अवघी ही पंढरी सुखाची ओवरी

विवेक मराठी    13-Jun-2020
Total Views |

ekadashi, 2020, pandharpu

अवघी ही पंढरी सुखाची ओवरी

अवघी ही पंढरी सुखाची ओवरी ।
अवघ्या घरोघरी ब्रह्मानंद ।।
अवघा हा विठ्ठल सुखाचाचि आहे ।
अनुसरे तो लाहे सर्व सुख ।।
पहावा नथनी ऐकावा श्रवणी ।
अवघा घ्यावा ध्यानी अवघ्या मने ।।
अवघिचे आवडी अवघा गावा गीते ।
अवघा सर्वांभूति तोचि आहे ।।
अवघा हा जाणावा अवघा हा मानावा ।
अवघा हा वाखाणावा अवघी वाचा ।।
अवघा ओळखूनि अवघा गिळिजे मने ।
- संत नामदेव

पंढरीच्या भक्तिसुखाचा आनंद अगदी आगळावेगळा असतो. त्याची तुलना इतर कुठल्याही गोष्टीबरोबर करता येत नाही. इतर कुठल्याही आनंदाशी त्याची बरोबरी होत नाही. या सुखाची जातकुळी वेगळीच आहे. त्याचा आदीअंतच सापडत नाही. म्हणूनच ‘पंढरीच्या सुखा। अंतपार नाही देखा।।’ असे संतांनी या सुखाचे वर्णन केले आहे.

संत नामदेवांनी या अभंगात पंढरीबाबत म्हटले आहे, ‘ही पंढरी नगरी म्हणजे सुखाची ओवरी (म्हणजे अंगण) आहे. घरोघरी ब्रह्मानंद दाटून राहिला आहे. विठ्ठल हा सुखाचेच रूप आहे. तो सर्व प्रकारचे सुख देणारा आहे. हा विठ्ठल डोळ्यांनी पाहावा, कानांनी ऐकावा, ध्यानीमनी साठवून ठेवावा, असा आहे. अवघ्यांची आवड असलेला असा हा गीतातून गावा, असा आहे. सर्वांच्या अंतरंगी तोच सामावला आहे. हा अवघेपणाने जाणावा, मानावा आणि वाचेने वाखाणणी करावा, असा आहे. याला पूर्णपणे ओळखून आपल्या अंत:करणात सामावून घ्यावा, म्हणजे तो पूर्णपणे आपला होतो.’

पंढरपूर आणि विठ्ठल यांच्याशी संत नामदेवांचे उत्कट नाते होते. भक्तीच्या प्रेमसूत्राने हे नात्याचे बंध घट्टपणे बांधले गेले होते. पंढरपूर म्हणजे सुखाचे अंगण. या अंगणात पंढरीच्या विठांबाच्या भक्तीचे तरंग लाभले की घरोघरी ब्रह्मानंदाची पखरण होते, हे अगदी निश्चित.

पंढरपूरचे माहात्म्य सर्व संतांनी गायिले आहे. पंढरपूरबाबत लिहिताना त्यांच्या वाणीला अधिक बहर येतो.

संत तुकाराम म्हणतात,
‘पंढरीये माझे माहेर साजणी ।
ओविया कांठणी गाऊं गीती ।।

संत ज्ञानेश्वर म्हणतात,
न चलति शब्द खुंटले पै वाद ।
एक तख भेद नाही रूपा ।।
ते रूप पंढरी भरले चराचरी ।
माझा माजी घरी बिंबलेसे ।।
रखुमादेविवरू पुंडलिकवरू ।
निलियेचा आगरू पंढरीये ।।

संत नामदेव म्हणतात,
निर्गुणीचे वैभव आले भक्तिमिषे ।
ते हे विठ्ठल वैषे ठसाविले ।।
बरविया बरवे पाहता नित्य नवे ।
हृदयी ध्याता निवे त्रिविधताप ।।
वोवीसांवेगळे सहस्राआगळे ।।
निर्गुणा निराळे शुद्धबुद्ध ।।

संत एकनाथ म्हणतात,
अनुपम्य भाग्य नांदते पंढरी ।
विठ्ठल निर्धारी उभा जेथें ।।

भूवैकुंठ पंढरपूर आणि भक्तसखा विठ्ठलाच्या भक्तिरंगाचे अवीट, अपार प्रेमसुख यातून लाभणाऱ्या परम आनंदाचे वा ब्रह्मानंदाचे वर्णन संत नामदेवांनी नेमक्या शब्दात केले आहे.