रत्ना'कर हरपले!

विवेक मराठी    20-May-2020
Total Views |
@जयश्री देसाई
रत्नाकर मतकरी यांची अचानक झालेली एक्झिट प्रत्येक मराठी रसिकाला चटका लावणारी आहे. मतकरींची लेखणी आणि त्यांची प्रयोगशीलता नवनवीन आयाम घेत विविध क्षेत्रांमधून बहरतच राहिली आणि आपल्याला समृद्ध करीत राहिली.

matkari_1  H x
सतत नवनवीन काहीतरी सुचत राहणं आणि सतत नवनवीन करावंसं वाटणं ही जर तारुण्याची ओळख असेल, तर रत्नाकर मतकरी हे चिरतरुण होते!
अगदी आत्ता लॉकडाउनमध्ये अडकलेले असतानाही ‘गांधी : अंतिम पर्व’ या नाटकासाठी त्यांची जुळवाजुळव, धडपड चालू होती. गांधीजींबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत आणि लोकांना गांधीजी कळावेत यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर या नाटकाचं अभिवाचन करण्याचं ठरवलं होतं. टाळेबंदी, लॉकडाउन, कोरोनाचा धोका हे सारं त्यांच्या गावीही नव्हतं आणि बहुधा म्हणूनच त्यांना खिंडीत गाठून त्यांच्यावर वार करायची, त्यांची विकेट काढायची संधी कोरोनाला मिळाली. जगातील अनेक नामवंत कलावंतांप्रमाणेच ख्यातनाम लेखक-नाटककार रत्नाकर मतकरी यांचीही विकेट कोरोनानेच काढली!
हा मृत्यू प्रत्येकच मराठी रसिकाला इतका चटका लावून गेला की त्यावर विश्वासच बसू नये... असंख्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत त्यांच्यावर भरभरून लिहिलं आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी उघड झाली. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात ही पोकळी निर्माण होणं स्वाभाविक होतं, कारण लहानपणापासून त्यांच्या नाटकांनी, त्यांच्या गीतांनी, त्यांच्या पुस्तकांनी आपल्याला साथ दिली आहे, आपल्या आयुष्यात अनेक रंग भरले आहेत.. मग ते रंग अद्भुताचे असतील वा गूढाचे, प्रणयाचे असतील वा जीवन विचाराचे... त्यांची लेखणी आणि त्यांची प्रयोगशीलता नवनवीन आयाम घेत विविध क्षेत्रांतून बहरतच राहिली आणि आपल्याला समृद्ध करतच राहिली!

हे सगळे ते करू शकले, यात देवाच्या देणगीचा भाग तर आहेच, त्याचबरोबर त्यांना जे समृद्ध बालपण मिळालं, त्याचाही त्यात फार मोठा वाटा आहे.

त्यांची आई कुडाळची, तर वडील कोकणातील नेरूरचे. तिथल्या कलेश्वराच्या देवळातला पहिला मान मतकरींच्या कुटुंबाकडे होता. मतकरींना त्याचं खूप अप्रूप होतं, कारण कोकणातील प्रख्यात दशावताराचा सिझन तिथून सुरू होतो. त्यामुळे ‘आमच्या घरातील नाटकाची मुळं किती खोलवर गेली आहेत ते बघा’ असं ते अभिमानाने सांगायचे. त्या मंदिरातला पहिला मान मतकरींच्या घराण्याकडे असल्याने त्यांचं आडनाव झालं मतकरी. नाहीतर ते प्रभू किंवा नेरूरकर म्हणून ओळखले गेले असते.

पण हा वारसा असला, तरी त्यांचा जन्म व आयुष्य मात्र गेलं ते मुंबईतच.

मला त्यांना भेटण्याचा योग अनेकदा आला. मी त्यांच्या काही मुलाखती घेतल्या, नंतर मी ज्या प्रकाशनात काम करत होते, त्या प्रकाशनातर्फे त्यांचं ‘सादर सप्रेम’ नावाचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक काढलं. त्यामुळे ते व त्यांच्या अतिशय गोड पत्नी प्रतिभाताई या प्रतिभावंत दांपत्याशी माझा चांगला स्नेह जुळला. त्यामुळे अनेकदा, अनेक विषयांवर त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा योग आला. अशाच एका गप्पांमध्ये त्यांच्या बालपणाविषयी त्यांनी सांगितलं. हे जाणून घेणं गरजेचं असतं, कारण त्यातून त्या लेखकाच्या किंवा कलावंताच्या निर्मिती प्रक्रियेचा उगम शोधता येतो.

त्यांचे वडील अतिशय बुद्धिमान. त्या काळातले ते एम.ए., एलएल.बी., बी.टी., संस्कृत, मराठी, गणित आणि इंग्लिशचा अतिशय गाढ व्यासंग असलेले विद्वान. त्यांना वकिली करायची होती. त्यांनी सनद घेतली. स्वतःचं ऑफिस उघडलं. पण वकिलीच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या असं लक्षात आलं की या व्यवसायात खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करावं लागतं, म्हणून त्यांनी चक्क वकिली सोडून दिली. ‘सचोटीने वागणं’, ‘लांडीलबाडी न करणं’, ‘मनाला पटेल तेच करणं’ हे संस्कार त्यांच्या वडिलांनी असे आपल्या कृतीतून त्यांच्यावर केले आणि ते त्यांनी आयुष्यभर जपले. त्यांच्या आईचं शिक्षण त्या काळानुसार फारसं नव्हतं, पण त्याही कर्तबगार होत्या. त्यामुळे घराची आघाडी व मुलांचं संगोपन हे त्यांनी अत्यंत यशस्वीपणे केलं. 


Renowned Marathi writer R

नाटकाचा संस्कारही त्यांच्यावर घरातूनच झाला.
 
त्यांनी एकदा सांगितलं होतं, “पूर्वी सगळ्या बुद्धिजीवी लोकांच्या घरांत नाटकांची पुस्तकं असायची. कारण ती वाचूनच त्यांना त्या पदांचा अर्थ समजायचा. तशी ती आमच्याही घरात होती. त्यामुळे लहानपणापासून मी नाटकांची पुस्तकं वाचतच मोठा झालो. मी बालसाहित्य फारसं वाचलंच नाही. या नाटकांमध्ये ज्या रंग सूचना दिलेल्या असायच्या, त्या वाचून अनेकांना कंटाळा यायचा. पण मला मात्र त्या वाचायला खूप आवडायच्या, एवढंच नव्हे तर त्या समजायच्यासुद्धा. मी शाळेत दुसरीत असताना गेलो. म्हणजे शाळेत जाण्याच्या पूर्वीच माझ्यावर पहिला संस्कार झाला होता तो नाटकांचा. मी त्याबाबत वडिलांना प्रश्नही विचारायचो आणि ते मला नीट समजावून सांगायचे. म्हणजे उदाहरणार्थ, ‘कीचकवध’ नाटकात ‘कीचक म्हणजे कर्झनचं प्रतीक आहे’ वगैरे. त्यामुळे माझी नाटकाची समज फार लवकर प्रगल्भ होत गेली. पण गंमत म्हणजे आमच्या शाळेत नाटकाचं वातावरण असतानाही मी वर्गात पहिला-दुसरा येणारा अतिशय हुशार विद्यार्थी असल्याने मला कुणी नाटकाकडे वळूच देत नसत. मात्र तरीही मी चौथीत असताना साने गुरुजींची ‘तीन मुले’ ही जी कादंबरी आहे, तिचं नाट्यरूपांतर केलं होतं. त्यात स्वतःच्या कल्पनेने नाट्यप्रवेश वगैरे लिहून मी एक ८० पानी वही भरवली होती, तर सातवीत असताना कालिदासाच्या कथेवर एक ४० पानी वही भरेल इतकं नाटक लिहिलं होतं. नंतर रवींद्रनाथ टागोरांच्या एक कथेचं नाट्यरूपांतर केलं होतं. तेव्हा एकांकिका हा शब्दही अस्तित्वात नव्हता. पण आजच्या भाषेत बोलायचं तर मी ती ‘एकांकिका’च लिहिली होती.”
 
शाळकरी वयातच नाटकं, एकांकिका लिहू लागलेले मतकरी, महाविद्यालयीन जीवनातच नाटककार म्हणून प्रसिद्ध झाले यात आश्चर्य नव्हतं! १९५५मध्ये त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी ‘वेडी माणसं’ ही त्यांची एकांकिका आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ध्वनिक्षेपित झाली आणि लोकांना आवडली. त्यांची बालनाट्य संस्थासुद्धा त्यांनी अवघ्या विशीतच सुरू केली होती.

खरं तर ते उत्तम चित्रकार होते. चित्रकलेचं विधिवत शिक्षण घेतलेलं नसलं, तरी ते उत्तम चित्रं काढू शकायचे. मात्र त्यांनी चित्रकलेच्या पुढे साहित्याला प्राधान्य दिलं आणि महाराष्ट्राला एक प्रतिभाशाली लेखक, नाटककार गवसला. ते म्हणायचे, “लेखन मला इतकं सहज येत होतं की ते शिकावं लागतं असं मला कधी वाटलंच नाही. मला वाटायचं की चित्रकला ही शिकण्याची गोष्ट आहे, लिखाण प्रत्येकालाच सहज येत असेल.”
 
या सहजतेनेच मग ते लेखनाचे विविध फॉर्म्स अत्यंत कौशल्याने हाताळत गेले आणि मराठी साहित्याचं दालन समृद्ध करत गेले. मोठ्यांसाठी ७० तर मुलांसाठी २२ नाटकं, अनेक एकांकिका, २० कथासंग्रह, ३ कादंबऱ्या, १२ लेखसंग्रह, त्यांच्या रंगभूमीवरल्या कामाचा आलेख मांडणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग', एक बालगीतसंग्रह, एक काव्यसंग्रह, आणि त्याशिवाय ‘गहिरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका तसंच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्व्हेस्टमेंट’ असं अतिशय विविधांगी योगदान त्यांनी दिलं आहे. नाटकं बसवणं, सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहणं आणि त्याच वेळी इतकी विपुल साहित्यसंपदा निर्माण करणं त्यांना शक्य झालं ते जबरदस्त नियोजन व शिस्त या त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांमुळेच! या व्यतिरिक्त त्यांनी दूरदर्शनवर ‘गजरा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, ‘शरदाचे चांदणे’ या कार्यक्रमात, १३ भागांत साहित्यिकांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि ‘प्रेमकहाणी’, ‘विनाशाकडून विनाशाकडे’, ‘लोककथा ७८’ आदींमध्ये त्यांनी अभिनयही केला आहे.
 
त्यांचं एक आवडीचं वाक्य होतं. ते नेहमी ते वाक्य सांगायचे की कलावंताला कंटाळा आला पाहिजे, तरच त्याची नवनिर्मितीची प्रेरणा टिकून राहील. त्यांना असा कंटाळा यायचा. त्यांच्या सगळ्या लेखन प्रवासाकडे बघितलं तर ते लक्षात येतं. त्यामुळेच ‘लोककथा ७८’ यशस्वी झाल्यानंतरही ते त्यात अडकून पडले नाहीत. त्याच साच्याच्या निर्मितीच्या प्रेमात अडकले नाहीत. ‘एक नाटक गाजलं की त्याच्याच प्रती काढत बसण्यात मला रस नाही’ असं ते सांगायचे आणि म्हणूनच त्यांनी ‘लोककला ७८’च्या पाठोपाठ लिहिलं ते ‘अजून यौवनात मी’ हे विनोदी नाटक... हे ते सहज करू शकत होते हे त्यांचं मोठेपण होतं!


Renowned Marathi writer R
त्यांनी लेखन केलं, दिग्दर्शन केलं, अभिनय केला, तसंच गूढकथा लिहून आपल्याकडे तशा उपेक्षित राहिलेल्या या साहित्यप्रकाराला साहित्यप्रवाहाच्या केंद्रस्थानीही आणलं. त्यांच्या गूढकथांचा उल्लेख व त्यांचं विवेचन केल्याशिवाय त्यांच्यावरील लेख पूर्णच होऊ शकणार नाही. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ऐन तारुण्यात त्यांनी ज्या तडफेने या कथा लिहिल्या, तीच त्यांची तडफ सत्तरी उलटल्यानंतरही कायम होती. कारण मी ज्या दिवाळी अंकाचं संपादन करत होते, त्यात त्यांनी ‘विल्कुची कहाणी’ ही गूढकथा दोन भागांत लिहिली. वाचताना अक्षरशः काटा येत होता. वाचकाला खिळवून ठेवण्याचं हे त्यांचं कसब तसंच कायम होतं!
 
त्यांना जेव्हा या गूढकथांबाबत विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं.. किंवा दुसऱ्या शब्दांत बोलायचं तर ते सांगायचे की "मी गूढकथा लिहिल्या, पण त्या वाचकांना घाबरवण्यासाठी नाही. लेखकाला वाचकाविषयी प्रेम, सहानुभूती असलीच पाहिजे, जसं नाटककाराला त्याच्या पात्रांविषयी प्रेम, सहानुभूती असायला हवी. पण माझ्या दृष्टीने भीतीचा शोध हा न संपणारा शोध आहे. भीती काय आहे याचा शोध मी माझ्या गूढ कथांमधून घेतला आहे."


त्यांच्या विविधांगी लिखाणाइतकीच आणखीही एका गोष्टीची आवर्जून दाखल घ्यायला हवी आणि ती म्हणजे त्यांनी केलेली अभिवाचनं! ते व प्रतिभाताई मिळून त्यांच्याच नाटकांतील स्त्री-पुरुष संबंधातील तुकड्यांचं अभिवाचन करत. त्या कार्यक्रमाचं नाव होतं ‘सांगाती’. लहान मुलांसाठी ‘अद्भुताच्या राज्यात’, ‘कथादर्शन’ असे कार्यक्रम ते करायचे. या कार्यक्रमाला ‘कथादर्शन’ असं नाव त्यांनी ठेवलं होतं, कारण ते एकटे मंचावर असले तरी पूर्ण मंच ते वापरायचे.


Renowned Marathi writer R
अमेरिकेत गेले असताना त्यांनी ‘माणसांच्या गोष्टी’ या नावाखाली ८ गोष्टींच्या अभिवाचनाचे कार्यक्रम केले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, नर्मदा आंदोलन काय आहे ते लोकांना कळावं आणि त्याबद्दलचे लोकांचे गैरसमज दूर व्हावे म्हणून ‘तुम्ही तिथे असायला हवं’ हा ५० मिनिटांचा कार्यक्रम ते करायचे.
 
नर्मदा आंदोलनाशी ते व प्रतिभाताई फार पूर्वीपासून जोडले गेले होते. त्यांनी स्वतः नर्मदा आंदोलनाचा सखोल अभ्यास केला होता. स्वतः तिथे जाऊन सगळं पाहिलं होतं. ते लोकांपर्यंत पोहोचावं अस त्यांना वाटत होतं. त्याच काळात त्यांना अरुंधती रॉय यांचा ‘For greater common good’ या शीर्षकाचा लेख वाचायला मिळाला. तो बऱ्यापैकी संवादात्मक होता. त्यांनी विद्या वैद्य यांच्याकडून ‘तुम्ही तिथे असायला हवं’ या शीर्षकाने त्याचं रूपांतर करून घेतलं. राज्यभर अनेक ठिकाणी, अगदी महाविद्यालयांतूनही त्यांनी त्याचं अभिवाचन केलं. ते हे अभिवाचन करायचे आणि मग संजय मं गो किंवा लता प्रतिभा मधुकर यांच्यापैकी कुणी तरी लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचे. असा तो दीड तासाचा कार्यक्रम होत असे.
 
नर्मदा आंदोलनाशी असलेलं त्याचं हे घनिष्ट नातं शेवटपर्यंत टिकून होतं. ते उत्तम चित्रकार तर होतेच. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन तैलचित्रांच्या रूपात कॅनव्हासवरही आणलं होतं! काही वर्षांपूर्वी रायगडच्या अण्णा भाऊ साठे संस्थेमध्ये नर्मदा आंदोलनासंदर्भात एक चित्रप्रदर्शन आयोजित केलं गेलं होतं. त्या प्रदर्शनामध्ये नर्मदा आंदोलनावर मतकरी सरांनी केलेल्या चित्रांचा स्वतंत्र विभाग होता.
 
त्यांच्याशी बोलताना जसा त्यांचा साधेपणा जाणवायचा, तसच त्यांचं समाजभानही जाणवायचं. त्यातूनच ते जसे नर्मदा आंदोलनाशी जोडले गेले, तसंच त्यांनी ‘वंचितांचा रंगमंच’ या नावाने झोपडपट्टीतील मुलांना रंगभूमीशी जोडण्यासाठी, त्यांना आविष्काराची मुक्त संधी देण्यासाठी एक अत्यंत वेगळी अशी नाट्यचळवळ उभी करण्याची धमक अगदी उतारवयातही दाखवली. यातही झोपडपट्टीतील मुलंच विषय निवडायची, लिहायची, सादर करायची आणि ते प्रयोग, त्यांचे ते विषय व सादरीकरण थक्क करणारं असायचं. लहान मुलांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी तो झोपडपट्टीतल्या महिला व मुलं यांच्यासाठीही राबवला व यशस्वी केला. हा रंगमंच भविष्यात देशाचा रंगमंच व्हावा, हे त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळे केवळ कार्यकर्त्यांवर जबाबदारी न टाकता ते व प्रतिभाताई या चळवळीत सक्रियरित्या सहभागी झाले होते. कुठेही जाहिरातबाजी न करता शांततेत हे काम चालू होतं.
 
“ही मुलं अत्यंत कडकपणे प्रश्नांशी भिडतात. त्यांचे प्रश्नही वेगळे असतात. त्यातून मला काय शिकायला मिळतं ते मी पाहतो" असं ते एकदा म्हणाले होते.
 
हा साधेपणा, निगर्वीपणा, नित्य नवीन काही तरी करण्याची आस आणि धाडसीपणा असे अनेक पैलू त्यांच्याशी बोलताना मला जाणवले. त्यामुळेच ‘आरण्यक’सारखं नाटक उतारवयात त्याच संचाला घेऊन सादर करायचं धाडस ते दाखवू शकले. ‘इंदिरा’सारख्या विषयावर नाटक लिहून, त्याला आर्थिक पुरस्कर्ता मिळवून ते यशस्वी करण्याची हिंमतही त्यांनी दाखवली.
 
मी ज्या प्रकाशनात काम करत होते, त्याच्या वतीने त्यांचं ‘सादर सप्रेम’ हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक मी काढलं. पुढे हे प्रकाशन बंद पडलं. पण त्यांचा पुस्तकांवर एवढा जीव होता आणि माझ्यावर विश्वास की ते मला सांगत होते की मी कोणीतरी फायनान्सर बघून माझं प्रकाशन सुरू करावं. ते व अन्य सगळे मोठे लेखक मला पुस्तकं देतील. पुस्तक प्रकाशनासारख्या आर्थिकदृष्ट्या फायद्याच्या नसलेल्या व्यवसायासाठी कोण फायनान्सर मिळणार? असा माझा प्रश्न होता. त्यामुळे मी त्या फंदातच पडले नाही. पण ते मात्र वारंवार मला ते सांगत होते. ज्याला ‘आउट ऑफ द बॉक्स’ विचार म्हणतात तसा करायची क्षमता त्यांच्याकडे होती.
मला आणखी एक जाणवलं की त्यांचे विचार फार सुस्पष्ट होते आणि ते मोकळेपणाने, उघडपणे सांगण्याची हिमत त्यांच्यात होती. उदाहरणार्थ, विजय तेंडुलकर हे गाजलेले नाटककार. त्यांचं लिखाण किती ग्रेट असंच सगळे म्हणताना आपण ऐकतो, वाचतो. मतकरींचं मत मात्र वेगळं होतं. ते ‘सादर सप्रेम’मध्ये तर आलंच आहे, तसंच माझ्या आणि त्यांच्याही यावर गप्पा झाल्या होत्या. कारण माझ्या डोक्यात पुस्तकाची एक कल्पना होती, ज्यात या थोर व्यक्तिमत्त्वांची मानसशास्त्रीय चिरफाड त्यांच्याशीच बोलून करायचा माझा विचार होता. त्यासाठी मी तेंडुलकरांना भेटलेही होते आणि त्यांना स्वतःला ती कल्पना फारच आवडली होती. या संदर्भात आमच्या एक-दोन भेटीही झाल्या होत्या. पण दुर्दैवाने ती मुलाखत होऊ शकली नाही. ते पुस्तकही परिणामी मागे पडलं. मतकरींनाही ती कल्पना आवडली होती. विषय तेंडुलकरांचा असल्याने ते भरभरून बोलले. तेंडुलकरांचं योगदान त्यांना माहीत होतं, त्याचा ते आदरपूर्वक उल्लेखही करायचे, पण तरीही तेंडुलकरांच्या स्क्रिप्टमध्ये गडबड असते, ते पसरट लिहितात, असांकेतिकतेचा वेध घ्यायचं धाडस दाखवता दाखवता त्यांची कथा शेवटी सांकेतिकतेच्या मार्गालाच जाऊन मिळते हे ते सोदाहरण सांगायचे. ते प्रत्येकाचं असं तटस्थ विश्लेषण सतत करत असायचे. त्यामुळेच ते कुणाच्या प्रभावाखाली येऊ शकले नाहीत. कुणीतरी काहीतरी ग्रेट करतंय असं वाटेपर्यंत त्यांना त्याचे मातीचे पाय दिसायला लागायचे. त्याची मर्यादित थोरवी त्यांच्या लक्षात यायची. अर्थात ती ते खुलेपणे मान्य करायचे. ती दिलदारी त्यांच्यात होती. मात्र ते तिथे अडकून पडायचे नाहीत. स्वतःचा मार्ग चोखाळत ते पुढे जात राहायचे. त्यांच्यात पूर्णपणे विरघळून गेलेल्या त्यांच्या पत्नी प्रतिभाताई आणि त्यांच्याइतकीच प्रतिभावंत असलेली गणेश व सुप्रिया ही दोन मुलं, यांची साथ त्यांना शेवटपर्यंत लाभली. कोरोनाने ती साथ, प्रतिभाताईंबरोबरचं त्यांचं अद्वैत भंग केलं!
 
'There is always a room at the top' ही त्यांची धारणा होती. त्यामुळे ते वर वर चढत राहिले आणि... आता कायमचेच वर निघून गेले! कधीच परत न येण्यासाठी!!
त्यांना प्रेमपूर्वक श्रद्धांजली!

जयश्री देसाई
९६१९८७८४१५