काकांपासून वाचवा

विवेक मराठी    12-Jun-2020
Total Views |

pawar_1  H x W:

मागच्या आठवड्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर कलगीतुऱ्याचा सामना रंगला. वादळाने झालेली हानी भरून काढणे, कोविडमुळे आधीच भयाच्या छायेत जगत असलेल्या जनतेला या नैसर्गिक संकटात धीर देणे हे राज्याच्या प्रमुखाकडून अपेक्षित होते. मात्र ज्या तातडीने आणि नियोजनबद्ध मदतकार्य व्हायला हवे होते, ते विद्यमान सरकारकडून झाले नसल्याचे पुरावे समोर येत आहेत. परिणामी, आधीच अस्वस्थ असलेली जनता या बेफिकीर हाताळणीने खवळली आहे. मुख्यमंत्री सत्तेच्या राजकारणात अननुभवी असतील, मात्र त्यांचा पक्ष आणि त्यांच्या जोडीला सत्तेची ऊब घेणारे दोन्ही पक्ष राजकारणात प्रदीर्घ काळ घालवलेले आहेत. तरीही या संकटकाळात सत्ताधारी म्हणून जनतेच्या त्यांच्याकडून असलेल्या किमान अपेक्षाही या तिघाडीला पूर्ण करता आल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर स्वत: थोरले साहेब मैदानात उतरले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, घराबाहेर पडण्याबाबत ज्येष्ठ नागरिकांना खबरदारीच्या सूचना सरकारनेच दिलेल्या असतानाही, हरलेले मैदान मारण्यासाठी ते वादळग्रस्तांच्या भेटीसाठी गेले. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी त्यांनी भेटीही दिल्या. नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतानाच त्यांनी "विरोधी पक्षनेते समुद्र पाहण्यासाठी येत आहेत" अशी त्यांच्या पाहणी दौऱ्यावर टिप्पणी करून राजकीय कलगीतुऱ्याचा नारळ फोडला. अशा नैसर्गिक संकटकाळात आपद्ग्रस्त भागात दौरे करून परिस्थिती समजून घेणे, पक्षीय राजकारण दूर ठेवून नागरिकांना धीर देणे हे विरोधी पक्षनेत्याचेही कामच आहे याची कल्पना राजकारणात हयात घालवलेल्या थोरल्या साहेबांना नक्कीच आहे. तरीही त्यांनी वादाची ठिणगी पेटवली. ती जशी सरकारचे अपयश झाकण्यासाठी होती, तशीच अहोरात्र बातम्यांचा भस्म्या जडलेल्या वृत्तवाहिन्यांना नवे खाद्य पुरवण्यासाठी, सरकारच्या मदतकार्यावरून त्यांची नजर हटवण्यासाठीही पेटवलेली होती.
 
हजरजबाबी आणि मुद्देसूद वाद घालण्यात कुशल असलेल्या विरोधी पक्षनेत्याने पवारांच्या तिरक्या बोलण्याला चोख उत्तर दिले आहे. ते गरजेचे होतेच. माध्यमांनीही फक्त हा कलगीतुरा दाखवण्यातच रस घेतला. विरोधी पक्षनेत्याने या दौऱ्यात काय पाहणी केली, या प्रश्नाच्या सोडवणुकीसंदर्भात काय विचार केला, नंतर सरकारमधील संबंधितांशी काय चर्चा केली अशा त्यांच्या लेखी बिनमहत्त्वाच्या असलेल्या विषयांकडे माध्यमांनी साफ दुर्लक्ष केले.

प्रश्न आपण सर्वसामान्यांनी या राजकीय कलगीतुऱ्याला किती महत्त्व द्यायचे, हा आहे. कारण लोकांपुढे आ वासून उभे असलेले प्रश्न त्याहून निराळे आणि अधिक गंभीर आहेत. वादळामुळे झालेली प्रचंड वित्तहानी आणि उपजीविकेचा उभा राहिलेला प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी तिथल्या नागरिकांना मदत हवी आहे, मानसिक आधार हवा आहे. या दोन दिवसांच्या वादळाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या तालुक्यांची प्रचंड हानी झाली आहे. पोफळी- नारळीच्या झाडांबरोबरच इथला माणूस उन्मळून पडला आहे. अशा वेळी त्याला सर्वार्थाने आधार देऊन उभे करण्यासाठी ठोस कार्यक्रम जाहीर करण्याऐवजी जेव्हा सत्ताधाऱ्यांमधील बुजुर्ग नव्या वादांना निमंत्रण देतात, तेव्हा त्यांच्या हेतूबद्दल संशय निर्माण होतो. दोन घटका इतकेही आयुष्य नसलेले हे रिकामे वाद सुरू करून ते विरोधी पक्षनेत्याची खिल्ली उडवत आहेत की त्यांनीच गादीवर बसवलेल्या मुख्यमंत्र्यांपुढे नवे संकट उभे करताहेत? त्यांच्या नेतृत्वासमोर कोविडमुळे आधीच भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे असताना, विरोधी पक्षनेत्याची कुरापत काढण्याची लहर थोरल्या साहेबांना का यावी?
या नैसर्गिक संकटातही विद्यमान सरकारातील ज्यांना राजकारण करण्याची हुक्की येते, त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून, विरोधी पक्षाने जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावायला हवी. अशा वेळी अशा शेलक्या टीकेकडे एका मर्यादेनंतर दुर्लक्ष करणेच उत्तम.
विरोधी पक्षाने सरकारला त्याच्या अपयशाबद्दल धारेवर धरतानाच जनतेला सर्व प्रकारे आधार द्यायला हवा व त्या माध्यमातून जनतेच्या मनातला त्यांच्याबद्दलचा विश्वास भक्कम करायला हवा, याची जाण असलेल्या भाजपाने त्या दिशेने काम करायलाही सुरुवात केली आहे. पक्षपातळीवर आपत्तिग्रस्तांना मदत पाठवायला सुरुवातही केली आहे. त्या कामासाठी मनुष्यबळाचे आणि अन्य मदतीचे शिस्तशीर नियोजनही केले आहे. ते काम एका बाजूला चालूच राहील. मात्र त्याची दखल घ्यावी असे सनसनाटी बातम्यांसाठी सोकावलेल्या वृत्तवाहिन्यांना वाटणारही नाही.
 
 
चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीचे क्षणार्धात होत्याचे नव्हते केले. ते पुन्हा उभारायला काळ जाईल. या भागातल्या लोकांना आणखी दहा वर्षांपर्यंत या वादळाचे परिणाम भोगावे लागतील इतकी हानी झाली आहे. पुनर्निर्मितीची गती संथ असते. कोकणचा अभिमान असलेली वृक्षसंपदा पुन्हा उभी करण्यासाठी अविश्रांत श्रमावे लागेल. वादळामुळे झालेल्या प्रचंड वित्तहानीच्या, पडझडीच्या अहवालात झाडामाडांशी असलेल्या तिथल्या माणसांच्या भावनिक गुंतवणुकीची नोंद कशी घेतली जाईल? समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावातील मच्छीमार बांधवांच्या बोटी फुटलेल्या आहेत. त्या केवळ अर्थार्जनाचे साधन नसतात, तर त्यांच्याशी भावबंध जुळलेले असतात याची नोंद सरकारी दप्तरात कशी होईल?
 
या वादळात वित्तहानी झालेल्या गरजूंसाठी सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली ती त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे ना, यावर सरकारने सक्त पहारा ठेवण्याची गरज आहे. आणि विरोधी पक्षाने त्यासाठी डोळ्यात तेल घालून पाठपुरावा केला पाहिजे. या संकटसमयी राजकीय मतभेद दूर ठेवून, आम्ही एक आहोत ही भावना प्रकट व्हायला हवी. ती काळाची गरज आहे.
 
गेले तीन महिने देश कोरोनाशी झुंजत आहे. त्यातच निसर्ग चक्रीवादळाने महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मोठी हानी पोहोचवली आहे. महाराष्ट्रातील विद्यमान सरकार या दोन्ही झुंजीत अपयशी ठरताना दिसत आहे.

सत्ताधारी कडबोळ्याचे अपयश जनतेसमोर येत आहे. हे अपयश झाकण्यासाठी आणि मूळ विषयावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी थोरले साहेब त्यांच्या जुन्याच खेळीसह मैदानात आले आहेत. अशा वेळी एका मर्यादेच्या पुढे त्यांच्या वक्तव्यांना किंमत न देता, जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि तिच्या मनाला उभारी देण्यासाठी राज्यातील विद्यमान विरोधी पक्षाने आपली सर्व प्रकारची शक्ती उपयोगात आणावी. जनता सकारात्मक विचारांची आणि कामांची नेहमीच पाठराखण करत असते, यावर विश्वास ठेवून काम करीत राहावे.
 
राजकारणातल्या या काकांची खेळी दुर्लक्षून निष्प्रभ करावी.. विरोधी पक्षानेही आणि त्यांच्या वळचणीला गेलेल्या पक्षांनीही. त्यातच सर्वांचे भले आहे.