कोविड-१९च्या टेस्ट्स

विवेक मराठी    15-Jun-2020
Total Views |

@डॉ. मिलिंद पदकी



Testing for COVID-19 _1&n

माणसामध्ये केल्या जाणाऱ्या कोविड-१९च्या (सध्याचा कोरोना विषाणू साथीचा रोग) टेस्ट्स तीन प्रकारात विभागता येतात -

१. प्रत्यक्ष विषाणूच्या आर.एन.ए.मधला जीन मोजणाऱ्या,

२. अँटीबॉडी मोजणाऱ्या,

३. अँटीजेन मोजणाऱ्या.

या तिन्हींतून निघणारे निष्कर्ष वेगवेगळे असतात, ज्यांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होऊ शकतो.

१. प्रत्यक्ष विषाणूच्या आर.एन.ए.मधला जीन मोजणारी टेस्ट (RT-PCR)

१. प्लास्टिकच्या काडीवर लावलेला लहानसा सिंथेटिक कापसाचा एक बोळा तुमच्या नाकात घालून आत घशावर फिरविला जाईल (हे थोडेसे त्रासदायक असेल).

२. हा बोळा एका द्रावणात बुडवून त्यातले विषाणूचे आर.एन.ए. त्या द्रावणात घेतले जाईल.

३. हे आर.एन.ए. पुरेसे नसल्यामुळे 'रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज' नावाचे विकर (एन्झाइम) वापरून त्याचे डी.एन.ए. बनविले जाईल. (डी.एन.ए.चे प्रचंड प्रमाणात पुनरुत्पादन करता येते.)

४. हे डी.एन.ए. सोल्युशन थोडेसे गरम करून डी.एन.ए.च्या, एकमेकांशी विळखा घालून असलेल्या साखळ्या अलग केल्या जातील.

५. या साखळ्यांचे डी.एन.ए. मग डी.एन.ए.चे घटक (कच्चा माल) आणि योग्य ते प्रायमर वापरून सुमारे ४० अब्ज पटींनी वाढविले जाईल. साखळीतील हवा तो भाग (मोजायचा 'जीन') कॉपी झाला की एक फ्लूरोसंट संयुग सोडले जावे अशी रासायनिक व्यवस्था असेल. सुमारे तासाभरात मोजण्याइतका फ्लूरोसंट प्रकाश निर्माण होईल, जो फ्लूरोसन्स स्पेक्ट्रोफोटोमीटरवर मोजला जाईल.

६. मोजले गेलेले आर.एन.ए. हे त्या विषाणूमधला 'E' हा 'जीन' असेल, (जो जीन वापरून विषाणू स्वतःचे पुरुत्पादन करतो आणि त्यामुळे तो विषाणूला अत्यंत विवक्षित मानता येईल!). बनविलेल्या सॅम्पलच्या एका मिलिलीटरमध्ये विषाणूचे सुमारे दहा हजार कण या सेन्सिटिव्हिटीला ही टेस्ट काम करू शकते. सेंट्रिफ्यूज करून आर.एन.ए.चे कॉन्सन्ट्रेशन काहीसे वाढविता येते. भारतात ICMR ही आपली शिखर संस्था विषाणूधला E जीन वापरते आणि नंतर N, RdRp (आर.एन.ए. डिपेंडन्ट आर.एन.ए. पॉलिमरेज) आणि S हे जीन्स वापरून खात्री करून घेते, असे त्यांच्या प्रकाशनांवरून दिसते.

७. सर्व टेस्टला सुमारे दोन तास लागतील. त्यात मानवी काम २० मिनिटे, उरलेले मशीनचे असेल.

८. तुमचे सॅंपल घ्यायची जागा, प्रत्यक्ष टेस्टच्या जागेपेक्षा वेगळी असायची शक्यता आहे. रिझल्ट्स येण्यास २ ते ४ दिवस लागू शकतील.

RT-PCR या टेस्टची विश्वासार्हता ९८% इतकी असते. पण नाक-घशाचा स्वॅब घेण्याची जी पद्धत आहे, तिची विश्वासार्हता मात्र ७२% इतकीच असते. म्हणजे शरीरात विषाणू उपस्थित असला, तरी तो २८ टक्के वेळा या स्वॅबमध्ये न उतरण्याची शक्यता असते. या रिझल्टला 'खोटा निगेटिव्ह' रिझल्ट म्हणता येईल. इतकी कमी विश्वासार्ह सॅंपलिंग पद्धत वापरली जाण्याचे मुख्य कारण म्हणजे, ती घेणाऱ्या कर्मचाऱ्याला त्यातून संसर्गाचा धोका अतिशय कमी असतो. (घशाच्या गुळण्यांचे सॅंपल घेतल्यास ही विश्वासार्हता ९३% इतकी उच्च होऊ शकते.) त्यामुळे एकदा टेस्ट निगेटिव्ह आली, पण डॉक्टरला रोगाची शंका असली, तर ती टेस्ट परत एकदा केली जाते. साधारणपणे दोन टेस्ट्समधून खरा विषाणू सुटत नाही.

मात्र या टेस्टमध्ये जो विषाणूचा जीन वापरला जातो, तो म्हणजे विषाणूच्या आर.एन.ए.चा 'तुकडा' असतो, हे लक्षात घेणे. विषाणू मरून त्याचे तुकडे झाले असले, तरी असा एखादा तुकडा टेस्टमध्ये सापडून, 'विषाणू अजून जिवंत आहे' अशी आपली दिशाभूल करू शकतो ('खोटा पॉझिटिव्ह' रिझल्ट!). त्यामुळे या टेस्ट्सवरून काढायचे निष्कर्ष हे रोग्याच्या एकूण लक्षणांच्या संदर्भातच काढावे लागतात.

२. अँटीबॉडी टेस्ट -

शरीरात शिरलेल्या विषाणूविरुद्ध शरीर लगेच अशा प्रथिनांची निर्मिती सुरू करते, ज्यांच्यायोगे विषाणूला अडवता, पकडता आणि नष्ट करता येईल. यांना इम्युनोग्लोब्युलिन असे नाव आहे. 'Ig' असे त्याचे संक्षिप्त रूप करतात. कोरोनाच्या संदर्भात यातल्या दोन प्रकारच्या इम्युनोग्लोब्युलिनची टेस्ट केली जाते - 'पंचमुखी' (म्हणजे विषाणूबरोबर संयुक्त होऊ शकणाऱ्या पाच जागा, 'मुखे' असणारी) 'IgM' आणि 'द्विमुखी' (दोन जागा, 'मुखे' असणारी) 'IgG'.

IgMची निर्मिती लगेच सुरू होते, आठ-दहा दिवसांत 'शिगेला' पोहोचते आणि त्यानंतर काही दिवसांत ओसरू लागून दीड ते दोन महिन्यांत जवळजवळ शून्यावर येते. याउलट IgGची निर्मिती एक-दोन दिवस उशिराने सुरू होते, पण किमान दोन वर्षे टिकते. लस (व्हॅक्सिन) देतानाही शरीराला IgG ही अँटीबॉडी बनविण्यास उद्युक्त केले जाते. मधून मधून 'बूस्टर' डोस देऊन तिची निर्मिती कायम चालू ठेवली जाते.

अँटीबॉडी टेस्टिंगवरून आपण खालील निष्कर्ष काढू शकतो -
१. IgM सापडणे - संसर्ग (इन्फेक्शन) गेल्या एक महिन्यात झाला आहे. ज्यांनी आपले राहण्याचे शहर किंवा देश बदलला आहे, त्यांच्यासाठी उपयुक्त.
२. IgM आणि IgG दोन्ही सापडणे - तुमच्या शरीरातर्फे रोगप्रतिकारक प्रतिसाद (इम्यून रिस्पॉन्स) सुरू झाला आहे आणि वाढत आहे.
३. केवळ IgG सापडणे - तुम्हाला झालेला संसर्ग सुमारे एक महिन्यापूर्वीचा किंवा त्याही आधीचा आहे.
४. IgM व IgG दोन्ही न सापडणे - तुमच्या शरीरात विषाणू शिरलेला नाही. हे अर्थात तुमचे संपूर्ण चित्र बघून नक्की करावे लागेल - ताप, खोकला, धाप लागणे, छातीचा एक्स-रे, RT-PCR, तसेच RT-PCR ही प्रत्यक्ष विषाणू मोजणारी टेस्ट.

कोरोना विषाणूविरुद्धच्या मानवी IgM आणि IgG या दोन अँटीबॉडीजसाठी टेस्ट प्रोसीजर -

टेस्ट कार्डवर पुढील गोष्टींचे गोंदण केलेले असते -

१. कोरोना विषाणूचा 'अँटीजेन' (a protein on the virus)

२. IgM आणि IgG यांची एक एक 'डिटेक्शन' ('शोधक') लाइन. या अनुक्रमे IgM आणि IgG विरुद्धच्या अँटीबॉडीज असतात. (हे जरा गोंधळवणारे आहे. IgM आणि IgG विरुद्धच्या या अँटीबॉडीज हे केवळ 'शोधक' रासायनिक 'रिएजंट' आहेत, त्यांचा रोगाशी काही संबंध नाही, हे लक्षात घेणे.)

३. एक क्वालिटी कंट्रोल लाइन.

टेस्ट -

अ) किटमध्ये दिलेल्या सुईने बोटातून रक्ताचा बारीकसा थेंब काढला जातो.

ब) तो थेंब सॅंपलच्या जागी टाकल्यावर रक्त कॅपिलरी ऍक्शनने (केशाकर्षणाने) कार्डवर पुढे सरकत राहते.

क) रक्तात IgM किंवा IgG असल्यास कोरोनाचा अँटीजेन प्रथम त्यांना पकडतो. हा अँटीजेन-अँटीबॉडी कॉम्प्लेक्स मग पुढे सरकतो.

ड) या कॉम्प्लेक्समध्ये जर IgM किंवा IgG असेल, तर ते त्यांच्याविरुद्धच्या रिएजंट अँटीबॉडीजने पकडले जातात आणि याची निर्देशक अशी लाल रेष उमटते.

ई) एक क्वालिटी कंट्रोल रेषा उमटते, जी रक्तात कोणतीही अँटीबॉडी असो किंवा नसो, टेस्ट योग्य प्रकारे झाली आहे याची निर्देशक असते. ते न उमटल्यास टेस्ट नव्याने करावी लागते.

टेस्ट केवळ दहा ते पंधरा मिनिटांत पूर्ण होते.

३. अँटीजेन टेस्ट

अँटीजेन म्हणजे शरीरात आलेले परके प्रथिन. शरीरात घुसलेले विषाणू, जिवाणू, अमिबा (अगदी दुसऱ्या मानवाची प्रत्यारोपण केलेले मूत्रपिंडसुद्धा), यांच्या बाह्य आवरणावरची प्रथिने पाहून आपल्या इम्यून सिस्टिमला 'आक्रमण' चालू असल्याचा संदेश मिळतो. प्रथिनाबरोबर स्निग्ध पदार्थ किंवा आर.एन.ए. असेल तर तेही अँटीजेन म्हणून काम करू शकते. कोरोना विषाणूमधले किंवा ही दोन प्रथिने यासाठी वापरली जातात. नाक-घशाच्या स्वॅबतर्फे सॅंपल घेतले जाते. ELISA नावाच्या तंत्राने, सुमारे एका तासात ही टेस्ट पूर्ण होऊ शकते.

अँटीजेन टेस्ट ही विषाणूची उपस्थिती दाखविते, तसेच RT-PCR पेक्षा खूपच वेगाने होते, त्यामुळे ती आकर्षक वाटते. पण RT-PCR मध्ये जे सॅंपलचे प्रमाण कित्येक अब्ज पटींनी वाढवून बघता येते, तसे या टेस्टमध्ये होत नाही, त्यामुळे तिची 'सेन्सिटिव्हिटी' फारच कमी असते. त्यामुळे ती सध्या वादग्रस्तच आहे.

तुमची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे RT-PCR ही टेस्ट पॉझिटिव्ह आली, असे आज समजावे. हे घडल्यास अनेक जागी सरकारतर्फे तुम्हाला विलगीकरणात नेले जाईल. याने घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. एक तर त्याने तुमच्या कुटुंबीयांचे रक्षणच होईल. दुसरे म्हणजे पॉझिटिव्ह टेस्ट आलेल्यातल्या अनेकांना रोगाची काहीही लक्षणे दिसत नाहीत. ज्यांना दिसतात, त्यातल्या ८० टक्क्यांना 'सौम्य' रोग होतो, जो घरच्या घरी, आपला आपण बरा होतो. वीस टक्के लोक हॉस्पिटलमध्ये नेले जातात, जिथे त्यातले १७ टक्के पूर्ण बरे होऊन घरी जातात. असा हा ९७% उत्तम निकाल येणारा रोग आहे.