होय होय वारकरी

विवेक मराठी    17-Jun-2020
Total Views |
होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी।।

काय करावी साधने। फळ अवघेचि येणे।।
अभिमान नुरे। कोड अवघेचि पुरे।।
तुका म्हणे डोळा। विठो बैसला सावळा।।
- संत तुकाराम


pandharpur ashadhi ekadas
वारी ही वारकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. ‘वारी करणे’ हे वारकऱ्यांच्या आचारसंहितेतील महत्त्वाचे तत्त्व आहे. ‘वारी करी’ म्हणजे वारी करतो तो वारकरी अशी ‘वारकरी’ या शब्दाची व्याख्या आहे.
संत तुकाराम या अभंगात म्हणतात, ‘‘हे वारकऱ्यांनो, तुम्ही पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घ्या. भक्तिमार्गात अन्य साधने काय उपयोगाची? सर्व काही फळ यामुळेच मिळते. अभिमान गळून पडतो. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. डोळ्यांमध्ये सावळा विठ्ठल भरून राहतो. त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्यय येतो.’’
वारी म्हणजे पंढरपूरच्या वाटेवरचा चैतन्यसोहळा. भक्तिरसाची आनंदमय दिवाळी. टाळ, वीणा, मृदंग यांच्या साथीने ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा गरज करीत आणि हरिनामाचा नामघोष करीत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणे म्हणजे वारी. ‘जन्मजन्माते वारी’ म्हणजे जन्ममरणाच्या चक्रातून जी आपली सुटका करते वा दु:खाचे निवारण करते, ती वारी.
वारी ही ‘यात्रा’ या संकल्पनेपासून अगदी वेगळी आहे. यात्रा वा तीर्थयात्रा ही कुठले तरी पुण्य मिळविण्याच्या हेतूने केलेली असते. यात अनेक प्रकारचे विधी, याग यांचे प्रस्थ असते. मात्र वारीच्या बाबतीत अशा कुठल्याही कल्पना वारकऱ्याच्या मनात नसतात. कुठल्याही विधींचे अवडंबर वारीत नसते. भजन, कीर्तन आणि परमेश्वराच्या नामाचा गजर करीत आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी मजल-दरमजल करीत वारकऱ्यांची पावले पंढरपूरच्या दिशेने चालत राहतात. वारीत लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेद मुळीच नसतो. सारेच विठुरायाचे भक्त. सारे जण एकमेकांना ‘माउली’ या नावाने पुकारतात. वारी माणसामाणसातला भेद पुसून टाकते आणि समानतेचे तत्त्व प्रत्यक्ष आचरणात आणते.
वारी हा पंढरपूरच्या दिशेने निघालेला भक्तीचा प्रवाह आहे. वारी हे मराठी संस्कृतीचे वैभव आहे याचा प्रत्यय वारीच्या वाटेवर येतो. वारी हे जणू २०-२१ दिवसांचे व्रत आहे. हे व्रत आहे चालत राहण्याचे. जो चालत राहतो तोच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. चालत राहिलो तरच आपण आपल्या इच्छित स्थळी पोहोचू, हे महत्त्वाचे तत्त्व वारी शिकविते. एकमेकांविषयी आदरभाव, सात्त्विक विचार, शिस्त आणि भक्तीच्या रंगात रंगून जाऊन इतरांनाही त्यात सहभागी करून घेणे हे वारीचे अंत:सूत्र आहे. एकमेकांना आनंद देणे हा वारीच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे.
वारकऱ्यांच्या मनात पंढरपूरच्या विठुरायाला भेटण्याची अपार ओढ दाटलेली असते. वारीचे वैशिष्ट्य असे की देवाच्या मनातही आपल्या भक्ताला भेटण्याची तितकीच तीव्र ओढ दाटून आलेली असते.
वारीला कुठलीही कृत्रिम साधने लागत नाहीत. वारीत एक महत्त्वाची घटना घडते, ती म्हणजे आपल्या अंतरीच्या अहंकाराची पिसे दरएक पावलगणिक गळून पडतात. विठ्ठल आपल्या डोळ्यात येऊन सामावतो.
वारकरी होऊन वारीत चालावे आणि विठुरायाचे दर्शन घेऊन तो डोळ्यात भरून घ्यावा, असे महत्त्वाचे सूत्र तुकोबारायांनी विशद केले आहे.