लॉकडाउनच्या काळात सोशल मीडिया ठरली जीवनसंजीवनी!

विवेक मराठी    11-May-2020
Total Views |

***व्यंकटेश कल्याणकर***
कोरोनाच्या रूपाने डोळ्यांना न दिसणाऱ्या अदृश्य स्वरूपातील राक्षसामुळे मानवी अस्तित्वावर महाभयानक संकट ओढवले आहे. `माणूस जिवंत राहावा' या एकाच हेतूने जगातील बहुतेक देशांनी कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाउनचा पर्याय स्वीकारला. मात्र, सतत कृतिशील-कार्यमग्न (एंगेज) राहण्याचा नैसर्गिक स्वभाव असलेल्या माणसाला लॉकडाउनच्या काळात आधार ठरला तो इंटरनेटचा. सोशल मीडियाने माणसांना कार्यमग्न ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि ही कार्यमग्नता नजीकच्या काळात आपली व्याप्ती अधिक वाढविण्याचे संकेत दाखवीत आहे.


internet connecting to pe 

लॉकडाउनच्या काळात रस्ते रिकामे असताना फेसबुक, व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्ड इन इत्यादी सोशल मीडिया साइट्स, झूम, लार्क, वेबेक्स इत्यादी वेबिनारची सुविधा देणारी माध्यमे तर यूट्यूब, नेटफ्लिक्स, मॅक्सप्लेअर, हॉटस्टार इत्यादी मनोरंजनाचा खजिना पुरविणारी माध्यमे माणसांच्या प्रचंड गर्दीने फुलून गेली. ही गर्दी एवढी प्रचंड होती की बॅंडविड्थवर (एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती (डेटा) पोहोचविणाऱ्या यंत्रणेवर) ताण आला आणि नेटफ्लिक्ससारख्या माध्यमांना त्यांच्याद्वारे प्रसारित केले जाणारे व्हिडिओ एचडीवरून (हाय क्वालिटी) केवळ एसडी (स्टॅंडर्स क्वालिटी) दर्जाचेच दाखविण्याची वेळ आली.

कार्यमग्नता, रंजन आणि काही अंशी प्रबोधनासाठी या सर्व माध्यमांचा वापर करण्यात आला. लॉकडाउन वाढत जाण्याची चिन्हे दिसल्यानंतर काही आस्थापनांनी, कंपन्यांनी हा कालावधी प्रशिक्षण, गुणवत्ता सुधारणा आणि चिंतनासाठी सार्थकी लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झूमचा (व्हिडिओ मीटिंग सुविधा असलेले संकेतस्थळ / ऍप) वापर वाढला. दरम्यान झूमशिवाय अन्य पर्यायही समोर आले. त्यामध्ये `गूगल डिओ'चीही मागणी वाढली आणि कर्मचाऱ्यांच्या घरांची कार्यालये झाली. प्रशासनानेही घरातूनच कामकाज सुरू केले. त्यासाठी नॅशनल इन्फॉरमॅटिक्स सेंटरने (एनआयसीने) तयार केलेल्या सुरक्षित अशा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूलचा वापर करण्यात आला. केंद्र सरकारने मंत्र्यांना आणि अन्य प्रशासकीय यंत्रणांना एनआयसीचेच टूल वापरावे असा अधिकृत सल्ला दिला. महानगरपालिका, नगरपालिका यासारख्या स्थानिक प्रशासनानेही स्वनिर्मित किंवा अधिकृत टूल्सद्वारे जनसेवेचे व्रत अखंडपणे सुरू ठेवले, तर राजकीय व्यक्तींनीही फेसबुक लाइव्हसारख्या माध्यमातून जनतेशी संवाद सुरूच ठेवला.


`-पेपर'चा गोंधळ

लॉकडाउनच्या काळात घरोघरी जाऊन छापील वर्तमानपत्रांच्या वितरणावर संसर्गाच्या धोक्यामुळे निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे बहुतेक माध्यम समूह आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माध्यम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही अनिश्चिततेची ग्रहण आले आहे. मात्र, सतत वाचकांसमोर राहावे यासाठी बहुतेक वृत्तपत्रांनी आपली ई-आवृत्ती अखंडपणे वाचकांसमोर ठेवली. त्यापैकी काही अगदी किरकोळ अपवाद वगळता सर्वच वृत्तपत्रांनी आपली ई-आवृत्ती पीडीएफ फाइलच्या स्वरूपात व्हॉट्स ऍपद्वारे शेअर केली. तिला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र त्यातून केवळ वाचकांसमोर वृत्तपत्र दिसण्याखेरीज महसुलाच्या दृष्टीने कोणताही लाभ होत नाही. याउलट जर त्या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर जाऊन ई-पेपरच्या स्वरूपात ही वृत्तपत्रे वाचली गेली असती, तर त्यातून डिजिटल जाहिरातींद्वारे (गूगल ऍडस, ऍड जेब्रा किंवा तत्सम माध्यमातून) काही महसूल प्राप्त होऊ शकला असता. भलेही तो महसूल अगदी किरकोळ ठरला असता. मात्र, त्यातून भविष्यात मोठा लाभ होऊ शकला असता. लॉकडाउनच्या काळात बहुतेक माध्यम समूहांना आपल्या वाचकवर्गाला ई-पेपरकडे (पीडीएफकडे नव्हे!) वळविण्याची आणि हळूहळू डिजिटल आवृत्तीकडे वळविण्याची सुवर्णसंधी लाभली होती. दुर्दैवाने, माध्यम समूहांनी तिचा फारसा लाभ घेतल्याचे दिसत नाही.

खाजगी क्लासेस, खाजगी शाळा यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात व्यग्र ठेवण्यासाठी ऑनलाइन क्लासेसचा पर्याय निवडला. त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सात-आठ वर्षांच्या बाळगोपाळांच्या कोमल ओठांतून `झूम' नाव बाहेर पडू लागले. कलावंतांना तर फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नवे व्यासपीठच मिळाले. कलावंतांचे समूह तयार झाले. काही विद्यापीठांनी `गूगल डिओ'द्वारे ऑनलाइन लेक्चर्सद्वारे अभ्यासक्रम सुरू ठेवले. याशिवाय हेलो, शेअरचॅट, टिकटॉक, ट्रूकॉलर, व्हीमेट या ऍप्सचीही मागणी वाढली. वाचनाची आवड जोपासण्यासाठी चोखंदळ मराठी वाचकांनी प्रतिलिपी, इनमराठी, स्टोरीटेल यासह अन्य माध्यमांना पसंती दिली. या सर्वांद्वारे लॉकडाउनमुळे घरात अडकलेल्यांचे चांगलेच रंजन झाले. काही आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांनी केलेल्या अभ्यासानुसार फेसबुक आणि तत्सम ऍपच्या डाउनलोडच्या प्रमाणात काहीही वाढ झालेली नसल्याचे म्हटले आहे. मात्र, ज्यांनी आधीच अशी ऍप्स केवळ डाउनलोड करून ठेवली होती. त्यांचे वापराचे प्रमाण वाढले, यात मात्र काहीही शंका नाही.

लॉकडाउनपूर्वी खरेदीचे नियोजन केलेल्या मंडळींची लॉकडाउमुळे निराशा झाली. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ऍप्सद्वारे खरेदी जरी शक्य झाली नसली, तरीही खरेदी इच्छुक मंडळींनी वेगवेगळ्या वस्तूंची निवांतपणे सविस्तर माहिती घेतली. त्यामुळे या ई-कॉमर्स ऍप्सवरही पुष्कळ गर्दी झाली.

अपग्रेडेशनला प्राधान्य

लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढला. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्स ऍपने वापरकर्त्यांची गरज ओळखून अपग्रेडेशनला प्राधान्य दिले. त्यासाठी रिसर्च डिपार्टमेंट कामाला लागले. मात्र, यासाठी कार्यरत बहुतेक कर्मचारी `वर्क फ्रॉम होम' करत होते. अखेरीस व्हॉट्स ऍपने काही दिवसांपूर्वीच एकाच वेळी आठ जणांना व्हिडिओ कॉलची सुविधा आणण्याचे जाहीर केले, तर फेसबुकने `फेसबुक मेसेंजर'द्वारे मल्टिव्हिडिओची सुविधा देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय फेसबुक लाइव्हद्वारे निधी संकलनाची सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याचेही कळविले. याशिवाय गूगल, ट्विटर या आणि अन्य कंपन्यांनीही आपले संशोधन विभाग कामाला लावले आहेत.

लॉकडाउननंतरचे जग आणि सोशल मीडिया

लॉकडाउननंतरचे जग कसे असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. एक मात्र खरे की लॉकडाइननंतर माणसे माणसांमध्ये सामाजिक अंतर ठेवतील. कमीत कमी स्पर्श होईल याची काळजी घेतील आणि पर्यायाने ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य देतील. याशिवाय सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून कमीत कमी मानवी हस्तक्षेपाने व्यवहार पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल. ऑनलाइन बैठका, प्रशिक्षण, मैफली (नि:शुल्क / सशुल्क), चर्चासत्रे, कार्यशाळा आदींसाठी वेगवेगळी व्यासपीठे विकसित होतील. स्वयंशिक्षणाकडे कल वाढेल. यातून कौशल्याधारित मनुष्यबळाची मागणी वाढेल, तर जास्तीत जास्त मानवी हस्तक्षेप असलेल्या कारकुनी किंवा कामाच्या पारंपरिक पद्धतीची मागणी कमी होईल. त्यामुळे प्रत्येकालाच नव्या युगातील संसाधनांच्या किमान वापराची कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज ठरेल. कल्पकता, नावीन्य आणि सर्जनशीलता यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल. विशेषत: उपलब्ध तांत्रिक संसाधने - डिव्हाइसेस, माणसांच्या गरजा आदींची सांगड घालून नवे शोध आणि सोयी-सुविधा निर्मितीकडे कल वाढेल. विशेष म्हणजे एखादी मोठी कंपनी किंवा समूह वगैरेच हे सगळे करेल हा भ्रम ठरेल. केवळ मानवी बुद्धिमत्ता हीच अशा तंत्रज्ञानाधारित निर्मितीसाठी एकमेव भांडवल ठरेल. त्यामुळे एखादा शाळकरी विद्यार्थी किंवा एखादी वयोवृद्ध व्यक्तीही अशी लोकोपयोगी नवनिर्मिती करू शकेल. जो या सर्वांमध्ये पारंगत होईल, तो अल्पावधीत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या समृद्ध होईल.


जिओमध्ये फेसबुकची गुंतवणूक

भारतामध्ये सर्वप्रथम सर्वांत स्वस्त आणि वेगवान इंटरनेट सेवा देणाऱ्या जिओमध्ये फेसबुकने ४३ हजार ५७४ रुपयांची गुंतवणूक केली आहे. लॉकडाउनच्या काळातील प्रमुख व्यवहारांपैकी हा एक व्यवहार ठरला आहे. यामुळे फेसबुक हे जिओचे सर्वांत मोठे शेअर होल्डर ठरणार आहे. नजीकच्या फेसबुकद्वारे स्थानिक व्यावसायिक आणि ग्राहकांना जिओमार्टच्या (-कॉमर्स पोर्टलच्या) माध्यमातून कनेक्ट करण्याच्या हेतूने हा व्यवहार झाला आहे. यामुळे डिजिटल मार्केटिंगला अधिक प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.

internet connecting to pe

फेसबुकच ठरेल वरचढ!

गूगलने सोशल मीडियामध्ये उतरण्यासाठी २००४ साली आणलेले `ऑरकुट' २०१४ साली बंद केले, तर २०१४ साली आणलेले `गूगल प्लस'ही बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, २००४पासून सुरू असलेले फेसबुक तब्बल १६ वर्षांपर्यंत अखंडपणे वाचकांच्या `लाइक्स' मिळवीत आहे. फेसबुकने संपूर्ण सोशल मीडिया स्वत:च्याच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. इन्स्टाग्राम, `व्हॉट्स ऍप' ही काही उदाहरणे. याशिवाय स्पर्धा करणाऱ्या छोट्या-मोठ्या कंपन्या विकत घेण्याचे फेसबुकचे धोरण कायम आहे. आतापर्यंत फेसबुकने तब्बल ८२ कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे बाजारातील स्पर्धाच ताब्यात घेण्याचा फेसबुकचा प्रयत्न दिसतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही ज्या वेळी एक श्वास तुमच्या शरीरात घेता, त्या प्रत्येक वेळी फेसबुकच्या खात्यात पाच लाख रुपये जमा झालेले असतात. यावरून फेसबुकची व्याप्ती लक्षात येईल. फेसबुकने वापरकर्त्यांबरोबरच जाहिरातदारांनाही प्रचंड मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. फेसबुकद्वारे जाहिरात करण्यासाठी तुम्हाला अपेक्षित ग्राहक शोधण्यासाठी स्थान, लिंग, वय, अभिरुची असे १३००पेक्षा अधिक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. आणि यामुळेच फेसबुक सर्वांत वरचढ ठरणार आहे.


हे आवश्यकच!

जग बदलत आहे. लॉकडाउननंतरही ते सतत बदलत राहणार आहे. त्यामुळे या बदल्या जगात सर्वसामान्यांना आपली सर्वार्थाने समृद्धी करून घ्यायची असल्यास नेहमीचे कौटुंबिक कलह, घरगुती समस्या बाजूला ठेवून लोकांची गरज आणि तंत्रज्ञान यांची सांगड कशी घालता येईल याबाबत सातत्याने विचार-चिंतन-मनन करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी छोट्या-मोठ्या नवीन कौशल्य विकासावरही भर द्यायला हवा. थोडक्यात फलप्राप्तीपेक्षा प्रत्यक्ष कृतिशीलतेला सर्वोच्च प्राधान्य दिले, तर समृद्धीसोबतच नजीकच्या काळात तुमच्या हातून अनेक भव्य-दिव्य शोध लागू शकतात.


आपला वापरकर्ता फेसबुक सोडून दुसरीकडे जाऊ नये
, हा फेसबुकचा नित्य प्रयत्न असतो. त्यासाठी सातत्याने संशोधने आणि विकास सुरू असतात. त्यामुळेच नजीकच्या काळात तुम्हाला काहीही करायचे असेल तर ते फेसबुकवर करता येणे शक्य होणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची खरेदी, कार्यशाळांचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे यासह जे काही इंटरनेट विश्वावर करता येईल, ते सर्व काही फेसबुकवर करता येणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात किमान भारतीयांसाठी तरी फेसबुक म्हणजे इंटरनेट ठरेल असे म्हणणेही वावगे ठरणार नाही.

लॉकडाउनच्या काळात आम्ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया, परवाने घेऊन आंबा विक्री सुरू केली. महाराष्ट्रभर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी आम्ही आमच्या ठरलेल्या मार्गांवर येणाऱ्या शहरांमध्येच फेसबुकद्वारे जाहिरात प्रसिद्ध केली. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही दररोज किमान १००० डझन आंबा राज्यभर विक्री करत आहोत.

-
महेश पळसुलेदेसाई, रत्नागिरी
आंबा बागायतदार-व्यापारी

-----------------------

मागील काही महिन्यांपासून अनेक कंपन्यांनी आपल्या डिजिटल जाहिरातींसाठीची आर्थिक तरतूद वाढवली आहे. लॉकडाउननंतर विपणन आणि जाहिरातींसाठी डिजिटल माध्यमांना पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी लवकरात लवकर या माध्यमांचा प्रभावी वापर करायला हवा.

-
राघवेंद्र जोशी,
विपणन तज्ज्ञ, पुणे
-------------------------

आम्ही कलावंत मंडळींच्या १४८ जणांच्या समूहाने लॉकडाउनच्या काळात फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दररोज सात तास याप्रमाणे सलग ४० दिवसांमध्ये मिळून तब्बल २८० तासांच्या संगीत कार्यक्रमांचे प्रसारण केले. जवळपास काही लाख प्रेक्षकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेतला. नजीकच्या भविष्यातही आम्ही ऑनलाइन कार्यक्रमांवर भर देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

- कीर्ती निलेश देसाई,
पुणे पार्श्वगायिका-गीतकार-संगीतकार

------------------ 

नावीन्यपूर्ण उपक्रम, प्रकल्प सुरू करण्यापूवी त्याची संकल्पना, योजना, नियोजन याबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी, तसेच जनजागृती-जनप्रबोधनासाठी आम्ही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहोत. या माध्यमातून प्रशासनाशी नागरिकांना कनेक्ट करून त्यांना सहभागी करून घेता येणे शक्य झाले आहे. लॉकडाउनदरम्यान आणि नंतरही या माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.

- संग्राम जगताप,
जनसंपर्क अधिकारी
पुणे स्मार्ट सिटी, पुणे

 --------------------------
लेखक समाज माध्यम अभ्यासक आहेत

७७९८७०३९५२