पुणे मनपा - रा. स्व. संघाचं ‘आरोग्यरक्षा सेवा अभियान’ ठरतंय वरदान!

विवेक मराठी    06-May-2020
Total Views |

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

-
अमृता खाकुर्डीकर

मुंबईखालोखाल कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या पुण्याची चिंता सगळ्या महाराष्ट्राला लागून राहिलेली असताना पुणे महानगरपालिकेने एक धाडसी पाऊल उचललं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यातून आरोग्य तपासणी अभियान अशी महत्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली असून हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद ठरला आहे.


RSS_1  H x W: 0 

डॉक्टर हा कोणत्याही रूग्णाला नेहमीच देव वाटत आला आहे. ही भावना फक्त आज नाही तर वर्षानुवर्ष माणसाने आपल्या मनात जपली. आज मात्र देवासमान भासणाऱ्या डॉक्टरची आज सत्वपरीक्षा सुरू आहे. कोरोनाच्या संकटात एकीकडे वैद्यकीय व्यवसायाचे ‘एथिक्स आणि माणुसकीचा तगादा आहे तर दुसरीकडे स्वतःच्याच जीवाला धोकाही पत्करावा लागतो आहे. एकीकडे मोठ्या संख्येने वाढणारे रूग्ण आहेत, तर दुसरीकडे पुरेशी सेवा देऊ शकतील इतक्या डॉक्टरांचं संख्याबळच उपलब्ध नाही. नर्स आणि आरोग्य सेवक यांची संख्याही अपुरीच पडत आहे. अशा अटीतटीच्या प्रसंगी कुठेतरी काही चांगलंही घडून येतं आहे. मुंबईखालोखाल कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या पुण्याची चिंता सगळ्या महाराष्ट्राला लागून राहिलेली असताना पुणे महानगरपालिकेने एक धाडसी पाऊल उचललं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यातून आरोग्य तपासणी अभियान अशी महत्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली असून हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद ठरला आहे.

ही संकल्पना आता देशभर राबवावी अशी पथदर्शी ठर आहे. या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आपत्ती निवारण कार्यात आपल्या जीवाची पर्वा न करता शिस्तबध्द काम करणारी, माणुसकीला वाहून घेतलेल्या कटीबध्द कार्यकर्त्यांची संघटना यात पुढे आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, पोलीस यांच्यासोबतीला संघस्वयंसेवक अशी पुरेसं मनुष्यबळ असलेली खास पथकं तयार करण्यात आली आहेत, जी आज शहरात विविध वस्त्यांमध्ये विशेषतः कोरोना फैलावाचा जास्तीत जास्त धोका असलेल्या पाटील वस्ती, एरोडा चाळ अशा दाट वस्तीच्या झोपडपट्ट्या, वंचित घटकांच्या वसाहतींमध्ये जाऊन हे आरोग्य तपासणी अभियान झपाट्याने राबवत आहेत. प्रारंभी या विशेष पथकांमध्ये समाविष्ट डॉक्टरांची संख्या पुरेशी नव्हती म्हणून यामध्ये पुणे शहरातील सर्व प्रकारच्या आरोग्य शाखांमध्ये सेवा देणारे सर्व पॅथीचे डॉक्टर खाजगी क्षेत्रातून निमंत्रित करण्यात आले.विविध पॅथीच्या डॉक्टरांनी या अभियानात सहभागी व्हावे आणि आपल्या बहुमोल सेवा या अभूतपूर्व आरोग्यसंकटातून समाजाला बाहेर काढण्यासाठी द्याव्यात, असं आवाहन पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबेल अगरवाल आणि रा. स्व. संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी एका व्हिडिओद्वारे केलं आणि खरोखरच समाजमाध्यमाद्वारे या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. सुरवातीला या पथकात यायला डॉक्टर तयार नव्हते. परंतु, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेले काही डॉक्टर स्वतःहून तयारी दर्शवत पुढे आले, पथक प्रमुख म्हणून कामाला लागले. पुढाकार घेऊन त्यांनी जोमाने तपासणीचं काम सुरूदेखील केलं. त्यांच्या या कृतीने समाजातील अनेक डॉक्टरांना प्रेरणा मिळाली, आणि आता स्वयंस्फूर्तीने अॅलोपॅथी बरोबरच आयुर्वेदीक आणि होमिओपॅथीचे अनेक डॉक्टर अभियानात सहभागी होत असल्याचं आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

तपासणी अभियानातील काही थक्क करणारे अनुभव

संवेदनाशील, अतिसंवेदनशील अशा कोरोनाग्रस्त भागात जाऊन प्रत्येक घराची तपासणी करून औषधोपचार करणे, त्यादरम्यान मिळालेल्या संशयित व्यक्तिंची सूची तयार करून पुढील तपासासाठी प्रशासनाला देणे, असे या आरोग्य रक्षा अभियान पथकाचं मुख्य काम. प्रारंभी उल्लेखल्याप्रमाणे या पथकात काम करण्यासाठी अनेक डॉक्टर धजावत नव्हते. अनेक जण गडबडले, घाबरले. कारण अर्थातच, इथे संभाव्य रुग्णाशी थेट संबंध येण्याची शक्यता. नियमानुसार प्रतिबंधक उपाय म्हणून या तपासणी सेवेनंतर आठवडाभर विलगीकरण करून घेणंही बंधनकारक. या सर्व किचकट गुंतागुंतीच्या प्रक्रियेला आज प्रत्येक माणूस घाबरतो आहे. डॉक्टरही त्याला अपवाद कसे असतील. अशा काही डॉक्टरांकडून एकेक अद्भूत अनुभव ऐकायला मिळाले. आपल्या घरच्यांनी या अभियानात सहभागी होण्यास परवानगी दिली का?” असा प्रश्न काही डॉक्टरांना विचारला असता त्यावर अनेकांनी उत्तरं दिली की, “ आमच्या घरच्यांनी नुसती परवानगी नाही तर पाठींबा दिला!” एका डॉक्टरांच्या वृद्ध मातोश्रींनी तर “मीही यात सहभागी होऊ का” असा प्रश्न विचारला. अर्थात, त्या भागाचे संघ कार्यवाह यांनी त्या माऊलीचे वय लक्षात घेऊन त्यांना येऊ दिलं नाही, हा भाग वेगळा. पण अशा संकटात आपणही समाजाला मदत करायला हवी, ही भावना कशाप्रकारे वाढीस लागली, हे दिसून येतं. दुसरा एक अनुभव असाच बोलका. एका कार्यकर्त्याच्या घरात या विषयासंबंधी सुरू असलेली चर्चा ऐकून त्यांची मुलगी स्वतःहून उत्स्फूर्तपणे पथकात मदतनीस म्हणून जायला तयार झाली. तिचा तो निश्चय बघून तिची आईदेखील तिच्यासोबत यायला निघाली! दिव्याने दिवा लागावा तसं त्या कुटंबातले तिघेही पथकात समाविष्ट झाले आहेत. वास्तविक या पथकातील कामकाज तसं धोकादायक. तपासणीची प्रक्रियाही किचकट, अवघड आहे. मात्र स्वयंसेवकांची जबरदस्त इच्छाशक्ती व मदतीला धावून जाण्याची मानसिकता हाच संघ संस्कार अशा असामान्य परिस्थितीत पणाला लागतो.



पर्वती भाग - कोरोनाबाधित रेडझोन वस्तीतील आरोग्य तपासणीमध्येही समोर आलेल्या घटना दिलासादायक आहेत. पर्वती भागातील या उपक्रमाचा प्रारंभ पर्वती दर्शन या वस्तीमध्ये संघाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला. उदघाटनानंतर सकाळी एका आरोग्यसेवा पथकाने व दुपारी दोन पथकांनी पर्वती दर्शन या सेवावस्तीमध्ये आरोग्य तपासणीचं काम केलं. या तपासणी कार्यक्रमात डॉ. करमळकर, डॉ. आसेरकर, डॉ. प्रशांत चौधरी व डॉ. संतोष गटणे यांच्या नावांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या पथकातील डॉ. करमळकर यांचं वय सत्तरीच्या पुढे आहे. पण कामाचा उत्साह, कर्तव्याची जाणीव आणि या कठीण प्रसंगी ऊभं राहाण्याची जिद्द यांनी त्यांना जणू आपलं वय विसरायला भाग पाडलं आहे. डॉ. करमळकरांचा या उपक्रमातील सहभाग अनेकांना प्रेरणा देणारा आणि तरूण डॉक्टरांचा उत्साह वाढविणारा ठरला आहे. सकाळी व दुपारी दोन्ही सत्रात आरोग्य तपासणी कामात ते स्वतः जातीने उभे असतात. डॉक्टरांसोबत एकूण सहा कार्यकर्तेदेखील यात सहभागी आहेत. हे अभियान किती आवश्यक आणि महत्वाचं आहे, त्याचा लगेच प्रत्यय मिळाला आहे. कारण या तपासणीत प्रथमदर्शनीच एक संशयित कोरोना रुग्ण आढळून आला. आता त्याची माहिती संबंधित आरोग्य यंत्रणेला पोहचविण्यात आली अशा संशयित संभाव्य ऋग्णांना योग्यवेळी योग्य उपचाराचा लाभ घेता येईल. सध्या हा आकडा एक असला तरी तो वाढत जाण्याची भीती आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

दुसरीकडे, या अभियानाला लोकांमधूनही उत्तम प्रतिसाद मिळत असून नागरिक स्वतः पुढाकार घेऊन घरातील सर्व सदस्यांची तपासणी करून घेत आहेत. आपल्या कुटुंबातील सदस्य, शेजारी किंवा मित्र परिवारातील कोणी राहून गेला असेल, कुठे बाहेर गेला असेल तर त्याला आवर्जून बोलावून तपासणी पथकाकडे पाठवलं जात आहे. काही जणांना सर्दी, ताप, खोकला अशा नेहमीच्याच छोट्या छोट्या तक्रारी होत्या. त्यांनाही डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून खबरदारी म्हणून संबंधित आजारावरील योग्य ते औषध देण्यात येतं आहे. तपासणी करून घेतलेले नागरिक उस्फूर्तपणे आरोग्य तपासणी अभियान राबवणारी पुणे मनपा आणि रा. स्व. संघ तसेच पथकात प्रत्यक्ष कामं करणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्याप्रती आभार व्यक्त करताना दिसतात. यामुळे हे अभियान यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना, सर्व संघ स्वयंसेवकांना कार्यपूर्तीचं समाधान लाभतं असल्याची भावना डॉक्टर्स, कार्यकर्ते व्यक्त करतात.


सकाळी एक टीम व दुपारी दोन टीम
मार्फत पर्वती दर्शन सेवावस्तीमध्ये नागरिकांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. या कामात डॉ. परशुराम वाघ, डॉ. स्वप्नील देशमुख व डॉ. करमळकर सहभागी झाले. एकूण १३९ कुटुंबातील ५६५ नागरिकांची तपासणी यावेळी पूर्ण झाली. त्यात संशयित कोरोना रुग्ण आढळून आले. त्यांची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना कळवून त्या रुग्णांचे त्वरीत विलगीकरण करण्यात आलं. तपासणीची व उपचाराची पुढील कार्यवाही त्यामुळे सुलभ होऊ शकेल. या सर्व कामाची दखल पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनीही घेतली आणि मुक्तकंठाने प्रशंसाही केली. शिवाय त्यांनी या सर्व मोहिमेत आवश्यक उपकरणे व अन्य साधनसामग्री अद्ययावत स्वरूपात तातडीने पुरवण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

या अभियानात आता एक नवाच अनुभव
डॉक्टरांच्या चेहऱ्यावर स्मितहास्याची रेष आणतो आहे. तपासणी टोपून डॉक्टर निघाले की, तिथे उपस्थित सर्व नागरिक एका ओळीत थांबतात आणि डॉक्टर जाईपर्यंत हात जोडून किंवा टाळ्या वाजवून त्यांचे आभार व्यक्त करतात. काही दिवसापूर्वी अनेक ठिकाणी जी माणसं डॉक्टरांना येवू देत नव्हती, एवढेच नव्हे तर काही भागात डॉक्टरांवर दगडफेकही होण्याच्या घटना घडत होत्या आणि इथली माणसं मात्र डॉक्टरांप्रती आपली कृतज्ञता इतक्या उत्स्फुर्तपणे व्यक्त करत आहे. विद्यापीठ भाग, पाटील इस्टेट, शिवाजीनगर परिसर रेडझोनमध्येही ३८३ व्यक्तींची तपासणी पूर्ण झाली. यामध्ये ५ संशयित रुग्ण आढळून आले. त्याची माहिती शासकीय यंत्रणेला कळवली गेली आहे. या परिसरातील तरूणदेखील या उपक्रमात सहभागी होवून स्वेच्छेने सहकार्य करीत आहेत. डॉ. रोहित काशीकर यांच्यासोबत ७ कार्यकर्त्यांचा चमू या भागात अभियानात सहभागी झाला आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

या सर्व अभियानात पुणे महानगर प्रचारक सुनील साठे, प्रांत कार्यालय व्यवस्था प्रमुख भरत देशपांडे, परमहंस नगर सहकार्यवाह आमोद कलगावकर, पुणे महानगर बौद्धिक मंडळ सदस्य डॉ. प्रशांत दुराफे यांनी पुढाकार घेतला असून महानगर तरूण व्यवसायिक गटाचे प्रमुख आनंद कुलकर्णी हे पूर्णवेळ थांबून समन्वय करीत आहेत. सेवा प्रमुख महेश पोहनेरकर यांनी या निमित्त खास कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गदेखील घेतला. प्रांत प्रचारक शोवर्धन वाळिंबे यांनीही तपासणी शिबीरास भेट देऊन पाहणी केली. पुणे महापालिकेच्या वतीने या अभियानात अधिकाधिक डॉक्टर्स, कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याबाबतचे आवाहन अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल आणि महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी एका व्हिडिओद्वारे केलं आहे.

अमृता खाकुर्डीकर, पुणे.

amruta.khakurdikar@gmail.com