पंढरीचा महिमा

विवेक मराठी    18-Jun-2020
Total Views |

pandharpur ashadhi ekadas
पंढरीचा महिमा। आणिक नाही त्वा उपमा।।
धन्य धन्य जगी ठाव। उभा असे देवराव।।
साक्ष ठेवुनी पुंडलिका। तारीतसे मूढ लोका।।
एका जनार्दनी देव। उभाउभी निरसी भेव।।

- संत एकनाथ

पंढरपूरची महती अपरंपार आहे. पंढरी म्हणजे भूवरचे वैकुंठ. सर्व तीर्थांचे माहेर. ‘सप्तपुण्यांमाजी पावन पंढरी’ असे नाथांनी आपल्या दुसऱ्या एका अभंगात म्हटले आहे. ज्याचे पंढरीला पाय लागतात तो भवतापातून मुक्त होतो, अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. पंढरपूर ही विठुरायाच्या भक्तिसाम्राज्याची राजधानी आहे.

या अभंगात संत एकनाथ म्हणतात, ‘‘पंढरीचा महिमा अनुपमेय आहे. त्याला दुसरी उपमाच नाही. अवघ्या विश्वात पंढरपूरसारखे दुसरे ठिकाण नाही. इथे देवांचा देव विटेवर उभा आहे. पुंडलिकाच्या साक्षीने त्याच्या साक्षीखातर युगानुयुगे हा अज्ञ लोकांचा उद्धार करीत उभा आहे. हा भक्तांच्या मनातील सर्व प्रकारची भीती व दडपण दूर करतो."

पंढरपूर हे वारकरी भक्तांचे तीर्थक्षेत्र आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला हजारो वारकरी नाचत, गात, हरिनामाचा गजर करीत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात. वारीची परंपरा अतिशय पुरातन आहे. तेराव्या शतकात ज्ञानेश्वर, नामदेव आणि इतर संतांची मांदियाळी उभी राहिली आणि त्यांनी वारीची परंपरा अधिक सुदृढ केली.

पंढरपूरचे माहात्म्य अनेक संतांनी वर्णिले आहे.

संत ज्ञानेश्वर म्हणतात,
मायबापे आमुची विठोबा रखुमाई निजाची।
त्याचीये गावीची कोन्ही येवु न्यावया।
माझ्या जीवाचा विसावा पंढरपूर हो।।

संत नामदेव म्हणतात,
उघलिली दृष्टी इंदियासकट।
वैकुंठीची वाट पंढरी जाणा।

संत जनाबाईंनी म्हटलेय,
धन्य ती पंढरी धन्य पंढरीनाथ।
तेणे हो पतित उद्धारिले।।

संत तुकाराम म्हणतात,
पंढरीचा महिमा। देता आणिक उपमा।
ऐसा ठाव नाही कोठे। देव उभाउभी भेटे।।

संत सेना म्हणतात,
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटताचि।।
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी।
पाहिली शोधोनि अवघी तीर्थे।।

संत एकनाथांनी पंढरपूर, पंढरपूरचा देव आणि त्याचे अलौकिक कार्य यांचे माहात्म्य या अभंगात वर्णन केले आहे. त्यांच्या विठ्ठलभक्तीचे तरंग अभंगात पुरेपूर उतरले आहेत