माझे जीवीची आवडी

विवेक मराठी    12-Jun-2020
Total Views |
@देविदास पोटे

वारीतील महत्त्वाची बाब म्हणजे समतेचे तत्त्व. वारीत सारे जण समान असतात. गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, छोटा-मोठा असा कुठलाही भेद वारीत नसतो. सर्व विठुमाउलीचे लाडके भक्त, वारकरी एकमेकांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करतात. प्रत्येक जण हा विठ्ठलाचेच रूप आहे ही विशाल भावना त्यामागे असते. समानतेचे हे तत्त्व सामाजिक अभिसरण करणारे आहे. जातीपातींनी पोखरलेल्या समाजाला हे समानतेचे तत्त्व प्रेरणा आणि संजीवनी देणारे आहे. ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' या फ्रेंच राज्यक्रांतीतून जन्मलेल्या मूल्यांतील समता आणि बंधुता ही मूल्ये वारीने पुरेपूर साध्य केली आहेत.

माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।
पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ।।
जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहता रूप आनंदी आनंद साठवे ।।
बाप रखुमादेविवर सगुण निर्गुण । रूप विटेवरी दाविली खूण ।।

Sant-Dnyaneshwar_1 &
 
पंढरपूरची वारी ही वारकरी भक्तिमार्गातील महत्त्वाची परंपरा आहे. वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. पंढरपूर हे भक्तीचे आद्य पीठ आहे. विटेवरचा श्री विठ्ठल या पीठाचा अधिपती आहे. शतकानुशतके हा भक्तीचा प्रवाह पंढरपूरच्या दिशेने नाचत, अभंग गात, नामगजर करीत वारीच्या वाटेवर चालतो आहे. हा भक्तीचा सोहळा अक्षय आहे. कधीही न संपणारा आहे.
 
या अभंगात संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘‘पंढरपूरला वारीबरोबर जाणे ही माझ्या मनाची आत्यंतिक आवड आहे. माझे मन पांडुरंगाच्या भक्तिरंगात बुडून गेले आहे. या गोविंदाच्या गुणांनी मनाला वेधून टाकले आहे. जागृत, अर्धजागृत आणि स्वप्न या तिन्ही अवस्थांचे भान हरपले असून विठुरायाचे सावळे रूप पाहताच मनात आनंदाच्या लाटा दाटून येतात. हा विठुराया जसा निर्गुण, निराकार आहे, तसाच सगुण आहे. विटेवरचे त्याचे देखणे रूप ही सगुणपणाची खूण आहे.’’
पंढरपूरच्या वारीला गुढी वा पालखी घेऊन जाणे ही आपल्या मनीची इच्छा वा आवड आहे, असे संत ज्ञानेश्वर म्हणतात. आवड असेल तरच कुठलीही कृती होते. आवडीतूनच आपल्याला हव्या असलेल्या ईप्सिताकडे आपण वाटचाल करतो. वारीची परंपरा ज्ञानेश्वरांच्या घराण्यात चालत आलेली होती. त्यांच्या आजी नीराबाई या वारीला जात असत, असे उल्लेख आलेले आहेत.
पंढरपूरला जायचे तर वारीबरोबर पालखी वा गुढी घेऊन. संतांनी वारीची ही परंपरा शतकानुशतके प्रवाहित ठेवली. वारीत सर्व वारकरी आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी अंतरीच्या ओढीने चालत असतात. सर्वांचे ध्येय एकच असते, ते म्हणजे विठुमाउलीला भेटणे. त्या सावळ्या परब्रह्माला आपल्या तनामनात, नेत्रात साठवून ठेवणे!


pandurang hari_1 &nb
वारीतील महत्त्वाची बाब म्हणजे समतेचे तत्त्व. वारीत सारे जण समान असतात. गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, छोटा-मोठा असा कुठलाही भेद वारीत नसतो. सर्व विठुमाउलीचे लाडके भक्त, वारकरी एकमेकांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करतात. प्रत्येक जण हा विठ्ठलाचेच रूप आहे ही विशाल भावना त्यामागे असते. समानतेचे हे तत्त्व सामाजिक अभिसरण करणारे आहे. जातीपातींनी पोखरलेल्या समाजाला हे समानतेचे तत्त्व प्रेरणा आणि संजीवनी देणारे आहे. ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' या फ्रेंच राज्यक्रांतीतून जन्मलेल्या मूल्यांतील समता आणि बंधुता ही मूल्ये वारीने पुरेपूर साध्य केली आहेत.
‘पंढरपुरा नेईन गुढी’ या ओळीत वर्णन केलेली गुढी ही समतेची, बंधुतेची, भक्तीची आहे तशीच आनंदाची आहे. वारीतील टाळमृदंगाचा ध्वनी, वीणेचा झणकार मनावर सात्त्विक आनंदाची शिंपण करतो. अभंग, गवळण, ज्ञानोबा-तुकाराम हा नामगजर, कीर्तन, भारूड या सर्व प्रकारांतून मनाला आनंद आणि अपार भक्तीचे सुख मिळते. ‘आनंदाचे डोही आनंदतरंग। आनंदाचि अंग आनंदाचे।।' अशी मनाची अवस्था होते. चालण्याचे श्रम, शारीरिक थकवा, तहान-भूक सारे या आनंदाच्या लाटेत विसरून जाते. धुंद होऊन नाचत, गात पावले अखंडपणे वारीच्या वाटेवर चालत राहतात. लग्न होऊन सासरी गेलेली लेक जशी माहेराचे नाव काढताच आनंदाने फुलून जाते, तशीच भावना वारकऱ्यांच्या मनात दाटून राहते. विठ्ठलाच्या दर्शनाने आनंदाची लय मनावर पसरून राहते. निर्मुण असलेल्या परमेश्वराचे विटेवर उभे असलेले रूप सगुणतेची साक्ष देत चैतन्याच्या चांदण्याची पखरण मनामनावर करीत राहते.
पंढरपूरच्या आतील ओढीने भक्तीची गुढी वा पताका घेऊन पंढरपूरला जाण्याचा आपला निर्धार, संत ज्ञानेश्वर या अभंगातून व्यक्त करतात. त्यांनी उभारलेली ही गुढी भक्तीची आहे, तशीच ज्ञानाची आहे, प्रेमाची आहे, समतेची आहे, आनंदाची आहे आणि धन्यतेचा अनुभव देणारी आहे. ज्ञानदेव, नामदेव आदी संतांनी रुजवलेली वारीची ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. ती अनंतकाळ सुरूच राहणार आहे, अक्षयपणे, अखंडपणे!