'बिनचेहऱ्या'च्या स्वयंसेवकांचे सेवा कार्य

विवेक मराठी    06-May-2020
Total Views |
 मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची उग्रता लक्षात येऊ लागली आणि वीस मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले. त्यालाही आता ४५ दिवस होऊन गेले. या आणीबाणीच्या काळात प्रशासनाबरोबरच काम करत सर्वसामान्य नागरिकांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी संघ सरसावला. संघ म्हणजे तरी काय? बिनचेहऱ्याच्या ध्येयनिष्ठ माणसाचा समूह. वैयक्तिक अस्तित्व संघजीवनात विलीन करून समाज, राष्ट्र यासाठी जगणाऱ्या या ध्येयवेड्यानी सामूहिक कृतीतून जी समाजसेवा केली आहे, ती पाहता संघ आणि स्वयंसेवक किती आत्मविलोपी असतो, केवळ समाज आणि राष्ट्र हाच त्याचा ध्यास आणि श्वास आहे, यांची प्रचिती येते.


RSS_1  H x W: 0

आपण जागतिक महामारीचा सामना करत असून दिवसेंदिवस हे संकट अधिक गडद होत आहे. शासनाने या संकटातून बाहेर पडण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यापैकी एक आहे गृहबंदी. प्रत्येकाने आपापल्या घरात स्वत:ला कोंडून घेतले, तर कोरोनाचा प्रसार थांबेल आणि लवकरात लवकर आपण सामान्य जनजीवन अनुभवू हे जरी खरे असले, तरी या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रशासनासह सक्रियपणे काम करून, प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून संघस्वयंसेवक काम करत आहेत. कोरोना संकट निवारण करण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून संघ काम करत आहे. संघाचे स्वयंसेवक अशा प्रकारचे काम का करतात? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, हे संकट त्यांना आपल्या राष्ट्रावर, पर्यायाने आपल्या स्वत:वर आले आहे असे वाटते आणि म्हणून संघस्वयंसेवक आपल्या क्षमतेनुसार या काळात सक्रियपणे काम करताना दिसतो. अचानक लॉकडाउन झाल्यावर अनेक बांधवांवर उपासमारीची वेळ आली. अशा वेळी स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन कोणी भुकेला राहू नये या भूमिकेतून सेवा कार्य सुरू केले. ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे, तेथे अन्न पोहोचेल अशी यंत्रणा स्वयंसेवकांनी ऊभी केली. ठाणे किसननगर येथील तृतीय पंथीयांच्या वस्तीत जाऊन स्वयंसेवकांनी भ्रातृभावाचा परिचय दिला, तर पुणे जिल्ह्यातील पिरंगुट येथील तलाठी कार्यालयातील नोंदणीकामात सहभागी होऊन स्वयंसेवकांनी आपल्या क्षमता समाज- आणि राष्ट्राचरणी अर्पण केल्याची प्रचिती दिली. संकट भयंकर आहे, ही दमाची लढाई आहे, पूर्ण ताकदीनिशी आणि आवश्यक ती सर्व काळजी घेत आपल्याला या आणीबाणीच्या काळात काम करायचे आहे, याचे भान जपत स्वयंसेवक प्रशासनाला मदत होईल अशी कामे करत आहेत. आज आपल्या देशात, राज्यात आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. आरोग्य यंत्रणेस मदत व्हावी यासाठी पुणे आणि ठाणे शहरात रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून वस्तीत जाऊन वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचा चमू तयार केला असून घरोघरी जाऊन तपासणी केली जाते आहे. पुणे आणि ठाणे या दोन्ही शहरांतील शासकीय आरोग्य यंत्रणेला या चमूच्या कामातून मदत होते आहे. कोरोनाचा सामना करण्यात वैद्यकीय क्षेत्रातील, पोलीस यंत्रणा आणि स्वच्छता कामगार आघाडीवर आहेत. कल्याणच्या संघस्वयंसेवकांनी पोलीस कर्मचारी बांधवांसाठी संरक्षक किट्स उपलब्ध करून दिली. कल्याण जिल्हा संघचालक डॉक्टर आहेत. ते स्वत: आरोग्य यंत्रणेसह काम करत आहेत. कुर्ला येथील संघस्वयंसेवकांनी भाभा रुग्णालयातील परिचारिका आणि अन्य कर्मचारी बांधवांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था केली. शहरी आणि ग्रामीण या दोन्हीही क्षेत्रांत संघस्वयंसेवक काम करत आहेत. दोन्ही ठिकाणच्या गरजा वेगळ्या, समस्या वेगळ्या आहेत. मात्र त्यांची उत्तरे शोधण्याची स्वयंसेवकांची कार्यपद्धती एक आहे. सेवाभाव एक आहे.


RSS_1  H x W: 0
कल्याण जिल्हात ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत होते, त्यांना कीटकनाशकांची आणि खतांची गरज होती. पण लॉकडाउनमुळे ते शहरात येऊन खरेदी करू शकत नव्हते, ही गोष्ट कल्याणच्या संघस्वयंसेवकांना कळली आणि त्यांनी स्थानिक राजकीय नेत्यांच्या मदतीने कीटकनाशके व खते मिळवली आणि संबधित शेतकऱ्यांना पाठवली. टिटवाळ्याच्या आसपासच्या ग्रामीण परिसरातील शेतकऱ्यासमोर भाजी कुठे विकायची हा प्रश्न होता. या प्रश्नांचे उत्तर टिटवाळा शहरातील संघस्वयंसेवकांनी शोधले. शेतकऱ्याची भाजी खरेदी केली आणि शारीर अंतराचे पालन करत ना नफा ना तोटा तत्त्वावर टिटवाळा शहरात विक्री केली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाच, तसेच टिटवाळा येथील नागरिकांनाही घरबसल्या भाजी उपलब्ध झाली. मुंबई शहरात बोरिवली हे उपनगर आहे. या उपनगरातील संघस्वयंसेवकांनी गेले चाळीस दिवस सुमारे बाराशे पोलीस कर्मचारी बांधवांसाठी सकाळी चहा-नास्ता आणि दोन वेळा भोजनाची व्यवस्था केली आहे. याशिवाय बोरिवलीतील गोरगरीब जनतेसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी संघस्वयंसेवकांशी संपर्क साधला की त्याला घरपोच भोजन मिळेल अशी व्यवस्था निर्माण केली आहे. या साऱ्यामागे एकच उद्देश आहे - कोणी उपाशीपोटी राहू नये. आपला बांधव उपाशीपोटी राहणार नाही या एकाच कारणासाठी संघस्वयंसेवक अहोरात्र काम करत आहेत.

या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला वेळेवर अन्न मिळणे. शहरी भागात संघाबरोबर अन्यही सामाजिक संस्था आपल्या ताकदीनिशी शक्य ते काम करत आहेत. मात्र अतिदुर्गम भागात आणि शहरापासून दूर असणाऱ्या तालुक्यात संघस्वयंसेवकच काम करत असल्याचे चित्र समोर येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका असाच शहरीकरणापासून खूप दूर आहे. सर्वच बाबतीत तुटवडा जाणवत असताना गोरगरीब जनतेला दोन घास मिळावेत यासाठी दोडामार्ग तालुक्यातील संघस्वयंसेवकांनी 'मुष्टियोजना' राबवली. आठ रेशनिंग दुकानांच्या बाहेर पिशव्या घेऊन स्वयंसेवक उभे राहिले आणि ज्यांना शासकीय व्यवस्थेतून अन्नधान्य मिळाले, त्यांना एक एक मूठ धान्य देण्याची विनंती केली. परिणामी खूप मोठ्या प्रमाणात धान्य जमा झाले आणि ज्यांना काहीच सुविधा उपलब्ध नाही अशांना ते वाटले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एका खेड्यात संघस्वयंसेवक भर उन्हात अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी गेले होते. काही वयस्कर मंडळी हे धान्य घेण्यासाठी आली. एका आजीबाईच्या पायात चप्पल नाही आणि तिच्या पायाला तापलेल्या जमिनीचे चटके बसत आहेत, हे स्वयंसेवकाच्या लक्षात येताच आपल्या पायातील बूट काढून त्यांने त्या आजीला दिले. म्हटले तर एक छोटीशी कृती, पण त्यातूनच संघसंस्कार प्रतिबिंबित झाला.


RSS_1  H x W: 0
केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात संघस्वयंसेवक सेवा कार्य करत आहेत. त्यांचे छोटे प्रतिबिंब या लेखाच्या रूपाने शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखात कोणाच्या नावाचा उल्लेख नाही. संघस्वयंसेवक हीच त्यांची ओळख आणि हीच ओळख समाजमान्य आहे. समाज संघाकडे डोळे लावून आहे, त्याचप्रमाणे संघस्वयंसेवकाची शिस्त व त्यांचा प्रामाणिकपणा यांचा समाज अनुभव घेत असून संघावरील विश्वास अधिक घट्ट होत आहे. सांगली शहरातील एका संघस्वयंसेवकांला आलेला अनुभव यांची प्रचिती देणारा आहे. तो संघस्वयंसेवक लिहितो - 'रस्त्यावर फिरून आइसक्रीम विकणाऱ्या एका व्यक्तीचा काल सकाळी फोन आला. "साबजी, दो दीन से भूखे है... कुछ मिलेगा क्या?" मी सांगितले की तुमचे नाव-पत्ता द्या आणि किती जण आहात ते सांगा. व्यवस्था करू या. त्यांचा मेसेज आला की ते तीन जण अमुक ठिकाणी आहेत. 'चिंता करू नका, शिधा घेऊन स्वयंसेवक येईल' असे सांगितले. दहा मिनिटांनी परत फोन आला. मनात आलेच - इतका धीर नाही का यांना, परत परत का फोन करतात बरे हे लोक? तर फोनवर त्यांच्या म्होरक्या बोलत होता, "साबजी, राशन मत भेजो. पर्याप्त राशन हमे मिला है. मेरे आदमी ने आपको गलत बताया. मै क्षमा मागता हूँ. मैनें उनको डाँटा भी. हमारे पास अभी है तो जादा क्यूँ लेना!" साध्या, गरीब, गरजू माणसातला हा प्रामाणिकपणा खूप दिलासादायक वाटला. असो.'
हा लेख प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. बिनचेहऱ्याच्या संघस्वयंसेवकांनी आपल्या सेवा कार्याच्या माध्यमातून माणूसपणाची जपणूक चालवली आहे आणि 'बंधुभाव' हेच त्यांचे अधिष्ठान, हाच त्यांचा धर्म आहे.

रवींद्र गोळे
९५९४९६१८६०