संघावरील विश्वास आणि प्रभाव

विवेक मराठी    14-May-2020
Total Views |
कोरोनाचा सामना करण्यासाठी संघस्वयंसेवक प्रशासनाला मदत करत असून सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात देत संघ काम करत आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या संघाचा समाजावर काय प्रभाव निर्माण झाला आहे, यांची असंख्य उदाहरणे रोज समोर येत आहेत. संघकामावरचा विश्वास द्विगुणित करणारा हा कालखंड असून समाजजीवनात आणि संघस्वयंसेवकांच्या घरात या प्रभावाची, विश्वासाची अनुभूती प्रकट होत आहे.


RSS_1  H x W: 0

मागच्या आठवड्यात बिनचेहऱ्याच्या स्वयंसेवकांचे सेवा कार्य आपण समजून घेतले. अर्थात तो लेख म्हणजे हिमनगाचे टोक होते. परदेशात, देशात, राज्यात संघस्वयंसेवकांच्या माध्यमातून जे जे काम चालू आहे, ते शब्दात मांडणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. तरीसुद्धा जे वेगळे लक्षात आले, ते लेखात मांडले होते. या लेखात संघविचार आणि त्याचा प्रभाव याबाबतचे काही प्रसंग आपण समजून घेऊ या.
 
लॉकडाउन सुरू झाले आणि नागरी वस्तीमधील स्वयंसेवकासमोर विविध समस्या येऊ लागल्या. लॉकडाउन सुरू झाल्यावर पहिला तडाखा बसला तो रोजच्या रोज रोजगार शोधून पोट भरणाऱ्या माणसांना. नाका कामगार, रिक्षाचालक, कचरा वेचक अशा लोकांची चूल विझली. विक्रोळी भागात टागोर नगरमध्ये दहा-पंधरा महिला राहतात, त्या कचरा वेचक म्हणून काम करतात. आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक कार्यकर्त्याला माहिती मिळाली. आपल्या भाग जिल्ह्यात कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी, हा स्वयंसेवकांचा निर्धार. पण समोर अनंत अडचणी. कारण दुकाने बंद, पंधरा महिलांची तत्काळ व्यवस्था कशी करायची? ज्या नागेश कदम नावाच्या स्थानिक कार्यकर्त्याने हा महिलांचा विषय संघस्वयंसेवकांसमोर मांडला, तोही संघ प्रभावात आला. त्याचे झाले असे की दुकाने उघडत नाहीत तोपर्यंत आपआपल्या घरातून शिधा गोळा करू या आणि त्या महिलांची गरज भागवू या असा कार्यकर्तांनी विचार केला आणि आपल्या सोसायटीतून शिधा जमा केला. प्रत्येकांने आपल्या क्षमतेनुसार या महिलांसाठी धान्य दिले. संघकार्यकर्ते महिलांना ते धान्य देण्यासाठी निघाले. सोबत नागेश कदम होते. कदमांनी सांगितले त्या त्या महिलेच्या झोपडीत धान्य पोहोचले. परत फिरताना कार्येकर्ते कदमांच्या झोपडीत गेले, तेव्हा लक्षात आले की कचरा वेचक महिलांना अन्न मिळावे म्हणून धावपळ करणाऱ्या कदमांची चूल विझली आहे. कार्यकर्ते मंडळींना परिस्थितीचा अंदाज आला. "तुम्ही मघाशी का नाही धान्य घेतले?" "मी कसे घेणार? तुम्ही ते कचरा वेचक महिलांसाठी जमा केले होते, त्यांच्या तोंडचा घास मला गोड लागला नसता." नागेश कदम बोलले. संघाचा प्रभाव काय असतो यांचे दर्शन घडवणारा हा प्रसंग. नंतर संघकार्यकर्त्यांनी नागेश कदमांच्या घरीही अन्नधान्य पोहोचेल अशी व्यवस्था केली. असे असंख्य नागेश कदम या काळात संघाच्या संपर्कात आले आहेत आणि पुढील काळात तेच संघविचाराचे वाहक असणार आहे.
आपण संघाच्या प्रभावाचा विचार करत आहोत. संघाचा प्रभाव म्हणजे तरी काय? संघाची ओळख. संघ गणवेशातील स्वयंसेवक बाजूने जात असेल तरी त्याचा परिणाम दिसून येतो. आपण याचा अनेकदा अनुभव घेतला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत संघस्वयंसेवकांनी सेवा आघाडी सांभाळली आहे. विक्रोळी भागातील एक स्वयंसेवक सेवा कामासाठी बाहेर पडले होते. संघ गणवेश असेल तर बऱ्याच गोष्टी सहजपणे होतात, हे संघस्वयंसेवकांला अनुभवातून कळले होते. ते स्वयंसेवक रस्त्याने चालले होते. मागून एक गाडी आली आणि त्यांच्या शेजारी थांबली.
"आप संघस्वयंसेवक है?"
"हा, मै संघस्वयंसेवक हूँ, देवीकांत ठाकूर मेरा नाम।"
"अब क्या कर रहे हो" 
"यहा हमारा सेवा कार्य चल रहा है, अनाज दे रहे जनकल्याण समिती के तरफसे"
"बहुत अच्छा। आप जसे लोग काम करते है इस लिये कुछ तो बदलाव दिख रहा है।"
"आपका नाम क्या? आपण रहते कहां?"
"कांजूर पूर्व में रहता हूँ, विमल नाम है मेरा।"
"चलो, मिलते है" देवीकांत ठाकूर पुढे निघाले, तेवढ्यात विमलजींनी आवाज दिला, "ठाकूरजी, संघकाम में मुझे कुछ मदद देनी है, आपण लेंगे क्या?"
"नहीं, मैं नहीं ले सकता। मैं आपको हमारे भाग सहकार्यवाह जी का संपर्क देता हू, आप उनको संपर्क करें और जो भी मदत देनी है वह उनको सुपुर्द करें।" देवीकांत ठाकूर यांनी भाग सहकार्यवाहाचा संपर्क दिला आणि तासाभराने विमलजीकडून पाच हजार रुपयांची देणगी मिळाली. हा आहे संघाच्या गणवेशाचा प्रभाव. संघस्वयंसेवक आणि संघ यांना समाजातून ज्या प्रकारे स्वीकारले जात आहे, संघकामावर विश्वास व्यक्त केला जात आहे, त्यांचे हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणायला हरकत नाही.

संघसंस्कार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. स्वयंसेवकांच्या सहज व्यवहारातून आसपासच्या परिसरावर संघविचार आणि संस्कार यांचा प्रभाव निर्माण होत असतो. संघस्वयंसेवक आपल्या घरात संघविचार कसा जगतो, यावर त्या घरातील सदस्यांना संघविचार कळणे अवलंबून असते. तन समर्पित मन समर्पित कार्यकर्ता असेल, तर त्याच्या घरातील सदस्यही त्याच मार्गाने जाताना दिसतात. संघस्वयंसेवकांच्या घरातील लहान मुलेसुद्धा आपल्या क्षमतेनुसार संघकामात सहभागी होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघाचे जे सेवा कार्य चालू आहे, त्यामध्ये या संघसंस्काराची झलक दिसून येते.


RSS_1  H x W: 0
देवगड शहरात जनकल्याण समितीच्या वतीने गरजू लोकांसाठी अन्नधान्य वितरण करण्यांची योजना झाली. स्वयंसेवक घरोघरी जाऊन अन्नधान्य गोळा करत होते. आपले बाबा धान्य गोळा करण्यासाठी फोनवरून ठिकठिकाणी संपर्क साधत आहेत, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत कोणी उपाशी राहू नये ही संघकार्यकर्त्यांची तळमळ पाहून ओवी (इयत्ता दुसरी) आणि सुरभी (इयत्ता सहावी) या दोन्ही बहिणी पुढे आल्या आणि त्यांना शाळेतून सकस पोषक आहार योजनेतून मिळालेले दहा किलो तांदूळ त्यांनी जनकल्याण समितीच्या योजनेसाठी दिले. वडील सुनील बापट यांच्या व्यवहाराकडे बघून त्यांच्या एकूण जगण्यावर असणारा संघसंस्कार बघूनच या दोन्ही मुलींना प्रेरणा मिळाली असणार, यात शंका नाही.
 
अशीच आणखी एक घटना आहे संभाजीनगरची. दत्ताजी भाले रक्तपेढीमध्ये काम करणारे निवृत्ती मोरे आपल्या कन्येशी - सानवीशी गप्पा मारत बसले होते. गप्पाच्या ओघात कोरोना महामारी, मदत कार्य, संघस्वयंसेवक करत असलेलं सेवा कार्य असे विषय येत गेले. सानवी आपल्या वडिलांकडून माहिती ऐकत होती आणि आपण या लढ्यात कसे सहभागी होऊ शकतो यांचा ती विचार करू लागली. एका क्षणी सानवी उठली आणि घरात जाऊन आपली बचत बँक घेऊन आली. "बाबा, माझी ही मदत." सानवीची ही कृती म्हणजे संघसंस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असल्याचा पुरावा आहे. सानवीचे १,१३४ रुपये निवृत्ती मोरेंनी सामाजिक संस्थेला सपुर्द केले.
 
तर हा आहे मागोवा संघप्रभावाचा आणि संघावरच्या विश्वासाचा. संघ वाढतो आहे, मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्व क्षेत्रांत संघ अग्रेसर आहे, त्याला संघस्वयंसेवकांचा समाजावर पडणारा प्रभाव आणि समाजाने संघावर दाखवलेला विश्वास हेच कारण आहे.

रवींद्र गोळे
९५९४९६१८६०