लोकसाहित्यातील विठोबा

विवेक मराठी    12-Jun-2020
Total Views |
विठोबा चे वर्णण संतांनी केले.आपली भक्ती व श्रद्धा भाव व्यक्त करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या रुपकाचा आधार घेतला.लोकसंस्कृती जपणारे वासुदेव,भाट,पिंगळा अशी विविध रूपे संतांनी आपल्या अभंगात आणली.या लोकसंस्कृतीतील विठोबाचा परिचय दीपक जेवणे करून देत आहेत.

pandurang hari_1 &nb
आपल्या समाजात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणार्‍या जमातींचा एक वर्ग आहे. त्यांना 'मागते' असे म्हणतात. अशा मागत्यांनी समाजप्रबोधनाचे मोठे कार्य परंपरेने केले आहे. एका अर्थाने त्यांनी लोकधर्माचे व लोकसंस्कृतीचे जतन केले आहे. पण त्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी भटकंती स्वीकारावी लागते. आपल्या लोकगायनातून लोकसंस्कृतीची जोपासना व उपासना करणार्‍या या लोकगायकांना रा.चिं. ढेरे यांनी ‘लोकसंस्कृतीचे उपासक’ असे म्हटले आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत वासुदेव, गोंधळी, वाघ्यामुरळी, मसणजोगी, पोतराज, बहुरूपी, पांगूळ, नंदीबैलवाले, भुत्ये, भराडी, चित्रकथी इ.ना आगळेवेगळे स्थान आहे. धर्मविधीच्या प्रसंगी देवतोत्सवात, भिक्षा मागताना हे उपासक पारंपरिक गाणी गातात, सादरीकरण करतात. लोकसंस्कृती संपन्न करण्यात या पारंपरिक लोकगायकांचा महत्त्वाचा वाटा आहे. आपल्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनाची वैशिष्ट्ये त्यांच्या गीतांतून दिसतात. लोकसंस्कृतीच्या जडणघडणीमध्ये या उपासकांबरोबरच संतांचेही स्थान आहे. या दोहोंनीही लोकभाषेच्या माध्यमातूनच लोकमानस घडविले. परमेश्‍वराविषयीची श्रद्धा व आदर्श जीवनाची ओढ या दोहोंमध्ये दिसते. ‘बुडते हे जन ना देखवे डोळा’ या भावनेतून लोकांविषयी असणारी करुणा व समाजोद्धाराची तळमळ असल्यामुळे कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता संतांनी हे कार्य केले. संतांनी या उपासकांच्या भाषेत, भूमिकेत शिरून समाजाला उपदेश केला. संतांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी लोकनाट्य प्रकारांचा उपयोग केला. संत असोत वा लोकगायक असोत, या लोकसंस्कृतीच्या वारकर्‍यांनी लोकजीवनाला मार्गदर्शन करून ते आदर्शाकडे नेण्याचा प्रयत्न केला. समाजविसंगती नेमकेपणाने दाखविली. पौराणिक घटनांवर आधारित देवदेवताविषयक श्रद्धा व उपदेशपर कथा सांगून लोकजीवनापुढे आदर्श ठेवले. आपण या लेखमालिकेतून या लोकसंस्कृतीच्या वारकर्‍यांच्या विचारांचा ‘शेष उरले ते सेवू’ या भावनेतून आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भल्या पहाटे भगवंताचा नामजागर करणार्‍या वासुदेवापासून आपण या मालिकेची सुरुवात करणार आहोत. डोक्यावर मोरपिसांची शंकूच्या आकाराची टोपी, अंगात पांढरीशुभ्र बाराबंदी, कंबरेला धोतर आणि कसून बांधलेला शेला, त्यात खोचलेला पावा, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे, काखेला झोळी, हातात चिपळ्या आणि मुखात भगवंताचे नाम असे या वासुदेवाचे पारंपरिक रूपडे. जुन्या काळी हा वासुदेव भल्या पहाटे घरच्या अंगणात येई. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतानाच पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात वासुदेवाचा मधुर स्वर कानावर पडला की आपोआपच परमेश्‍वराची ओढ निर्माण होत असे. वासुदेव टाळ-चिपळ्यांच्या तालावर अंगणात फेर धरू लागल्यावर बालगोपाळांचा मेळा त्याच्याभोवताली जमा होत असे. घरातील लक्ष्मी सूपभर दाणे वासुदेवाच्या झोळीत टाके. असा हा वासुदेव ‘दान पावलं दान पावलं’ असे म्हणत सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या विचारांची गावोगावी पखरण करीत फिरत असे.
वासुदेवाच्या या रूपकाचा उपयोग करून संतांनीही समाजजागृतीचे कार्य अतिशय उत्तम प्रकारे केले आहे. ‘खांब दिला भागवत’ अशी कीर्ती असणार्‍या भागवतोत्तम संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचा वासुदेव काय सांगतो ते पाहा -

मी वासुदेव नामे फोडितो नित्य टाहो ।
देखिले पाय आता मागतो दान द्यावो ।
सावळे रूप माझ्या मानसी नित्य राहो ।
पावन संतवृंदे सादरे दृष्टी पाहा हो ॥ १ ॥
रामकृष्ण वासुदेवा । हरी रामकृष्ण वासुदेवा ॥ध्रु.॥

नाथबाबांच्या या वासुदेवाला ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ आपल्या मनीमानसी नित्य राहावे, एवढे एकच दान हवे आहे.

सांडोनी सर्व चिंता संतपदी लक्ष लागो ।
मुक्त मी सर्वसंगी सर्वदा वृत्ती जागो ।
भाविक प्रेमळांच्या संगती चित लागो ॥ २ ॥

परमार्थमार्गावर प्रगती करायची असेल, तर त्यासाठी एकच आवश्यकता असते - ‘देव वसे चित्ती। त्यांची घडावी संगती॥’ त्यामुळे भाविक प्रेमळ भक्तांची संगती त्याला हवी आहे. आपण मूळचेच मुक्त आहोत अशी वृत्ती जागल्याने मग सर्व प्रकारची चिंता लयाला जाते आणि केवळ संतपदावर आपले लक्ष एकवटून राहते.

अद्वैतेची चालो अक्षयी भक्तियोग ।
स्वप्नीही मानसाते नातळो द्वैत संग ।
अद्वैयानंद वेधे नावडो अन्य भोग ।
अक्रियत्वची वाहो सक्रिया रूप बोध ॥ ३ ॥

द्वैतभावनेमुळेच मानवाला हे प्रपंचरूपी दुःख भोगावे लागत आहे आणि संसारसागरात गटांगळ्या खाव्या लागत आहेत. त्यामुळे द्वैतभावना स्वप्नातही आपल्या मनाला शिवू नये आणि अद्वैतभावनेतून स्फुरलेला हा भक्तियोग अखंड चालत राहावा. या भक्तिप्रेमातून हाती लागणार्‍या सुखापुढे अन्य भोग सर्वथैव तुच्छ आहेत. ‘जो अमृताते ठी ठेवी। तो कांजी न सेवी॥' असे माउली ज्ञानोबारायांनी म्हणूनच ठेवले आहे. आपल्या खर्‍या रूपाचा बोध झाल्यानंतर या संसारमोहात भक्त सापडू शकत नाही.

पाहता विश्‍वमाते निजरूप दाखवी ।
सत्कथा श्रवण कर्णी पियुष चाखवी ।
रसने नाममंत्र सर्वदा प्रेम देई ।
तोषला देवराणा म्हणे बारे घेई ॥ ४॥

अशा भक्तरायाची देवाकडे एकच प्रार्थना आहे - ‘निजरूप दाखवा हो!’ कानाने अमृताहूनी गोड असलेल्या सत्कथेचेच श्रवण घडले पाहिजे. आपल्या मुखात ‘आवडीचा मंत्र सांगितला सोपा’ अशा रितीने सदैव भगवंताचेच नाम राहिले पाहिजे. भक्ताची ही मनोकामना ऐकून भगवंत का बरे तोषणार नाही! देवाकडे काय मागणे मागितले पाहिजे, हेच आपल्याला हा वासुदेव भल्या पहाटे उलगडून सांगतो. काय हो! आजकाल आपल्या एका तरी दिवसाची सुरुवात अशी मंगलमय होते का? खरेच आपण कोणत्या मोठ्या ठेव्याला मुकलो आहोत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

हे दान पावले सद्गुरु शांतिलिंगा ।
हे दान पावले आत्मया पांडुरंगा ।
हे दान पावले व्यापका अंतरंगा ।
हे दान पावले एका जनार्दनी दोष जाती भंगा ॥ ५ ॥

अशा तर्‍हेने भावजागृती करून ‘तुमचे सर्व दोष लयाला जातील’ असा आशीर्वाद देऊन हा वासुदेव ‘दान पावलं’ म्हणून पुढच्या घरी जागृतीसाठी निघून जातो.