जनकल्याणाचा अखंड वसा !

विवेक मराठी    16-Jun-2020
Total Views |

@संजय देवधर

एखाद्याच्या मृत्यूमुळे जवळच्या नातेवाईकांमध्ये शोक, हळहळ, विरह, भीती या भावना निर्माण होतात. स्मशान, अंत्यविधी या शब्दांनीच अनेकांना घाम फुटतो. काहीजण भीतीने जायचे टाळतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक किंवा अन्य कारणाने मृत्यू झाल्यासही वीसपेक्षा जास्त जणांना स्मशानभूमीत येऊ दिले जात नाही. जवळच्या नातलग, स्नेह्यांना अंतीम दर्शनाला जाता येत नाही. अशावेळी जनकल्याण समितीचे स्वयंसेवक मृतांवरीव विधीवत अंत्यसंस्कारासाठी पुढे सरसावले आहेत.


helping to the people!_1&

कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंस्फूर्तीने सर्वतोपरी मदतकार्य करीत आहे. देशभरात हे कार्य तत्परतेने व मूकपणे सुरु आहे. त्यात भुकेलेल्याला जगवण्यापासून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांंवर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत सेवा केली जाते. त्यात सर्वधर्मसमभाव हे सूत्र अंतीम क्षणीही कसोशीने पाळले जाते आहे. समाजभान देणाऱ्या संस्कारातून हा जनकल्याणाचा अखंड वसा सुरू आहे.
 
माणूस संस्कारांनी घडतो. घरोघरी प्रत्येकावर बालवयापासून संस्कार केले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभक्तीचे व समाजभान देणारे संस्कार करतो. संघाच्या मुशीत सामाजिक बांधिलकीचे प्रबोधन केले जाते. संघविचारांचा संस्कार झालेले युवक राष्ट्रीय आपत्तीच्या प्रसंगी सेवाकार्यासाठी कायमच आघाडीवर असतात. आतापर्यंत कोरोनाच्या आजाराने नाशिक परिसरात तेरा जणांचे बळी घेतले. त्यातील सहा मृतदेहांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार केले.कठीण परिस्थितीत एकप्रकारे बेवारस ठरलेल्यांंचे नातेवाईक दूर गेले. पण सामाजिक बांधिलकीने प्रेरित झालेल्या या युवकांनी सगेसोयरे बनून कर्तव्य निभावले. यापुढेही गरज भासेल तोपर्यंत हे कार्य करण्याचा त्यांचा निर्धार आहे.मात्र सुदैवाने अशी वेळ येऊ नये अशीच त्यांची प्रार्थनाही आहे.

हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत सोळा संस्कार केले जातात. अन्य धर्मातही थोड्याफार फरकाने असेच संस्कार करण्यात येतात. काही प्रथा, परंपरा, पद्धती वेगळ्या असतात इतकेच. हिंदूंंमध्ये गर्भाधानापासून संस्कारांना प्रारंभ होतो. मृत्यूनंतर मृतदेहावर शेवटचे विधिपूर्वक अंत्यसंस्कार केले जातात. सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना हा शब्द उच्चारला तरी भीतीने थरकाप होतो.कोरोनावर यशस्वीपणे मात करून अनेकजण कोरोनामुक्त देखिल झाले आहेत. पण काहींना दुर्दैवाने प्राणही गमवावे लागतात. नाशिक परिसरात आतापर्यंत तेरा जणांचा कोरोनाने बळी घेतला. त्यातील काही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न निर्माण झाला.तेव्हा प्रशासनातर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला सहकार्याची विनंती करण्यात आली. समिती कार्यवाह मदन भंदुरे व शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे यांनी हे आव्हान स्वीकारले.जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याशी त्यांची सविस्तर चर्चा झाली. त्यातून केलेल्या आवाहनाला धडाडीचे संघ स्वयंसेवक मंगेश खाडिलकर, मंदार ओलतीकर, मनोज कुलकर्णी, धनराज देशपांडे, जयेश क्षेमकल्याणी,अजय गोटखिंडीकर,अद्वैत देशपांडे, स्वप्नील जोशी तसेच नव्यानेच संघ परिवाराशी जोडलेले ज्ञानेश्वर काळे,प्रसाद देवचक्के,योगेश तरवडे,संजय आहेर, मंगेश जोशी, नकुल परदेशी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.अर्थात त्यांच्या घरच्यांनीही परवानगी आणि साथ दिली.काहींना घरीही संघर्ष करावा लागला.
 
रा. स्व.संघ जनकल्याण समिती वेगवेगळ्या माध्यमातून सक्रिय आहेच. विविध स्तरावर देशभर आणि अनेक देशांमध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी मदतकार्य सुरु आहे. त्यात अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपापासून वैद्यकीय सेवा करणाऱ्यांंना सहाय्य करण्यापर्यंत कामे केली जातात. आताही मृतांच्या धर्म - परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्याची लेखी हमी देण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यावर अंत्यसंस्कार करतांना वैद्यकीय दृष्टिकोनातून कोणती दक्षता घ्यायला हवी याबाबत डॉ.भरत केळकर यांनी या चमूला मार्गदर्शन केले. अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. जेजुरकर यांनी सहकार्याचा हात दिला.जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे संरक्षक साहित्यासह शववाहिका व अन्य मदत उपलब्ध करून देण्यात आली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते सर्वजण सज्ज झाले. कुटुंब व संघ परिवाराच्या भक्कम पाठिंब्याने नैतिक बळ मिळाले. पहिलाच मृतदेह मुस्लिम व्यक्तीचा आल्याने त्यांनी विधिपूर्वक दफन केले. त्यावेळी मौलवीही उपस्थित होते. भर उन्हात पीपीई कीट, मास्क, गॉगल, शिल्ड व पूर्णपणे डोके झाकणारी टोपी घालून हे कार्य पूर्ण केले. नंतर पाच हिंदू मृतदेहांचे दहन करून अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. प्रत्येक जन्मलेल्या व्यक्तीला मृत्यू अपरिहार्य आहे.ती नैसर्गिक व सार्वत्रिक प्रक्रिया आहे. एखाद्याच्या मृत्यूमुळे जवळच्या नातेवाईकांमध्ये शोक, हळहळ, विरह, भीती या भावना निर्माण होतात. स्मशान, अंत्यविधी या शब्दांनीच अनेकांना घाम फुटतो. काहीजण भीतीने जायचे टाळतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक किंवा अन्य कारणाने मृत्यू झाल्यासही वीसपेक्षा जास्त जणांना स्मशानभूमीत येऊ दिले जात नाही. जवळच्या नातलग, स्नेह्यांना अंतीम दर्शनाला जाता येत नाही.अशावेळी संघ स्वयंसेवकांचे हे कार्य प्रेरणादायी म्हणावे लागेल.
९४२२२७२७५५
 
मनोगत सहभागी स्वयंसेवकाचे...

एक दिवस अमोल जोशी यांचा फोन आला की कोविड़ -१९ मुळे परिवारांनी नाकारलेल्या मृतदेहांच्या अंतिम संस्कारांची जबाबदारी घेणार का यासंदर्भात संघाला विचारणा झाली आहे. विचारणा करणारी व्यक्ती एक सरकारी अधिकारी आहेत. तर हे काम आपण करायला घ्यायचे का ? मनोज कुलकर्णी त्यावेळी होता. मी काम करायला तयार आहे असे सांगितले.या चर्चेनंतर मनोज कुलकर्णींचा फोन २४ मे ला दुपारी एकच्या सुमारास आला . दुपारी २ वाजता सिव्हील हॉस्पिटलला भेटायचे ठरले. मंदार ओलतीकर, आशुतोष देशपांडे आल्यानंतर डॉ.भरत केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आशुतोषच्या मदतीने मी व मंदारने सिव्हिलने दिलेले पीपीई किट परिधान केले. ते घातल्याने लगेच तपमान १० ते १५ डिग्रीने जास्त झाले. मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर मयताचे दोन (बहुदा मुलगा व भाऊ) नातेवाईक तसेच मी व मंदार यांनी शववहिकेत ठेवला . पांडवलेण्यांमागील कब्रस्थान येथे पोहोचण्यास १५ - २० मिनिटे लागली. मंदार व मला प्रचंड उकाड्यामुळे असह्य वाटू लागले पण इलाज नव्हता. कब्रस्थानमध्ये मयतासाठीची कबर खोदून तयार व्हायला अजून ४० मिनिटे लागली. मौलवी यांनी शेवटची नमाज सुयोग्य अंतर ठेऊन केली.मंदार मृतदेह ठेवण्यासाठी अगदी कबरमधेही उतरला.दफन विधी झाल्यानंतर तिथेच पीपीई किट काढून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडे योग्य विल्हेवाट लावण्यास दिले. डॉ. केळकर यांनी सॅनिटायझर्सची व्यवस्था केली होती. ते करुन आम्ही परत आलो. अतिशय तहान लागली होती. मी व मंदार एक -दिड लिटर पाणी प्यायलानंतरच क्वारंनटाईन होण्याकरता भोसला सैनिकी महाविद्यालयात पोहोचलो. तेथे श्रीपादजी व भोसला भागमधील कार्यकर्त्यांनी राहण्या - जेवण्याची उत्तम व्यवस्था केली होती. शववाहिकेत बसल्यावर मंदारला मी सहज विचारले ,हे काम का स्विकारले ? त्याचे उत्तर ऐकुन माझा मंदारबद्दलचा आदर शतपटीने वाढला . मंदार म्हणाला "देवाने संघात पाठवले, संघाने हे काम करायला पाठवले म्हणजे अप्रत्यक्षपणे देवानेच हे काम करायला पाठवले. देवाने काम सांगितले ते निर्विघ्नपणे पूर्णही तोच करेल."मयताच्या मुलाचे सांत्वन करण्याचा मी प्रयत्न केला पण तो कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता . मौलवीही संकोचून संवाद साधायला अपयशी ठरले . मयताचा दुसरा नातेवाईक (बहुदा भाऊ) मला म्हणाला "नसे राऊळी वा नसे मंदिरी, नांदतो देव हा आपल्या अंतरी" इतकेच बोलून तो निघुन गेला. शववाहिकेच्या चालकाने मात्र चौकशी केली की हे काम तुम्ही सर्व धर्मासाठी करता का ? तेव्हा "संघ सगळ्यांना मदत करतो"असे मी सांगितले. २५ मे रोजी अजून एक मयत व्यक्तीस अमरधाम येथे न्यायला मी सहभागी झालो होतो. तेव्हा मी व मंदार भोसलामधे होतो. तेथून आम्ही सिव्हिलला गेलो. यावेळी मृताचे एकही नातेवाईक नसल्याने ज्ञानेश्वर राक्षे , स्वप्निल जोशी हे सहकारी कार्यकर्ते परस्पर सिव्हिलला आले होते. मनोज कुलकर्णी, मंगेश खाडीलकर सहाय्यक म्हणून उपस्थीत होते. यावेळी शववाहिका, विद्यूतदाहिनी वेळेत उपलब्ध झाल्याने पीपीई कीटने होणारा त्रास कमी झाला. हे सगळ करतांना मला असा प्रश्न पडत राहीला की आपण हे मृत्यू थांबवण्यासाठी काही करु शकतो का ? मी अजुनही उत्तर शोधत आहे.सर्व कोविड-१९ मुळे मयत झालेल्या व्यक्तींसाठी प्रार्थना.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥

- जयेश क्षेमकल्याणी
---------------------------------------------------------

 सेवायज्ञात वैद्यकीयदृष्टीने प्रशिक्षण 
कोरोना मृतदेहाच्या अंत्यसंस्काराला मदत देऊ शकाल का ? याविषयी संघाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांना विचारणा झाल्यावर, स्वयंसेवकांना हे सुरक्षितरित्या करता येईल का हा प्रश्न होता. याविषयीच्या शंका, आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून घ्यावयाची दक्षता यासाठी मला विचारणा केली गेली. डब्ल्यूएचओ आणि आयसीएमआर यांच्या मार्गदर्शन प्रणाली नुसार , नीट काळजी घेऊन प्लास्टिक बॉडी बॅग मध्ये मृतदेह असेल तर त्याने कोरोनाचा संसर्ग व्हायची शक्यता नसते. परंतु त्याची हाताळणी करताना पीपीई किटस योग्य रीतीने घालायचे आणि काळजीपूर्वक काढायचे असतात. समाज कार्यात कधीही झोकून देणाऱ्या स्वयंसेवकांच्या गटाला याविषयी प्रशिक्षण दिले. त्यांच्या मनातील सर्व शंका, काळजी यांचे शास्त्रीय समाधान केले. सिव्हिल हॉस्पिटलमधून फोन आल्यापासून , स्वयंसेवकांनी नेमके काय व कसे करायचे याची क्रमवार मार्गदर्शक सूची बनवली. पहिल्यावेळी स्वतः त्यांच्याबरोबर गेलो. आणखी योग्य पद्धतीने कार्य व्हावे म्हणून त्यामध्ये अजून काही सुधारणा केल्या. स्वयंसेवकांना समर्पण म्हणजे काय हे सांगण्याची अजिबात आवश्यकता नसते. पण ते त्यांच्यासाठी सुरक्षित राहावे, यासाठी माझ्याकडून या सेवायज्ञात छोटासा सहभाग झाला. एखाद्याला कोरोनाची लागण झाली, तर तो एक रुग्ण आहे, आरोपी किंवा दोषी नाही, हे जाणून त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.पॉझिटिव्ह आलेल्यांंपैकी सुमारे ८० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतातच. त्यांची आणि आपली काळजी घेणे हेच महत्वाचे सूत्र लक्षात घ्यायला हवे.
-डॉ.भरत केळकर