पुरोगामित्व जपायचे असेल, तर..

विवेक मराठी    15-May-2020
Total Views |
प्रश्न केवळ पारधी हत्याकांडाचा नसून पुरोगामी महाराष्ट्रात जन्माला आलेल्या सामाजिक अराजकाचा आहे. ही घटना म्हणजे सामाजिक कीड असून तिचा वेळीच बंदोबस्त करण्यात आला पाहिजे. महाराष्ट्र राज्याला आपले पुरोगामित्व जपायचे असेल, तर अशा घटनांचा तातडीने तपास करून दोषींना जबर शिक्षा झाली पाहिजे, तरच पुरोगामित्वाचा आब राहील. 

'महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी होते' असे अवतरणचिन्ह वापरून लिहिण्याची गरज निर्माण झाली आहे. योगायोगाने नुकतीच महाराष्ट्र राज्य निर्मितीस साठ वर्षे पूर्ण झाली आणि राज्याचा हीरक महोत्सव सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य नाही असे अधोरेखित करणारे समाजवास्तव समोर येत आहे. हे वास्तव इतके जळजळीत आहे की आपण कोणत्या सामाजिक व्याधींनी ग्रासलेलो आहोत याची महाराष्ट्र राज्यास जाणीव झाली असेल.

crime_1  H x W:
दिनांक तेरा मे रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मांगवडगाव येथे तीन पारधी बांधवांची हत्या करण्यात आली. या घटनेच्या मुळाशी जाऊन तपासणी केली असता पुढीलप्रमाणे माहिती उपलब्ध झाली आहे - मांगवडगाव शिवारात बाबू शंकर पवार या पारधी बांधवाने शेती विकत घेऊन तेथेच संसार थाटला होता. शेजारच्या शेतकऱ्यांशी बांधाच्या हद्दीवरून वाद झाल्यानंतर पवार यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने पवार यांच्या बाजूने न्याय दिला. त्याच रात्री तीस-पस्तीस लोकांनी ट्रॅक्टरमधून येऊन पवार यांच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोरांनी पवार यांच्या मोटरसायकल जाळल्या. बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार व संजय बाबू पवार हे तिघे या हल्लात मृत्युमुखी पडले असून पोलिसांनी चौदा व्यक्तीना अटक केली आहे. ही घटना पूर्वनियोजित आणि सामाजिक आकसातून घडली असून पुरोगामी महाराष्ट्राचे अंतरंग उलगडून दाखवणारी आहे. पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्यात आजही अशा प्रकारे सामाजिक अत्याचार होतो. न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य नव्हता, तर वरच्या न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असताना अशा प्रकारे हत्या करणे हे स्वत:स पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील सामाजिक मानसिकतेचे भेसूर चित्र आहे.
 
महाराष्ट्र राज्यातील भटके विमुक्त जातीजमातींचे प्रश्न आणि भटके विमुक्त जातीजमातींच्या संघटना यांचे कोणत्या शब्दात वर्णन करावे हेच आम्हाला कळत नाही. कारण सातत्याने भटके विमुक्त समाजावर अन्याय-अत्याचार होत असतात, तेव्हा या संघटना कय करतात? धुळे जिल्ह्यातील राईलपाडा हत्याकांड, जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावातील अत्याचार आणि आता ही घटना पाहता भटक्या विमुक्त समाजाचा कोण तारणहार आहे का? हा प्रश्न पडतो. केवळ भटके विमुक्त समाजाला राजकीय पक्षांच्या दावणीला बांधण्यासाठी संघटना काढणारे भटक्या समाजाचे नेते आज कोठे आहेत? त्यांनी का मौन बाळगले आहे? असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाले, भटके काटेरी कुंपणाच्या आत डांबलेले होते, त्यातून ते मुक्त झाले, पण त्यांची परवड थांबली नाही. भटक्या विमुक्त समाजाचे जीवन अधोरेखित करणारी आत्मकथने प्रकाशित झाली, त्यांना पुरस्कार मिळाले, पण भटके विमुक्त समाजाची स्थिती-गती अजिबात बदलली नाही. यमगरवाडी प्रकल्प आणि भटके विमुक्त विकास परिषद यांचा अपवाद वगळला, तर भटक्या विमुक्त समाजाचा विकास करण्यासाठी कोण काम करत आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम काय झाला आहे, हे पुरोगामी महाराष्ट्रात दिवा घेऊन शोधावे लागेल अशी स्थिती आहे. तेरा तारखेला झालेल्या पारधी हत्याकांड प्रकरणी सर्वात आधी भटके विमुक्त विकास परिषदेनेच आवाज उठवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन दिले असून तातडीने आरोपी पकडले जावेत व त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
 
बीड जिल्ह्यातील या घटनेमुळे वेगळी सामाजिक मानसिकता समोर येत असून 'न्यायालयाने दिलेला निकाल आम्ही मानत नाही, आम्ही आमच्या मताप्रमाणे वागू, त्यासाठी आम्ही खूनही करू' असे तिचे स्वरूप आहे. अशा घटनांसाठी यूपी-बिहारची उदाहरणे दिली जात असत. आता आपल्या पुरोगामी महाराष्ट्राने स्वत:साठी स्वत:ची उदाहरणे निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बीड जिल्ह्यातील घटना हे त्यातील एक उदाहरण आहे. वंचित, उपेक्षित घटकांच्या मदतीला उभे राहून त्यांना इतरांच्या बरोबरीने उभे करण्याचे काम खरे तर खूप आधीपासून सुरू व्हायला हवे होते. त्या कामाची केवळ भाषणबाजी झाली, प्रत्यक्षात काम काही अपवाद वगळता कोठेच झाले नाही. महाराष्ट्र राज्यातील समाजधुरीणांना व राजकीय पक्षांना यांची जाणीव करून देण्याचे काम या हत्याकांडाने केले आहे. तीस-पस्तीस जण येतात आणि तीन जणांची हत्या करतात, या समाजवास्तवाकडे संघटना, जात, संप्रदाय, धर्म यांच्या दृष्टीने न पाहता निखळ मानवतावादी दृष्टीकोन ठेवून या घटनेकडे पाहण्याची गरज आहे.

प्रश्न केवळ पारधी हत्याकांडाचा नसून पुरोगामी महाराष्ट्रात जन्माला आलेल्या सामाजिक अराजकाचा आहे. ही घटना म्हणजे सामाजिक कीड असून तिचा वेळीच बंदोबस्त करण्यात आला पाहिजे. महाराष्ट्र राज्याला आपले पुरोगामित्व जपायचे असेल, तर अशा घटनांचा तातडीने तपास करून दोषींना जबर शिक्षा झाली पाहिजे, तरच पुरोगामित्वाचा आब राहील. म्हणून शासन-प्रशासन यांनी तातडीने कारवाई केली पाहिजे आणि भटक्या विमुक्त समाजात जे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, ते दूर करून सामाजिक आधार दिला पाहिजे, तरच आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध होईल.