पाकिस्तानचा ‘कोरोना बॉम्ब’

विवेक मराठी    10-May-2020
Total Views |
सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी झटत आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेही राष्ट्रांना परस्परांमधील संघर्ष बाजूला सारून मदतीचे आवाहन केले आहे. असे असताना पाकिस्तान मात्र आपला जुनाच अजेंडा पुढे घेऊन जाताना दिसत आहे. उलट भारताला अडचणीत आणण्यासाठी सध्या सुसंधी आहे, असे मानून पाकिस्तानने तीन कलमी कारस्थान आखले आहे. यातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या देशातील कोरोनाग्रस्तांना पाकिस्तान भारतात घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी डाव आखत आहे. भिकेकंगाल होऊनही पाकिस्तानला सद्बुद्धी झालेली नाही, हे दुर्दैव आहे.


pak_1  H x W: 0
संपूर्ण भारत कोरोना - कोविड-१९ महामारीचा सामना करत आहे. आतापर्यंत दोन वेळा लॉकडाउनला मुदतवाढ देण्यात आली असून सध्या तिसरा टप्पा सुरू आहे. या संपूर्ण काळात भारताच्या अडचणी कमालीच्या वाढल्या आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेवर, विशेषतः: उद्योग जगतावर या लॉकडाउनचा नकारात्मक परिणाम झालेला आहे. त्यावर मात करण्यासाठी अवघा देश प्रयत्न करत असताना आपला शेजारी देश असणारा पाकिस्तान मात्र भारताच्या अडचणी वाढवण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. विशेष म्हणजे, आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला पाकिस्तान स्वतःदेखील कोरोना महामारीचा सामना करत आहे. तेथील रुग्णसंख्या २० हजारांपुढे गेली आहे. मात्र या संकटावर मात करणे ही त्यांची प्राथमिकता नसून पुन्हा एकदा भारताला लक्ष्य करण्यातच पाकिस्तान धन्यता मानत आहे. किंबहुना, यासाठीच आपली शक्ती खर्ची घालताना दिसत आहे. भारताबाबतचा आपला जुना अजेंडा आजही पाकिस्तानने कायम ठेवला आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पाकिस्तानने भारताला अडचणीत आणण्यासाठीचे प्रयत्न वाढवले आहेत. यासाठी त्यांनी एक व्यापक स्वरूपाची योजना आखली आहे. तीन टप्प्यांवर भारताला अडचणीत आणण्याचा पाकिस्तानचा कुटिल डाव आहे.
यातील पहिला टप्पा अत्यंत धोकादायक आणि पूर्णपणे अमानवी आहे. भारताचे आणखी नुकसान व्हावे यासाठी पाकिस्तान त्यांच्या देशातील कोरोनाचे रुग्ण भारतात घुसवण्याचा घाणेरडा प्रयत्न करत आहे. हा त्यांच्या कारस्थानाचा भाग असून भारताच्या सैन्यदलाकडून अलीकडेच हा कट उघडकीस आला आहे. पाकिस्तान नेपाळच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्ण भारतात घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारशी जोडलेल्या नेपाळच्या सीमेवरून या कटाची अंमलबजावणी केली जात आहे. भारत-नेपाळ सीमेवर गस्त घालणाऱ्या सशस्त्र सीमा बलांनी चंपारण्य जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांना आणि एसपींना नुकतेच एक पत्र दिले आहे. त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, पाकिस्तान काही मुस्लीम कोरोनाग्रस्तांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी भारत-नेपाळ सीमेवरील गस्त कडक करण्यात आली. पाकिस्तानचा हा ‘कोरोना बॉम्ब’ भारतात फुटू नये, यासाठी हे सैनिक जवान डोळ्यांत तेल घालून गस्त घालत आहेत. आजवर पाकिस्तान भारताला अण्वस्त्राची धमकी सातत्याने देत आला आहे आणि या धमकीच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंगही करत आला आहे. पण आता पाकिस्तानच्या 'कोरोना बॉम्ब'पासून भारताला धोका निर्माण झाला असून त्या संदर्भात अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे.
पाकिस्तानच्या या षड्यंत्राचा दुसरा टप्पा म्हणजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर हरेक प्रकारे भारताला बदनाम करणे. यासाठी पाकिस्तानकडून भारताविषयीच्या खोट्या बातम्या जगभरात, विशेषतः: इस्लामी जगतात पसरवल्या जात आहेत. इस्लामी जगताशी भारताने गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. त्याचीच परिणती म्हणून अनेक कठीण प्रसंगी इस्लामी जगत भारताच्या पाठीशी उभे राहिलेले दिसून आले आहे. बालाकोटचे प्रकरण असो किंवा जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा निर्णय असो, त्या वेळी मलेशिया, तुर्कस्तान यांसारखे अगदी तुरळक इस्लामी देश वगळता अन्य सर्व इस्लामी देश भारताच्या बाजूने उभे राहिले. त्यांनी या निर्णयावर कोणत्या प्रकारची टीकाटिप्पणी केली नाही. ही बाब पाकिस्तानला रुचलेली नाही. कारण यामुळे पाकिस्तान तोंडघशी पडला. त्याचे उट्टे काढण्यासाठी किंवा या देशांपुढे भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी पाकिस्तान सध्याच्या कोरोनाकाळात प्रयत्न करत आहे. भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी पाकिस्तानने काही हॅशटॅग मोहिमा चालवल्या आहेत. भारतात प्रचंड अनागोंदी सुरू आहे, मोदी सरकार कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे, भारतात मुस्लिमांवर प्रचंड अन्याय होत आहे, कोरोनाचे उपचार देण्यामध्ये जाणीवपूर्वक भारतात मुस्लिमांबाबत दुजाभाव केला जात आहे अशा प्रकारचे संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी पाकिस्तानने काही ट्विटर हँडलर्स नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून भारतातून काही माहिती गोळा करून, तिला चुकीचे रूप देऊन, ती चुकीच्या प्रकारे सादर करून, त्यात छेडछाड करून ट्विटर हँडलर्सच्या माध्यमातून इस्लामी जगतात पसरवणे असा प्रकार पाकिस्तान करत आहे. दुर्दैवाने, इस्लामी जगत पाकिस्तानच्या या अपप्रचाराला बळी पडताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फरन्स अर्थात ओआयसी या इस्लामी देशांच्या सर्वात मोठ्या संघटनेने भारताला अल्पसंख्याकांसंदर्भात काही सूचना केल्या आहेत. पाकिस्तानच्या याच प्रपोगंडाच्या आधारावर अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य संस्थेनेही भारताला काही सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या या अपप्रचाराकडे भारताने दुर्लक्ष करता कामा नये.
पाकिस्तानी कटाचा तिसरा टप्पा म्हणजे कोरोनाच्या बिकट काळात जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाला पुन्हा एकदा उभारी देण्याचा प्रयत्न. जम्मू आणि काश्मीरमधील ब्रेनवॉश केलेल्या स्थानिक तरुणांना दहशतवादी हल्ले-कारवाया करण्यासाठी पाकिस्तान उद्युक्त करत आहे, चिथावणी देत आहे. दुसरीकडे, सीमापार घुसखोरीलाही वेग आला आहे. एप्रिल महिन्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधून तीस घुसखोर भारतात आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची प्रशिक्षण तळे, म्हणजेच लाँचपॅड्स पुन्हा कार्यरत केली आहेत. आज तेथून भारतात घुसखोरी करण्यासाठी शेकडो दहशतवादी तयार आहेत. यासाठी पाकिस्तानने 'रेझिस्टन्स फ्रंट' नावाची एक आघाडी सुरू केली असून त्या माध्यमातून काश्मीरमधील दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी उत्तर काश्मीरवर लक्ष केंद्रित केले आहे. या उत्तर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा पाकचा डाव आहे. तसेच गेल्या काही आठवड्यांत शस्त्रसंधीचे उल्लंघनही वारंवार होताना दिसून आले आहे. या माध्यमातून लष्कराचे लक्ष विचलित करून घुसखोरांना भारतात पाठवण्याची जुनी कार्यपद्धती पाकिस्तान पुन्हा अवलंबताना दिसत आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्याकडे अतिरिक्त जबाबदारी आली आहे. देशातील गरिबांना अन्नधान्याची पाकिटे वाटणे, कोरोनाच्या चाचण्यांसाठी आरोग्य शिबिरे भरवणे यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याची मदत घेतली जात आहे. पण पाकिस्तान याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रकोप वाढत चालल्याने भारत सध्या अडचणीत आहे, त्यामुळे आपला बदला घेण्यासाठी, सूड उगवण्यासाठी हीच उत्तम वेळ आहे असे पाकिस्तानला वाटते. यासाठीच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अलीकडेच संयुक्त राष्ट्रसंघाला एक पत्र लिहून कोरोनाच्या विषयाला बगल देत जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे कसे उल्लंघन होत आहे हा जुनाच पाढा वाचला. दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या प्रश्नावर सार्क देशांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली, तेव्हाही दुर्दैवाने पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा मुद्दा उकरून काढला. एकूण काय, तर पाकिस्तानचे शेपूट आजही वाकडेच आहे. वास्तविक, जागतिक संकट बनलेल्या कोरोना महामारीच्या काळात भारताबरोबरचे संबंध सुधारण्याची चांगली संधी पाकिस्तानला आहे. भारत त्यांना मदत करण्यासही तयार आहे. मध्यंतरी याच पाकिस्तानने भारताकडे हायड्रोक्लोरोक्वीनची मागणीही केली होती. भारत त्यांना मदतही करू शकतो. पण त्यासाठी पाकिस्तानने आपली भूमिका बदलणे गरजेचे आहे. पण भिकेकंगाल होऊनही पाकिस्तानला आणि तेथील राजकारण्यांना व लष्कराला ती सद्बुद्धी झालेली नाही.