'विनाशकाले विपरीत बुद्धी'चा प्रत्यय देणारा - मकबूल

विवेक मराठी    04-May-2020
Total Views |
**चित्रलिपी***

ओम पुरी आणि नसीरुद्दीन शहा दोन पोलिसांच्या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका अप्रतिम वठवतात. चित्रपट आहे तो मकबूलचा. चित्रपटाचे कारणच आहे त्याची महत्त्वाकांक्षा. के.के. मेननने ही भूमिका नाकारल्यानंतर भारद्वाज यांनी कमल हसन यांचा विचार केला. पण भूमिका मिळाली ती इरफान खान यांना. चित्रपटाच्या तगड्या कलाकारांच्या गर्दीत हे नाव नवीन होते, अननुभवी होते, पण इरफान यांनी या संधीचे सोने केले. आपली महत्त्वाकांक्षा आणि आपल्याला वाढवणाऱ्या पित्यासमान व्यक्तीबद्दल वाटणारी कृतज्ञता याच्या कात्रीत सापडलेला मकबूल त्यांनी उत्तम सादर केला.


कलेची निर्मिती शोकांतिकेतून होते. शोकनाट्यात केवळ सज्जन माणसांच्या दुःखाचे चित्रण करायला हवे, हा ऍरिस्टॉटलचा सिद्धान्त धुडकावून शेक्सपिअरने दुष्ट माणसांच्या दुःखाला वाचा फोडली. दुष्ट माणसे हीसुद्धा मुळात माणसेच असल्याने त्यांच्या आत्म्याचा तडफडाटसुद्धा दाखवून दिला पाहिजे, या विचारातून मॅकबेथ, ऑथेल्लो या नाटकांची निर्मिती झाली. या नाटकांच्या केंद्रस्थानी बलाढ्य, उच्चपदस्थ माणसे होती, कारण त्यांच्याच कृतीवर किंवा भाग्यावर एखाद्या साम्राज्याचे भवितव्य अवलंबून असते आणि त्यांच्या पतनाने जनमानसावर व्यापक आणि विदारक स्वरूपाचा परिणाम होतो.

Maqbool _1  H x

प्राचीन रोमन किंवा ग्रीक नाट्यक्षेत्रात अशा व्यक्तींच्या दुर्दैवाचे खापर नशिबावर फोडले जाते. शेक्सपिअरने या व्यक्तींना मात्र सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे स्खलनशील, मोहाला बळी पडणारी म्हणूनच रंगवले. माणसांच्या विचारावर जेव्हा विकारांची पकड बसते, भावनांवर वासनांचे नियंत्रण होते, तेव्हा माणसाचा प्रवास नाशाच्या दरीकडे वेगाने होऊ लागतो ह्याचे प्रत्ययकारक दर्शन त्याने मॅकबेथ किंवा ऑथेल्लो या अत्यंत गाजलेल्या नाटकांच्या माध्यमातून दाखवले.
असामान्यातले सामान्यपण दाखवणाऱ्या त्याच्या कलाकृतींनी अनेकांना प्रेरणा दिली. कुसुमाग्रज, गुलज़ार आणि आताचा आघाडीचा दिग्दर्शक विशाल भारद्वाज ही काही ठळक नावे. भारद्वाजांच्या 'मकबूल'ची प्रेरणा होती शेक्सपिअरचा 'मॅकबेथ'.

मकबूलवर लिहिण्याआधी मॅकबेथ समजणे महत्त्वाचे आहे.

महत्त्वाकांक्षा माणसाच्या अस्तित्वाला आकार देते, काहीतरी भरीव कार्य करण्यास उद्युक्त करते हे खरे असले, तरीही नैतिकतेचा मार्ग सोडून भलत्याच महत्त्वाकांक्षेच्या पाठीमागे धावणे हे सर्वनाशाला आमंत्रण देण्यासारखे असते, ही आहे मॅकबेथची थीम.

मॅकबेथ हा स्कॉटलंडचा राजा डंकन याचा अत्यंत विश्वासू आणि पराक्रमी सरदार आहे. त्याची राजावर निष्ठा आहे, मित्रांवर प्रेम आहे. त्याची वृत्ती आनंदी आहे. खरे तर तो दुष्ट नाही, पण मनातून सत्ता आणि स्वतःचा उत्कर्ष याचे त्याला आकर्षण आहे. त्याची पत्नी लेडी मॅकबेथ आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मॅकबेथच्या ह्या सुप्त आकर्षणाचा उपयोग करून घेते. राजाविरुद्ध बंड करण्यासाठी त्याला चिथावते. मॅकबेथच्या हातून राजाचा खून होतो. एकदा हत्यांचे सत्र सुरू झाले की ते थांबवता येत नाही. रक्ताला रक्ताची चटक लागते आणि मग नरसंहाराला सुरुवात होते. यात अनेकांचे, निरपराध्यांचेही बळी जातात. या कांडात, मॅकबेथला "तू राजा होशील" ही भविष्यवाणी सांगणाऱ्या तीन चेटकिणींचासुद्धा हात आहे. उद्यासाठी धडपड करणाऱ्या माणसाला उद्या जाणून घेण्याची इच्छा असते. भविष्यकाळ अज्ञात असल्याने, समजा कुणी भविष्य सांगितले आणि ते खरे ठरले, तर माणसाचा विश्वास बसणे स्वाभाविक असते. विश्वासाचा अंधविश्वास व्हायला वेळ लागत नाही. सांगितलेला कौल खरा करण्यासाठी माणसे कोणत्याही थराला जातात, एका मृगजळाच्या पाठी लागतात आणि लक्षात येईपर्यंत फार उशीर होतो.

मकबूल बनवताना, पार्श्वभूमी होती मुंबईचे अंडरवर्ल्ड (गुन्हेगारी साम्राज्य), डंकन होता अब्बाजी, मॅकबेथ होता मकबूल, अब्बाजीचा उजवा हात आणि लेडी मॅकबेथच्या भूमिकेत होती अब्बाजीची रखेल आणि मकबूलची प्रेयसी निम्मी.
 
मुंबईच्या अंडरवर्ल्डचा सर्वेसर्वा डॉन आहे जहाँगीर खां उर्फ अब्बाजी (पंकज कपूर). मकबूल - त्याचा उजवा हात, हा अनाथ मुलगा, जो अब्बाजीच्या घरीच मोठा होतो. हे नाते केवळ मालक आणि नोकर असे नाही. त्यांच्यात प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा बंध आहे. डॉनच्या पैशावर पोसलेले दोन पोलीस (ओम पुरी, नसीरुद्दीन शहा) इथे चेटकिणींची भूमिका बजावतात. हे कुडमुडे ज्योतिषी आहेत. शक्तीचे संतुलन होणे आवश्यक आहे हे त्यांचे तत्त्व. एकाच ठिकाणी सत्ता केंद्रित होणे धोक्याचे, म्हणून मकबूल आणि अब्बाजी यांच्यात फूट पाडणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. मकबूलची सुप्त महत्त्वाकांक्षा, टोळीचा प्रमुख होण्याची लालसा त्यांनी हेरली आहे. 'बॉलिवूडचा ताबा तुझ्याकडे येईल' ही त्यांची भविष्यवाणी खरी ठरते आणि मकबूलचा त्यांच्यावर विश्वास बसतो. तो अब्बाजीची जागा घेईल ही त्यांची दुसरी भविष्यवाणी असते.


Maqbool _1  H x
मनात नसूनही, मकबूलच्या मनात ईर्षा जागृत होते. ह्याला खतपाणी घालते ती निम्मी. ही अब्बाजीची रखेल, पण मकबूल आणि निम्मी दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. अब्बाजीच्या विरोधात जाण्याची ताकद मकबूलमध्ये नाही. पण याच वेळी निम्मीचा मोह त्याला टाळता येत नाही. एक पुरुष म्हणून, अब्बाजी आणि निम्मीचे एकत्र असणे त्याला सहन होत नाही आणि त्याची ही घुसमट निम्मीच्या लक्षात येते. म्हाताऱ्या अब्बाजीबरोबर तिला राहायचे नाही, शिवाय अब्बाजीच्या मुलीचे लग्न झाले तर सत्ता जावयाच्या हातात जाणार आणि आपले महत्त्व कमी होणार, याची तिला कल्पना आहे. आपल्या शरीराची लालूच दाखवणे आणि दुसरीकडे मकबूलच्या पुरुषार्थाला आव्हान देऊन त्याची महत्त्वाकांक्षा जागृत करणे हा डाव खेळून निम्मी मकबूलला अब्बाजीची हत्या करायला उद्युक्त करते. सत्तेच्या मोहाला लिंगाचा अडसर नसतो. पुरुषाइतकीच - अनेक वेळा स्त्री - जास्त क्रूर असते. सत्तेसाठी हपापलेली असते, महत्त्वाकांक्षी असते आणि आपली इच्छा पूर्ण करायला ती कोणत्याही थराला जाऊ शकते, ह्याचे उदाहरण म्हणजे निम्मी.
 
गुड्डूचा समीराशी झालेला साखरपुडा हा मकबूलसाठीसुद्धा धोकादायक, त्याचे स्थान डळमळीत करणारा ठरू शकतो. यामुळे मकबूल अब्बाजीच्याच शय्यागृहात, निम्मी शेजारी झोपलेली असताना, तिच्या डोळ्यादेखत अब्बाजीचा खून करतो. त्याचा आरोप दुसऱ्या माणसावर लावला जातो, ज्याचा निम्मी खून करते. गॅंगला मकबूलचा संशय असतो, पण मकबूल सूत्रे स्वतःच्या हातात घेऊन बाकी लोकांचे तोंड बंद करतो. खून करण्याची इच्छा असणे वेगळे आणि स्वतःच्या हाताने, विश्वासघाताने कुणालातरी मारणे वेगळे. भिंतीवर उडालेले रक्ताचे शिंतोडे, जमिनीवर जमा झालेले रक्ताचे थारोळे निम्मी आणि मकबूलला भेडसावते. अपराधीपणाच्या भावनेने दोघेही ग्रासून जातात. निम्मीला भास होऊ लागतात. भिंत कितीही साफ केली, तरीही रक्त काही तिची पाठ सोडत नाही.. मकबूलला अब्बाजीला मारण्याची खंत असतेच, शिवाय आपली जागा कुणीतरी घेईल याची भीतीही असते. माणूस जेव्हा कृतघ्न होतो, तेव्हा त्याला जगही तसेच भासू लागते.
 
समीराला स्वतःच्या मुलीप्रमाणे मानणारा मकबूल, तिच्या प्रियकराच्या जिवावर उठतो. त्याच्या वडिलांना, जो त्याचा मित्रही असतो, त्याला संपवतो. सुडाचे चक्र आता गरगर फिरायला लागते. आहुत्या पडत जातात. शेवटी निम्मी आणि मकबूल दोघांचा बळी घेऊन ते थांबते.
 
मूळ कथेत मॅकबेथ निपुत्रिक आहे, पण इथे निम्मी आणि मकबूलच्या मुलाला, (ते मूल अब्बाजीचेही असू शकते) समीरा आपल्या कुशीत घेते, त्याच्या जीवनाची परवड संपते हे पाहून मकबूल मरणाला सामोरे जातो.
 
नाटक आणि चित्रपट या दोघांची मध्यवर्ती संकल्पना एकच आहे. अनैतिक महत्त्वाकांक्षेमुळे आणि स्वतःच्या मर्यादा न ओळखल्याने नायकाची झालेली घसरण आणि अंत. भविष्यवाणीवर अंधविश्वास हे कारण फक्त त्यांच्या आत दडलेल्या हेतूला हवा देते. डंकनला मारल्यानंतरसुद्धा, सत्ता स्वतःच्या काबूत ठेवण्याच्या वेडाने मॅकबेथ आंधळा होतो. इथे मकबूलची असुरक्षितता आणि अपराधीपण त्याला दुसऱ्यांचा नायनाट करायला कारणीभूत ठरते.
 
एक छोटासा फरक आहे - मॅकबेथला राज्य हवे आहे, शिवाय त्याच्या पत्नीची तीव्र इच्छा त्याला हे पाऊल उचलायला भाग पाडते, तर मकबूलसाठी प्रेम हा ट्रिगर आहे. निम्मीची प्राप्ती त्याला आंधळे करते. सत्तेची महत्त्वाकांक्षा त्याच्यासाठी दुय्यम आहे. त्यामुळे मकबूल ही शोकांतिकेच्या वाटेने जाणारी प्रेमकथा होते.
मॅकबेथमध्ये डंकन हे सकारात्मक पात्र आहे, त्यामुळे त्याचा खून दुर्दैवी ठरतो. पण अब्बाजी हे पात्र दुर्वर्तनी आहे. स्वतःच्याच गॉडफादरला संपवल्याचा त्याच्यावर संशय आहे. शिवाय खंडणी, खून, अपहरण अशा अनेक गुन्ह्यांनी त्याचे हात बरबटले आहेत. त्याचा मृत्यू दुर्दैवी ठरत नाही. त्यामुळे मकबूलवर रोखलेली अपराधाची सुई बोथट होते.

लेडी मॅकबेथ हे शेक्सपिअरच्या नाटकांतील सर्वात पाताळयंत्री पात्र आहे. तिची हाव मॅकबेथला अपराधाच्या वाटेवर ढकलते. राजाचा खून करायला हवा हे तिच्या मनात पक्के रुजलेले आहे. मकबूलमध्ये मात्र निम्मीला कारण आहे. ती रखेल असल्याने तिला समाजात स्थान नाही. अब्बाजी हा रंगेल माणूस आहे, त्यामुळे स्वतःच्या भविष्याविषयी असलेली असुरक्षितता तिला या मार्गावर नेते. मादक, पुरुषाला कह्यात ठेवणारी, पाताळयंत्री, प्रसंगी क्रूर होणारी आणि नंतर अपराधी भावनेने स्वतःचे मानसिक संतुलन बिघडलेली निम्मी तब्बूने सुंदर रंगवली आहे.

मुंबईच्या गॉडफादरचा चेहरा कसा असावा, हा प्रश्न विचारला तर पंकज कपूरचा चेहरा आठवेल एवढे अब्बाजींचे व्यक्तिचित्र वास्तववादी झाले आहे. सहकाऱ्यांवर असलेली त्याची पकड आणि प्रेम, गुर्मी, कठीण प्रसंगात स्वतःवर ठेवलेला संयम हे सारे वाखाणण्याजोगे.

ओम पुरी आणि नसीरुद्दीन शहा दोन पोलिसांच्या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका अप्रतिम वठवतात. चित्रपट आहे तो मकबूलचा. चित्रपटाचे कारणच आहे त्याची महत्त्वाकांक्षा. के.के. मेननने ही भूमिका नाकारल्यानंतर भारद्वाज यांनी कमल हसन यांचा विचार केला. पण भूमिका मिळाली ती इरफान खान यांना. चित्रपटाच्या तगड्या कलाकारांच्या गर्दीत हे नाव नवीन होते, अननुभवी होते, पण इरफान यांनी या संधीचे सोने केले. आपली महत्त्वाकांक्षा आणि आपल्याला वाढवणाऱ्या पित्यासमान व्यक्तीबद्दल वाटणारी कृतज्ञता याच्या कात्रीत सापडलेला मकबूल त्यांनी उत्तम सादर केला. मुळातले गुंड पण आज्ञाधारक असलेले हे पात्र नंतर निम्मीच्या मोहात सारासार विचार गमावून बसते. तिची मोहिनी आणि दबलेली आकांक्षा मेंदूचा ताबा घेते. बेसावध क्षणी एका महाभयंकर कृत्याचे बीज रोवले जाते आणि मकबूलची ऱ्हासाकडे सुरुवात होते.
 
चित्रपटाच्या सुरुवातीला निम्मी मकबूलवर पिस्तूल रोखते आणि "मेरी जान म्हटल्याशिवाय मी पिस्तूल देणार नाही" असे धमकावते, तेव्हा वेगवेगळ्या शैलीत हे दोन शब्द इरफान उच्चारतो. सुरुवातीला कोणत्याही भावनेशिवाय आणि नंतर त्याचे डोळे हसतात. चित्रपटातले हे प्रेमदृश्य त्याच्या अभिनयाची ताकद दाखवते. सुडाने पेटलेले आणि नंतर मुलाच्या काळजीने खचलेले डोळे शेवटी विझत जातात, ते पाहून मन गलबलते. त्याच्या थंड आणि निष्ठूर वाटणाऱ्या डोळ्यात उदासीची छटा स्पष्ट दिसते आणि प्रेक्षकांच्या मनात कीव दाटून येते. आणि शेक्सपियरचा मॅकबेथ हे पाहून समाधानाने हसतो.