कोरोना : नक्षली चळवळीसाठी इष्टापत्तीच

विवेक मराठी    19-May-2020
Total Views |
कोरोनाचे संकट नक्षली चळवळीसाठी एक इष्टापत्तीच ठरली आहे. नक्षली चळवळीचा व त्यांच्या रणनीतीचा अभ्यास केला, तर एक बाब स्पष्टपणे लक्षात येते की, नक्षली चळवळ आपली शक्ती वाढवण्यासाठी, प्रशिक्षणासाठी, नवीन भरतीसाठी कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक संकटकाळाचा उपयोग करीत असतात. कोरोना संकटकाळाचाही वापर त्याच पद्धतीने केला जात आहे. सर्व सुरक्षा दले व प्रशासन कोरोनाशी लढण्यात व्यग्र असल्याने त्याचा फायदा घेऊन नक्षली त्यांच्या नवीन भरतीचे व त्यांच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रम जोमाने राबवत आहे, असे दिसून येत आहे. ८ मे रोजीच्या घटनेत याची चुणूक जाणवत आहे.

naxalism attack maharasht

सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या छायेत वावरत आहे. भारतसुद्धा त्याला अपवाद नाही. सारे जनजीवन ठप्प झाले आहे. तुम्ही-आम्ही सारे जण आपापल्या घरात बंदिस्त झालो आहोत. कोरोनाला रोखण्यासाठीची महत्त्वाची उपाययोजना म्हणून असे बंदिस्त होणे आवश्यक होतेच. रेल्वे बंद.. विमान बंद.. बसगाड्या बंद.. बाजार, मॉल, कारखाने सारेच गेले दोन महिन्यांपासून बंद आहेत. गेल्या आठवड्यात काही भागात तुरळक प्रमाणात लहान कारखाने, छोटे दुकाने सुरू झाली आहेत. पण अजूनही जनजीवन ठप्प आहे. केंद्रातले सरकार व सर्व राज्यांतील सरकारे या संकटातून देशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील आठवड्यात ही जनजीवनाची गाडी संथ का होईना, पण सुरू होईल... पण ती पूर्वीप्रमाणे सुरू होण्याला आणखी बराच कालावधी लागेल, हे निश्चित. तो कालावधी किती असेल, हे आजच सांगता येत नसले तरी तो दोन-तीन महिन्यांपेक्षा कमी असेल, असे सध्याच्या परिस्थितीवरून व कोरोनाच्या गंभीर परिणामांवरून तरी वाटत आहे.

नाइलाजाने का होईना, पण कोरोनाच्या दहशतीमुळे जनजीवनाचे हे ठप्प होणे साऱ्यांनीच स्वीकारले आहे. पण याही परिस्थितीत या देशाच्या एकतेला धोकादायक असणारी नक्षली चळवळ मात्र थांबलेली नाही. सारी सुरक्षाव्यवस्था कोरोनाविरोधी लढाईत व्यग्र आहे. प्रशासनही त्यात सहभागी आहे. त्याचा फायदा घेऊन नक्षली चळवळीचे म्होरके ही चळवळ आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून येत आहे. नुकतीच ८ मे रोजी छत्तीसगढमधील राजनांदगाव जिल्ह्यात असलेल्या परधौनी गावाजवळ बस्तरच्या जंगलात सुरक्षा जवानांची नक्षल्यांशी चकमक झाली. रात्री जंगलात झालेल्या या चकमकीत चार नक्षली ठार झाले. त्यांच्याजवळ एके-४७सारखी अत्याधुनिक हत्यारे, संदेशवाहक यंत्रे होती. त्यांच्याजवळ बरेच नक्षली साहित्यही सापडले. गेल्या तीन-चार महिन्यांत, विशेष म्हणजे कोरोनाची सावली पडायला लागल्यापासून नक्षली कारवायांमध्ये घट झाली किंवा या कारवाया थंडावल्या असे वाटत होते. पण परधौनीच्या चकमकीने ही वादळापूर्वीची शांतता तर नाही, असे वाटायला संधी मिळाली आहे. तसे असेल तर कोरोनानंतरचा काळ सुरक्षा जवानांसाठी अधिक आव्हानात्मक राहण्याची अधिक शक्यता आहे.
बस्तरच्या जंगलातील नक्षली कारवायांचा इतिहास ८०च्या दशकापासून सुरू होतो व हा इतिहास भयावह, रक्तरंजित आहे. या नक्षली चळवळीने केवळ सुरक्षा जवानांचेच बळी घेतले नाही, तर अनेक निष्पाप, निरपराध, भोळ्याभाबड्या आदिवासींचेही बळी घेतले आहे. या क्षेत्रातील पहिला मोठा नक्षली हल्ला १९९५मध्ये नारायणपूर जिल्ह्यात झाला. या हल्ल्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह २५ जवान शहीद झाले होते. २००५मध्ये सलवा जुडूम ही नक्षलविरोधी चळवळ सुरू झाल्यानंतर भांबावलेल्या व संतापलेल्या नक्षल्यांनी थेट आदिवासी पाड्यांवर हल्ले करणे सुरू केले. या काळातच नक्षल्यांच्या हिंसक कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या. २००६मध्ये एर्राबोर कॅम्पवर हल्ला करून नक्षल्यांनी ३५ आदिवासींना मारले होते. त्याच वर्षी सलवा जुडूमच्या कार्यक्रमामधून परतणाऱ्या ग्रामीण आदिवासींची गाडीच नक्षल्यांनी उडवून दिली. त्यात २५ जण मारले गेले. याच काळात उपलामेटात सुरक्षा दलाच्या शिबिरावर हल्ला चढवून २२ जवानांची हत्या केली. २००८मध्ये बिजापूर जिल्ह्यातील राणीबोदली गावातही जवानांच्या शिबिरावर नक्षल्यांनी हल्ला केला. त्यात ५५ जवान शहीद झाले.


naxalism attack maharasht
२०१०मधील ताडमेटला हल्ला हा नक्षली हिंसाचारातील सर्वात मोठा भीषण हल्ला मानला जातो. सुकमा जिल्ह्यातील चिंतलनार या गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा कॅम्प होता. या कॅम्पमधील सुमारे दीडशे जवान ५ एप्रिल रोजी रात्री नजीकच्या घनदाट जंगलात शोध मोहीम राबवत होते. मोहीम आटोपून जवानन ६ एप्रिल रोजी सकाळी चिंतलनार कॅम्पकडे परतत असताना ताडमेटला गावाजवळील छोट्या पुलावर पोहोचताच नक्षल्यांनी पूल उडवून दिला व जवानांच्या तुकडीवर हल्ला चढवला. रस्त्यात नक्षल्यांनी भूसुरूंग पेरून ठेवले होते. हजारावर सशस्त्र नक्षल्यांनी या तुकडीला घेरून ठेवले होते. या हल्ल्यात ७६ जवान शहीद झाले. अलीकडचा मोठा हल्ला २०१७मध्ये झाला. एप्रिल २०१७मध्ये सीआरपीएफची गाडीच नक्षल्यांनी उडवून दिली. त्यात २५ जवान शहीद झाले. २०१८मध्येही भेज्जी येथे नऊ जवान शहीद झाले होते.
राज्यात १९८० ते २००० या काळात सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या लेच्यापेच्या धोरणामुळे नक्षली चळवळीला मोकळे रान मिळाले, हे नाकारता येत नाही. खरे तर काँग्रेसला या नक्षली हिंसाचाराचा जबर फटकाही बसला. २०१३मधल्या झिरम येथे झालेल्या नक्षली हल्ल्यात ३१ जण मारले गेले. हे सारे काँग्रेसच्या मिरवणुकीतून परतणारे कार्यकर्ते होते. मारल्या गेलेल्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल, त्या वेळचे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नंदकुमार पटेल, माजी मंत्री महेंद्र कर्मा यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. २०००नंतर सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने राज्यात वेगाने पसरत चाललेल्या नक्षल चळवळीवर अंकुश आणला होता. पण नंतरच्या काळात नक्षलविरोधी धोरणात ढिलाई आली होती, हेही नाकारता येत नाही.

भाजपा सरकारच्या काळात जी नक्षली चळवळ थंडावली होती, तिला पुन्हा उठाव देण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरापासून पद्धतशीरपणे सुरू होता. अनेक वरिष्ठ नक्षली कमांडर बस्तरच्या जंगलात ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्या पॉलिट ब्युरोच्या नेत्यांची वर्दळ छत्तीसगढमध्ये व विशेषतः बस्तरच्या जंगलात वाढली आहे, असे या परिसरात दिसून येत आहे. पण नक्षली चळवळीसमोरचे सर्वात मोठे आव्हान नवीन भरतीचे निर्माण झाले आहे. गेल्या वर्षापासून एकूणच नक्षलग्रस्त जंगल क्षेत्रातील आदिवासी गावांमध्ये नक्षली चळवळीबाबत निराशा वाढीस लागली आहे. या चळवळीतल्या फोलपणाबाबत जागरूकता वाढली आहे. त्यामुळे या चळवळीला आदिवासी गावांमधून सहजपणे मिळणारी मदत आटली आहे. आदिवासी तरुणांमधील चळवळीबाबत कमी झालेले आकर्षण व आदिवासी ग्रामस्थांचे असहकार्य या दुहेरी कातरीत नक्षली चळवळ सापडली होती. नक्षली संघटनेचे धोरण व रणनीती निर्धारित करणारे या चळवळीतील काही प्रमुख म्होरके सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत ही चळवळ थंडावण्याची भीतीही आहे.

या पार्श्वभूमीवर कोरोनाचे संकट नक्षली चळवळीसाठी एक इष्टापत्तीच ठरली आहे. नक्षली चळवळीचा व त्यांच्या रणनीतीचा अभ्यास केला, तर एक बाब स्पष्टपणे लक्षात येते की, नक्षली चळवळ आपली शक्ती वाढवण्यासाठी, प्रशिक्षणासाठी, नवीन भरतीसाठी कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक संकटकाळाचा उपयोग करीत असतात. कोरोना संकटकाळाचाही वापर त्याच पद्धतीने केला जात आहे. सर्व सुरक्षा दले व प्रशासन कोरोनाशी लढण्यात व्यग्र असल्याने त्याचा फायदा घेऊन नक्षली त्यांच्या नवीन भरतीचे व त्यांच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रम जोमाने राबवत आहे, असे दिसून येत आहे. ८ मे रोजीच्या घटनेत याची चुणूक जाणवत आहे. त्यामुळेच नक्षली हिंसाचाराबाबत दिसून येणारी शांतता ही फसवी तर ठरणार नाही ना, ही भीती कायम राहणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या या दहशतीतही नक्षल चळवळीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनाची गढूळता निवळल्यानंतर नक्षली हिंसाचाराचे वादळ घोंघावू नये, यासाठी प्रशासनाला व सुरक्षा दलांना आताच सजगतेने नक्षल्यांच्या हालचालींकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
@मंजूषा कोळमकर
नागपूर