अमेरिकन वंशवाद - २०२०

विवेक मराठी    14-Jun-2020
Total Views |
जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या, पोलिसांच्या कारवाईमुळे झालेल्या अनैसर्गिक मृत्यूमुळे अमेरिकेतील वांशिक मतभेद परत ऐरणीवर आला आहे. त्यावरील स्थानिक पातळीवर झालेली शांततापूर्ण निदर्शने, विध्वंसक दंगली आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय परिणाम यांचा वेध घेणारा लेख.

Emotion is contagious_1&n

'Emotion is contagious.'
- Malcolm Gladwell, The Tipping Point : How Little Things Can Make a Big Difference
गेल्या दोन महिन्यांपासून कोविड-१९च्या संसर्गाने ग्रासलेली अमेरिका जरा कुठे त्यातून बाहेर येत असतानाच, आज सार्‍या देशाला भावनोद्रेकाच्या संसर्गाने ग्रासले आहे. भावनोद्रेकाचे टोक जेव्हा गाठले जाते, तेव्हा कुठले तरी तात्कालिक कारण घडलेले असते. ऑस्ट्रियाच्या राजपुत्राचा वध हे तत्कालीन कारण होते खरे, पण त्यातून पहिले महायुद्ध पेटले. आत्ता, जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या, पोलिसांच्या कारवाईमुळे झालेल्या अनैसर्गिक मृत्यूमुळे अमेरिकेतील वांशिक मतभेद परत ऐरणीवर आला आहे. त्यावरील स्थानिक पातळीवर झालेली शांततापूर्ण निदर्शने, विध्वंसक दंगली आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय परिणाम यांचा विचार करणे गरजेचे आहे.
काही शतकांपूर्वी आणलेले आफ्रिकेतील कृष्णवर्णीय गुलाम १८५३ साली राष्ट्राध्यक्ष लिंकनच्या काळात गुलामगिरीतून मुक्त होऊ शकले. पण त्यासाठी अमेरिकेला यादवी / नागरी युद्धाला सामोरे जावे लागले, ज्यामध्ये सहा लाखाहून अधिक माणसे मृत्युमुखी पडली. पुढे १९५५पर्यंत बसेसमध्ये त्यांना वेगळे ठेवण्याचे अधिकृत धोरण होते. नंतर विविध चळवळींनंतर १९६४मध्ये अमेरिकेत समान हक्क असलेला नागरिक कायदा संमत झाला. अर्थात कायद्याने समाज घडत नसतो. कायदा फक्त त्यांच्या बिघडण्यावर नियंत्रण ठेवू शकतो. अमेरिकन समाजातील वर्णभेद १९६४ला संपला नाही आणि आजपर्यंत अनेक घटना घडल्या, त्यातून कृष्णवर्णीयांच्या विरोधात हा वंशवाद अथवा किमान नकळत असलेला आकस दिसू शकतो. विषय आणि लेखनमर्यादा पाळण्यासाठी आपण या वर्षातील घटनेतून काय झाले, ते आता पाहू या.
पार्श्वभूमी
जॉर्ज फ्लॉइड हा अमेरिकेतील दक्षिणी राज्यात, टेक्सासमध्ये वाढलेला एक कृष्णवर्णीय. शाळेत आणि कॉलेजात त्याने बास्केटबॉल खेळामध्ये बर्‍यापैकी चांगले नैपुण्य दाखवले होते. मात्र नंतरच्या काळात त्याने लहानसहान चोर्‍यामार्‍या केल्या आणि तत्सम गुन्हेगारी केल्याने त्याला २००९मध्ये पाच वर्षांची शिक्षा झाली. त्यातून तो २०१३मध्ये चांगल्या वर्तणुकीमुळे जामिनावर बाहेर आला. पुढे स्थानिक चर्च समुदायामध्ये सक्रिय होऊन तिथल्या तरुणांना मार्गदर्शन करू लागला. त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. सगळ्यात लहान मुलगी ६ वर्षांची आहे. पुढे नोकरीच्या शोधासाठी म्हणून तो उत्तरेकडील मिनिसोटा राज्यामधील मिनिओपोलीसमध्ये स्थलांतरित झाला. तिथे तो ट्रक ड्रायव्हर, क्लबसाठी लागणारे बाउन्सर (सुरक्षा रक्षक) म्हणून काम करू लागला. याच वर्षात सुरुवातीस त्याने बंदुकांमुळे होणार्‍या हिंसाचाराच्या विरोधात समाजजागृती करणार्‍या एका व्हिडिओमध्येदेखील काम केले होते. थोडक्यात, गेल्या दशकात वाईट वळणावर लागलेला जॉर्ज फ्लॉइड हा एक सामान्य पण शांतताप्रिय नागरिक म्हणून जगू लागला होता. त्यातच कोविड-१९मुळे त्याची नोकरी गेली.
२५ मे २०२०ला तो एका दुकानात सिगरेट्स आणायला गेला. त्याने २० डॉलर्सची नोट देऊन त्या विकत घेतल्या आणि गाडीमध्ये बसायला लागला. दुकानातील कारकुनाच्या म्हणण्याप्रमाणे ती नोट खोटी होती, म्हणून तो त्याच्याकडे दुसरी नोट अथवा सिगरेट्स परत दे असे सांगायला गेला. जॉर्ज फ्लॉइडने नकार दिला. त्याने दिलेली नोट खरी होती की खोटी, या संदर्भात हा लेख लिहीत असतानादेखील स्पष्ट बातमी दिसत नाही. पण अगदी असे गृहीत धरले की त्याने जाणतेपणे अथवा अजाणतेपणे खोटी नोट दिली असली, तरी मिनिसोटा राज्याच्या कायद्याप्रामाणे, आरोप सिद्ध झाल्यावर एक हजार डॉलर्सहून कमी खोट्या प्रमाणात नोटा असतील तर एक वर्ष तुरुंगवास आणि ३००० डॉलर्सपर्यंत दंड होऊ शकतो. मात्र येथे भलतेच घडले. दुकानाच्या धोरणाप्रमाणे तिथल्या कर्मचार्‍याने पोलिसांना फोन केला. आधी दोन पोलीस आले आणि ते जॉर्जशी बोलू लागले. सभोवताली असलेल्या इतर दुकानांच्या क्लोज सर्किट कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डिंगप्रमाणे जॉर्जने कुठलेही गैरवर्तन केले नाही अथवा आक्रमकता - विशेषत: गुन्हेगाराकडून स्वसंरक्षण करण्याची आवशक्यता भासेल असे तो वागला नव्हता. तरीदेखील पोलीस ऑफिसर डेरेक शॉविन याने त्याला गाडीतून बाहेर येण्याची आज्ञा केली, त्याला बेड्या ठोकल्या. इतकेच करून तो थांबला नाही, तर त्याला जमिनीवर झोपवून त्याच्या मानेवर गुडघा ठेवून, आता बाहेर आलेल्या माहितीनुसार, ८ मिनिटे ४६ सेकंद बसला. हे चालू असताना आणखी दोन पोलिसांनी त्याच्या हालचालींवर नियंत्रण आणले आणि आणखी एका पोलिसाने इतर बघ्यांवर नियंत्रण ठेवले. तरीदेखील एका व्यक्तीने ते सर्व फोनवर व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यात दिसल्याप्रमाणे, तो श्वास घेता येत नाही म्हणून तक्रार करत होता, तसेच "म मा" (आईग्ग म्हटल्यासारखे) म्हणत होता. कोर्टात दिलेल्या माहितीनुसार या आठ मिंनितांपैकी जवळपास शेवटची तीन मिनिटे तो निपचित पडला होता, तरीदेखील पोलिसांनी काही प्रयत्न केले नाहीत आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. ज्या पोलिसाने यात पुढाकार घेतला, त्या ऑफिसर डेरेक शॉविनच्या विरोधात त्याच्या डिपार्टमेंटमध्ये १८ तक्रारी होत्या, त्यातील १६ बंद केल्या गेल्या होत्या. एका प्रकरणात एक मृत्यूही झाला होता.
 
जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूचे व्हिडिओ बाहेर आल्याने मिनिसोटा प्रशासनाने या चारही पोलिसांना तत्काळ बडतर्फ केले. पुढे दोनच दिवसांत फ्लोरिडा प्रांतात टोनी मकडेड नामक कृष्णवर्णीय व्यक्तीस पोलिसांनी गोळीबारात मारले.
वरील घटना आधी म्हटल्याप्रमाणे २५ मेची आहे. पण ही घटना होण्याआधी, २३ फेब्रुवारीला २५ वर्षीय अहमद आरबेरी या जॅर्जिया प्रांतातील अटलांटा शहरात, एक कृष्णवर्णीय जॉगिंग करत असताना दोन श्वेतवर्णीयांनी त्याला बंदुकीने मारले.
मार्च १३ला लुईव्हिल केंटकीमध्ये, नर्सचे शिक्षण घेत असलेल्या 'इमर्जन्सी मेडिसिन टेक्नीशियन' २६ वर्षीय कृष्णवर्णीय ब्रिओना टेलरला श्वेतवर्णीय पोलिसांनी घरात घुसून गोळीने मारले. पोलिसांना तिच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका घरात मादक द्रव्यांचा साठा आहे असे कळले आणि नंतर ती स्वत: नाही, तर तिच्याकडे कोणीतरी त्यांपैकी लपून बसले आहे असे कळले म्हणून ते तिच्या घरी गेले. तिने वाद घातल्याचे कारण झाले आणि त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तिला प्राणास मुकावे लागले.

Emotion is contagious_1&n

तत्काळ प्रतिक्रिया

जॉर्ज फ्लॉइडच्या घटनेआधीच्या घटना ह्या कोविड-१९ समस्या खूप गंभीर आणि अनाकलनीय असताना झाल्या. परिणामी त्याकडे ना धड माध्यमांचे लक्ष गेले, ना जनतेचे. पण जॉर्ज फ्लॉइड घटना समाजमाध्यमे आणि इतर पारंपरिक माध्यमे यांच्याकडे लगेच आली. मिनिसोटा राज्यात आणि त्याच्या मूळ गावी - म्हणजे ह्युस्टन टेक्सास येथे तत्काळ निदर्शने झाली. सुरुवातीची निदर्शने शांततेत झाली, पण बघता बघता त्यांचे विंध्वंसक दंगलीत रूपांतर झाले. सतत कुणाचा न कुणाचा तरी झालेला मृत्यू ऐकून हताश झालेला कृष्णवर्णीय समाज आता देशभर क्रोधित होऊन बाहेर पडला आणि न्याय मागू लागला. त्यांना उदारमतवादी श्वेतवर्णीय तसेच इतर सर्ववंशीय जनतेने पाठिंबा दिला. वणव्यासारखी पसरणारी दंगल पाहून शासनाने आरोपी पोलिसांच्या आरोपात वाढ केली, तरीदेखील क्षोभ थंड होताना दिसत नव्हता. या निदर्शकांच्या प्रमुख मागण्यामध्ये जसे जॉर्ज फ्लॉइडला न्याय मिळणे ही एक होती, तशीच पोलिसांच्या आंनियंत्रित अधिकारांवर नियंत्रण आणण्याचीसुद्धा मागणी होती आणि अजूनही आहे.
राजकारण
अमेरिकेत पोलिसांना खूप अधिकार आहेत. त्यातील काही अधिकार कायद्याने आहेत, तर काही युनियन्समुळे आहेत. पण एखाद्या संशयितास पकडले आणि अगदी नुसती बाचाबाची होत आहे अथवा संशयिताने काही हालचाल केली ज्यामुळे त्याच्याबद्दलचा संशय अधिकच वाढला, तर पोलीस गोळीबार करू शकतात. गेल्या अनेक वर्षांत असे अनेक जण हकनाक मृत्युमुखी पडले आहेत. त्यातच उपलब्ध माहितीवर आधारित संशोधनानुसार, आशा गोळीबारात कृष्णवर्णीय मरण्याची शक्यता तिपटीहून अधिक असते. म्हणून त्यांचे अधिकार (पॉवर) कमी करा असा निदर्शनकर्त्यांचा हट्ट आहे. अर्थात इथे पोलीस हे राज्य सरकारे आणि स्थानिक सरकारे यांच्या प्रत्यक्ष अखत्यारीत येतात. त्यामुळे त्यांच्या आंनियंत्रित अधिकारांमध्ये बदल घडवून आणणे हे स्थानिक सरकारांचे काम आहे. पण कुठल्याच राजकीय पक्षाचे सरकार ते त्या पातळीवर काही निर्णय घेताना दिसत नाहीत, कारण शेवटी राजकारण...
अमेरिकेतले हे राष्ट्राध्यक्ष निवडणूक वर्ष आहे. ट्रम्प यांची चार वर्षे कशी होती? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तो प्रश्न कुणाला विचारत आहात यावर अवलंबून राहील. पण बहुधा एक गोष्ट सर्वमान्य असल्याचे लक्षात येईल, ती म्हणजे आज देश कधी नव्हे इतका दुभंगलेला आहे. हे दुभंगलेपण वैचारिकतेतले जास्त आहे. एका बाजूला ट्रम्प समर्थक उजवे, ज्यांच्या अर्थकारणाची दिशा जास्त उद्योगधंदेप्रेमी आहे आणि दुसर्‍या बाजूला राजकीय पक्ष नाही, तर विचारसरणी म्हणून अतिडावे आणि त्यांचे समर्थक आहेत. यांचे विचार कम्युनिस्टांच्या अधिक जवळ जाणारे आणि म्हणून अनुपयुक्त तसेच हिंसक आहेत. ह्या अतिरेकी डाव्यांच्या विचारांच्या समुदायाने आपल्या बाजूने प्रकरण तापवायला जॉर्ज फ्लॉइड प्रकरण वापरले, त्यात दंगल हा एक नक्की भाग होता. या अतिरेकी डाव्यांचा ANTIFA म्हणजे अॅंटी फॅसिस्ट नावाचा गट आहे, जो समाजात अस्थिरता आणण्यास कारणीभूत आहे. आता ट्रम्प यांनी हा स्थानिक दहशतवादी गट आहे असे जाहीर केले आहे आणि त्यावर बंदी घातली आहे. वास्तविक अमेरिकतील व्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्कांमुळे हा आदेश कोर्टात टिकेल का, ही शंका आहे, पण त्याविरोधात अजून तरी कोणी कोर्टात गेलेले नाही. ट्रम्प यांनी सुरुवातीस लष्कराला बोलावून आणखी खळबळ माजवली. पण शेवटी लष्कराला वापराचे का हा निर्णय राज्यांचा असल्याने या संदर्भात अधिक काही घडू शकले नाही.
दोन्ही प्रमुख पक्षनेतृत्वांनी या घटनेची दाखल घेत पोलीस यंत्रणेत बादल करू असे जाहीर केले आहे. स्वत: ट्रम्प ह्यांनीदेखील त्यांच्या नेहमीच्या राजकारणात बसू शकणार नसले, तरी जॉर्ज फ्लॉइडच्या कुटुंबीयांना फोन केला, तसेच शांततेने चाललेल्या निदर्शनास पाठिंबा आहे असे संगितले. त्यांनीदेखील पोलीस यंत्रणेतील बदल या संदर्भात प्रस्ताव तयार केला आहे आणि तो ते लवकरच जाहीर करणार आहेत, असे व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने संगितले आहे.
वास्तव
गोंगाटात कुणाचेच ऐकू जात नाही आणि सत्य कुठेतरी दडपून जाते. या संदर्भातही असेच काहीसे होत आहे. आता पुढे आलेले निदर्शक हे प्रामुख्याने स्वत:चे राजकारण पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरी बाजू या अतिडाव्या अतिरेकी विचारांच्या लोकांना विरोध करण्यासच महत्त्व देत आहे. त्यात जॉर्ज फ्लॉइड आणि एकंदरीत कृष्णवर्णीयांवर होणारे अत्याचार यावर प्रामुख्याने लक्ष नाही. यातील दुसरा एक महत्त्वाचा भाग असादेखील आहे की कृष्णवर्णीय समाजातील अविकसित समुदाय जोपर्यंत विकसित होत नाही, तोपर्यंत दुर्बल समाज म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षच होत राहणार. अमेरिकेत गेल्या काही वर्षांत कुटुंबसंस्थेचा ऱ्हास झाला आहे. समाजातील दुर्बल आणि या संदर्भात वंशभेदाने दुर्लक्षित समाजाला त्याचा सर्वात अधिक तोटा होतो. त्यात शिक्षण खूप महागडे असल्याने अधिकच प्रश्न तयार होतात. त्या संदर्भातील प्रयत्न या गंभीर प्रश्नाच्या आवाक्याच्या मानाने तोकडे आहेत असे वाटते.
महाभारतात शांतिपर्वामधला श्लोक या संदर्भात बरेच काही सांगून जातो -
भेदे गणा विनश्युर्हि भिन्नास्तु सुजया: परै:
तस्मात्संघातयोगेन प्रयतेरंगणा: सदा
फाटाफूट झालेला समाज हा त्याच्या नाशास कारण असतो. कारण शत्रू अशा दुभंगलेल्या समाजाचा सहज पराभव करू शकतात. हे टाळण्यासाठी समाजाने एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे.
प्रामुख्याने अमेरिकेचे अर्थकारण आणि खर्‍या अर्थाने व्यक्तिस्वातंत्र्य ही अमेरिकेची बलस्थाने आहेत. आज एकीकडे अर्थकारण विषमतेकडे झुकणारे आहे, दुसरीकडे व्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ न समजणारी पिढी आणि त्या संदर्भात अतिरेकी वृत्ती तयार कणारी अतिरेकी डावी नीती आहे, तर तिसरीकडे टोकाचे उजवे हे धर्म आणि अर्थ या दोन्ही गोष्टी दुसर्‍या टोकास नेत आहेत. याची सुरुवात कधी आणि का झाली, हा संशोधनाचा आणि वेगळ्या लेखाचा विषय आहे. पण त्यातून जगातील इतर लोकशाही देशांनासुद्धा काही शिकण्यासारखे आहे, असे वाटते.