बहिरा

विवेक मराठी    13-Jun-2020
Total Views |

 
pandharpur ashadhi ekadas 

आपण एखाद्याला हाक मारली आणि त्याने जर आपल्यालानाही दिली तर आपण संतापाने त्यालाअरे, बहिरा झालास का?’ असे विचारतो. वस्तुतः तो जर बहिरा असेल तर आपण संतापाने उच्चारलेले शब्दही त्याला कसे ऐकता येणार? तो सर्व जगाचे ऐकतो आणि केवळ आपल्यापुरताच बहिरा झाला आहे असे वाटल्याने आपला संताप झालेला असतो. त्याचप्रमाणे आपण जर आपल्याला जे श्रवणेंद्रिय लाभलेले आहे, त्याचा योग्य तो उपयोग केला नाही तर आपण बहिरे झाल्यासारखेच होणार नाही का?

संत एकनाथ महाराजांनी बहिरा या रूपकाचा उपयोग करून जगातील कटू वास्तव आपल्यासमोर मांडले आहे. नाथमहाराज सांगत आहेत - अहो, या जगात मी खरोखरच बहिरा झालेलो आहे! बहिरा होण्याचे कारण ते पुढे सांगतात. कसे ते आपण पाहू या!

बहिरा झालो या जगी ॥धृ

नाही ऐकिले हरिकिर्तन नाही केले पुराण श्रवण

नाही वेदशास्त्र पठण गर्भी बहिरा झालो त्यालागून 1

काही लोक जन्मांध असतात, त्याचप्रमाणे आपला लोकगायक हा गर्भातच बहिरा झालेला आहे. एका संस्कृत उक्तीनुसारदानधर्म करणे हे हाताचे खरे भूषण आहे, सोन्याचे कडे नव्हे! भगवंताचे नाम ऐकणे हे कानाचे भूषण आहे, सोन्याची कर्णफुले अथवा भिकबाळी नव्हे!’आपण हरिकीर्तन ऐकले नाही, आपण पुराणांचे श्रवण केले नाही, त्याचप्रमाणे वेदशास्त्र पठणसुद्धा केलेले नाही. या पापकृत्यामुळेच मी बहिरा झालेलो आहे.

वारकरी सांप्रदायातील संतांना बंडखोर ठरविताना त्यांनी वेदांचा महिमा गुंडाळून ठेवला असा अपप्रचार केला जातो. मात्र त्यात काहीच तथ्य नाही. वैदिक धर्माचा उच्छेद करणे हा काही संतांचा निर्धार नव्हता. उलट संतांनी वैदिक धर्माला कालोचित वळण देत असे सांगितले -

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा

येरांनी वाहावा भार माथा

त्याचप्रमाणे,

वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाचि साधिला

विठोबासी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे

म्हणजे विट्ठलभक्ती हेच वेदांचेही सार आहे, हे संतांनी बजावून सांगितले आहे. या सर्व गोष्टींकडे आपण पाठ फिरविली याचाच अर्थ आपण जगात मनुष्यजन्माला येऊन बहिरे झालेलो आहोत.

नाही संतकिर्ती श्रवणी आली नाही साधूसेवा घडियेली

पितृवचनासी पाठ दिधली तिर्थे व्रते असोनी त्यागिलो 2

संतांनी ऐहिक जीवनाकडे पाठ फिरविली होती, त्यांना लौकिक जीवनाचे वावडे होते, मनुष्य व्यवहार त्यांना माहीत नव्हता... असेही गैरसमज काही लोकांचे झालेले आहेत. पण त्यातही तथ्य नाही. आपला प्रपंच सांभाळून परमार्थ कसा साधता येतो, याचेच मार्गदर्शन संतांनी सतत केले आहे.

संतांनी सांगितले आहे -

मायबापे काशी मायबापे काशी त्याने जावे तीर्थासी

जुन्या काळात असा समज होता की, ज्यांचे आईवडील जिवंत आहेत त्यांनी तीर्थयात्रा करू नये. त्यामुळेच मग म्हातारपणी तीर्थयात्रेस जाण्याची प्रथा पडली होती. बर्याच गोष्टींचा व्यत्यासच आपण स्वीकारत असतो. त्याचा पूर्वपक्ष जणू विसरूनच गेलेलो असतो. तीर्थयात्रेला जाणे म्हणजे पापकृत्य नव्हे? पण घरी आपले आईवडील आपल्यासाठी तीर्थक्षेत्र आहेत, तीर्थरूप आहेत, त्यामुळे मग आपण काशीयात्रा करण्याची गरजच काय? आईवडिलांची सेवा केली की आपल्या जीवनाचे आपोआप सार्थक होते, हे संतांनी उच्चरवाने सांगितले आहे. भगवान रामचंद्रानेहीपितृवचनासाठी वनवास भोगिला!’ एवढे आदर्श उदाहरण आपल्यासमोर असताना आपण आईबापाच्या सांगण्याकडे कानाडोळा करतो की! याच पापामुळे आपण बहिरे झालो आहोत.

संतजनांची कीर्ती ऐकून आपले कान किटतात, संतसेवा करण्याची आपली मनोवृत्ती नाही...याच पापामुळे आपण बहिरे झालेलो आहोत....

माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता

बहिरा झालो नरदेही येता एका जनार्दनी स्मरेन आता 3

हरिदासाची कथा पुन्हा मूळपदावर आपण लोकगायक येथे सांगतो की, आईने हाक मारली पण ती ऐकायला येऊनही आपण ती ऐकलीच नाही असा बहाणा केला... अरेरे! या नरदेहाला येऊन मी खरोखरच बहिरा झालो!

असा उपदेश करून नाथमहाराज आपल्याला आग्रह करतात की, आता तरी हा बहिरेपणा सोडा!!

**