मुसलमानांसहित आपण एक आहोत

विवेक मराठी    12-May-2020
Total Views |
- रमेश पतंगे

देशभर संघाचे लाखो स्वयंसेवक या वेळी देशबांधवांची सेवा करण्यासाठी रणांगणात उतरले आहेत. सर्वांबरोबर ते मुसलमानांचीदेखील सेवा करीत आहेत.

RSS_1  H x W: 0

कोरोना विषाणूचा विषय फेब्रुवारी-मार्चपासून भारतात सुरू झाला. मार्च महिन्यात लाॅकडाउन सुरू झाले. लाॅकडाउन सुरू झाल्याबरोबर भारतातील मुसलमानांचा विषय सुरू झाला. मुसलमानांचा विषय सुरू होण्याचे कारण या अगोदर नागरिकत्व कायदा लोकसभेने संमत केला होता. हा कायदा मुसलमानांच्या विरोधी आहे, अशी ओरड डाव्या लोकांनी आणि मुस्लीम मुल्लांनी सुरू केली. हाच धागा पुढे कोरोना विषाणूशी कसा जोडला गेला, हे बघू या.
सर्वप्रथम भारतविरोधी प्रचार करणाऱ्या काही विदेशी वर्तमानपत्रांच्या बातम्यांचे मथळे बघू या. वाॅशिंग्टन पोस्ट म्हणते (२३ एप्रिल २०२०) - 'जग कोरोना विषाणूचा आळ कोणावर टाकायचा याचा शोध घेत असताना, भारतात मुसलमानांना कोरोना विषाणूच्या प्रचारासाठी जबाबदार धरण्यात येते.' अल्-जझिराच्या बातमीचे शीर्षक आहे - 'मुसलमानांवर कोरोना विषाणूच्या प्रचाराचा दोष कसा टाकला जातो, हे बघण्यासारखे आहे. इस्लामोफोबिया झालेला आहे. 'कोरोना जिहाद' हा नवीन शब्द प्रचारात आणला गेला आहे.' गार्डियन वर्तमानपत्र म्हणते - 'कोरोना विषाणू कटकारस्थानाची कथा भारतातील मुसलमानांना लक्ष्य करते आहे.' याशिवाय आणखी दोन-तीन बातम्यांची शीर्षके अशी आहेत - 'भारतात कोरोना विषाणूच्या प्रचाराला जबाबदार धरून मुसलमानांवर हल्ले होतात.' 'मुसलमानांवर कोरोना विषाणूच्या प्रचाराचे दोषारोपण केले जाते आणि प्रचाराचा भाग चिकटविला जातो.' अशा सगळ्या बातम्या एकत्र करून द्यायचे म्हटले, तर ३०-३२ पानांची पुस्तिका करावी लागेल.

काही अतिउत्साही, तथाकथित, स्वत:ला हिंदू समाजाचे रक्षक समजणारे या आगीत तेल ओतण्याचे काम करीत असतात. हे घरात बसून वेगवेगळे व्हिडिओ तयार करतात. मुसलमान भाज्यांवर थुंकतात, लघवी करतात, कोरोना विषाणू काफरांना नाहीसे करण्यासाठी अल्लाने तयार केला आहे असे सांगतात.. अशा प्रकारचे व्हाॅट अॅप मॅसेज आणि फेसबुक पोस्ट खूप फिरत असतात. आपल्यापैकी अनेकांनी त्या पाहिल्या असतील आणि काही जणांनी फाॅरवर्डही केल्या असतील. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की, मुसलमानांविरुद्ध द्वेषाचा प्रचार करणे म्हणजे हिंदुत्व नव्हे. काही लोकांचा असा गोड गैरसमज झालेला असतो की, मुसलमानांविरुद्ध जहाल बोलण्यानेच आपण कट्टर हिंदू ठरतो. असे 'कट्टर हिंदू' चार भिंतींच्या आडच शूर असतात. जेव्हा प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची वेळ येते, तेव्हा ते आईच्या पदरामागे किंवा बायकोच्या दुपट्टयामागे लपून बसतात. या वेळी खऱ्या हिंदूंनी करण्याची कामे फार वेगळी आहेत.

RSS_1  H x W: 0

देशभर संघाचे लाखो स्वयंसेवक या वेळी देशबांधवांची सेवा करण्यासाठी रणांगणात उतरले आहेत. सर्वांबरोबर ते मुसलमानांचीदेखील सेवा करीत आहेत. देशभरातील अशी हजारो उदाहरणे आहेत. संभाजीनगरची दोन उदाहरणे देतो. बीबी जान पठाण या वयोवृद्ध महिला. यांना समाजात आसरा देणारे असे कुणी नाही, राहायला हक्काचे छप्परही नाही. तरीही या कठीण परिस्थितीत त्या हाॅटेलमध्ये भांडी घासण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत असत. परंतु त्या ज्या हाॅटेलमध्ये कामासाठी जायच्या, ते हाॅटेलही लाॅकडाउनमुळे बंद झाले. अशा वेळी जे काही थोडेबहुत रेशन होते, तेही संपले आणि होते-नव्हते ते पैसेही संपले आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. संगीता तायडे यांनी त्यांना जेवणाचा डबा देणे चालू केले. त्यावर त्या खूप आनंदी झाल्या आणि म्हणाल्या, "बरं झालं, तू मला जेवण दिले. नाहीतर मी काय केले असते? मला उपाशीच राहायला लागले असते. तुझ्यामुळे मला जेवण मिळाले. अल्लाची मेहेरबानी तुझ्यावर कायम राहो."
 
डॉ. दिवाकर कुलकर्णी यांना फारुक बेग (कर्जत, अहमदनगर) यांचे पत्र आले. पत्र मोठे आहे, संक्षिप्त भाग असा - 'ठाण्याच्या 'वुई टुगेदर' या संस्थेने लाॅकडाउनमध्ये लोकांना मदत करण्यासाठी जीवनावश्यक २५० किट्स पाठविली होती. संभाजीनगर शहरात गरीब कुटुंबासाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीतून हाताला काम आणि त्यातून रोजगार मिळवून देण्यासाठी डॉ. कुलकर्णी यांचे प्रयत्न चालू असतात. त्यामुळे कुलकर्णी सरांना लाॅकडाउन काळात हतबल मजूर कुटुंबांची माहिती होती. संभाजीनगरमध्ये वुई टुगेदरची मदतीची किट्स येताक्षणी हतबल उपाशीपोटी झोपणाऱ्या माणसांना अन्नाची सोय करून दिली.
 
वुई टुगेदची दूरदृष्टी, ममत्व, माणुसकीचा झरा, या सगळ्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. उज्ज्वलाताई आणि सर्व सहकारी वुई टुगेदरचे खूप खूप धन्यवाद. डॉ. श्री व सौ. दिवाकर कुलकर्णी आरोग्ययोद्धा ते मदतनीस आहेत. स्वत:चा परिसर कोरोनाबाधित असूनही मदतीसाठी पुढे सरसावलात.
 
प्रशांत सहस्रबुद्धे आरोग्ययोद्धा आणि सामाजिक कार्याची जबाबदारी निखालस पार पाडण्यासाठी सदैव तत्पर असतात. मुसलमान गारुडी समाजातील २५ लोकांना दोनदा रेशन वाटप करण्यात आले. त्यांची नावे येथे दिली तर लेख खूप मोठा होईल. ते मुसलमान आहेत, म्हणून त्यांना मदत देताना वगळण्यात आले नाही. पुन्हा एकदा अनमोल अमूल्य मदत केलीत, धन्यवाद!' (फारुक बेग.)


RSS_1  H x W: 0
 
संभाजीनगर येथे डॉ. हेडगेवार रुग्णालयातर्फे आरोग्य केंद्रे चालविली जातात. येथे आतापर्यंत सात हजार जणांची तपासणी झाली आहे, त्यातील पंधराशे मुसलमान आहेत. पहिले काही दिवस खिचडी देण्याचा कार्यक्रम झाला. २२०० कुटुंबाना खिचडी देण्यात आली. त्यात दोन-अडीचशे मुसलमान परिवार असतील. खरा हिंदू मुसलमानांना सेवेसाठी लक्ष्य करतो, भन्नाट आरोप करण्यासाठी नाही. मुसलमान समाजात माथेफिरू मुसलमान आहेत, ते धोकादायक आहेत, हे त्यांना माहीत आहे. तो अज्ञानी नाही, परंतु ही वेळ सर्वांना माथेफिरू म्हणण्याची नाही.
 
तरुण भारतची योगिता साळवी हीदेखील कोरोनायोद्धा महिलाच आहे. मुस्लीम वस्त्यांतदेखील ती फिरते. आसिफ कुरेशी हे तिचे सहकारी आहेत. मुस्लीम वस्त्यांत नवऱ्याने सोडून दिलेल्या अनेक महिला भेटल्या, काही विधवाही भेटल्या. त्या सर्वांना योगिता आणि आसिफ यांनी धान्याचे किट दिले. मुस्लीम महिलांना एकत्र करून कोरोना विषाणू म्हणजे काय, त्यापासून बचाव करण्यासाठी काय केले पाहिजे, हे सांगितले.
 
या मुस्लीम महिला म्हणतात की, 'मरगजवाल्यांचा आमच्याशी काही संबंध नाही. आमचे घर आमचे कुटुंब आहे. मुलांना शिकवायचे आहे, या बिमारीपासून त्यांना वाचवायचे आहे. सरकारने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे आम्ही पालन करणार. तुम्ही मदत करायला आलात, अल्ला तुम्हाला सुखी ठेवो.' हे आहे जमिनीवरचे वास्तव. जे खरे हिंदू आहेत, ते 'मानव तितुका एक' या भावनेने काम करतात. ते व्हाॅटस अॅपचे संदेश फाॅरवर्ड करीत बसत नाहीत.
 
भारतातील मुसलमान, त्यांचे मशिदी नेतृत्व, ओवेसी बंधूंसारखे आगलावे नेतृत्व, त्यांच्यात फुटीरतावादाचे विष पेरणारे डावे आणि काही गांधीवादी ज्वलंत प्रश्न निर्माण करणारे आहेत, हे नाकारता येणार नाही. याचा अर्थ वाचाळ हिंदूंनी आगीत तेल ओतण्याचे काम करायला पाहिजे असे नाही. मुसलमानांचा विचार करताना एकेकाळी हे सर्व हिंदू होते, यांचे रक्त हिंदू आहे, त्यांची संस्कृती हिंदू आहे, त्यांचे कौंटुबिक रितीरिवाज हिंदूपणाची ओळख करून देणारे आहेत. इस्लामला मंजूर नसलेली दरग्याची पूजा हा समाधी पूजेचा वेगळा प्रकार आहे.
त्यांचे भक्तिगीत येथे कव्वाली असते.
'कन्हया याद है कुछ भी हमारी
कहुॅं क्या कहुॅं तेरे भूल ने के मैं वादे|'
 
तिलककामोद रागातील हे भजन आहे. पं. भीमसेन जोशी किंवा पं. कुमार गंधर्व यांनी हे भजन गायलेले नाही. गायकाचे नाव आहे हबीब अहमद खान. हा पाकिस्तानी गायक आहे. पाकिस्तानात तो हे भजन कव्वाली ढंगाने गातो. श्रोते तन्मयतेने ते ऐकतात. गोकुळातून कृष्ण गेल्यानंतर गोपींच्या मनाच्या अवस्थांचे वर्णन या भजनात आहे. ऐकताना आपण भावविभोर होऊन जातो.
 
'मंदिर मे क्या पूजा मूरख
मश्जिद में क्या सजदा करे
है राम मिलन की राह निराली
साई मन की माला जपा करो|'
 
हे सांगतात मौलवी हैदर हसन, झमीर हसन खान. हे विख्यात कव्वाल आहेत. याचा अर्थ असा आहे की, मुसलमानांतील एक वर्ग असा आहे, जो आपली परंपरा विसरलेला नाही, आपली ओळख विसरायला तो तयार नाही. हे सर्व गायक पोटासाठी गातात, हिंदूंना भुलविण्यासाठी गातात, असे कुणी म्हणू शकतो. आपण कुणाची वाणी बंद करू शकत नाही. पण असली भजने पोटासाठी मुखातून येत नाहीत. ती रक्तात असावी लागतात. 
 
प्राणघातक संकट आले की अन्य विषय मागे पडतात. एकमेकांच्या रक्षणाचा विषय मुख्य होतो. या वेळी सर्वसामान्य मुसलमानाला आपल्या जवळ आणून संस्कृती गंगेच्या धारेत त्याला न्हाऊ घालणे आवश्यक आहे. हळूहळू त्याला अरबी संस्कृती गुलामीतून बाहेर काढता आले पाहिजे. एका सच्च्या हिंदूचे या वेळेचे हेच काम आहे, हे मला वाटते. बलुचिस्तान ते बांगला देश भारत एक आहे. त्याची संस्कृती एक आहे. त्याची अनुभूती घेण्याचा आणि देण्याचा हा विषय आहे.