॥ माझी मंजुळा तुटली ॥

विवेक मराठी    18-Jun-2020
Total Views |


vithhal rakhumai _1                                                                                                                     त्रिभुवनात श्रेष्ठ अशा पंढरीचा विठोराणा देवळात मात्र एकटा उभा दिसतो. मालनींनी रखुमाईच्या रुसव्याच्या कथा तर अोव्यांमध्ये गुंफल्या आहेतच..

थोरली रुकमिन जशी नागीन तापली
देवाच्या मांडीवर त्यानं राहीला देखली

राहीवरच्या - म्हणजे राधेवरच्या त्याच्या प्रेमाचा राग येऊन रुक्मिणी रुसून थेट दिंडीरवनात आली. तिच्यामागे तोही आलाच. तिच्या शेजारीच वसतीला राहिला. तिथेही तिच्या नशिबी फक्त त्याचा प्रपंच चालवणं आलं. पण तेवढंच नाही..

रखमाईच्या पलंगाला गाद्या गिरद्या बख्खळ
देवाला अावडती जनाबाईची वाकळ

हे दुःखही तिला पचवावंच लागलं.

या कथेबरोबरच धनगरांनी जतन केलेली रुक्मिणीची आणखी एक कथा दुर्गाबाईंनी 'पैस'मध्ये सांगितली आहे. त्याबरोबरच त्या आणखी एक लोककथा सांगतात ती तुळशीची.

तुळसदेखील त्याची लाडकी! हरिप्रियाच ती! तिची कथा त्यांनी ऐकली कुणब्यांकडून.

कुण्या दरिद्री ब्राह्मणाच्या त्या सावळ्या पोरीला कुणी वर मिळत नव्हता. तिला पंढरपुरातल्या 'गवळी विठोबा राजाने' आपलं म्हटलं. पण रुक्मिणीला तिचा मत्सर झाला. तिने तिच्याविरुद्ध कारस्थान केलं. तो अपमान सहन न होऊन ती जमिनीत लुप्त झाली. पण जाता जाता विठोबाच्या हाती लागले तिचे केस. ते धरून त्याने अोढले, तर त्याच्या हाती एक रोपटं अालं. तीच तुळस. त्याच्या हाती लागल्या तिच्या मंजिर्‍या.. मंजुळा.

तिला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता त्याने त्या झाडाशी लग्न लावलं. तेव्हापासून त्याच्या गळ्यात ती सदैव असते, असं ही कथा सांगते. तर या तुळशीचे नि रुक्मिणीचे सवाल-जबाब काही अोव्यांमध्ये दिसतात..

रुक्मिणी बाई बोले,
का ग तुळशी वाटेला
तुझ्या मंजुळांनी 
पदर जरीचा फाटला!

तुळशी बाई म्हणे,
किती रुक्मिणी हट्टेली
तुझ्या जरीच्या पदरानं 
माझी मंजुळा तुटली!

असं एकमेकींना म्हणेपर्यंत हे भांडण तोलामोलाचं असतं. तुळस तिला म्हणते, "तुझ्याकडे इतकं राजवैभव असून उपयोग काय! शेवटी त्याच्या मस्तकी तुरा असतो माझ्याच मंजुळेचा!"

तुळसाबाई बोले काय रूक्मिणी तुझा तोरा
माझ्या मंजिर्‍यांचा तुझा विठ्ठल लेतो तुरा...

आणि शेवटी म्हणते,

तुळशी बाई म्हणे रूक्मिणी काशियानं थोर..
आधि लेली माझी माळ मग मांडिलं सौयंवर!

त्याने मारे तिला स्वयंवरातून पळवून आणली असेल, पण त्याही वेळी त्याच्या छातीवर माझीच माळ रुळत होती!

बहुधा हे सत्य रुक्मिणी नाकारू शकत नाही अन ती रुसते आणि मग..

रूसली रूक्मिणी गेली बदामी तळ्याला
प्रुथविचा पांडुरंग पाणी घालतसे तुळशीला

इथे 'बदामी तळं' हे पद्मावतीचं तळं असावं की काही जण याचा अन्वय लावतात तसं 'हृदयाच्या आत' ती गेली असावी? पांडुरंग पाणी घालतो म्हणजे माया देतो ती त्याच्या छातीवर रुळणार्‍या तुळशीला की त्याच्या मनातल्या बदामाच्या आकाराच्या हुरुदाच्या तळ्यात आश्रय घेतलेल्या रुक्मिणीला?

कुठल्याही अवतारात अवस्थेत तिचं असणं तो नाकारू शकला नाही, हे खरं. या जगन्नाथाला सर्वच प्रिय होत्या. पण कृष्णावतारात जशी राधेबरोबरची त्याची जोड जनमानसाने सर्वाधिक जपली, तशीच विठ्ठलाबरोबर तुळशीची, वृंदेची, या हरिप्रियेची जोड भक्तांनी जिवापाड जपली आणि त्याच्या अक्षय सहवासाचं भाग्य तिला लाभलं.

आज माणिक वर्मांच्या आवाजातलं एक खूप जुनं, नितांतसुंदर गीत ऐकू या.. तुळशीसारखंच प्रसन्न, सौम्य आणि अतिसात्त्विक!