देवर्षी नारद : आद्य संदेशवाहक

विवेक मराठी    08-May-2020
Total Views |
@विद्याधर मा. ताठे

Devarshi Narad Jayanti an

भारतीय ऋषी परंपरेतील परिपक्वता आणि सामर्थ्य यांचे दर्शन देवर्षी नारदांच्या एकूण कार्यातून दिसते. ज्येष्ठ वद्य द्वितीया ही देवर्षी नारदांची जयंती मानली जाते. देवर्षी नारद हे जगाील पहिले संदेशवाहक आहेत. प्रचंड विद्याव्यासंग, कुशाग्र बुद्धिमत्ता, भक्ती आचार्य, संगीततज्ज्ञ, संभाषण चतुर आणि समाजहितैषी उद्देशाने कार्यरत देवर्षी नारद हे महर्षी व्यास, वाल्मिकी, ध्रुव आणि प्रल्हाद यांचे गुरू आहेत. त्यांचे वाङ्मय, त्यांची वाङ्मयमूर्ती आहे. नारद जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार व ‘देवर्षी नारद’ ग्रंथाचे लेखक विद्याधर ताठे यांनी केलेले शब्दवंदन.

धन्य धन्य तो नारदु । ज्यासी सर्वां सर्वत्र गोविंदु ।
सर्वथा हरिनामाचा छंदु । तेणे परमानंदु सदोदित ॥
जो श्रीकृष्णाचा आवडता । ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा ।
ज्याचेनि संगे तत्त्वतां । नित्यमुक्ततां जडजीवा ॥
 
महाराष्ट्राच्या संत परंपरेतील थोर संत एकनाथमहाराज यांनी ‘एकनाथी भागवत’ या ग्रंंथात देवर्षि नारदमुनींचा वरील ओव्यामध्ये कार्यगौरव केलेला आहे. तर श्रीमद भागवत या संस्कृृत ग्रंथात व्यास महर्षींनी स्कंध 1 अध्याय 2 श्लोक 39 मध्ये पुढील शब्दात देवर्षि नारदांचा गौरव केलेला आहे -
अहो देवर्षिर्धन्योऽयं यत्कीर्ति शारंगधन्वनः ।
गायन्माद्यन्निदं तन्त्र्या रमयत्यातुरं जगत ॥

अर्थ ः अहो, नारद देवर्षि तुम्ही धन्य आहात. संसार दुःखाने तप्त अशा लोकांना - जीवांना आपण आपल्या वीणा झंकाराने व नामस्मरणाने सदैव आनंदित करतात.

एक मराठी व दोन संस्कृृत अशा भाषेतील नारदमुनींचा गौरव वर दिलेला आहे असाच त्यांचा गौरव महर्षी व्यास, महाकवी वाल्मिकींसह अनेक थोर मोठ्यांनी केलेला आहे.

भारतीय धर्म-संस्कृृतीच्या क्षेत्रात ऋषीमुनींनी केलेले तत्त्वचिंतनात्मक कार्य, हा आपला प्राचीन वैभवशाली चिंतन ठेवा आहे. ऋषीमुनींच्या अनन्यसाधारण योगदानातून व सातत्यपूर्ण परंपरेतूनच भारतीय धर्मसंस्कृतीचा हा ऐश्वर्यशाली चिरंतन ठेवा संरक्षित व संवर्धित होत आपणास लाभलेला आहे. म्हणूनच भारतीय परंपरेत ऋषीमुनींचे स्थान सदासर्वदा अगाध व अनन्य वंदनीय राहिलेले आहे. माता-पित्या प्रमाणेच, भारतीय माणूस ऋषींचेही ऋण अभिमानाने डोक्यावर मिरवण्यात धन्यता मानतो व स्मरणपूर्वक त्याच्या ऋणाचे स्मरणवंदन करतो.

ऋषी जीवन म्हणजे त्याग, तपश्चर्या, साधना, तत्त्वचिंतन आणि केवळ मनुष्य नव्हे तर अवघ्या प्राणीमात्राचे वैश्विकभावाने कल्याणासाठी समर्पित जीवन होय ! या ऋषींमध्ये अनेक प्रकार आहेत. देवर्षि, ब्रह्मर्षि, आणि राजर्षि ेहे ऋषींचे मुख्य तीन प्रकार आहेत. कर्म, ज्ञान व अधिकारस्थिती यानुसार ऋषींचे हे प्रकार असून देवर्षि हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्यानंतर ब्रह्मर्षि आणि राजर्षि (राजा जनक, अंबरीष इ.) मानले जातात. काही अभ्यासकांच्या मते नारदमुनी हे एकमेव ‘देवर्षि’ झाले आहेत. नारदमुनींंच्या श्रेष्ठतेचेच हे विशेषत्व आहे.
महाभारतामध्ये शांतीपर्वात धर्मराज युधिष्ठिरांनी भीष्माचार्यांना प्रश्न विचारला की, ‘या विश्वात सर्वांना प्रिय, सर्वांना वंदनीय आणि सर्व गुणसंपन्न व्यक्ती आहे का? असेल तर ती कोण आहे?’ युधिष्ठिरांच्या या प्रश्नाला क्षणाचाही विलंब न लावता आचार्य भीष्म यांनी उत्तर दिले ‘देवर्षी नारदमुनी ! ’ देवर्षी नारद हे त्रिभुवन संचारी होते तसेच ते एकाच वेळी देवांना, दैत्यांना, गंधर्वांना, नागांना, मनुष्यांना असे सर्वांना प्रिय होते. प्रत्येकाच्या घरी-दारी-दरबारी देवर्षी नारदांना (24 x 7) मुक्त प्रवेश होता. देवर्षि नारदांच्या भक्तीबद्दल, साधनेबद्दल, कल्याणकारी-परोपकारी विशाल व्यापक वृत्तीबद्दल आणि हितोपदेशाबद्दल देवांएवढाच दैत्यांना व मनुष्यमात्राला विश्वास होता. असे नारदमुनी कोणाला आदरणी, कोणाला वंदनीय, कोणाला पूजनीय वाटत होते तर त्यांचे वीणावादन करीत, ‘नारायण-नारायण’ म्हणत होणारे आगमन सर्वांनाच संतोषप्रद वाटत होते. आपल्या केवळ आगमनाने संतुष्टी निर्माण करणारे नारदमुनी केवळ हरिजप करणारे भाविकभक्त साधक नव्हते तर कुशल संवादपटू, थोर विद्वान व व्यासंगी तत्त्वचिंतक ग्रंथलेखक होते.
 
‘नारद’ म्हणजे काय? नारद शब्दाचा अर्थ काय् या गोष्टींचा विचार करता, विविध संदर्भग्रंथांचा आढावा घेता असे लक्षात येते की ’नारद’ हे केवळ नाव नसून ‘विशेषनाम’ आहे व ते कार्यवाचक विशेषण आहे. आजच्या काळात जसे ‘बातमीदार’, ‘वार्तहर’, ‘पत्रकार’, ‘संपादक’ ही नावे नसून कार्यवाचक विशेषनामे आहेत. आधुनिक काळाचा विचार करता बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे हे जसे वेगवेगळ्या काळातील ‘पत्रकार’ आहेत तसेच सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग या प्रत्येक काळात वेगवेगळे ‘नारद’ झालेले आहेत. नारद हे एका व्यक्तीचे नाव नसून त्या त्या युगातील संचारी-संवादी समाजकल्याण समर्पित व्यक्तिचे कार्यवाचक विशेषनाम आहे. त्यामुळे नारद अनेक होऊन गेले आहेत, त्यांच्या अनेक कथा अनेक पुराणात वर्णित आहेत. त्या अनेक नारदांपैकी ‘देवर्षि नारद’ हे मुख्य, बहुपरिचित, बहुचर्चित व्यक्तिमत्व होय !
 
नारद या शब्दाचा अर्थ काय? नारद हा नार + द असा जोड शब्द आहे. नार म्हणजे ज्ञान, नार म्हणजे अज्ञान खंडण, नार म्हणजे असे ज्ञान जे कल्याणकारीच आहे. द म्हणजे देणारा. “अज्ञान खंडन करून सम्यक ज्ञान देत लोककल्याण साधणारी समर्पित सेवाभावी व्यक्ती म्हणजे ‘नारद’ होय! ” अशा व्यक्तिंची गरज प्रत्येक काळातच असते. म्हणून नारद नावाच्या अनेक व्यक्ती पुराणात - इतिहासात आढळतात. या अनेक नारदांपैकी प्रामुख्याने ज्या नारदांचा सर्वत्र गौरव झाला ते म्हणजे देवर्षि नारद ! देवर्षि नारद एकच झालेले आहेत.
 
भगवान विष्णूंच्या 24 प्रमुख अवतारांपैकी 10 अवतार म्हणून ‘देवर्षि नारद’ यांची गणना केली जाते. तर श्रीमद् भगावत प्रथम स्कंधात अध्याय 3 मध्ये नारदमुनींना भगवंताचा ‘तिसरा’ अवतार मानलेले आहे. ‘तृतीयं ऋषि सर्गच’ वाराहकल्पाच्या स्वयंभुव मन्वंतरात देवर्षि नारदांचा जन्म झाला असे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या 10 मानसपुत्रांपैकी ‘देवर्षि नारद’ हे एक होय ! म्हणून ज्या नारदकार्याची महती आपण पाहणार आहोत ते नारद म्हणजे ‘देवर्षि ब्रह्मपुत्र नारद’.
 
देवर्षि नारदमुनींचे मोठे अलौकिक असून चार युगे, तीन भुवने असा त्यांचा सर्वत्र संचार असे. सर्व देवदेवता, दैत्य-असूर-राक्षस आणि सर्व सामान्य मानव-प्राणी यांच्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांना तपश्चर्या व योग साधनेद्वारे अनेक सिद्धी प्राप्त होत्या. योगबलाने ते कोठेही, केव्हाही संचार करीत. रामभक्त हनुमंताला जशा अनेक सिद्धी प्राप्त होत्या व तो जसे सूक्ष्मरूप घेऊन कोठेही ये-जा करी, प्रसंगी अचाट वाटावे असे, चमत्कार वाटावे असे (भौतिकदृष्ट्या कार्यकारणभाव लक्षात न येणारे ) कार्य करी तशीच काहीशी शक्ती नारदमुनींना लाभलेली होती. आजच्या विज्ञानयुगात मानवाच्या सिमित तर्कबुद्धीला न समजणार्‍या या अशा नादरमुनींच्या कथांकडे दुर्लक्ष करूनही देवर्षि नारद यांचे ठोस वाङ्मयीन व सांस्कृतिक कार्य दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही इतके महान स्वरूपाचे आहे. देवर्षि नारद हे महाभारत-भगवद्गीता, 18 पुराणे लिहिणार्‍या व्यासमहर्षींना गुरुस्थानी आहेत तसेच रामायणासारखे महाकाव्य लिहिणार्‍या महर्षी वाल्मिकींचेही नारदमुनी गुरु आहेत. महर्षीव्यास व वाल्मिकींचे गुरु म्हणून देवर्षि नारदमुनी निश्चितच वंदनीय व पूजनीय आहेत. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस, संत ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ यांचे विवेकानंद-ज्ञानेश्वरांच्या समग्र कार्यामागे जे महनीय योगदान आहे तद्वतच व्यास, वाल्मिकींच्या वाङ्मयीन महान कार्यामागे देवर्षि नारदांचे सम्यक कृपा मार्गदर्शन आहे.
नारदांचे बहुमुखी प्रतिभाशाली व्यक्तित्व
देवर्षि नारद हे थोर भागवत भक्त होते, भक्तीच्या क्षेत्रातील ‘आचार्य’ मानले जात होते, संगीत शिरोमणी होते, व्युत्पन्नप विद्वान होते, महान योगी होते, समाजसन्मुख समन्वशील समाजहितैशी होते. देव, असूर, गंधर्व, मानव सर्वांना प्रिय होते. अनेकांचे गुरु होते, अनेकांचे जिवलग सांगाती होते, सर्वत्र संचारी, सूक्ष्म सृष्टीज्ञानी व अंतर्ज्ञांनी होते एवढेच नव्हे तर त्रिताप दूर करणारे संकीर्तनकार, थोर खगोल ज्योतिषाचार्य होते. अशा बहुमुखी गुणवत्तेमुळेच त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना सदैव प्रिय वाटत असे. नारदमुनींच्या वार्तामुळे अनेक कलह-तंटे निर्माण झाले पण त्याचा परिणाम हा उभयपक्षी कल्याणाचाच होता हेही तितकेच महत्वाचे आहे. आपल्या माहितीच्या-वार्तेच्या सूचनांनी त्यांनी अनेकांचे गर्व हरण केले, अनेकांना लोभ मोह, मत्सर अशा दोषांपासून मुक्त केले व अंतिमतः परम कल्याणाच्या-परम अर्थाच्या मार्गाकडे वळवले. वाल्या कोळ्याचा वाल्मिकीऋषी हा व्यक्तिविकास हे नारदांच्या वाणी सामर्थ्याचाच चमत्कार आहे. पुराणात ब्रह्मर्षि, आणि देवर्षि यांची लक्षणे दिली आहेत. तो श्लोक असा -
कर्मज्ञानो भयपरा विप्रा ब्रह्मर्षयः स्मृताः ।
कर्मगौणा ज्ञानपरा ते तु देवर्षयः स्मृता ॥

कर्म व ज्ञान अशा दोन्ही मार्गाधारे आचरण करणार्‍या ब्रह्मनिष्ठ ऋषिंना देवर्षि म्हणतात. पद्मपुराणात नारदांना महात्मा, महामुनी, योगभास्कर, योगनीधी अशा विशेषणांनी गौरविलेले आहे.

ब्रह्मवैवर्त पुराण आणि भागवत पुराणात देवर्षि नारदांचे थोडे सविस्तर चरित्र असले तरी खुद्द नारदाच्या नावेच प्रसिद्ध असलेल्या ‘बृहन्नारदीय’ पुराणामध्ये मात्र त्यांचे फारसे चरित्र उपलब्ध होत नाही. हे बृहदन्नारदीय पुराण म्हणजे नारद व सनतकुमार या दोन ब्रह्मपुत्र बन्धुंचा संवाद आहे.
महर्षी व्यास हे देवर्षि नारदाचे शिष्य आहेत त्यामुळे व्यास रचित सर्वच्या सर्व 18 पुराणांमध्ये कमी अधिक प्रमाणात नारदांचे दर्शन घडते. नारदांचे सर्वव्यापी, सर्वकालिन असे वर्णन व्यासमहर्षींनी केलेले आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे बहुतेक सर्व पुरणांनी नारदांचे ब्रह्मचारी असे वर्णन केले असले तरी ब्रह्मवैवर्त पुराणात ब्रह्मखंड आठ मध्ये मात्र नारद प्रापंचिक-विवाहित असल्याचे शब्दांकीत केलेले आहे. महाभारतामध्ये हरिवंशपर्वात नारदाचे वर्णन आढळते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे व्यासांनी इथे नारदांना ‘चिरंजीव’ म्हणून गौरविलेले आहे. पण आपल्याकडे अश्वत्थामा, राजा बळी, व्यास, हनुमान, परशुराम, कृपाचार्य, बिभिषण असे सात चिरंजीव प्रातःस्मरणीय मानले गेले आहेत. त्या पारंपारिक श्लोकात नारदांचा चिरंजीव म्हणून समावेश दिसत नाही. पारंपारिक प्रातःस्मरणातील सात चिरंजीव नामाचा श्लोक पुढीलप्रमाणे आहे -
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषण ।
कृपः परशुमाश्च सप्तै ते चिरंजीविनः ॥

तर अशा श्लोकात समाविष्ट
 नसलेले तरी पण चिरंजीव मानले जाणारे देवर्षि नारद हे एकमेव आहेत.
संत तुकाराममहाराजांनीही नारदमुनींची देवाचा अवतार म्हणून स्तुती केलेली आहे. तुकोबा म्हणतात - ‘वाढवावया सुख, भक्तिभाव धर्म ।’ अगदी एका ओळीत नेमकेपणाने तुकारामहाराजांनी नारदाच्या कार्याचा गौरव केलेला आहे. भवतापाने दुःखीकष्टी झालेल्या जनांचे सुख वाढवणे व भक्तिचा प्रचार असा नारदांच्या दुहेरी कार्याचा येथे उल्लेख केलेला आहे. भगवद्गीतेमध्ये दहाव्या ‘विभुतीयोग’ नामक अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या विविध विभुतींचा परिचय दिलेला आहे. त्यामध्ये ‘देवर्षीणांच नारदः ।’ म्हणत श्रीकृष्णांनी नारद ही आपलीच विभुती असल्याचे सांगितलेले आहे.
नारदमुनींची वाङ्मय संपदा
देवर्षि नारद हे केवळ भक्तभागवत नसून थोर तत्त्वज्ञ, चिंतक, उपदेशक, संगीतकार होते. भक्तीच्या क्षेत्रातील त्यांचा अधिकार ‘थोर आचार्य’ असा आहे. देवर्षि नारदांचे वाङ्मय विपुल आहे. त्यामध्ये 1) नारद भक्तिसूत्रे 2) नारद पाचरात्र 3) बृहन्नारदीय पुराण आणि 4) नारदस्मृती या प्रमुख ग्रंथाचा समावेश आहे. भारतीय माध्यम सृष्टीच्या या आद्य संदेशवाहक महात्म्यास विनम्र वंदन ।
*****
विद्याधर मा. ताठे
 9881909775
 
vidyadhartathe@gmail.com

*लोककल्याण व समाजाभिमुक पत्रकारितेची अनिवार्यता*

ज्येष्ठ कृष्ण द्वितीयेला आद्य पत्रकार देवर्षी नारदांची जन्मतिथी असते. त्यांच्या जन्मतिथीचे औचित्य साधून भारतात अनेक ठिकाणी 'पत्रकार दिवस' साजरा केला जातो. यावर्षी विश्व संवाद केंद्र विदर्भाच्या वतीने दिनांक ८ मे २०२० तिथी वैशाख कृष्ण १ रोजी श्री नारद जयंतीच्या कार्यक्रमाचे डिजिटल आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने देवर्षी नारदांच्या लोककल्याणकारी पत्रकारितेचा परिचय करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच.

श्री.नारद मुनींना चराचर सृष्टितील आद्य पत्रकार म्हणून मानले जाते. आणि ते योग्य ही आहे.महर्षि नारद या सृष्टितील प्रथम पत्रकार असल्याने त्यांच्या स्मृतीत साजरा होणारा हा दिवस आजच्या पत्रकारितेचा दृष्टीने ही महत्त्वाचा ठरतो. संपूर्ण पत्रकार जगतात सत्याची कास धरून ,अन्यायाला सामोरे जाण्याचे धैर्य. समाजातील सर्व स्तरातील सदस्यांनी संवाद साधण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून देवर्षी नारदांसारख्या आद्य पत्रकारांचे स्मरण करणे आवश्यक ठरते.

पौराणिक काळात नारदाने नेहमीच एक वैशिष्ट्यपूर्ण भूमिका वठवली आहे हे आपण त्यांच्याशी संबधित अनेक गोष्टींवरुन सांगु शकतो. त्यांना देवर्षी ही पदवी जरी बहाल करण्यात आली असली तरी त्यांचे कार्य केवळ देवतांपुरतेच मर्यादित नव्हते. ते मानव व दानवांच्या समूहातील ही तेवढ्याच आत्मियतेने मिसळत असत आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करीत असत असे दिसुन येते. देव,मानव आणि दानव यांचे ते मित्र,मार्गदर्शक आणि सल्लागार होते.

परमेश्वराविषयीचे त्यांचे ज्ञान अगाध होते.महाभारतात भीष्म आणि श्रीकृष्णांसारख्या दिग्गजांनी ही नारदांचे मोठेपण मान्य केले आहे. पुराणात तर नारदांना 'संवाददाता' च म्हटले आहे. त्यांच्या प्रेरणेनेच वाल्मिकींनी रामायणाची तर व्यासांनी महाभारताची रचना केली.अशा या नारदांना काही लोक 'कलहप्रिय' किंवा 'कळलाव्या ' म्हणून संबोधतात.पण असे करतांना ते आपलेच अज्ञान प्रकट करीत असतात.

नारदांच्या तथाकथित कळलाव्या भूमिकेचा खोलवर जाऊन विचार केला तर लक्षात येते की या भूमिकेमागे नारदांची लोककल्याणाचीच भावना आहे.नारद सर्व विषयांचे ज्ञाता होते.त्यांचा त्रिभुवनी सर्वत्र मुक्त संचार होता.ते उत्तम संगीततज्ञ होते.संगीतातले आपले ज्ञान अपूर्ण आहे हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी कठोर तपस्या व अभ्यास करून गंधर्वांपासुन संगीताचे ज्ञान प्राप्त केले. नारद संहिता हा त्यांचा संगीतावरचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

नारद हे सतत भ्रमंतीवर असणारे व्यक्तित्व आहे.परंतु हा त्यांचा प्रवास निरुद्देश नाही तर त्यामागे देव,दानव,व मानव समूहातील महत्वपूर्ण व्यक्तिंशी संपर्क साधून त्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे आणि त्यातुन सर्वसामान्य लोकांचे कल्याण साधणे हा नारदांचा भ्रमंती हेतु आहे. त्यामुळे समकालीन ॠषिमुनींच्या आश्रमासारखा नारदांचा आश्रम आढळत नाही. चराचर सृष्टित संचार करण्याची योग्यता आणि क्षमता हा त्यांचा गुण होता तसेच कोणत्याही परिस्थितीत विचलीत न होता समयोचित मार्गदर्शन करण्याचे कौशल्य नारदांनी आत्मसात केले होते.

नारदांना पत्रकारितेचे प्रारंभकर्ते म्हणून आद्य पत्रकार मानले जाते. त्यांनी लोकहितासाठी जे जे कार्य केले ते आजच्या वर्तमान पत्रकारितेसाठी अनुकरणीय असेच आहे.नारद भक्तिसूत्रातील प्रमुख सूत्र आहे उत्तम वाक्चातुर्य व सत्य समाजासमोर आणण्याची किमया आणि धैर्याने समस्यांना सामोरे जाण्याची क्षमता या गुणांचा अंगिकार आजच्या पत्रकारांनी करायला हवा.

आज पत्रकारिता दिशाहीन झाली आहे, भरकटली आहे, विकाऊ झाली आहे असा जो आरोप करण्यात येतो तो पूर्णतः सत्य नाही कारण आजचा पत्रकार नारदांप्रमाणे जागृत नसता तर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे किंवा योगगुरु बाबा रामदेव यांनी सुरू केलेल्या सामाजिक आंदोलनाचा हुंकार ,सामाजिक सुधारणा बिलाची सत्यता(CAA),काश्मीरच्या ३७०,३५अ बाबतची सत्यता, तीन तलाक कायद्याची आवश्यकता

जनतेपर्यंत पोचली नसती आणि अनेक घोटाळे समोर आले नसते.

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. भरकटलेल्या समाजाला, राज्यकर्त्यांना आणि नेत्यांना योग्य दिशा देऊन त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकारांचे आहे.त्यांची प्राथमिकता ही लोककल्याणा आहे,राष्ट्ररक्षाआहे,समाजप्रबोधन आहे.ही जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावयाची असेल तर आजच्या पत्रकारांना आद्य पत्रकार नारदांचाच आदर्श आपल्यासमोर ठेवावा लागेल. नारदांनी नेहमीच समाज कल्याणाचे भान ठेवले. लोककल्याण हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा होता .आजही अशा समाजाभिमुख पत्रकारितेची

आवश्यकता आहे.त्यादृष्टीने विचार केला तर आजच्या पत्रकारितेच्या पाठ्यक्रमात

देवर्षी नारद यांचे चरित्र्य व भक्तिसूत्रांचा समावेश करण्याची देखील गरज आहे.असे झाले तरच पत्रकारितेच्या क्षेत्रातही उत्कृष्ट मापदंड निर्माण होऊ शकतील यात संशय नाही.

अतुल पिंगळे

विश्व संवाद केंद्र ,विदर्भ प्रांत.

भ्रमणध्वनी क्रमांक 9763198047