईची नाळ जोडलेली असते. जन्मानंतर नाळ तोडली, तरी त्यांचे नाते अखंड राहते. दत्तक घेणे हे एकदा स्त्री-पुरुषांनी मनाशी ठरवले की ही नाळ मनात जोडली जाते आणि मग मात्र उरते ते निखळ ममत्व. ही अदृश्य नाळ कापली जात नाही. ह्या नाळेबरोबरच विश्वासाचे नातेही जोडले जाते. हा जोड निरपेक्ष प्रेमाने, आपुलकीने, काळजीने किती घट्ट बांधला जातोय यावरच पुढचे नाते सुखाचे होऊ शकतेमणी रत्नम यांचा 'कन्नथील मुथामित्ताल' (Kannathil muthamittal) हा तामिळ चित्रपट हा अनवट बंध उलगडून दाखवतो.

Kannathil muthamittal_1&n

कन्नथील मुथामित्ताल म्हणजे गालावर प्रेमाने केलेला ओठांचा स्पर्श. चित्रपट सुरू होतो श्रीलंकेतील मानकुलम नावाच्या छोट्या गावात. शामा आणि दिलीपन या दोन व्यक्ती लग्नाच्या बंधनात अडकतात. दिलीपन हा तामिळ दहशतवादी गटाचा कार्यकर्ता आहे. काही दिवस सुखात जातात, पण मग त्यांच्या सहजीवनाला नजर लागते. गावात सैन्य शिरते. दिलीपन शामाला माहेरी पाठवतो आणि स्वतः जंगलात शिरतो. ती गरोदर आहे हे लक्षात आल्यावर शामाचे वडील शरणागत म्हणून जलमार्गाने भारतात येण्याचे ठरवतात. सैन्याच्या हल्ल्यात दिलीपन जखमी झाला आहे हे शामाला समजते, पण उशीर झालेला असतो. बोट निघालेली असते.


रामेश्वरमला आल्यावर शामाची प्रसूती होते. एका गोड मुलीची आई होऊनही, कदाचित आपला नवरा जिवंत असेल या आशेने आपल्या नवजात मुलीला इथेच ठेवून ती श्रीलंकेला परत जाते. आई-वडिलांना जन्मतः गमावून बसलेली ही मुलगी मात्र सुदैवी असते. एका इंजीनिअरला - थिरुचेलवनला लेखक बनण्यास ती प्रवृत्त करते. ती छोटीशी बाळमूर्ती त्याच्यातल्या पितृत्वाला साद घालते. तिला दत्तक घेण्याचा त्याचा निश्चय पक्का होतो. आता गरज असते ती त्याला समजून घेणाऱ्या सहचारिणीची. ही गरज पूर्ण करते त्याच्यावर मनोमन प्रेम करणारी इंद्रा.

लग्नानंतर ते दोघे या छोट्या मुलीला, अमुधाला कायदेशीररीत्या दत्तक घेतात. चित्रपटाचा हा फ्लॅशबॅक. मणी रत्नम यांच्या सिनेमात काळाचा लपंडाव अनेक वेळा दिसतो. भूतकाळ, वर्तमान एकमेकांत गुंफणे ही त्यांच्या दिग्दर्शनाची खासियत आहे.


Kannathil muthamittal_1&n

चित्रपटाची खरी कथा सुरू होते ती नऊ वर्षांनी. अमुधा आणि तिचा आपल्या जन्मदात्या आईला शोधण्यासाठी केलेला प्रवास हा या कथेचा जीव. अमुधा आणि तिच्यानंतर झालेले विनय आणि अखिल, कुटुंब पूर्ण करतात. हसरी, खेळकर, हुशार, चौकस अमुधा सर्वांचीच लाडकी असते. कौतुकात वाढलेली ही मुलगी नऊ वर्षांची होते आणि तिचे वडील तिला तिच्या जन्माचे सत्य सांगायचे ठरवतात. स्वतःच्या मुलाला अथवा मुलीला दत्तक घेतलेले आहे हे त्यांना सांगणे पालकांसाठी फार कठीण असते. सत्य परिस्थिती ऐकल्यावर मूल कशी प्रतिक्रिया देईल हे कुणाला माहीत नसते. अचानक हे सत्य समजले तर अनेक वेळा मुले सैरभैर होतात. अचानक 'को अहं' हा प्रश्न उभा राहतो. आई-वडिलांबद्दल वाटणाऱ्या हक्काची जागा कृतज्ञता घेते. आपण परक्या लोकांच्या घरात राहतोय की काय या विचारामुळे कानकोंडे वाटते. अमुधा याच कोंडीत सापडते. आपली भावंडे, ज्यांच्यावर ती सहज ताईगिरी गाजवत असते, त्यांना जर हे सत्य समजले तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल! आपण एवढे सावळे का? आई आपल्याला का टाकून गेली असेल? आपले वडील कोण असावेत? हे प्रश्न तिला कासावीस करतात. आपल्या आईचा पत्ता शोधण्यासाठी अमुधा कोणालाही न सांगता रामेश्वरमला निघून जाते.

'आई' म्हटले की प्रेम, माया, आपलेपणा अशा सर्व ऊबदार भावभावना मनात जाग्या होतात. या नात्यात कधी औपचारिक, परतफेडीचा किंवा व्यवहारी विचार नसतो. ती सोबत असताना निर्धास्त वाटते. आतापर्यंत ह्याच भावना अमुधाला इंद्राबाबत वाटत असतात, पण आता मात्र अचानक उघड झालेल्या या रहस्याने तिला असुरक्षित वाटते. इंद्रा आणि थिरुचेलवन दोघांचे मात्र या मुलीवर जिवापाड प्रेम असते. हे तिला पटवून देण्याचा एकच मार्ग असतो - तिची आणि जन्मदात्या आईची भेट घडवून आणणे.



यात बराच धोका असतो
. श्रीलंकेतील राजकीय परिस्थिती अस्थिर असते. सरकारमध्ये असलेले सिंहलींचे वर्चस्व आणि तामिळींना मिळणारी दुय्यम वागणूक यामुळे येथील तामिळ समुदाय स्वतंत्र तामिळ राष्ट्राची मागणी करतो. त्यातून सुरू होतो तो वांशिक संघर्ष. नंतरच्या काळात तो अधिक हिंसक आणि क्रूर होतो. अशा वेळेला अमुधाला तिथे घेऊन जाणे, तिच्या आईचा शोध घेणे हे अतिशय कठीण काम असते.

आपल्या दोन मुलांना आजोबांकडे ठेवून हे तिघे श्रीलंकेला प्रयाण करतात. त्यांना मदत करतो एक सिंहली डॉक्टर, हेरॉल्ड विक्रमसिंघे, जो थिरुचेलवनच्या लिखाणाचा चाहता असतो. अतिशय स्फोटक परिस्थिती, पावलापावलावर असणारा मृत्यूचा सापळा, अतिरेक्यांकडून मारले जाण्याचा धोका या सर्वांवर मात करून ते अमुधाच्या आईचा शोध लावण्यात यशस्वी होतात.

सशक्त स्त्री भूमिका हे मणी रत्नम यांच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. नंदिता दास हिने अमुधाच्या जन्मदात्रीची भूमिका केली आहे. सुरुवातीला अतिशय अल्लड, निरागस असलेली ही मुलगी नंतर परिस्थितीच्या रेट्याने कठोर होत जाते. एका हळव्या मुलीचे रूपांतर अतिरेक्यात होते. लग्नानंतर आपल्याला निदान आठ तरी मुले हवीत असा लाडिक हट्ट करणारी ती, जन्मजात मुलीला आश्रमात ठेवून जाते. नंतरसुद्धा तिला भेटायचे नाकारते. पण शेवटच्या क्षणाला मात्र मुलीला छातीशी धरल्यानंतर भरून आलेले डोळे ती लपवू शकत नाही. नऊ वर्षांचा बांध फुटून जातो.

कीर्तना या मुलीने अमुधाची भूमिका रंगवली आहे. हे चित्रण एवढे वास्तववादी आहे, अस्सल आहे की तिची वेदना, तिची असुरक्षितता, भांबावलेपण हे सारे आपण जगतो. नवल नाही, त्या वर्षीचा लहान मुलांसाठी असलेला राष्ट्रीय पुरस्कार तिच्या नावावर जमा झाला.


Kannathil muthamittal_1&n

या दोन सशक्त भूमिकांत, दुय्यम असूनही अतिशय महत्त्वाची भूमिका आहे ती इंद्राची. लहान वयात दुसऱ्याच्या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय ती घेते. थिरुचेलवन मुलीसाठी आपल्याशी लग्न करायला तयार झाला आहे हे माहीत असूनही त्या मुलीला आपली मानते. अमुधा आपल्या जन्मदात्रीला भेटली, तर कदाचित आपल्यापासून दूर जाईल याची तिला भीती आहे, तरीही स्वतःचा जीव धोक्यात टाकून ती आई-मुलीची भेट घडवून आणते. सिमरन ही भूमिका अक्षरश: जगली आहे.

तसा हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्याचा, पण या चित्रपटातील वडील (माधवन) आणि मुलीचा बंधसुद्धा अनोखा आहे. इंजीनिअर असलेला थिरुचेलवन लेखक होतो, त्याचे कारण असते ही मुलगी. तिला पाहूनच त्याला आपली पहिली कथा सुचते. केवळ तिला दत्तक घेता यावे म्हणून तो लग्नाला तयार होतो. तिच्या जन्माचे सत्यही तोच सांगतो. तिला सावरायला वेळ देतो. अमुधा जेव्हा त्यांच्याशी उर्मट वागते, तेव्हाही तो तिला समजून घेतो. स्वतःचा जीव धोक्यात घालून तिच्यासाठी श्रीलंकेला जाण्यास तयार होतो. कदाचित हे एक कारण असेल, ज्यामुळे अमुधा आपल्या खऱ्या वडिलांना भेटण्याचा आग्रह धरत नाही. तिच्यासाठी थिरुचेलवन हाच तिचा खरा पिता असतो.


MOVIE_1  H x W:

दहशतवाद ही कन्नथील मुथामित्ताल ह्या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे. दहशतवादाच्या हिंसाचारात गेलेले बळी म्हणजे केवळ मरण पावलेली माणसे नसतात, तर सर्वसामान्य लोकांचे सामान्यपणे जगणे हा दहशतवाद नष्ट करतो. अशा परिस्थितीतसुद्धा टिकलेली कुटुंबव्यवस्था, कर्तव्याची जाणीव आणि बाँम्बच्या स्फोटात, गोळ्यांच्या वर्षावातसुद्धा एकमेकांना तारून नेणारे प्रेम आशेचा दीप तेवत ठेवते.

चित्रपटाच्या शेवटी, मुलीचा आग्रह न मानता शामा आपल्या गोटात परत जाते, पण "केव्हातरी या देशात शांतता नांदेल आणि तेव्हा मी तुला भेटेन" हे तिचे उद्गार, पहाट होईल याची आशा जागवतात. अमुधाच्या आयुष्यातले वादळ मात्र शांत होते. आईला निरोप देतानाच अमुधा इंद्राच्या गालावर प्रेमाने ओठ टेकवते. आई-मुलीच्या नात्याचा तो पुनर्जन्म असतो.