संघसमर्पित भाऊसाहेब शेळके

विवेक मराठी    14-May-2020
Total Views |
@- प्रा. रवींद्र भुसारी

गांगलगावच्या एका प्रतिष्ठित शेतकरी कुटुंबातील एक तरुण. चिखलीच्या संघाच्या शाळेत त्याला शिक्षक म्हणून नोकरी मिळते. सर्वांनाच आश्चर्य वाटते. पुढे आणीबाणीत संघसंबंधित सर्व शिक्षकांना अटक होते. त्या वेळी संघाचा नसल्याने हा तरुण बचावतो. त्याच्यावर शाळेच्या मुख्याध्यापकपदाची जबाबदारी दिली जाते. संघस्वयंसेवक नसूनही संघाने आपल्यावर एवढा भरवसा ठेवला, या जाणिवेने हा तरुण भारावतो आणि नंतर पूर्णपणे संघसमर्पित होऊन विदर्भातील उत्तम स्वयंसेवक होतो... अशी विलक्षण जीवनकहाणी असलेले शेषराव पुंडलिकराव शेळके उपाख्य भाऊसाहेब शेळके यांना बुधवारी पहाटे झोपेतच मृत्यू आला आणि एका समर्पित जीवनाचा अंत झाला. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.


RSS_1  H x W: 0

बुधवारी सकाळी चिखलीहून फोन आला. दुःखद बातमी. भाऊसाहेब शेळके यांना झोपेतच देवाज्ञा झाली. मनाला धक्का देणारी बातमी होती. तसे त्यांचे जाण्याचे वय नव्हते किंवा कुठल्याही गंभीर आजाराने ग्रासलेले नव्हते. भाऊसाहेब चिखली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष होते. सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व! तरी हे का व्हावे? चांगल्या व्यक्ती अशा अचानक न्याव्या असे परमेश्वराला का वाटते? जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, ही रीत ह्या बाबतीत खरी ठरावी, का असे व्हावे? असे अनेक प्रश्न मनाला भेडसावत आहेत. यांची उत्तरे न मिळणारीच.


चिखलीजवळील गांगलगाव ह्या खेड्यातील प्रतिष्ठित शेतकरी कुटुंबात भाऊसाहेबांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर स्व. लालाजींनी या उमद्या तरुणाला आदर्श प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी दिली. यापूर्वी त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा संघाशी काहीही संबंध आला नव्हता. सगळ्यांना आश्चर्य वाटे की, ते या संस्थेत कसे नोकरीला लागले. पुढे आणीबाणी आली आणि आदर्श विद्यालयातील अनेक शिक्षकांना जेलबंद केले गेले. पण भाऊसाहेब स्वयंसेवक किंवा अधिकारी नसल्यामुळे बाहेर राहिले. हे ओळखून लालाजींनी त्यांना मुख्याध्यापक केले. इथून पुढे भाऊसाहेबांच्या जीवनाला गती मिळाली. त्यांना जाणवले की, मी संघाचा नसूनही माझ्यावर संस्थेने इतका विश्वास दाखविला. त्यांनीही नवे दायित्व मनापासून पार पाडले. त्यांनी अतिशय कठीण काळात शाळा सांभाळली व नावारूपाला आणली. शाळेचे काम करता करता ते संघमय होऊन गेले. त्यांना उत्तम शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, संघातही तालुका कार्यवाह, नंतर जिल्हा कार्यवाह, विभाग कार्यवाह, पुढे प्रांत सहकार्यवाह असे चढत्या क्रमाने दायित्व मिळत गेले.

संघाची नित्य शाखा व संघवाढीसाठी नियमित प्रवास हे भाऊसाहेबांचे जणू ब्रीदच. चिखली तालुका कार्यवाह असताना त्यांनी 'गाव तेथे स्वयंसेवक' अशी मोहीम राबविली. १४८ गावात संघाची शाखा – साप्ताहिक मिलन किंवा संघ मंडळी अशी कोणती तरी इकाई (युनिट) असणारच. अशा सर्व तालुक्यातील सर्व स्वयंसेवकांचे विशाल एकत्रीकरण करण्यात आले. चिखली तालुक्यातील सर्व - म्हणजे १४८ गावांतून १८५० स्वयंसेवक आले व तत्कालीन प्रांत प्रचारक व विद्यमान प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे पाथेय ग्रहण करून गेले.

भाऊसाहेब त्या वेळी मेहकर जिल्हा कार्यवाह होते. सहा तालुक्यांचा हा संघ जिल्हा. या जिल्ह्यात दोनशेवर शाखा होत्या. विदर्भातील अग्रणी जिल्हा म्हणून गणला गेला. अकोला विभाग कार्यवाह असताना पाचशे शाखांचा संकल्प सोडला. तशी योजना आखली. कार्यकर्त्यांची चमू कामाला लागली. हे सर्व भाऊसाहेबांचे कौशल्य होते. प्रांत सहकार्यवाह म्हणून त्यांनी संपूर्ण विदर्भ पिंजून काढला. त्यांचे संवादकौशल्य वाखाणण्यासारखे होते. पटवून देण्याची क्षमता अद्भुत होती. नियोजन अप्रतिम व त्याचे क्रियान्वयनही औरच.

प.पू. श्रीगुरुजी जन्मशताब्दी वर्ष २००६. भाऊसाहेबांनी अनोखा प्रयोग केला. ग्रामीण भागात पत्नीसह जाऊन घरोघरी संपर्क केला. हे तर अगदीच वेगळे घडले. ज्या परिवारातून भाऊसाहेब आले, त्यात तर अशक्यच वाटणारे होते. यात वहिनींचा मोठेपणाही मान्य केला पाहिजे. आता भाऊसाहेबांचा मोठा असलेला परिवार संघमय झाला.

कामाची घोडदौड सुरू होती. घरातही एक मुलगी, दोन मुले असा संसार होता. सर्वत्र आनंदमय वातावरण होते. पण अचानक त्यांना पायाचा व कमरेचा त्रास सुरू झाला. मोठी शस्त्रक्रिया झाली. भाऊसाहेबांचे ‘चरैवेती चरैवेती’ बंद झाले. घराबाहेर पडणे यापुढे होणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे पडले. भाऊसाहेबांना तब्येतीची चिंता नव्हती. पण शाखा होऊ शकत नाही, प्रार्थना होऊ शकत नाही याचीच खंत होती. जो भेटावयास जाईल, त्याच्याशी हेच बोलत आणि मनातली खंत सांगत.

पण अडचणी आल्या म्हणून स्वस्थ बसतील ते भाऊसाहेब कुठले? व्यायाम, फिजिओथेरपी याच्या माध्यमातून हळूहळू बरे झाले. काठी घेऊन घराबाहेर पडू लागले. स्कूटीवरून शाखेत जाऊ लागले. शाखेत प्रार्थना केल्याबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढू लागला. चिखली अर्बन विद्या मंदिराच्या माध्यमातून ते त्यांचे आवडते शैक्षणिक कार्य करू लागले. संघकार्यात रमू लागले. चिखलीच्या सामाजिक जीवनात त्यांचे एक स्थान होते. त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय अनेकांचे पान हलत नव्हते. चिखली अर्बन बँकेचे ते संचालक होते. या वेळी उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले.

वयाची सत्तरी पार केली. मोठ्या दुखण्यातून बरे होऊन रोजची शाखा, दांडगा जनसंपर्क, बँकेच्या बैठका, अन्य सेवा कार्य व शैक्षणिक कार्य या सर्वात गुंतून गेले होते. स्व. लालाजींच्या जन्मशताब्दी वर्षात होणाऱ्या कार्यक्रमात भाऊसाहेबांची फार महत्त्वाची भूमिका होती. हा एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल की, लालाजींच्या परीसस्पर्शाने ज्यांच्या जीवनाचे सोने झाले, लालाजींनी हेडमास्तर म्हणून ज्यांची निवड केली होती आणि पुढे जे उत्तम स्वयंसेवक ठरले, त्या भाऊसाहेबांना लालाजींच्या जन्मशताब्दी वर्षातच देवाचे बोलावणे यावे. दैवी योग समजत नाहीत हेच खरे.
RSS