अनंत लावण्याची शोभा

विवेक मराठी    15-Jun-2020
Total Views |
@देविदास पोटे

अनंत लावण्याची शोभा। तो हा विटेवरी उभा।।
पीतांबर माळ गाठी। आविकासी घाली मिठी।।
त्याचे पाय करी हाते। कष्टलीस माझे माते।।
आवडी बोले त्यासी। चला जाऊ एकांतासी।।
ऐसा ब्रह्मीचा पुतळा। दासी जनी पाहे डोळा।।
- संता जनाबाई
 

sant Janābāi,  religious,

या अभंगात संत जनाबाई म्हणते, ‘ज्या शोभेला शेवट नाही, असे हे विठ्ठलाचे लावण्य आहे. तो पंढरपूरला विटेवर उभा आहे. त्याने पितांबर नेसलेला असून गळ्यात माळ घातली आहे. आपल्या भोळ्या भक्तांना तो प्रेमाने अलिंगन देतो. एवढेच नव्हे, तर दूरवरून पायी चालत येणाऱ्या भक्ताचे पाय चेपून देतो.’

म्हणून जनाबाई विठ्ठलाला म्हणते, ‘‘हे विठुमाउली, तू आपले देवपण विसरून भक्तांची सेवा करतोस, प्रेमाने संवाद करून त्यांना शांत, निवांत स्थळी घेऊन जातोस. तू साक्षात परम ब्रह्म आहेस. तुला मी डोळा भरून पाहते. तुझे रूप तनामनात आणि रोमरोमात साठवून ठेवते.’’

विठ्ठलाचे रूप सर्वांना वेड लावणारे आहे. सावळ्या मूर्तीतले आगळेवेगळे तेज तनामनाला दिव्यत्वाचा स्पर्श करून देणारे आहे. पाषाणाच्या एका काळ्या मूर्तीत चैतन्याचा गाभा सामावलेला आहे. सौंदर्याचे प्रकार दोन - बाह्यसौंदर्य आणि आंतरसौंदर्य. बाह्यसौंदर्य मानवी डोळ्यांना दिसते. मात्र प्रज्ञेचे चक्षू उघडलेल्या ज्ञानी व्यक्तीलाच आंतरिक सौंदर्याचे दर्शन होते. हा प्रवास मूर्ताकडून अमूर्ताकडे जातो वा सगुणाकडून निर्गुणाकडे जातो.

विठ्ठलाचे माहात्म्य अनेक संतांनी गायिले आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात,
पंढरपूरचा निळा कैवल्याचा पुतळा।
विठु देखियेला डोळा बाई बो।।

संत नामदेव म्हणतात,
निर्गुणीचे वैभव आले भक्तिमिषे ।
ते हे विठ्ठल वैषे ठसाविले ।।
बरविया बरवे पाहता नित्य नवे ।
हृदयी ध्याता निवे त्रिविधताप ।।
वोवीसांवेगळे सहस्राआगळे ।।
निर्गुणा निराळे शुद्धबुद्ध ।।

संत तुकाराम आपल्या एका अभंगात म्हणतात,
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।
कर कटेवरी ठेवोनिया।।

संत निळोबाराय म्हणतात,
उघडली सतेज खाणी, लावण्याची बखेपणी।
विठो सुंदरा सुंदर, रुप नागरा नागर।।

संत जनाबाई ही वारकरी परंपरेतील महत्त्वाची संत. नामदेवांच्या सहवासात तिचे आध्यात्मिक जीवन बहरले. जनाबाई म्हणजे भक्तीचे आर्त, वेल्हाळ रूप. तिच्या स्त्रीमनाचे रंग तिच्या अभंगवाणीत प्रभावीपणे प्रकट झाले आहेत.

विठ्ठलाच्या लावण्यरूपाचे वर्णन अतिशय प्रासादिक, उत्कट शब्दात व्यक्त झाले आहे. ‘लावण्याची शोभा’, ‘ब्रह्मीचा पुतळा’ या शब्दप्रयोगांतून जनाबाईच्या भक्तिभावाबरोबर तिच्या भाषेचे वैभवही प्रकट झाले आहे. संत जनाबाईची अभंगवाणी हे मराठी भाषेचे अमोल लेणे आहे. तिचे अभंग मराठी समाजमनाच्या हृदयात रुजून गेले आहेत.