भरभराटीची आणखी एक सुवर्णसंधी संधी

विवेक मराठी    01-May-2020
Total Views |
@सुधीर मुतालीक (9822197343)

mh_1  H x W: 0

कोविड-१९मुळे थोडे थांबायला लागते आहे हे मान्यच आहे. उंच शिखर चढताना गिर्यारोहक मध्ये थोडा वेळ थांबतातच. पण ते थांबणे त्या 'थांबला तो संपला'मधले थांबणे नसते. थांबत सरकणे ही गिर्यारोहणाच्या परिभाषेतली 'रेस्ट स्टेप' आहे. शिखर स्पष्ट दिसते आहे. तिथे पोहोचण्याची जिगर आणि ऊर्मी मराठी मातीत तर आहेच. महाराष्ट्र विशेषतः उद्योगांच्या बाबतीत सदैव अग्रेसर असतो. उद्योग करणे हे एक कमालीचे झिंग आणणारे गिर्यारोहणच आहे. त्यामुळे अशा साहसी खेळात मराठी मातीत रुजलेला माणूस मागे राहणे अशक्य आहे. महाराष्ट्राची आजवरची औद्योगिक घोडदौड मराठी मातीमध्ये रुजलेल्या असामान्य साहसाची आणि चतुरस्र मराठी स्वभावाची साक्ष देणारी आहे. उदाहरणार्थ, फारशी चर्चा न झालेली एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रचंड मोठी घटना गेल्या पाच-साडेपाच वर्षांत महाराष्ट्रात झाली आहे - या कालावधीमध्ये दहा लाख नवीन छोटे उद्योग सुरू झाले आहेत. नवीन आणि छोटे उद्योग हे खूप महत्त्वाचे. या छोट्या उद्योगांनी महाराष्ट्रात केलेली एकत्रित गुंतवणूक डोळे दिपवणारी आहे. एक लाख साठ हजार कोटी रुपये! महाराष्ट्र राज्याचे हे अफलातून यश आहे. आशिया खंडातच नव्हे, तर संपूर्ण जगात सर्वाधिक केळी पिकविणारा जिल्हा महाराष्ट्रात आहे - जळगाव. देशात सर्वाधिक द्राक्ष निर्यात करणारे ठिकाण आपल्या राज्यात आहे - नाशिक. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही निर्यात करणारी कंपनी कुणा व्यापाऱ्याची नाही, तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर स्थापन केलेली 'सह्याद्री' नामक कंपनी देशातली सगळ्यात मोठी द्राक्ष निर्यातदार आहे. देशातला सगळ्यात मोठा जमीन मालक महाराष्ट्रामध्ये आहे - आपली MIDC. एकूण दोन लाख वीस हजार एकर जमीन संपादित करून उद्योग उभारणीसाठी त्याचा अतिशय योग्य वापर करणारी आपल्या राज्यातली ही संस्था. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या संस्थेने बळाचा वापर करून, कुणाची हाय खाऊन, गळ्यावर बंदूक ठेवून हे जमीन संपादन केलेले नाही - इथे सिंगूर कधीही झालेले नाही, ना पिकविणाऱ्या जमिनीची नासाडी. महाराष्ट्राचे उत्पादन एकूण देशाच्या घसघशीत पंधरा टक्के आहे - म्हणजे महाकाय. गेल्या वर्षी २०१८-१९ सालात एकूण एक लाख सत्तर हजार
कोटी रुपयांचा विक्री आणि सेवाकर (GST) एकट्या महाराष्ट्राने केंद्रीय तिजोरीत भरला आहे, जो केंद्र सरकारच्या एकूण वसुलीच्या पंधरा टक्के आहे. राज्याचा साडेआठ ते नऊ टक्के वृद्धिदर देशाच्या वृद्धिदाराच्या खूप पुढे आहे आणि देदीप्यमान आहे. अशी अनेक प्रकारची आकडेवारी बघितली तर खात्री पटेल की राज्य एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करायच्याच मार्गावर आहे. कोविडमुळे थोडे थांबायला लागत असले, तरी शिखर स्पष्ट दिसते आहे. काय आहे शिखर? कोणते आहे?


mh_1  H x W: 0
महाराष्ट्राने गेल्या दोन वर्षांत एक मोठे स्वप्न बघितले आहे. माझ्यासारख्या अनेक उद्योजकांना मोहित करणारे आनंददायक स्वप्न. २०२५ सालापर्यंत महाराष्ट्र राज्याची आर्थिक उलाढाल १ ट्रिलियन (१,००० अब्ज) डॉलर्स करण्याची - One Trillion Dollar Economy. हे आम्हाला स्वच्छ स्पष्ट दिसणारे शिखर आहे, जे आपल्याला गाठायचे आहे. आजवरचा महाराष्ट्राचा आर्थिक इतिहास अभ्यासला, तर हे सहज कळेल की संपूर्ण देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जे असे भव्य स्वप्न बघू शकते आणि साकारदेखील करू शकते. कारण महाराष्ट्राचे देशाच्या जीडीपीमध्ये जर १५% योगदान असेल, तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाची किंवा त्यानंतरची राज्ये जीडीपीमधल्या योगदानाच्या बाबतीत पन्नास टक्क्यांहून खाली आहेत, उदा., तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, वगैरे राज्ये सुमारे आठ, साडेसात टक्के इतकेच योगदान जीडीपीमध्ये देत आले आहेत. अलीकडच्या काळात राज्यात एक महत्त्वाचा बदल दिसतो आहे, तो असा की राज्याचा आर्थिक विकास शेतीवर आता अवलंबून न राहता उद्योग हे आर्थिक विकासाचे केंद्र बनले आहे. उद्योग क्षेत्राचे सेवा आणि उत्पादन असे दोन भाग केले, तर राज्यातल्या सेवा उद्योगांनी प्रचंड मोठी झेप घेतल्याची दिसते आहे आणि वेगाने या क्षेत्राची वाढ होते आहे. शेतीपेक्षा उद्योग क्षेत्राची उत्पादकता सात पट असेल, तर सेवा क्षेत्राची उत्पादकता नऊ पट आहे. अर्थात त्यामुळेच राज्याच्या एकूण उत्पादनात उद्योग क्षेत्राचे ३१ टक्के योगदान असेल, तर शेतीचे केवळ १२ टक्के आहे. सेवा क्षेत्राचे योगदान मात्र घसघशीत ५७% इतके योगदान आहे. स्वाभाविकपणे स्वप्नपूर्तीच्या प्रयत्नात सेवा क्षेत्राकडून अधिक अपेक्षा असणार. त्यामुळे आगामी पाच-सहा वर्षांत सेवा क्षेत्रावर अधिक भर असणार आणि अर्थातच त्या क्षेत्रात संधीदेखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल.

२०२५ सालापर्यंत One Trillion Dollar Economy हे स्वप्नरंजन नाहीये आणि ते वास्तविक ध्येय आहे असा विश्वास राज्यातल्या आम जनतेने आणि सरकारी यंत्रणेने बाळगण्याची मात्र आवश्यकता आहे. कारण त्याखेरीज स्पष्ट कार्यक्रम ठरविता येणार नाही आणि ठरविला तरी अमलात आणण्याची जिगर उत्पन्न करता येणार नाही. कोविड-१९ म्हणजे, सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे तात्पुरती विश्रांती आहे. भयंकर दूरगामी परिणाम करणारी ती घटना नव्हे. आणि आता तर अगदी स्पष्ट होते आहे की कोविड-१९ ही भारतीयांसाठी इष्टापत्ती आहे.
MH_1  H x W: 0
कोविड-१९मुळे विकसित देशांचे पितळ मात्र उघडे पडले आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या एक दशांशपेक्षादेखील कमी लोकसंख्या असलेल्या पण श्रीमंत म्हणून गणल्या गेलेल्या भल्याभल्या राष्ट्रांना कोरोनाचे संकट हाताळताच आलेले नाही, याचे चित्र आपल्या डोळ्यासमोर आहेच. फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर व्यवस्थात्मकदृष्ट्यादेखील गलितगात्र झालेल्या या राष्ट्रांचा चीनवर प्रचंड राग आहे. एकतर चीनमधून या आपत्तीची सुरुवात झाली आणि दुसरे म्हणजे समस्त जगाची अशी तक्रार आहे की चीनने या विषाणूबद्दल आणि त्यामुळे पसरणाऱ्या महामारीबद्दल जगाला अंधारात ठेवले. चीनने आम्हाला फसविले अशी भावना आहे जगभरात. ज्या पाश्चात्त्य आणि अमेरिकन राष्ट्रांनी चीनकडे आपले कारखाने चालवायला दिले, त्यांना त्यांची एक भीषण चूक ध्यानात येते आहे, ती अशी की त्यांनी गेल्या वीस-बावीस वर्षांत कधीच रिस्क मॅनेजमेंट केले नाही. या समस्त राष्ट्रांची समस्या आहे त्यांच्या स्वभावातील उपभोगवाद - कन्झ्युमेरिझम. त्यांच्या अवास्तव, अवाढव्य मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना महाकाय कारखाने उभे करायचे होते आणि त्यावर झालेला अधिक खर्च भागविण्यासाठी आणखी मोठी बाजारपेठ. चीनने ही गरज सर्व शक्तीनिशी भागवताच या समस्त श्रीमंत राष्ट्रांनी धडाधड आपले कारखाने तिथे उघडले आणि जे जे शक्य आहे ते सगळे तिथे बनवायचा सपाटा लावला - अगदी शवपेट्यांपर्यंत. आता गेल्या वीस वर्षांत ही राष्ट्रे आपले उत्पादन करण्याचे कसब एका बाजूला हरवून बसले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांना चीनवर आता अजिबात विसंबून राहायचे नाही. जपानने तर आपल्या उद्योजकांना चीनमधले कारखाने अन्यत्र हलविण्यासाठो आर्थिक मदतीची तरतूद केली आहे, इतके हे सर्व चीनला विटले आहेत. त्यामुळे या श्रीमंत जगाला आता भारताकडे वळण्याव्यतिरिक्त काहीही पर्याय नाही. किंबहुना तेथील काही उद्योजकांना आपण याआधीच का भारतात का आपले कारखाने थाटले नाहीत, याचा पश्चात्तापदेखील होत असेल. सुमारे एक हजार विदेशी कंपन्यांनी भारतामध्ये आपले कारखाने थाटण्यासाठी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी बोलणीदेखील सुरू केली आहेत. चीन बेभरवशाचा ठरणे विदेशी कंपन्यांनी भारतात कारखाने थाटण्याचे एक कारण आहे, तसे आणखी एक कारण आहे. आंतराष्ट्रीय नाणे निधीने समस्त जगातल्या देशांच्या आगामी वर्षभरातल्या आणि त्यानंतरच्यादेखील एक-दोन वर्षांतल्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला आहे. जगातले बहुतेक देश त्यांच्या विकासदराचा विचार करता खाईतच जाणार आहेत. म्हणजे शून्याखाली विकासदर. भारताचा विकासदर मात्र सुमारे दोन टक्के असेल, असे या संस्थेला वाटते. जगाच्या दृष्टीने ही दिलासादायक बातमी आहे. पैसे गुंतविल्यावर ज्या देशात योग्य परतावा मिळेल तिथे गुंतवणुकीचा वेग वाढेल हे सहज कळण्यासारखे आहे. त्याचमुळे कोविड-१९ ही भारतीयांसाठी इष्टापत्ती आहे. आगामी एक-दोन वर्षांत बरेच विदेशी कारखाने भारतात येतील. त्यामुळे इथे रोजगारनिर्मिती वगैरे होईलच. परकीय गुंतवणूक येणे हे अर्थव्यवस्थेला टॉनिक पाजण्यासारखे आहे.

इसवीसन दोन हजार सालापासूनचा गेल्या वीस वर्षांतला महाराष्ट्राचा आर्थिक इतिहास बघितला तर ध्यानात येईल की देशात येणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी सरासरी तीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये येते. महाराष्ट्र राज्य अनेक कारणांनी परकीय गुंतवणूकदारांचे अशा अर्थाने लाडके राज्य आहे. त्यामुळे राज्याच्या त्या One Trillion Dollar Economy उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर परकीय गुंतवणूक येण्याची हालचाल अत्यंत उत्साहवर्धक घटना आहे. परकीय गुंतवणूक येण्याचे एक महाद्वार कोविड-१९च्या निमित्ताने उघडले आहे, त्याचा राज्याला तुलनेने अधिक फायदा होईल.

फक्त या सुवर्णसंधीच्या पार्श्वभूमीवर मला एक पुसटशी चिंता वाटते आहे, ती अशी की महाराष्ट्रातल्या आणि अन्यत्र देशातल्यादेखील जनतेला हे कळेल का की 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' या भाबड्या समजुतीला या सगळ्या प्रक्रियेमध्ये काहीच अर्थ नाही? पन्नास-साठच्या किंवा अगदी अलीकडे नव्वदच्या दशकापर्यंत जो समज होता, तो आता निरर्थक आहे. गुंतवणूक आणण्याचे काम सरकारचे नाही. ते लोकांनी करायचे आहे. वास्तविक लोकशाही व्यवस्थेमध्ये बरेच काही लोकांनीच करायचे असते, हे भारतीय जनतेला अजूनही कळलेलेच नाही. इंग्रज असताना जे काही करायचे ते साहेब करेल हे बरोबर होते. कारण साहेबाला आपल्याला काही करूच द्यायचे नव्हते. तो देईल तेवढे घ्यायचे हीच व्यवस्था होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर तत्कालीन सरकारने साम्यवादी मॉडेल डोळ्यासमोर ठेवून विकासाचा घाट घातला आणि जे काही करायचे ते सरकार करेल अशी आधीचीच जनतेची सवय सुरू ठेवली. त्यामुळे प्रजासत्ताक हा प्रकार अजूनही जनतेच्या अंगवळणी पडतच नाही. सत्ता असणारी प्रजा राजा आहे की सेवा देणारा कलेक्टर साहेब आहे याविषयी समाज गोंधळलेलाच आहे. त्यामुळे सेवा देणाऱ्या यंत्रणेला खिशात ठेवण्याची फुशारकी मारणारा समाज त्यांच्याकडून रस्ते, गटारी, औद्योगिक वसाहती आदी बांधून घेणे हे आपले काम आहे आणि त्या सेवा पुरविणे हे त्या प्रशासकीय अधिकाऱ्याचे काम आहे हे साफ विसरलेला आहे. आज ही जे काही करायचे ते सरकार किंवा साहेब करणार असाच समज रूढ आहे. गावोगावी एक टिपिकल विधान ऐकू येतेच - 'गावाचे नेतृत्व करणारे सक्षम राजकीय नेतृत्व आमच्याकडे नाही.' हे विधान आपल्या गंडलेल्या प्रजासत्ताकाचा पुरावा आहे. गावाचे नेतृत्व जनतेनेच करायचे असते. राजकीय, वैयक्तिक वाद, स्वार्थ यापलीकडे जाऊन पाणी, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग या क्षेत्रात योगदान देऊ शकतील अशा जाणत्या लोकांकडे सामाजिक नेतृत्व लोकांनीच बहाल करावे लागेल. उद्योगाचा विषय असल्यामुळे नाशिक, ठाणे, कोल्हापूर, यवतमाळ, भंडारा, नांदेड आदी गावांमधल्या कर्तबगार लोकांनी एकत्र येऊन विचारमंथन करावे लागेल. गावच्या पाच हजार लोकांना रोजगार देऊ शकेल असा कोणता उद्योग आपल्या गावी थाटला जाऊ शकतो, याचा अभ्यास करावा लागेल. गावातल्या सोयींचा आढावा घ्यावा लागेल. पाणी, रस्ते आदी बाबतीत कमतरता असेल तर सरकारकडून योग्य कामे करून घ्यावी लागतील आणि मग आपल्या तयार गावाचे मार्केटिंग करावे लागेल. हे सातत्याने करावे लागेल. शंभर ग्राहकांकडे गेल्यावर एक ग्राहक "पाणी पाहिजे का?" विचारतो आणि हजारातला एक धंदा देतो. कोरोनामुळे उद्योगधंद्यांसाठी दरवाजे उघडले जातील, पण येणाऱ्या लक्ष्मीला आत घेण्याची तयारी आम जनतेला करावी लागेल आणि त्या कामी सरकारला, प्रशासकीय यंत्रणेला जुंपावे लागेल. इसवीसन दोन हजारच्या आधी सुमारे आठ वर्षे अशी संधी आली होती. आपल्या दारी आलेली संधी झोपलेल्या लोकांच्या ध्यानातच न आल्यामुळे चीन, कोरिया, सिंगापूर, थायलंड या देशांनी पळवून नेली. चीनचा उदय फार जुना नाही, अगदी अलीकडला आहे. मुद्दा असा आहे की हे आपल्याला आज तरी कळणार आहे का? आगामी किमान पाच वर्षे ती संधी हातात चांदीच्या ताम्हणात तेजस्वी ज्योतींची तुपाने भरलेली निरांजने घेऊन उंबरठ्यावर पुन्हा एकदा उभी राहणारच आहे. गावचा पुढारी जे काही करायचे ते करेल, सरकार करेल, मोदी तर आहेच असे समजून 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' अशी धारणा असणाऱ्या जनतेला डुलकी घ्यावीशी वाटली, तर आशिया खंडात आणखी एखादा देश पुन्हा एकदा आपल्या तोंडाचा घास पळवून नेऊ शकतो.