कोरोना काळात भटके - विमुक्तांना घडलेले समरसता भारताचे विश्वरूपदर्शन

विवेक मराठी    14-Jun-2020
Total Views |
@डॉ. सुवर्णा रावळ

 कोरोना विषाणूवर अजूनही कोणती लस किंवा औषधांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक आणि एकमेव उपाय म्हणजे 'घरी रहा, सुरक्षित रहा' हा होय. ही गोष्ट जरी खरी असली तरी आपल्या समाजातील एक गट असा आहे, ज्यांना रहायला घरचं नाही. कधी मोकळ्या माळरानावर, तर कधी रेल्वे ट्रॅकवर, तर कधी शहरातील उड्डाणपुलाच्या खाली आपले थोड्या दिवसाचे बस्तान बांधतात. आठ-आठ महिने भटकंती करणाऱ्या या भटके- विमुक्त समाजाची स्थिती लाॅकडाउनच्या काळात अतिशय दयनीय झाली होती. हा काळ मानवता धर्म जागृत ठेवून समाजाचे ऋण फेडण्याचा आहे. हीच जाणीव आणि कर्तव्य समजून भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून भारतात अनेक ठिकाणी सेवाकार्ये करण्यात आली. या सेवाकार्यांचा आढावा घेणारी लेखमाला देत आहोत.

samrasta_1  H x
संकट जेव्हा अत्युच्च पातळीवर येते, संपूर्ण मानवसमूहालाच आपल्या कवेत घेण्यासाठी असुसलेले असते, त्याच वेळेस मानवतेची कसोटी असते. कोरोना महामारीचे संकट त्याच सदरात मोडते. आपल्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चला एक दिवसाच्या संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली, सायंकाळी घंटानाद करून भारताच्या एकतेची चाचणी घेतली. २४ मार्च, सायंकाळी १७ एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाउनची घोषणा त्यांनीच केली आणि जनतेला घरातच थांबण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या महामारीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. या महामारीच्या संकटाला थोपविण्यासाठी, घरातच थांबणे हाच उपाय आहे या त्यांच्या आवाहनाभोवती माझ्या डोळ्यात विचारचक्र घोघावू लागले ते भटके-विमुक्त समाजाच्या संदर्भात - ज्यांना घरच नाही, त्यांनी कुठे राहायचे? गावाच्या, शहराच्या, रेल्वे ट्रॅकच्या माळरानावर, उघड्या जागेत कपड्याची किंवा प्लॅस्टिकची पाले टाकून राहणारा, बंदिस्त घराच्या व्याख्येत न बसणारा, गाढवाच्या, घोड्याच्या, उंटाच्या पाठीवर बैलगाडीमध्ये आपल्या संसाराचा बोजा टाकून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वर्षाचे ८ महिने भटकंती करणारा हा समाज. मैलोनमैल पायपीट करीत, आपले पारंपरिक काम करीत दिवसभरात जे मिळेल त्यावर गुजराण करणारा हा भटका समाज उद्याची काळजी करीत नाही, ना तशी तरतूद करण्याचा संस्कार अंगी बाळगतो. यांचे कसे होणार? चलत दूरभाष यंत्राने (मोबाइल फोनने) अशा वेळी निष्ठावान सहकार्‍याची भूमिका निभावली, समाजमाध्यमांचा (व्हॉटस्‌ ऍपचा) उपयोग आणि साहाय्य याआधी कधी घेतले नसेल, तेच सच्च्या मित्रासारखे या संकटसमयी मदतीला धावून आले. बरे, हे मोबाइलचे यंत्र सगळ्या भटक्यांकडे! कपड्याची अधिकची जोडी नसेल, पण साधा का होईना, मोबाइल पुरुष मंडळींकडे आणि तरुण मुलांकडे व्हॉटस्‌ ऍप असणारे मोबाइल होते. एका वस्तीमध्ये कमीत कमी एक-दोघांकडे फोटो व व्हॉटस्‌ ऍपवाले मोबाइल असल्याचे दिसून आले.
 
सा. विवेकच्या वाचकांना हे माहीतच आहे की भटके विमुक्त विकास परिषद गेली तीस वर्षे महाराष्ट्रात (प. महाराष्ट्र, कोकण, देवगिरी प्रांतामध्ये) भटके विमुक्तांमध्ये कार्यरत आहे, तसेच विदर्भामध्ये भटके-विमुक्त कल्याणकारी संस्था या नावाने कार्यरत आहे. भटके विमुक्तांच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यामध्ये परिषदेचा मोठा वाटा आहे. आत्मभान जागृतीमध्येही चांगले यश म्हणता येऊ शकेल. असे असले, तरी पालावरचे जिणे परिवर्तित करण्यात व भक्कम घरासाठी प्रयत्न करूनही यश अत्यल्प आहे, कारण ते शासकीय योजनेच्या आधारावर घडवून आणण्याचा प्रकार आहे. त्याचबरोबर वर्षातील ८ महिने भटकंती व त्याला अनुसरून आपला पारंपरिक व्यवसाय करण्याचे त्यांचे कौशल्य हा उच्चतम आनुवंशिक गुण आहे आणि परंपरेने आलेले किंवा स्वीकारलेले हे भटकंतीचे जगणे हे भटके-विमुक्तांच्या जगण्याची प्रेरणा आहे. ते धर्माचे काम आहे हे त्यांचे मत आहे आणि त्यावर दृढ विश्वास आहे. त्यामुळे कुठल्याही तक्रारीविना कर्तव्यबुद्धीने ते करीत असतात, हे वास्तव आहे. त्या-त्या परिसरातील आपआपला जातसमूह कुठे आहे, त्यांची पाले कुठे पडली आहेत याची इत्थंभूत माहिती असते. आतातर मोबाइलच्या काळात संपर्क साधणे सोपे व सहज झाले आहे.
 
 
तर मंडळी, २४ मार्च २०२० रोजी सायंकाळी मा. पंतप्रधान यांनी दीर्घ पहिल्या लॉकडाउनची घोषणा केली. २३ मार्चला सकाळी मी सहज माहिती काढावी म्हणून काशिनाथ शिंदे यांना फोन केला. काशिनाथ शिंदे विदर्भातील नाथपंथी डबरी गोसावी समाजाचे कार्यकर्ते. दर वर्षी भिवंडीच्या कोनगावजवळ साईबाबा मंदिराच्या पटांगणात त्यांची पाले पडतात. गोंदियामधील एका बिर्‍हाड परिषदेमध्ये त्यांच्याशी माझा परिचय झाला होता. बिर्‍हाड परिषदेबाबत पुढील लेखात लिहीन. माझा अंदाज होता तिथे जवळपास असतील यांची पाले. काशिनाथ शिंदे अगदी व्याकूळतेने म्हणाले, "ताई, आम्ही इकडे गोध्रा (गुजरात) रोकडे हनुमान मंदिराजवळ आहोत. कालपासून आम्ही उपाशी आहोत." मला आश्चर्य वाटले, हे लोक गुजरातला कुठे गेले? साधारणत: शहरी भागात नाथपंथी डबरी गोसावी समाजाच्या महिला गाय (भाड्याने) घेऊन मंदिराच्या बाहेर बसतात, चारा, कडब्याचे लाडू लोक त्यांच्याकडून विकत घेतात व तिथेच त्या गायीला खाऊ घालतात. त्यातून जो पैसा मिळतो, त्यावर गुजराण करतात. पुरुषही बोलण्यात पटाईत, देव-देवतांच्या, नीतिमूल्यांच्या कथा सांगण्यात पटाईत, त्यातून भविष्यकथन करू लागतात. साधारणत: पांढरे धोतर, भगवा शर्ट, झोळी, कपाळाला विभूतीचे तीन पट्टे, त्यामध्ये कुंकवाचा गंध, भाषा शुद्ध. त्यामुळे व्यक्तीशी व समूहाशी सहज संवाद साधू शकतात. एकदा कोणी त्याच्या संपर्कात आले की त्या त्या ठिकाणी गेले की आवर्जून संपर्क साधून भेटतात. या भटकंतीतून जो पैसा मिळतो, सामान मिळते त्यावर गुजराण करतात. माझा समज असा होता की यांची भटकंती महाराष्ट्रापुरती होत असेल. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील काशिनाथ शिंदेंचा समूह गोध्य्राला कसा पोहोचला? याच अनुषंगाने मी त्यांना विचारले, "तुम्ही तिकडे कुठे व कशासाठी गेला होतात?" ते म्हणाले, "आम्ही हरिद्वारला यात्रेला गेलो होतो. परतीच्या प्रवासातच हे बंद सुरु झाले आणि आम्ही इथे अडकलोत. आमची ३८-४० पाले आहेत." यांचा लवाजमा सहकुटुंब भटकंती करत असतो. त्यामुळे महिला, लहान मुलेही होती. गेले दोन दिवस सगळे उपाशी होते. यांचा भटकण्याचा भौगोलिक आवाका ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. गुजरातमधून आशा प्रकारचे खूप फोन येऊ लागले. त्यामध्ये जगदीश विश्वनाथ चव्हाण हे म्हणे "आम्ही वलसाड जिल्ह्यातील बिलाडमधील हनुमान मंदिराच्या बाजूला आहोत." त्यातच बडोद्याच्या कुही मार्गावर असणार्‍या गोपाळ समाजाची वस्तीची (अंबाडी गाव), मढी गाव, ता. बारडोली (सुरत) येथे अकोला (विदर्भ) जिल्ह्‌यातले हवरी गोसावीची पाले अडकली होती, त्यांच्या शंकर रोहर यांचा फोन आला. म्हणजे एकट्या गुजरातमध्ये ५-६ ठिकाणी विदर्भातील भटके अडकले होते. त्यांच्याकडूनच कळले की त्यातील काही समूह हरिद्वारहून परत येत होते, तर कुणी हृषीकेशहून, तर कुणी बद्रीनाथहून. आपल्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांचा लवाजमा, सोबत महादेवाची पालखी, एखादे-दुसरे जनावर असा ते दर वर्षी हा प्रवास करतात. ठिकठिकाणी जाता-येता काही थांबतात. काही जण मंतरलेल्या खड्यांच्या अंगठ्या किंवा खडे विकतात. पुरुषमंडळी देशभर हा व्यवसाय करतात. या लॉकडाउनमुळे यांच्या या नियमित कार्यक्रम ठप्प तर झालाच, तसेच ते आपल्या मूळ गावापासून दूर परराज्यात अडकून पडले. कुणाची ओळख नाही, आसरा देणारे कुणी नाही. उपासमार चालू झाली. प्रत्येक जण हीच व्यथा सांगत होता. आता एवढ्या जणांची व्यवस्था, तीही परराज्यात, लॉकडाउनमुळे आलेली प्रवासाची बंधने. असाहाय्यतेच्या मानसिकतेमध्ये मला विश्व हिंदू परिषदेचे समरसता गतिविधीचे राष्ट्रीय प्रमुख देवजीभाई रावत यांची आठवण आली. त्यांना फोन लावला. प्रथम गोध्राच्या वस्तीची स्थिती सांगितली. "भाईसाहब, कुछ हो सकता है क्या?" देवजीभाईंचे प्रत्युत्तर - "बहनजी, चिंता मत करो। कुछ ना कुछ प्रयास करेंगे।" हळूहळू व्हॉटस्‌ ऍपवर सर्व माहितीची देवाणघेवाण होत गेली. गुजरातमधील अन्य सर्व ठिकाणची माहिती, वस्तीवस्तीतील प्रमुखाचा संपर्क क्रमांक, एकूण कुटुंबसंख्या, सदस्य, फोटो असे माहितीचे बोलणे व लिखित माहिती पाठविली गेली. त्या-त्या ठिकाणच्या एखादा कार्यकर्ता, मठ किंवा मंदिर, कलेक्टर, स्वयंसेवक, आमदार, उद्योजक, सामाजिक संघटना असे विविध मार्ग अवलंबून काही ठिकाणी ४-५ तासांत, तर काही ठिकाणी १२-१४ तासांत कार्यकर्ते पोहोचले. कार्यकर्त्यांनी फोनवर संपर्क मात्र अर्ध्या तासाच्या आत केला. अशा प्रकारे जोडणी झाल्यानंतर या भयभीत झालेल्या समाजाला आधार वाटू लागला. तसेही फोन येत होते. गोध्य्रामधील वस्तीला शिजलेले अन्न, शिवाय धान्यही दिले गेले, अन्य वस्तूंचेही वाटप झाले. अगदी पंगतीमध्ये उत्तम भोजनाची (दोन्ही वेळेस) व्यवस्था लागली.


samrasta_1  H x 
  
संपर्कासंदर्भात मुळातच तल्लख आणि हुशार असणारे भटके मोबाइलमुळे आता तर इतक्या वेगाने संपर्क करतात की समोरच्याला उसंत घेऊ देत नाही. गुजरातमधील व्यवस्था लागते न लागते, तोच दिल्लीहून शिवराम बाबर यांचा फोन - "ताई, आमचे इथं लई हाल व्हायला लागलेत, आम्ही जळगावचे आहोत, इथे फसलोय." अमरावतीची काही कुटुंबे / पाले बडोली फरीदाबाद (हरियाणा) इथून तानाजी शेगर व विश्वनाथ शिंदे, तिकडे राजस्थानच्या जोधपूरमध्ये शेळगाव आटोलची पाथरवटाची ११ कुटुंबे अडकली, तर उत्तराखंडमधल्या डेहराडूनमध्ये डवरी समाजाची ३८ पाले अडकली. दिल्ली, हरियाणा, राजस्थान या प्रांतातील व्यवस्थेसाठी भटके-विमुक्त कामाचे अ.भा. संयोजक दुर्गादासजी (प्रचारक, अलीकडेच त्यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे.) यांच्याशी संपर्क साधला असता अतिशय उत्साहाने व आनंदाने म्हणाले, "हां बहनजी, कर लेंगे। उनका संपर्क सूत्र बताइयेगा!"
 
आश्चर्य म्हणजे वर नमूद केलेल्या समाजाच्या प्रतिनिधींपैकी एकाचीही न माझी ओळख वा प्रत्यक्ष भेट झाली होती, ना दुर्गादासजींची झाली होती, ना देवजीभाईची झाली होती. आणि या दोघांच्याही माध्यमातून अनेक हात या कार्यात काम करीत होते, वस्तीपर्यंत सामान पोहोचविणारे, जेवण पोहोचविणारे स्वयंसेवक कार्यकर्ते हेच या समाजाचे प्रत्यक्ष दर्शन घेत होते. ही सारी मंडळी ना त्यांच्या प्रांतातली होती, ना त्यांच्या भाषा-वेशभूषा एक होत्या, तरीही संपर्क झाल्यानंतर एकही जण एकदाही उपाशी राहिला नाही किंवा उपाशी झोपला नाही.
 
डेहराडून (उत्तराखंड)हून जेव्हा फोन आला, तेव्हा तर चिंताच वाटत होती. तिकडे कुणाला फोन करावा, याच विचारात असताना आठवले - २०१६-१७ला मा. मधुभाई कुलकर्णी यांच्या प्रयत्नामुळे भटके-विमुक्तांमध्ये त्या-त्या प्रांतात, समरसतेच्या बॅनरखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा तीन दिवसांचा अभ्यासवर्ग झाला होता. या वर्गात सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांच्या नावाची सूची संपर्क क्रमांकासहित डायरीत निश्चित मिळेल, म्हणून शोधाशोध सुरू केली. ईश्वरकृपेने सर्व नोंदी सापडल्या. त्यामध्ये श्रीमती अनुराधा सिंग, उत्तराखंड हे नाव मिळाले. लगेच फोन लावला. अनुराधा सिंग या खूप गुणी, संवेदनशील, कर्तृत्ववान कार्यकर्ता आहेत. उत्तराखंड गाडीया-लोहार या समुदायामध्ये खूप चांगला संपर्क व प्रत्यक्ष काम करतात. मला हे सर्व आठवत होते. यांच्या माध्यमातून नक्की काही ना काही मार्ग निघेल, अशी आशा वाटू लागली होती. तीन-चार वेळा फोन लावल्यानंतरही त्यांनी फोन उचलला नाही. पुन्हा निराशा... थोड्या वेळाने अनुराधा यांचाच फोन आला. "नमस्ते दीदी। मै जरा ध्यान-पूजा मे थी, तो आपका फोन नहीं उठा पाई।" कोरोनासंदर्भातील त्यांच्या सुखरूपतेची विचारणा करायला लागले, तर त्या फोनवरच रडायला लागल्या. विचारणा केली असता समजले की त्यांचा मुलगा फ्रान्समध्ये एमएस्सी (मेडिकल)च्या शिक्षणासाठी गेला आहे. मार्चमध्ये फ्रान्समध्ये कोरोनाचा कहर उच्चांकावर होता, हजारोंनी बाधित व मृत्यूच्या बातम्या थरकाप उडवत होत्या. त्यांचा मुलगा संपूर्णत: होम क्वारंटाइन, स्टडी फ्रॉम होम. तिथे घरातच अडकलेला. भारताने आपल्या देशातील लोकांना परत आणण्यास खूप प्रयत्न करूनही नंबर न लागल्याने, मुलाच्या चिंतेने त्या अत्यंत दु:खी होत्या. सतत देवाची पूजा-अर्चा, धारणा, होम-हवन ही माता करीत होती. मला त्यांच्या कुटुंबाबद्दल, मुलाबद्दल काहीही माहीत नव्हते आणि माझ्याकडून विचारणा झाली आणि त्यांचा बांध फुटला. मी पहिल्यांदा अनुभवत होते की अशा वेळी सांत्वनासाठी शब्द सुचत नाही. या कोरोनाची दहशत आणि थैमान कुठल्याच उपायात्मक विचारांना जवळ फिरकू देत नाही. एकच विचार येत असतो, ती म्हणजे भीती, मृत्यूची भीती. स्वत:च्या मृत्यूपेक्षा स्वकीयांच्या मृत्यूची भीती. ती माउली रडत होती, बोलत होती... त्या क्षणी माझ्या मनात आले, हे ईश्वरा, माझे सर्व पुण्य या माउलीच्या मुलाला मिळो व तो सुरक्षित राहो! याच भावनेने त्यांचे सांत्वन करीत म्हटले, "दीदी, आप चिंता ना करों, बाबा भोलेनाथ आपके बेटे को कुछ नहीं होने देंगे। वो सुरक्षित रहेगा। आप समाजका नि:स्वार्थ भावसे काम करती हो, उसका पुण्य आपको जरूर मिलेगा।" माझ्या या बोलण्याने त्या माउलीने थोडे सावरण्याचे प्रयत्न केले आणि मग "दीदी, आपने फोन करके मुझे जो आधार दिया है, यह कभी भूलूंगी नहीं।" संकट, दु:ख-सांत्वन या शब्दांच्या भोवती फिरणारा आंतरिक भाव काय असतो, याची अनुभूती मला येत होती, जी शब्दात कथन करणे कठीण.
 
मी बोलायला सुरुवात केली. "दीदी, मुझे आपसे एक साहाय्यता चाहिये थी। महाराष्ट्र के गोसाई समाज के लोग इस लॉकडाउनमे डेहराडून मे अटकेे हुए है। अगर वहॉं के किसी संघ कार्यकर्ता या विभाग प्रचारक / कार्यवाहजीका नाम और संपर्क दे दे, तो मै उनसे संपर्क करूंगीं। ३५-४० परिवार है इस गोसाई समाजके, इन्हे मदत की जरूरत है।" अनुराधाजी म्हणाल्या, "मी संपर्क साधते. मला तिथल्या कुणाचातरी नंबर द्या व व्यवस्था लावते आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला फोन करते." दुसर्‍या दिवशी नारायण शिंदेचा फोन आला, "ताई, तुम्ही आमच्यासाठी देवीसारख्या धावून आलात. आम्हाला मदत मिळाली. लोक / कार्यकर्ते भेटायला आले. इथल्या मठाच्या जवळच आमची राहण्याची व्यवस्था केली आहे." मी त्यांना म्हटले, "मी काहीही केलेले नाही त्या अनुराधा दीदी व तुमच्यासाठी हे सर्व करणारे जे कार्यकर्ते आलेत ना, त्याचे उपकार. त्यांना धन्यवाद द्या."
 
माणसाचे कसे असते बघा - पोटाची व्यवस्था लागली, मग गरजेच्या अन्य बाबींसाठी फोन यायला लागले, ते म्हणजे आमच्या गावाला जाण्याची व्यवस्था करा. गावाला जाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात मी प्रत्येकाला हेच आवाहन करीत राहिले की आत्ता तुम्ही दुसरी कुठलीच मागणी करू नका. पोटाला जे मिळते आहे ते खा आणि जगा! तुमचे जगणे महत्त्वाचे आहे. या रोगासाठी असणार्‍या सर्व प्रतिबंधांचे पालन करा. वस्ती सोडून कुठेही जाऊ नका. पोलीस पकडतील, मारतील. तुम्ही परप्रांतात आहात. दारू पिऊ नका. आत्ता फक्त जगा! सरकारने वाहनाची व्यवस्था केली की बघू परतीचे.
 
...क्रमश:
भाग १.