माओवाद्यांची हुकूमशाही

विवेक मराठी    13-Jun-2020
Total Views |
माओवाद्यांच्या या हत्यांचा निषेध करावा तितका थोडाच, परंतु राज्यातील पुरोगामी मंडळी, जहाल कम्युनिस्ट, बामसेफी, ब्रिगेडी, मानव हक्क कार्यकर्ते, गोरगरिबांचे तथाकथित नेते मात्र या हिंसेचा कधीही निषेध करताना दिसत नाहीत. शहरी भागातील अनेक नक्षलसमर्थक अराजकवादी कॉमरेड्स सोईस्कर मौन धरतात. आणि विशेष म्हणजे हेच लोक 'संविधान वाचवा' अशा मोहिमा राबवतात.


naxalism crime_1 &nb

माओवाद्यांनी पुन्हा एकदा क्रूरतेने केली आदिवासी तरुणाची हत्या! सरंजामी विकृत जातीय मानसिकतेतून राज्यात जातीय हिंसेच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. त्याचा सर्व स्तरांतून निषेध होतोय, झालाच पाहिजे; परंतु त्यासह माओवाद्यांनी केलेल्या गोरगरीब दलित-आदिवासींच्या हत्याकांडांचाही निषेध व्हायला हवा.

एकट्या गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी २५ दलित व शेकडो आदिवासी बांधवांच्या हत्या केल्या व दिवसागणिक हे हत्यासत्र सुरूच आहे. पोलिसांचा खबर्‍या असल्याच्या फक्त संशयावरून, दि. ११ जून २०२० रोजी रात्री रवी जुरी पुंगाटी या आदिवासी तरुणाची गोळी घालून हत्या केली.

एप्रिल महिन्यात ८ तारखेला जीविता रामटेके या दलित बांधवाची त्यांच्या पत्नीसमोर डोक्यात गोळी घालून माओवाद्यांनी क्रूरतेने हत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली आहेत. खबरी असल्याच्या संशयवरून काही महिन्यांपूर्वी एक निष्पाप दलित शिक्षक योगेंद्र मेश्राम यांची हत्या केली व नंतर माओवाद्यांनी पत्रक काढले की शिक्षक खबरी नव्हता, चुकून हत्या झाली. खबरी असल्याचे भंपक कारण देऊन या माओवाद्यांनी शेकडो गोरगरीब, दलित, आदिवासी सामान्य जनतेचे हत्यासत्र केले आहे. अशा हत्या करून सामान्य जनतेत लाल दहशत निर्माण करण्याचे काम हे हुकूमशाही मानसिकतेचे माओवादी करत आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात वनपरिक्षेत्र कार्यालयाची जाळपोळ करून दोन अधिकार्‍यांना बेदम मारहाण केली गेली. त्या अगोदर रस्त्याच्या कामात असणार्‍या वाहनांची जाळपोळ केली, १६ मे २०२० रोजी माओवाद्यांनी दोन जवानांची हत्या केली... हे आकडे खूप आहेत.

एकीकडे संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी लढत आहे, पण हे संविधानविरोधी असलेले माओवादी मात्र देशाच्या लोकशाहीला धक्के देण्यात सक्रिय आहेत.

माओवाद्यांच्या या हत्यांचा निषेध करावा तितका थोडाच, परंतु राज्यातील पुरोगामी मंडळी, जहाल कम्युनिस्ट, बामसेफी, ब्रिगेडी, मानव हक्क कार्यकर्ते, गोरगरिबांचे तथाकथित नेते मात्र या हिंसेचा कधीही निषेध करताना दिसत नाहीत. शहरी भागातील अनेक नक्षलसमर्थक अराजकवादी कॉमरेड्स सोईस्कर मौन धरतात. आणि विशेष म्हणजे हेच लोक 'संविधान वाचवा' अशा मोहिमा राबवतात. सामान्य जनतेने या फुटीरतावादी लोकांचे षड्यंत्र या निमित्ताने ओळखले पाहिजे. हेच खरे संविधनाचे शत्रू आहेत.

- सागर शिंदे