आणीबाणी, संघ आणि समाज - वुई द पीपल

विवेक मराठी    19-Jun-2020
Total Views |
@प्रदीप केतकर
 
आणीबाणीचा लढा, त्याआधीचे देशावरील आक्रमण किंवा देशाच्या हितासाठी हाती घेतलेले काम या सर्व कामांत समाजाला बरोबर घेऊन काम करण्याची संघाची वृत्ती, ही संघ स्थापनेपासून ते आज कोरोनाच्या संकटकाळातही कायम आहे. यातील 'वुई द पीपल' हे संघकामाचे गमक आहे. कोरोनाच्या या संकटकाळातही संयम व धैर्य कायम ठेवून अनेक संघस्वयंसेवक आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

RSS323_1  H x W

२६ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली व सर्वत्र दहशतीचे साम्राज्य पसरले. जयप्रकाश नारायण, अटलजी, अडवाणीजी, अनेक वरिष्ठ पक्षांचे वरिष्ठ नेते, पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस व संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आदल्या दिवशीच पकडले गेले होते. वृत्तपत्रांवर व अन्य प्रसिद्धीमाध्यमांवर बंधने लादली गेली. खऱ्या-खोट्या बातम्याचे पीक उसळले. पकडलेल्यांमध्ये गावातील व आपल्या आजूबाजूचे संघकार्यकर्ते आहेत एवढे नक्की कळत होते. सुरुवातीला या धक्क्यातून सावरणे सगळ्यांनाच जड गेले. सामान्य माणूस तर आपल्यावर काही गंडांतर येणार नाही ना, या भीतीखाली दबलेला राहिला. लोक एकमेकांशी बोलायलाही घाबरत. पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणावरून एवढेच लोकांना कळले की देशात अराजक माजेल अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे अंतर्गत सुरक्षेसाठी घटनेच्या कलमानुसार आणीबाणी लावली आहे, ज्यामुळे नागरिकांचे सर्व घटनादत्त अधिकार स्थगित केले आहेत. 

ज्या राजकीय पक्षांचे कार्य देशभर पसरलेले नव्हते आणि खालपर्यंत निरोप देण्याची यंत्रणा उपलब्ध नव्हती, त्यांच्या अनुयायांची स्थिती दोर तुटून अधांतरी लटकावे अशी झाली होती. मोठे नेते पकडले गेल्यावर त्यांची जागा कोणी घ्यावयाची याची व्यवस्था नव्हती, अशी परिस्थिती आली तर काय करायचे, याचे भान नव्हते. विजेचा झटका बसून सुन्न व्हावे अशी स्थिती निर्माण झाली होती. नेत्यांनाही खाली कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करावे, याचे भान राहिले नव्हते आणि कोणत्या माध्यमातून निरोप द्यावा या कल्पनेत तुरुंगामध्ये सुन्न होऊन बसले होते

अशा परिस्थितीत देशभर आपल्या शाखा व त्याद्वारा तळापर्यंत संपर्क ही स्थिती फक्त संघाकडे व समविचारांच्या संघटनांकडे उपलब्ध होती. कारण आतापर्यंत देशातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश तालुक्यांमध्येही संघाच्या शाखा किंवा परिवार संघटना पोहोचल्या होत्या. संघाच्या जन्मापासून सरसंघचालक ते गटनायक अशी साखळी कायम अस्तित्वात होती. शिवाय संघाच्या कार्यकर्त्यांना १९४९ सालच्या स्थितीचा अनुभव होता. शाखांच्या रोजच्या कार्यक्रमातून नकळत असे शिक्षण दिले जाते की अशा परिस्थितीला कसे धैर्याने सामोरे जावे. त्यामुळे साहजिकच अशा वेळी जे भूमिगत कार्य करावे लागते, त्याची यंत्रणा संघाजवळ होती. अशा स्थितीत एक व्यक्तीच्या हुकूमशाहीविरुद्ध लढण्याचे नेतृत्व संघच करू शकत होता. एवढ्या विस्तृत पसरलेल्या देशात अशा प्रसंगी काय आवश्यक असते? सामान्य स्थितीत अत्यंत साधे वाटणारे स्वयंसेवक कितीही अत्याचार झाले तरी ठरवलेले काम कसे पूर्ण करतात, याचे उदाहरण म्हणून या कालखंडाकडे बघणे आवश्यक आहे. याआधी व नंतरही अशी अलौकिक कामे केल्याची कितीतरी उदाहरणे आजच्या कोरोनाच्या संकटापर्यंतच्या कालखंडात समोर आली आहेत. 

आणीबाणीनंतर पू.. सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी स्पष्ट केले की हुकूमशाही विरुद्ध लोकशाही यामध्ये केवळ जयप्रकाश नारायण व संघ, जनतेला बरोबर घेऊन (we the people) हेच उभे राहिले होते.

अशा लढ्यासाठी कसे संघटन आवश्यक होते? जे अनेक जबाबदाऱ्या पेलू शकेल, देशभरातून माहिती गोळा करून त्या आधारावर पुढील कार्याची निश्चिती करणे, देशभरातील कार्यकर्त्यांना कामांची माहिती पुरविणे व त्याची अंमलबजावणी करणे, खालून वर आणि वरून खाली माहितीचे आदानप्रदान करणे, अशा दळणवळणासाठी गुप्त शब्दांकन तयार करणे, परदेशातील देशभक्तांशी संपर्क ठेवणे, संघर्षासाठी आवश्यक निधी उभा करणे व त्याचे योग्य वितरण करणे, तुरुंगात असलेल्या कार्यकर्त्यांशी व त्यांच्या परिवाराशी संपर्क ठेवणे, सामाजिक सेवांचे उपक्रम आयोजित करणे, संघर्ष करणारे कार्यकर्ते पुरविणे असे कार्यकर्ते राजकीय किंवा अराजकीय असू शकतील. या निकषांवर संघ कसा खरा उतरला?

आणीबाणीनंतर एका पत्रकार परिषदेत पू. बाळासाहेब देवरासांना विचारले, "तुम्ही आत होता, मग हे सर्व कसे जमविले?" त्यांनी उत्तर दिले, "मी जरी आत होतो, तरी आठ सरसंघचालक बाहेर होते. मी जे सांगितले असते, अगदी तसेच आदेश त्यांनी विचारविनिमयानंतर दिले व त्यांचे पालनही झाले." शिवराम कारंथ या कट्टर संघविरोधकांनीही हे नमूद केले की "मी बघितले की ध्येयाने प्रेरित हजारो कार्यकर्ते अशा संघर्षाच्या बदल्यात आपल्यला काय मिळेल याची आशा न बाळगता संघर्षात झोकून देत होते. बऱ्याच वेळी तर त्यांना खायलाही मिळत नसे, विश्रांतीही घेता येत नसे. पण त्यांची कार्यप्रेरणा कोणी हरवू शकले नाही."

हे सर्व साध्य होऊ शकले, याचे कारण संघाची आधीच्या पन्नास वर्षांची तपश्चर्या तर होतीच, त्याचबरोबर एक महत्त्वाचा भाग होता - 'वुई द पीपल'. संघाच्या सर्व कार्यांमधील यशाचे नेमके हेच गमक आहे. आणीबाणीविरुद्ध लढा असो किंवा त्याआधीचे देशावर आक्रमणाचे किंवा देशाच्या हितासाठी हाती घेतलेली कामे असोत, आपली लोकांबरोबर राहण्याची आणि त्यांना बरोबर नेण्याची परंपरा पुढील मोठमोठ्या कामांवर संघाने कायम ठेवली व आजही ती तशीच आहे.

पहिला प्रसंग १९२९ सालचा. काँग्रेसने लाहोरच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित केला व काँग्रेसने ठरविलेल्या दिवशी शाखांवर त्याचे स्वागत करण्याचे आदेश पू. डॉक्टरांनी दिले. जंगल सत्याग्रहात डॉक्टरांनी स्वतः सहभाग घेतला. महात्मा गांधींच्या हत्येत संघाचा सहभाग नाही हे निर्विवाद सिद्ध झाल्यावरही १९४८च्या संघबंदीनंतर पू. श्रीगुरुजींनी सूडाची भावना न ठेवता 'वयं पंचाधिकं शतं' हा दृष्टीकोन स्वयंसेवकांना दिला.

आणीबाणीनंतरही पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरासांनी "विसरा आणि क्षमा करा" हाच संदेश स्वयंसेवकांना आणि देशाला दिला. जनता पक्षातील सत्तेसाठी आसुसलेल्या समाजवादी मंडळींना हा देशहिताचा विचार मानवला नाही व जनता सरकारचे पतन व इंदिराजींचे पुन्हा सत्तेवर आरोहण यात त्याची परिणती झाली, ही गोष्ट वेगळी.

ह्या प्रसंगांचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे संघाने देशहितासाठी व समाजाला कायम बरोबर ठेवता यावे यासाठी दूरगामी विचार करून निर्णय घेतले. आपलेच दात आणि आपलेच ओठ ही विरोधकांबद्दलची संघाची भावना होती, ज्याचा परिणाम म्हणून अनेक विषयांवर संघाने समाजाला बरोबर घेऊन विस्तृत कार्य उभे केले आहे. या ठिकाणी त्याची माहिती देण्याची आवशकता नाही. यासाठी संघाचे ब्रीदवाक्य होते - 'सब समाजको लिये साथमे आगे है बढते जाना।'

आणीबाणीच्या आधी स्वातंत्र्यपूर्व काळात संघाचे कार्य एवढे विस्तारले होते व संघाच्या शाखांतील स्वयंसेवकांची संख्या एवढी वाढली होती की राजकारणाशी कोणताही संबंध न ठेवणाऱ्या हिंदुत्व व मातृभूमीची सेवा एवढेच ध्येय असलेल्या संघाची पंडितजींना उगीच भीती वाटू लागली होती. त्यामुळेच १९४८ साली गांधीहत्येमध्ये संघाचा कोणताही हात असल्याचा आधार किंवा पुरावा नसताना त्यांनी संघावर बंदी लादली. संघाने गांधींच्या अहिंसक मार्गाने सत्याग्रह केला व नंतर सरकारला बिनशर्त माघार घ्यावी लागली. याही वेळी समाजाने संघाला साथ दिली. मोठमोठ्या धुरीणांनी मध्यस्थी केली. संघाचे निरपराधित्व त्यांना पटले व त्यांनी सरकारला पटवूनही दिले, पण त्यांच्या संपूर्ण आयुष्यात नेहरूंनी संघाशी कायम वैरभाव ठेवला.

नेहरूंच्या मुलीनेही त्यांचाच कित्ता गिरविला. त्या आणखी एक पाऊल पुढे होत्या. इंदिराजींच्या रक्तातच हुकूमशाही रुजलेली होती हे स्वतः नेहरूंनी नमूद करून ठेवले आहे. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द करणे व जयप्रकाशजींनी उभी केलेली लोकसंघर्ष समिती व त्यामागे उभा संघ यामुळे स्वतःची गादी सांभाळण्यासाठी त्यांनी आणीबाणीचा मार्ग स्वीकारला व संघाला चिरडणे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून पावले टाकली. पुढे वर्णन केल्याप्रमाणे लोकशाहीच्या मार्गाने हुकूमशाहीकडे जाणाऱ्या इंदिराजींनी व त्यांच्या सरकारने देशात इतके अत्याचार केले की ते इंग्रज शासनालाही लाजवतील. या सर्वांचे कारण म्हणजे संघद्वेष (संघफोबिया).

पू. डॉक्टरांनी इच्छा व्यक्त केली होती की एक दिवस संघ व समाज एक व्हावा. या त्यांच्या इच्छेनुसार संघाने प्रत्येक प्रसंगात समाजाला बरोबर घेण्याचे काम केले. आणीबाणीत संघबंदी लादल्यावर केवळ संघबंदी उठवण्यासाठी सत्याग्रह न करता लोकशाहीच्या पुन:स्थापनेसाठी लोकांना बरोबर घेऊन सत्याग्रह केले. हे सत्याग्रह लोकसंघर्ष समितीच्या छत्राखाली केले. या सर्वांचे आकडे बघितले, तर १ लाख लोकांनी सत्याग्रह केले. यात ८० हजार संघस्वयंसेवक होते. देशात ४०,००० लोकांना मिसा या काळ्या कायद्याखाली अटक झाली, त्यातही ३५,००० संघस्वयंसेवक होते. यात कित्येक जण असे विकलांग होते की त्यांना चालणेही शक्य नव्हते. अशांना उचलून आणले गेले. 

संघाच्या बरोबर सत्याग्रह करणाऱ्या अनेक जणांनी असे प्रस्ताव ठेवले की आपण हिंसक मार्गांनी सरकारला जेरीस आणावे. पण अहिंसक लोकशाही मार्गांनी सत्याग्रह करावा या विषयावर संघ ठाम राहिला, कारण संघाची ही भावना होती की हा लढा आपल्याच लोकांबरोबर आहे.

संघाने नवीन नवीन क्लृप्त्या लढवीत कुठेही हिंसक मार्गाचा अवलंब न करता केवळ आणि केवळ महात्मा गांधींच्या अहिंसक मार्गाने सत्याग्रह घडविले. याबाबत संघाचे जेष्ठ कार्यकर्ते माधवराव मुळेंनी स्वयंसेवकांना जे मार्गदर्शन दिले, ते या विषयावर संघाची मानसिकता स्पष्ट करणारे आहे - "गेल्या कांही दिवसांत घडलेल्या घटनांची तुम्हा सगळ्यांना जाण आहेच. आणीबाणी लादणे, संघबंदी, हजारो महत्त्वाच्या नेत्यांना व जवळजवळ १०,००० संघकार्यकर्त्यांना एकाच वेळी अटक करणे हा लोकशाहीचा गळा घोटण्यासाठीचा एक भाग आहे. जनतेवर लादलेल्या या संघर्षासाठी उभे राहणे हे लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे कर्त्यव्य आहे.


RSS323_1  H x W

मी सर्व बांधवांना आवाहन करतो की, या धर्मयुद्धात सगळ्यांनी पूर्ण शक्ती लावून, पण आपल्या नेहमीच्या शिस्तीने व पूर्ण शांततेच्या मार्गाने सत्य, न्याय, राष्ट्रीय मूल्यांना जपण्यासाठी व आपल्या ईश्वरी कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी सहभागी व्हावे. आपल्या मागे अनेक संत-महात्म्यांची, क्रांतिकारकांची व करोडो नागरिकांची शक्ती व आशीर्वाद उभे आहेत. पू. भारतमातेला पुनर्वैभव प्राप्त करण्याचा व पू. श्रीगुरुजींनी दिलेला 'विजय ही विजय है' हे आमच्या हृदयात घेऊन या कार्यात उतरावे."

हा संदेश घेऊन सांगितल्याप्रमाणे लोकशाही मार्गाने पण वेगवेगळ्या योजना आखून देशात सर्वत्र सत्याग्रह घडविले. त्या सर्वांत संघकार्यकर्त्यांनी दाखविलेले अतुलनीय धैर्य, चातुर्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कितीही अत्याचार, हाल झाले तरीही, कुठेही हिंसाचार होऊ नये यासाठी दाखवलेला संयम हे अशा प्रकारच्या लढ्याची इतिहासात नोंद व्हावी असे आहे. आजच्या पिढीला या सर्वाची माहिती देणे आवश्यक आहे.

बन्सीलालांचा गढ भेदला

बन्सीलाल हे त्या काळात हरियाणाचे अनभिषिक्त सम्राट होते. इंदिराजींच्या सर्वात मर्जीतले. त्यांची इतकी दहशत होती की हरियाणात विरोधकांचे अस्तित्वच नाही असे म्हटले जात होते. पण संघस्वयंसेवक मागे हटणारे नव्हते. तुरुंगामध्ये असलेले विरोधी नेते देवीलाल यांना भेटण्यासाठी व सत्याग्रह व्हावा याविषयी बोलण्यास गेले, पण देवीलाल खेदाने म्हणाले, "हरियाणात सत्याग्रहाचा फक्त विचार होऊ शकतो. प्रत्यक्षात सत्याग्रह केवळ अशक्यच आहे." अशा हरियाणात १४३ स्थानी १०१३ लोकांनी सत्याग्रह केले. त्यापकी फक्त ४२ सोडून सर्व संघकार्यकर्ते होते, जे १३ ते ७५ वर्ष वयोगटातील होते.

भिवानी हा बन्सीलालांचा गड मानला जात होता. ते आणि त्यांचा परिवार आपल्याविरुद्ध विरोधी स्वर उठूच नये याची सतत काळजी घेत होता. अशा भिवानीत गोयल या संघप्रचारकांच्या नेतृत्वाखाली १४ नोव्हेंबरला सत्याग्रह झाला. त्यापैकी रामभक्त हा सरकारी छळाचा बळी ठरला. त्याचे मुंडन करून नग्नावस्थेत त्याची रस्त्यातून मिरवणूक काढण्यात आली.

त्या वेळी असलेले हरियाणाचे मुख्यमंत्री यांच्या हिसार येथील कार्यक्रमात अगदी कडेकोट बंदोबस्त असूनही सत्याग्रह झाला. सत्याग्रहींना बेदम मारहाण करण्यात आली. पण लोकच सत्याग्रही घोषणा देत होते - "बोलो बोलो बनारसीदास, इमर्जन्सीका सत्यानाश."

हरियाणातील डॉक्टरांनी केलेला सत्याग्रह विशेष होता. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी दीपचंद गर्ग यांच्या नेतृत्वासाठी जे आधीच तुरुंगात होते असे बाबर यांचे घर निवडले. सौ. बाबर यांनी धीटपणाने सर्व व्यस्था केली होती. महिलांनी सत्याग्रहींना कुंकुमतिलक लावून व मिठाई देऊन निरोप दिला. ठरल्या वेळी सर्व सत्याग्रही मॉडेल टाउनला पोहोचले व मग एकमेकांना माळा घालून घोषणा द्यायला सुरुवात केली. आणीबाणीविरुद्ध घोषणा देत व पत्रके वाटत सत्याग्रही फिरू लागले व मोठा जनसमुदाय त्यांच्या मागे चालू लागला. शेवटी तिथल्या उपायुक्तांच्या घरासमोर पोलिसांना अटक करता आली. 

आम्हाला अटक करा

फरिदाबादच्या औदयोगिक परिसरात तर गम्मतच झाली. तेथील सेक्टर १ आणि ३मध्ये विजय आनंद यांच्या नेतृत्वाखाली चौकाचौकातून सत्याग्रही घोषणा देत पत्रके वाटत हिंडू लागले. रात्रीचे ९ वाजले, तरी पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. शेवटी ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी बालगडला चौकात भाषणे केली, पत्रके वाटली व मग त्यांना अटक झाली.

इंदिराजींच्या नाकासमोर दिल्लीत सत्याग्रहांची मालिका

राजधानी दिल्लीत १४ नोव्हेंबरला चांदणी चौकापासून सत्याग्रहाला सुरुवात झाली. दिल्ली युनिव्हर्सिटी, सरकारी कार्यालयासमोर पाच ठिकाणी असे सर्व दिल्लीत सत्याग्रह झाले, पण दोन कार्यक्रमांतील सत्याग्रह खूप गाजले.

यातील पहिल्या सत्याग्रहाची - राष्ट्रपती फक्रुद्दीन अलींच्या कार्यक्रमात बालस्वयंसेवकांनी राष्ट्रपतींच्या समोर केलेल्या सत्याग्रहाची हकीकत फारच रोचक आहे. १९ नोव्हेंबरला इंदिराजींच्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम ठरवला होता व राष्ट्रपती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. बरेच केंद्रीय मंत्री, २४०० मुली व परदेशी पाहुणेदेखील उपस्थित होते.

हे ठरलेले बाल- आणि किशोर स्वयंसेवक वेळेवर हॉलवर पोहोचले. पण आत जाण्यासाठी निमंत्रण पत्रिका आवश्यक होती. तेवढ्यात त्यांच्या ओळखीचा एक विद्यार्थी आत शिरताना दिसला. त्याच्याजवळ असलेली अतिरिक्त पत्रिका त्याने एका कार्यकर्त्याला दिली. मग एक जण आत जाऊन त्याने बऱ्याच पत्रिका गोळा करून आणल्या. सर्व स्वयंसेवक आत शिरले. समोर बसले आणि आता "महामहिम राष्ट्रपती उद्बोधन करतील" अशी घोषणा होताच त्यांनी मोठ्याने घोषणा देणे व पत्रके वाटणे यास सुरुवात केली. सभागृहात उपस्थित सर्वांना या बालांचे अन्याय आणि छळ याविरुद्ध दाखविलेले धैर्य बघून सगळ्यांना आश्चर्य वाटले.

आणि इंदिराजी खवळल्या 

या सगळ्यावर कडी म्हणजे इंदिराजींच्या कार्यक्रमात केलेला सत्याग्रह. दिल्लीला २४ नोव्हेंबर १९७५ रोजी सर्व देशातील प्राथमिक शिक्षकांची एक परिषद आयोजित केली होती. या परिषदेत इंदिराजी भाषण करणार होत्या. पोलिसांनी अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पण सवयंसेवकांनी अध्यापक परिषदेचा लोकांकडून बिल्ले मिळविले. सर्व कार्यकर्त्यांनी इंदिराजींच्या अगदी समोरच्या खुर्च्यांवर जागा मिळविल्या. ठरलेल्या वेळी सत्याग्रहींनी घोषणा द्यायला व पत्रके वाटायला सुरुवात केली. सत्याग्रहींना जागीच पोलिसांनी ताब्यात घेतले, पण तोपर्यंत देशभरातील या शिक्षकांना हवा तो संदेश पोहोचला होता. पण इंदिराजींनी भाषणाचा विषय बदलून, सत्याग्रहावर व पत्रके वाटण्यावर कटू टीका सुरू केली. दूरदर्शनवर इंदिराजींचा अत्यंत खवळलेला चेहरा देशभर दिसल्याने सत्याग्रहाचे यश वेगळे सांगावे लागलेच नाही.

चांदणी चौकातील दुसरा सत्याग्रह खासदार व वल्लभभाई पटेलांच्या कन्या मणिबेन पटेल यांच्या नेतृत्वाखाली खूप पोलीस बंदोबस्त असतानाही झाला. संघस्वयंसेवकांनी स्वामी श्रद्धानंदांच्या पुतळ्यासमोर सर्व महिलांना आणून उभे केले व त्यांनी ठरल्या वेळी 'हुकूमशाहीचा निषेध असो, जयप्रकाशजींचा विजया असो' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. पकडण्यासाठी आलेल्या पुरुष पोलिसांना स्त्री पोलीस आणण्याचा आग्रह धरण्यात आला. मणिबेन सोडून सर्वांना अटक करण्यात अली व त्यांना तीन तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले.

जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवार येथे रमण प्रदीप या तरुण वकिलाने भर चौकात तासभर भाषण दिले. जमाव एवढा उत्साहात होता की भाषण संपल्याशिवाय पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत. याच किश्तवारला एका सत्याग्रहीला कोर्टात सादर केल्यावर त्याने कोर्टाला सांगितले की, "भारतमाता की जय म्हटल्याबद्दल मला पकडण्यात आले आहे. स्वतंत्र भारतात हा जर गुन्हा होणार असेल, तर असा गुन्हा मी हजार वेळा करायला व त्याबद्दल शिक्षा भोगायला तयार आहे." न्यायाधीशांनी त्यांना मुक्त केले. याच गावात प्रांत संघचालक ओमप्रकाश मेघी यांच्या ८२ वर्षांच्या आईने महिलांना घेऊन सत्याग्रह केला. बाजारात महिलांनी बांगड्या वाटल्या. 

एक आगळावेगळा सत्याग्रह

उदयपूरला क्रिकेटचा रणजी ट्रॉफी सामना चालू होता. त्याचे समालोचन जिथून चालू होते, त्या ठिकाणी जाऊन वीरुमल या सत्याग्रहीने आत शिरून समालोचकांचा ध्वनिक्षेपक हिसकला व घोषणा द्यायला सुरुवात केली. "भारत माता की जय, इंदिरा गांधी मुर्दाबाद, आणीबाणी रद्द करा, जे.पी. झिंदाबाद." ह्या घोषणा आकाशवाणीवरून सगळ्या जगाने ऐकल्या. मग साहजिकच वीरुमलला पोलिसांनी पकडले व त्याच्यावर पोलीस चौकीत खूप अत्याचार केले.

शौर्य पदक मानकरी बालकाचा सत्याग्रह

जबलपूरला राजेंद्र श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली ७ डिसेंबर १९७५ला झालेल्या सत्याग्रहात साक्षी ठाकरे नावाचा १५ वर्षांचा एक बालक होता, ज्याला त्या वर्षीचे शौर्य पदक जाहीर झाले होते व २६ जानेवारी १९७६ला ते पदक मिळणार होते. पण त्याने ठरविले की पदकापेक्षाही लोकशाहीसाठी अटक होणे जास्त महत्त्वाचे आहे.

पश्चिम बंगालच्या १६ जिल्ह्यात ११२९ जणांनी सत्याग्रह केले, त्यापैकी ७९५ संघपरिवारातील कार्यकर्ते, तर ३३४ इतर संघटनांचे होते.

महाराष्ट्र - पुणे आकाशवाणी कार्यक्रम थांबवावा लागला

एक दिवस असाही उजाडला. आकाशवाणी पुणे केंद्रावर बालोद्यान हा लहान मुलांसाठी कार्यक्रम सुरू होता आणि अचानक घोषणा ऐकायला येऊ लागल्या - भारत माता की जय, आणीबाणी संपवा, हुकूमशाहीला खाली खेचा, संघबंदी उठवा. हे सर्व घडले कसे, याची हकीगत फारच रोचक आहे. झाले असे होते की तळेगावचा रवींद्र देसाई हा पुणे आकाशवाणीच्या बालोद्यान कार्यक्रमात कायम सहभागी असायचा. त्या दिवशी इतर मुलांबरोबर तो आत शिरला. कार्यक्रम सुरू करा ही सूचना मिळताच तो ध्वनिक्षेपकाकडे झेपावला व त्याने घोषणा सुरू केल्या. आकाशवाणीचे सर्व कर्मचारी स्तब्ध झाले. काय करावे हे त्यांना उमजेना. ते घाबरले होते. मग केंद्र अधिकाऱ्याने कसेबसे केंद्रच बंद केले. 

त्या सत्याग्रहीला न्यायाधीशांपुढे उभे केले. कोर्टाने विचारले, "तू असे का केलेस?" त्याने उत्तर दिले, "मी रस्त्यावर किंवा एखाद्या कार्यक्रमात सत्याग्रह केला असता, तर जास्तीत जास्त दोनपाचशे लोकांनी बघितला असता. आकाशवाणीमार्फत मी हजारो लोकांपर्यंत माझा संदेश दिला." त्याला तीन महिन्यांची कैद झाली व रिमांड होममध्ये पाठविले गेले.

सरकारने याला दिलेला प्रतिसाद मात्र अत्यंत हिंसक व लोकशाहीला काळिमा फासणारा आहे. या अत्याचारांचे काही नमुने दिले, तरी सामान्य नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहील. आजच्या पिढीला हे माहीत होणे आवश्यक आहे, कारण कायम देशहित डोळ्यसमोर ठेवून कुठल्याही प्रसंगी देशावर, समाजावर संकट आले असताना जातपात, धर्म याचा विचार ना करता मदतीसाठी धावून जाणारा संघ कधीही हिंसक मार्ग न अवलंबता अन्यायाचा प्रतिकार करणे हे ब्रीद असलेल्या संघावर कसे आरोप-अत्याचार झाले आहेत, हा सत्य इतिहास समोर येणे आवश्यक आहे. विशेषतः आजची अशी पिढी ज्यांना अशा प्रकारची आणीबाणी लादली गेली, त्यात आपल्याच सरकारने आपल्याच नागरिकांवर निर्घृण अनाचार केले, पण तरीही महात्मा गांधींच्या अहिंसक मार्गाने सत्याग्रह करून असे अत्याचारी शासन लोकशाही मार्गाने उलथवून टाकले गेले व असे अत्याचार करणाऱ्यांना कायमचा धडा दिला, हे समोर येणे आवश्यक आहे, म्हणून काही अत्याचारांचे फक्त नमुन्यासाठी हे वर्णन.

अत्याचारांच्या कथा

पनवेलच्या एका कार्यकर्त्याने सत्याग्रह केल्यावर झालेल्या अत्याचारांचे वर्णन असे केले आहे - "ज्या दिवशी आम्हाला पकडले, त्या रात्रभर आम्हाला सतत अनेक प्रश्न विचारून छळण्यात आले. दुसऱ्या दिवशी आम्हाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे आमच्यावर अर्वाच्य शिव्यांचा वर्षाव करण्यात आला. आम्हाला कोणी सत्याग्रह करायला लावला, त्यांची नावे त्यांना हवी होती. आम्ही तीन दिवस बधलो नाही. मग एका डाक बंगल्यावर आम्हाला नेण्यात आले. तिथे आम्हाला काहीही खायला-प्यायला न देता थंडीत उभे करण्यात आले. मग एकेकाला बोलावून बेदम मारण्याचा क्रम सुरू झाला. हे मारणे दांड्यांनी होते. आमच्यापैकी अनिल मराठेला वेगळे करून खूप मारण्यात आले. त्याला मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. नंतर आम्हाला बेशुद्ध होईपर्यंत मारणे, विजेचे शॉक देणे असा क्रम चालू राहिला. शेवटी आम्हाला एका कोठडीत टाकण्यात आले व कोणालाही भेटू दिले नाही.

कुलाबा जिल्ह्यातील नागोठणे येथील शिक्षक मधुसूदन भाटे यांनी सत्याग्रह केला. त्यांना महाड, अलिबाग येथे रस्त्यातून मारत मारत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नेण्यात आले. आठ दिवस त्यांचा छळ सतत चालू होता. सत्याग्रह कोणी करायला सांगितला, या सगळ्याचे सूत्रधार कोण हे सांगावे म्हणून अत्याचाराचे जेवढे मार्ग होते ते वापरले गेले. पण ते शिक्षक बधले नाहीत. शेवटी त्यांना मिसा लावून ठाण्याला रवाना करण्यात आले.

नेवासेच्या मोहन खडाडकर आणि विलास गुजराथी यांनी सत्याग्रह केला. त्यांनाही तुम्हाला सत्याग्रह कोणी करायला सांगितले, पोस्टर्स कुठून मिळाली, तुमच्याबरोबर आणकाही कोणी सत्याग्रह केले अशा प्रश्नांची सरबत्ती व मारहाण दिवसेदिवस चालू राहिली. पण या संघकार्यकर्त्यांनी तोंड उघडले नाही. शेवटी अशा कोणत्याही सत्याग्रहाशी संबंध नसलेल्या तरुण माणसाला पकडून आणले गेले. त्याला मारहाण करून त्याच्याकडून खोटा कबुलीजबाब लिहून घेण्यात आला. त्यांच्या पत्नीकडून पोस्टर लावण्यासाठी खळ बनवून दिल्याचे लिहून घेण्यात आले. आठ दिवसांच्या अशा छळानंतर मोहन खडाडकरला मिसा लावून ठाण्याला रवाना केले गेले.

नांदेडला मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या यशवंत महाविद्यालयातील कार्यक्रमात त्यांचे बोलणे सुरू झाले ना झाले, तोच भास्कर ब्रह्मनादकर व संदीप ढाकणीकर हे दोघे विद्यार्थी स्वयंसेवक उभे राहून घोषणा देऊ लागले - आणीबाणी रद्द करा , राजकीय कैद्यांची सुटका करा, हुकूमशाहीचा निषेध असो. मुख्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एवढी नाचक्की झाल्यावर ते भडकल्याशिवाय कसे राहणार होते? मग त्या दोघांना बेड्या अडकवून रस्त्यातून ओढत ओढत पोलीस स्टेशनला नेण्यात आले. पाच पोलिसांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी पिटून काढले. ब्रह्मनादकरला तर उलटे टांगून पट्ट्याने मारहाण केली. त्याच्या नाकातोंडातून रक्त येऊ लागले, तरीही बेशुद्ध पडेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. खूप छळ केल्यावर पोलिसांना पराभव स्वीकारावा लागला. कारण त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही. शेवटी त्यांना अत्यंत विकलांग स्थितीत कोठडीत टाकून दिले गेले.

अशा क्रूर अत्याचारांच्या देशभरातील कथा इतकया विस्तृत आहेत की या लेखाचा मुख्य भाग तोच होऊन बसेल. स्वतःची कातडी बचावण्यासाठी जनावरांशी करणार नाही असे अत्याचार मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आदी राज्यांमध्ये झाले. भीषण मारझोड तर सर्वदूर झाली, पण दोन्ही हात पसरवून झोपविणे व त्यांच्यावर उभे राहणे, शरीराच्या विभिन्न अवयवांवर सहन होणार नाहीत अशा स्थिती करून तासनतास तसे ठेवणे, तीन तीन दिवस अन्नपाण्यावाचून ठेवणे, एका ठिकाणी तर गुप्तांगावर तिखट टाकण्याचाही प्रकार झाला. महाराष्ट्रात एक संघकार्यकर्त्याने पोलिसांना सळो की पळो करून सोडले होते. एके ठिकाणी सत्याग्रह आयोजित करून तो जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाला पळून जात असे व तिथे सत्याग्रह घडवीत असे. त्याला पकडले, तेव्हा पोलिसांनी त्याला टायरमध्ये घालून मारहाण केली. सुटल्यावर अनेक वर्षे अशा कार्यकर्त्यांना नीट उभे राहणे व चालणे जमत नसे. काहींना आयुष्यभराची दुखणी लागली. कर्नाटकातील एक कार्यकर्ते वीस वर्ष अशा विकलांग स्थितीत होते व त्याच स्थितीत त्यांचा अंत झाला.

एवढे करूनही इंदिराजींनी आणीबाणीनंतर कबुली दिली की आम्ही पराकाष्ठेचे प्रयत्न करूनही संघाच्या १०% लोकांनाही पकडू शकले नाही. काही जण आणीबाणीनंतरच प्रकट झाले. याचे कारण संघकार्यकर्ते समाजाशी एवढे एकरूप झाले होते की त्यांना वेगळे काढणे सरकारला जड गेले. निवडणूक जाहीर झाल्यावर अशा सर्व अत्याचारांच्या गोष्टी लोकांसमोर आल्या. तोपर्यंत लोकही मोकळेपणाने बोलू लागले होते. तुरुंगात असलेल्या, परदेशात असलेल्या सर्वांनी पत्र लिहून आपल्या संबंधिताना माहिती दिली व या जुलमी सरकारविरुद्ध जनमत तयार केले. समाजातील पु.ल. देशपांडे, दुर्गाबाई भागवत, राम शेवाळकर, देशभरातील अनेक विचारवंत उभे राहिले. त्याची परिणती म्हणून इंदिराजींचे जुलमी शासन उलथवून टाकले. हे सर्व संघकार्यकर्त्यांनी लोकनायक जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली समाजाला बरोबर घेऊन हे दुसरे स्वातंत्र्य आपण मिळविले, म्हणूनच आज स्थिर व सक्षम लोकशाहीचे दिवस आपण बघत आहोत व भारताला जगाचे नेतृत्व या लोकशाहीच्या जीवनमूल्यामुळेच आपल्याला बघायला मिळतील, असा विश्वास वाटतो.