माझिया बापाची मिराशी गा देवा

विवेक मराठी    15-Jun-2020
Total Views |


pandharpur ashadhi ekadas

माझिया बापाची मिराशी गा देवा।

तुझी चरणसेवा पांडुरंगा।।

उपास, पारणे राखे दारवंटा।
केला भाग्यवाटा आम्हालागी।।

तुजपरते दुजे नेणे आणिक काही।
देखे सर्वाठायी रूप तुझे।।

तुझ्या सुखे घाला तुजमाजी निवाळा।
आपुला विसरला देहभाव।।

आम्हासी घातले तुझिये आभारी।
विठा म्हणे अंगीकारी नारायणा।।

- संत विठा


संत विठा हे संत नामदेवांचे पुत्र. विठ्ठलाची भक्ती वा चरणसेवा ही आपली वंरापरंपरागत जहागीर आहे असे ते म्हणतात. भक्तिरंगातील ही जहागिरी अगदी आगळीवेगळी आहे. पारंपरिक संपत्तीपेक्षा भक्तीच्या संपत्तीचे हे मोजमाप व्यवहाराच्या रूढ चौकटी मोडणारे आहे.

या अभंगात संत विठा म्हणतात, ‘‘हे पांडुरंगा, माझ्या वडिलांची जहागीर वा वारसा असलेली तुमची चरणसेवा मला त्यांच्याकडूनच वंशपरंपरेने लाभली आहे. त्यामुळे त्यांच्या कृपेने मी करीत असलेली तुमची चरणसेवा ही माझी वडिलोपार्जित हक्काची जहागीरच आहे.

एकादशीचा उपवास, पारणे वगैरे नियमितपणे करून, तुमचा उंबरा राखणे, सेवा करणे असा केवळ शुद्ध भाग्यानेच मिळणारा वाटा, वारसा आमच्या वडिलांनी आम्हाला मिळवून दिला आहे.

हे देवा, तुझ्याहून वेगळे, दुसरे आणखी काही आम्हास ठाऊकच नाही. सर्वांठायी, सर्वत्र आम्हाला तुमचेच रूप अनुभवाला येते. आमचे वडील तुमच्या सुखानेच तृप्त झाले. तुमच्या स्वरूपात मिळवून तुमच्याशी एकरूप झाले. आपला सारा शरीरभाव विसरून गेले. आम्हा सर्वांना त्यांनी तुमच्या स्वाधीन केले आहे. म्हणून हे नारायणा, आम्हा सर्वांचा तुम्ही प्रेमपूर्वक अंगीकार करावा.’’

संत विठा यांनी आपल्या वडीलांची विठ्ठलभक्तीची परंपरा अतिशय निष्ठेने पुढे चालविली. व्यवहारात आईवडिलांची इस्टेट, संपत्ती, सत्ता यांचा वारसा पुढे चालविला जातो. मात्र भक्तीच्या प्रांतात विठ्ठलाची चरणसेवा हीच मोठी संपत्ती आहे. वडिलांनी संपत्तीचा हा वारसा पुढच्या पिढीकरिता मागे ठेवला आहे. तो वारसा पुढच्या पिढीतील वंशज अतिशय अभिमानाने पुढे चालवीत आहेत. एखाद्या गावची जहागीर असावी, तशी विठ्ठल सेवेची जहागिरी आम्हाला लाभली आहे असे विठा म्हणतात. पूर्वी विठ्ठलपूजेचे हक्क वा मिरासदारी बडवे यांच्याकडे होती. विठा यांनाही वडिलांकडून जहागिरी मिळाली आहे. मात्र पुजाऱ्यांची जहागिरी बाह्य विधी व लौकिक लाभ यांच्याशी संबंधित होती. भक्तीची ही जहागिरी वा मिरासदारी सेवेची आहे, समर्पणाची आहे. अंतरंगातील उत्कट भक्तिरंगाची आहे. वाडवडिलांनी विठ्ठलभक्तीचे व्रत निष्ठेने चालविले. त्या व्रताची परंपरा पुढे चालविण्याचा वारसा आम्हाला लाभला आहे. वडिलांप्रमाणे आमची सेवा मान्य करून आम्हाला तुमच्या स्वरूपात सामावून घ्यावे, आमचा स्वीकार करावा अशी विनवणी संत विठा विठ्ठलाला करीत आहेत.

भक्तीच्या प्रांतातील उदात्त जहागिरीचे वा वारशाचे प्रत्ययकारक चित्रण संत विठा यांनी या अभंगात केले आहे