शहामृगी पवित्रा कशासाठी?

विवेक मराठी    29-May-2020
Total Views |
महाराष्ट्र, मुंबई आज कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, सर्वाधिक मृत्यूही मुंबईमध्ये झाले असताना एका दूरचित्रवाहिनीवर मुंबईत कोरोनावर कसा ताबा मिळवला यांची स्टोरी चालवली जाते आणि 'मुंबई पॅटर्न' म्हणून तिचे कौतुक केले जाते. एका अर्थाने मुंबईत कोरोनचा प्रसार आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या यावर मात करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी अशा स्टोरी चालवल्या जातात. ही स्टोरी चालवताना केंद्रीय पथकाने मुंबई पॅटर्नचे कौतुक केले असे सांगितले जाते. मात्र केंद्रीय पथकाडून याचा इन्कार केला जातो. 

uddhav thackeray_1 &

आपली बाजू सावरून धरायची असेल, आपली प्रतिमा उजळवून घ्यायची असेल तर माणूस अनेक मार्गांचा अवलंब करत असला, तरी खोटे बोलणे, वास्तवाशी फारकत घेऊन अवास्तवाचे इमले बांधणे या सहज मार्गावर अनेकांचा प्रवास होत असतो. आपली डागाळलेली प्रतिमा उजळवून घेण्यासाठी सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच मार्गाने जाणे पसंत केले आहे.

कोरोनाचे वास्तव आणि समाजमाध्यमे, वृत्तपत्र, दूरचित्रवाहिन्या अशा माध्यमांतून प्रतिमा उजळवून घेण्यासाठी काहीही मांडणी केली जाते, त्याचे ताजे उदाहरण म्हणजे एका वृत्तपत्राच्या वेबिनारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान होय. "टाळेबंदीची वेळ चुकली" असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर - पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. पण ही टीका करताना मोदींच्या पदरात आपण ज्या चुका घालत आहोत, त्यांची अप्रत्यक्ष जबाबदारी आपल्या शिरावर येते, हे ते विसरून जातात, कारण मोदींच्याही आधी मुंबईत टाळेबंदीची घोषणा याच मुख्यमंत्री महोदयांनी केली होती. तेव्हाच अन्य प्रांतांतील लोकांना आपल्या गावाकडे पाठवण्यांची योजना मुख्यमंत्री महोदयांनी का अमलात आणली नाही? हा प्रश्न आम्हाला पडतो. पण प्रतिमा निर्माण करण्याचा ठेका घेतलेल्या वृत्तपत्राला असा प्रश्न पडत नाही, उलट पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाची वेळ चूक कशी आहे, याची हेडलाइन करून त्या वृत्तपत्राने आपला खरा चेहरा दाखवून दिला आहे.

महाराष्ट्र, मुंबई आज कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, सर्वाधिक मृत्यूही मुंबईमध्ये झाले असताना एका दूरचित्रवाहिनीवर मुंबईत कोरोनावर कसा ताबा मिळवला यांची स्टोरी चालवली जाते आणि 'मुंबई पॅटर्न' म्हणून तिचे कौतुक केले जाते. एका अर्थाने मुंबईत कोरोनचा प्रसार आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या यावर मात करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी अशा स्टोरी चालवल्या जातात. ही स्टोरी चालवताना केंद्रीय पथकाने मुंबई पॅटर्नचे कौतुक केले असे सांगितले जाते. मात्र केंद्रीय पथकाडून याचा इन्कार केला जातो. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील कोरोनापीडितांची संख्या दिवसेदिवस वाढत आसताना, समस्या अधिक गंभीर होत असताना मुख्यमंत्री महोदय मात्र प्रतिमामंडन करण्यात गुंतले आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैवच आहे.

याच वेबिनारमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी "पोटदुखी हे कोरोनाचे लक्षण असून ते विरोधकांमध्ये दिसत आहे" असे विधान केले. गेले काही दिवस महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे सरकारला प्रश्न विचारत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या खोटेपणाची पोलखोल करत आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना तीन तीन मंत्री मैदानात उतरवावे लागत आहेत, त्या तिघांतही एकवाक्यता नाही असे चित्र समोर येत असताना, सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधी पक्षाला पोटदुखी होत आहे असे म्हणणे म्हणजे, माझ्यात काहीच दोष नसून माझ्या कारभारावर टीका करणाऱ्या विरोधकांध्येच दोष असल्याचा दावा आपल्या विधानातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. जितक्या लवकर मुंबईचे जनजीवन सामान्य होईल, तितक्या लवकर देश या संकटातून बाहेर पडेल आणि त्यासाठी मुंबईत युद्धपातळीवर कोरोनाशी लढावे लागेल. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागेल.
 
मात्र परिस्थिती तशी नाही. मुख्यमंत्री आपला गड सोडायला तयार नाहीत, त्यांचे सहकारी पक्ष आता स्वत:ला वेगळे करून घेण्याचा पवित्रा घेत असून राहुल गांधी यांनी तसे सूतोवाच केले आहे. दुसरा सहकारी पक्ष आपल्या मर्यादा ओळखून असला, तरी तो मनापासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे असे म्हणता येणार नाही. कारण या पक्षाचा नेता सांगेल तीच पूर्व दिशा असल्याने सत्तासुखापलीकडे तो पक्ष ठाकरेंसह असणार नाही. असे पडझडीचे पडघम वाजू लागले असताना मुख्यमंत्री स्वत:ची प्रतिमा उजळवून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र ठाकरे यांनी लक्षात घ्यायला हवे की ज्यांची प्रतिमा डागाळलेली आहे, तेच प्रतिमा उजळवून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. आपण गेले सहा महिने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात, या काळात त्यांचे आपण कोणकोणत्या प्रकारचे डाग लावून घेतले आहेत हे तपासून पाहिले पाहिजेत आणि कधीतरी गडउतार होऊन जमिनीवरचे वास्तव समजून घेतले पाहिजे. आपले सहकारी पक्ष, मंत्री, आमदार काय बोलत आहेत आणि समाज त्यांच्या वक्तव्याचा कसा विचार करतो, हे समजून घेतले पाहिजे. कोरोनाचा फैलाव लवकरात लवकर थांबला पाहिजेच, पण त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी हे वास्तव समजून घेतले पाहिजे आणि प्रतिमा उजळवून घेण्यासाठी प्रयत्न न करता सत्य स्वीकारून आपल्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणले पाहिजेत. तसे होणार नसेल, तर वाळवंटातील शहामृग आणि मुख्यमंत्री महोदय यांच्यात फार फरक नाही, असे म्हणता येईल. कारण शहामृग खऱ्या अर्थाने संकट समजूत घेत नाही, स्वसंरक्षणाची त्यांची रीतही आत्मघातकी असते. आपल्या मुख्यमंत्री महोदयांना शहामृगासारखे वागायचे आहे का?