रामायणाच्या निमित्ताने

विवेक मराठी    12-May-2020
Total Views |
 © अॅड. विक्रम श्रीराम एडके.
दूरदर्शनच्या अधिकृत ट्विटर हँडलने १६ एप्रिल या दिवशी ट्वीट करून घोषित केले की, 'रामायण'ने सुमारे ७.७ कोटींची प्रेक्षकसंख्या खेचून दाखवलीये! दूरदर्शनने त्या ट्वीटमध्ये या घटनेचे वर्णन 'विश्वविक्रम' असे केलेय. खाजगी वाहिन्यांचा आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा सुळसुळाट झालेला असताना गेली अनेक वर्षे काहीशा विस्मृतीत गेलेल्या दूरदर्शनने ही प्रेक्षकसंख्या गाठणे अजिबातच नेहमीच्या सवयीप्रमाणे नव्हते. तेहतीस वर्षे जुनी एक मालिका, जी अनेकांनी अनेकदा पाहिलीये, जी यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर सहजी उपलब्ध आहे, तिने एवढे प्रेक्षक मिळवावेत! तेही पुन:प्रक्षेपणात! काय कारण असावे यामागे?

Ramayan breaks viewership

लॉकडाउन सुरू झाल्यावर दूरदर्शनने घोषित केले की, ते रामानंद सागरांचे 'रामायण' पुन:प्रक्षेपित करणार आहेत आणि लगेचच काही मंडळींकडून नेहमीच्या सवयीप्रमाणेच या घोषणेचा विरोध सुरू झाला. जनसामान्यांनी मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणेच या मंडळींना व्यर्थ ठरवले आणि तेच केले, जे लोक गेली तीन दशके करत आलेत - या मालिकेवर भरभरून प्रेम! सारे काही नेहमीच्या सवयीप्रमाणेच चालू असताना त्याचा परिणाम असा झाला की, दूरदर्शनच्या अधिकृत ट्विटर हँडलने १६ एप्रिल या दिवशी ट्वीट करून घोषित केले की, 'रामायण'ने सुमारे ७.७ कोटींची प्रेक्षकसंख्या खेचून दाखवलीये! दूरदर्शनने त्या ट्वीटमध्ये या घटनेचे वर्णन 'विश्वविक्रम' असे केलेय. खाजगी वाहिन्यांचा आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा सुळसुळाट झालेला असताना गेली अनेक वर्षे काहीशा विस्मृतीत गेलेल्या दूरदर्शनने ही प्रेक्षकसंख्या गाठणे अजिबातच नेहमीच्या सवयीप्रमाणे नव्हते. तेहतीस वर्षे जुनी एक मालिका, जी अनेकांनी अनेकदा पाहिलीये, जी यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर सहजी उपलब्ध आहे, तिने एवढे प्रेक्षक मिळवावेत! तेही पुन:प्रक्षेपणात! काय कारण असावे यामागे?
याचे सगळ्यात सोपे कारण हे आहे की, लोक लॉकडाउनमुळे घरात बसले आहेत. म्हणजे पूर्वी एकेकाळी 'रामायण' सुरू झाले की रस्ते निर्मनुष्य व्हायचे आणि आता रस्ते (काहीसे) निर्मनुष्य असल्यामुळे 'रामायण' सुरू करण्यात आलेय. पण हे कारण वरवरचेच असावे. कसे ते पाहा. पूर्वी लोकांना 'रामायण' आवडले हे जरी खरे असले, तरीही लोकांकडे दुसरा काही पर्यायसुद्धा नव्हता. आज तशी परिस्थिती नाहीये. आज शेकडो वाहिन्या आहेत, ज्यांच्यावर सहस्रावधी मालिका सुरू असतील. भरीस भर म्हणून नेटफ्लिक्स, अॅमेझॉनपासून ते अगदी काल-परवाच्या अॅपल टीव्ही प्लसपर्यंत ढिगाने ओटीटी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. या सगळ्या प्लॅटफॉर्म्सपैकी कोणत्याही एका प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही एका साध्या मालिकेचेदेखील बजेट 'रामायण'पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. एवढेच कशाला, ती मालिका तांत्रिकदृष्ट्याही 'रामायण'पेक्षा निश्चितच सरस असणार. तरीही लोकांनी आणि एक-दोन नव्हे, तर बहुतांश लोकांनी या सगळ्या गोष्टी टाळून 'रामायण' पाहणे निवडले, हा 'रामायण'च्या यशाचा खरा आवाका आहे!

निवडले म्हणजे कसे निवडले? 'रामायण' पाहिलेल्या पिढीने त्यात रस दाखवला असता, तर ते साहजिकच होते. परंतु 'गेम ऑफ थ्रोन्स'सारख्या पॉप-कल्चरचा अविभाज्य भाग बनलेल्या मालिकेवर रसिक तावातावाने जशा चर्चा करतात, तशा आणि तितक्याच उत्स्फूर्त चर्चा सोशल मीडियावर 'रामायण'बद्दल पाहायला मिळाल्या. हा जो सोशल मिडिया वापरणारा वर्ग आहे ना, त्यापैकी बहुतांश लोक 'रामायणा'च्या मूळ प्रक्षेपणाच्या वेळी जन्मालादेखील आले नसतील कदाचित! कित्येकांनी आपल्या घरातील पुढची पिढी कशी समरसून 'रामायण' पाहातेय, त्याबद्दल पोस्ट्स लिहिल्या आहेत. फेसबुकवरील एका ग्रूपचे नाव घेतल्याशिवाय मला पुढे जाववतच नाहीये, तो ग्रूप म्हणजे 'रामायण मिम भोग'. आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा भाग असलेल्या गोष्टींबद्दल मिम्स बनावेत का, हा निश्चितच वादाचा मुद्दा होऊ शकतो. मला त्यात पडायचे नाहीये, कारण तो एका वेगळ्याच लेखाचा विषय आहे. मला मांडायचा असलेला मुद्दा वेगळाच आहे. मिम्स बनणे चांगले असो वा वाईट, परंतु आज परिस्थिती अशी आहे की, एखाद्या विषयावर मिम्सचा पाऊस पडत असेल, तर हमखास समजावे की त्या विषयाला, त्या गोष्टीला तरुणाईने मनापासून आपल्या 'कल्चर'चा भाग बनवलाय! हा 'रामायण मिम भोग' ग्रूप अतिशय अॅक्टिव्ह आहे आणि त्यांची सदस्यसंख्या चक्क दहा सहस्र एवढी आहे. तरुणाईला नेहमीच सगळ्या गोष्टींमधील तात्पर्य अथवा सार समजत असेलच असे नाही; पण त्यांना 'रामायण' मालिकेला केंद्रस्थानी ठेवून असा एखादा ग्रूप बनवावासा वाटला, यातच 'रामायण' मालिकेचे काळापलीकडचे आणि पिढ्यांपलीकडचे यश दिसून येतेय. असे आणखीही काही ग्रूप्स असू शकतील.


Ramayan breaks viewership
मी वर उल्लेख केलाय की, सध्याच्या खाजगी वाहिन्यांवरील मालिका या बजेटच्या आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत 'रामायणा'पेक्षा खचितच पुढे असतील. 'रामायण' आणि एकूणच जुन्या पौराणिक मालिकांकडे भरमसाठ बजेट नव्हते, पण कमालीच्या सशक्त संहिता होत्या. आत्ताच्या पौराणिक मालिकांकडे प्रचंड बजेट आहे, पण संहितेच्या दर्जात दांड्या उडालेल्या. याची दोन कारणे आहेत - एक म्हणजे लेखक, जो कोणत्याही चित्रपट, मालिका यांच्या कथावस्तूला आत्मा प्रदान करतो, त्यालाच क:पदार्थ समजण्याचा घाणेरडा पायंडा. आणि दुसरे व त्याहून महत्त्वाचे कारण म्हणजे, पौराणिक मालिका बनवताना मूळ स्रोतांचा भारतीय संदर्भात अर्थ लावण्याची बुद्धीच नसणे. निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार बहुतांश लोक परभाषेत, परसंस्कृती शिकलेले. त्यामुळे त्यांना मूळ स्रोतांचा अन्वयार्थ लावता येत नाही आणि ज्यांना लावता येतो त्यांच्या विचारसरणीची खात्री नाही. या जांगडगुत्त्यात आधुनिक पौराणिक मालिका ही केवळ देखण्या दिसणाऱ्या पात्रांचा फॅशन-शो तेवढा होऊन बसते.
आणि पौराणिकच का, कोणत्याही विषयावर मालिका बनवताना तुमची त्या कथावस्तूवर नितांत श्रद्धा असणे अत्यावश्यकच असते, तरच कलाकृती निर्माण होऊ शकते. मग वैयक्तिक आयुष्यात तुम्ही भले नास्तिक का असेना, काही फरक पडत नाही. पण काम मात्र तपश्चर्याच मानले पाहिजे, तरच त्यात सजीवपणा येतो. निव्वळ पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहिले, तर तात्कालिक परिस्थितीत सगळे छान वाटेलही कदाचित, पण अभिजात काही निर्माण नाही होऊ शकत. रामानंद सागरांची अशी श्रद्धा होती, चोप्रांची होती, म्हणून त्यांच्या मालिका (आणि या लेखाच्या संदर्भापुरते बोलायला गेले तर 'रामायण') भव्यतेच्या आजच्या कल्पनेत जरी बसल्या नाहीत, तरी दिव्यतेच्या सगळ्या कसोट्यांवर खऱ्या उतरतात. तुम्हाला बजेट मिळेल, कंटेंटही मिळेल, पण श्रद्धा तुमच्या आतूनच यावी लागते. यालाच कामाचे अध्यात्म अथवा कर्मयोग म्हणतात! हेच हिंदू संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. हिंदू संस्कृती कर्मयोग सांगते, कामाचे व्यसन म्हणजेच वर्कोहोलिझम नाही! योग तुम्हाला वरच्या पायरीवर नेत असतो आणि व्यसन खालच्या पायरीवर.

फक्त कल्पना करा - आज चालू असलेली कोणतीही मालिका अथवा वेबसिरीज आजपासून तेहतीस वर्षांनंतर दाखवली, तर पुन्हा प्रेक्षकांचे तसेच प्रेम मिळवू शकेल? तेही जाऊ द्या, कालसुसंगत वाटेल? लोकांना किमान आवडेल तरी का? उत्तर नकाराकडेच झुकणारे आहे. तुमच्या सर्वाधिक आवडत्या मालिकेचीदेखील तुम्ही तीन दशकानंतरची खात्री नाही देऊ शकणार. काळाचे ओरखडे भल्याभल्या गोष्टींना टराटर फाडून टाकतात. कलाकृतीला आज केवढे यश मिळते, त्यावर अभिजातता ठरत नसते, तर काळाच्या विशाल पटलावर ती कलाकृती केवढी ठसठशीतपणे उठून दिसते, यावर ठरते. आम्हाला मात्र इन्स्टंट रिझल्ट देणाऱ्याच गोष्टी डिजिटल ताटात वाढायच्या असतात. महिना-पंधरा दिवसांच्या कॉण्ट्रोव्हर्सीजच्या पलीकडे ज्यांची दृष्टी जात नाही, ते दशकांचा विचार काय डोंबल करणार? आज कंटेंटमध्ये क्वांटिटी भरपूर आलीये, पण क्वालिटीचा कधी नव्हे एवढा दुष्काळ पडलाय तो यामुळेच. दुर्दैवाने अशांच्या हातात आपल्या स्क्रीनचे 'ऑन बटन' आहे आणि आपल्या हाती असलेले 'ऑफ बटन' मात्र त्यांनी मोठ्या शिताफीने विसरायला लावले आहे!
'रामायण' हे आपल्या आर्ष महाकाव्यांपैकी एक. सामान्य हिंदू मोठ्या श्रद्धेने व विश्वासाने त्याला 'इतिहास' म्हणतो. श्रीराम आणि रामायण हे दोन्हीही भूतकाळात भारताच्या व भारतीयांच्या भावविश्वाचे भाग होते यात काडीमात्रही शंका नाही, परंतु ते वर्तमानकाळातही आपल्या भावविश्वाचे भाग आहेत हे 'रामायण'ला पुन:प्रक्षेपणात मिळालेल्या अद्वितीय यशाने ठळकपणे दाखवून दिलेय. एवढेच नाही, तर भविष्यातदेखील तंत्रज्ञान आणि अन्य गोष्टी किती जरी बदलल्या, तरीही पिढ्यानपिढ्या श्रीराम व रामायण कायमच सामान्य भारतीय मनाच्या भावविश्वाचे भाग बनून राहतील, हा विश्वासदेखील दिलाय. 'रामायण'च्या निमित्ताने, भारतीय मन किती जरी गगनाला गवसणी घालून आले तरीही त्याची मुळे आपल्या मातीच्या मृद्गंधातच रुजलेली आहेत, हेच पुन्हा एकवार सिद्ध झालेय. 'रामायण'च्या चिरंतन यशाचा खरा अन्वयार्थ हा असा आहे!