वाट ही चालावी पंढरीची

विवेक मराठी    13-Jun-2020
Total Views |
टाळी वाजवावी गुढी उभारावी
टाळी वाजवावी गुढी उभारावी ।
वाट ही चालावी पंढरीची ।।
पंढरीचा हाट भक्तीची पेठ ।
मिळाले चतुष्ट वारकरी ।।
पताकांचे भार मिळाले अपार ।
होतो जयजयकार भीमातीरी ।।
हरिनाम गर्जना भय नाही चिंता ।
ऐसे बोले गीता भागवत ।।
खटनट यावे शुद्ध होऊनि जावे ।
दवंडी पिटी भावे चोखामेळा ।।
- संत चोखामेळा


sant chokhamela_1 &n

पंढरीच्या वारीचे माहात्म्य सर्व संतांनी गायिले आहे. वारीच्या आनंदयात्रेत संतांची मांदियाळी एकत्र आली होती. ‘पंढरीच्या सुखा। अंतपार नाही देखा।।’ असे म्हणत टाळमृदंगाच्या गजरात साऱ्यांची पावले पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करीत होती.

या अभंगात संत चोखामेळा म्हणतात, ‘हातात भगवी पताका घेऊन, टाळी वाजवून भजन करीत पंढरपूरच्या वाटेवर चालत राहावे. पंढरीचा हाट म्हणजे भक्तीची पेठ आहे. चहू दिशांनी वारकरी तिथे एकत्र येतात. चंदभागेच्या वाळवंटात गजर केला की कुठलेही भय वा चिंता शिल्लक राहत नाही. गीतेचा वा भागवताचा हाच आशय आहे. जो कुणी नटखट वा अशुद्ध असेल त्याने यावे आणि या पवित्र धारेत शुद्ध व्हावे. मी मनोभावे ही दवंडी पिटीत आहे.’

संत चोखामेळा हे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू. भागवत धर्माची पताका चोखोबांच्या खांद्यावर शोभून दिसते, असे यथार्थपणे म्हटले जाते. त्यांचे मूळ गाव मंगळवेढा. त्यांच्या पत्नीचे नाव सोयराबाई, बहिणीचे नाव निर्मलाबाई आणि मुलाचे नाव कर्ममेळा. संसारातील यातना, आयुष्यातील संघर्ष यामुळे त्यांचे मन विरक्त झाले. याच काळात त्यांना संतसहवास लाभला. त्यांना संतसमागमाची गोडी वाटू लागली. 'चोखा जाई लोटांगणी। घेत पायवणी संतांची।।’ अशी त्यांची अवस्था झाली. संतांच्या सहवासाने त्यांच्या अंतरंगात विठ्ठलाचे भक्तिप्रेम अधिकच दृढ झाले. एकेक वारकरी म्हणजे विठ्ठलाचाच एक अंश आहे, अशी त्यांची भावना झाली.

त्यांची पंढरीची वारी कधी चुकली नाही. ‘महाद्वारी चोखामेळा। विठ्ठल पाहतसे डोळा।।’ अशी त्यांची अवस्था होती. संत चोखामेळा यांना विठ्ठलनामाचा झरा सापडला होता. या झऱ्यातील जळाचा प्रवाह अखंडपणे वाहणारा होता. त्यांच्या अंतरंगातील विठ्ठलभक्तीची मात्रा दिवसेदिवस अधिकाधिक वाढत गेली. पंढरपूरचे विटेवरील सावळे परब्रह्म हे त्यांच्या आयुष्याचे निधान झाले, सारसर्वस्व झाले.

पंढरीचा बाजार वा हाट वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथे भक्ती आणि ईश्वराची कृपा यांची देवाणघेवाण होते. सारे भक्तजन या बाजाराच्या निमित्ताने एकमेकांना भेटतात. पताकांची दाटी, गजबजलेले भीमातीर, विठुनामाचा गजर असे भरलेले आणि भारलेले वातावरण असते. या भावपूर्ण वातावरणात चोखोबा पूर्णपणे भक्तिरंगात विरघळून गेले आहेत, कुणीही यावे आणि या भक्तिरंगात आकंठ भिजून पावन व्हावे, असे ते सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देत आहेत वा दवंडी पिटीत आहेत.

पंढरपूरचे आणि पंढरपूरच्या वारीचे तत्त्व आणि सत्त्व चोखोबांनी उत्कटपणे शब्दरूप केले आहे.