वसवुनिया चराचर

विवेक मराठी    19-Jun-2020
Total Views |

sant_1  H x W:
वसवुनिया चराचर। उभा नागर विटेवरी।।

सगुणरूपे भासे लोका। परि हा नेटका निरामय।।
दैत्यांतकचि म्हणती यासी। परि हा सकळासी भक्षक।।
भक्तापाशी गुंतला दिसे। परि हा वसे वणुरेणी।।
कर्ता भोळा वाटे सकळा। परि हा वेगळा अलिप्त।।
निळा म्हणे नयेचि मना। करिता विवंचिना श्रुतिशास्त्रासही।।
- संत निळोबाराय

संत निळोबाराय यांनी विठ्ठलाचे वर्णन अनेक परींनी केले आहे. कधी विठ्ठलाच्या मूर्तीचे, अवयवांचे आणि अलंकारांचे वर्णन आहे, तर कधी विठ्ठलाचे संतसहवासातील रूप त्यांनी शब्दांकित केले आहे. पंढरपूरला विटेवर उभा असलेला कैवल्याचा गाभा भक्तांचा अंकित आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भक्तांच्या भेटीसाठी आतुर असलेला हा देव सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहे. हा सर्व देवांचे अधिष्ठान आहे.

या अभंगात संत निळोबाराय म्हणतात, ‘‘सर्व चराचर निर्माण करून हा विठ्ठल पुन्हा विटेवर उभा आहे. याला दैत्यांतक असे म्हणतात, पण खरे तर तो विश्वाचाच भक्षक आहे. तो भक्ताच्या प्रेमात गुंतल्यासारखा वाटतो, पण या विश्वातील अणुरेणूत तो गुंतलेला आहे. अणुरेणूत त्याचेच अस्तित्व आहे. तो कर्ता आणि भोक्ता आहे असे सर्वांना वाटते. पण हा वेगळा आहे आणि सर्व कर्तेपण आणि भोक्तेपण यापासून तो अलिप्त आहे. हे विठ्ठलाचे रूप अतर्क्य आहे. श्रुतिशास्त्रांनाही त्याचे पूर्ण यथार्थ रूप वर्णन करता आले नाही.’’

विठ्ठलाची दोन रूपे आहेत - सगुण आणि निर्गुण. भक्तीसाठी सगुण, तर ध्यान, ज्ञान यासाठी निर्गुण अशी त्याची रूपे आहेत. विटेवरचा विठ्ठल हे समुण रूप, तर विश्वाचा निर्माता हे त्याचे निर्गुण रूप. दोन परस्परविरोधी गुण दाखवून निळोबांनी विठ्ठलाचे स्वरूप वर्णन केले आहे. लोकांना विठ्ठल सगुण भासतो. पण मुळात तो निर्गुण, निराकार आणि निरामय आहे. विठ्ठलाची मूर्ती ही केवळ दगडाची मूर्ती नसून तो एक आनंदाचा गाभा आहे. साकार आणि निराकार अशा दोन्ही रूपांतून विठ्ठलाचे अस्तित्व सामावले आहे. व्यापक, सर्वात्मक असलेला देव सगुण होऊन भक्तासाठी मूर्तीत वास करतो. मानवी शरीर धारण करून तो मानवी क्रिया करतो आणि भक्ताच्या आधाराचा खांब बनतो. त्याची सर्व प्रकारे काळजी वाहतो.

विठ्ठलाचे वर्णन करताना आपल्या दुसNया एका अभंगात ते म्हणतात,
चराचर व्यापुनिया उरला। उभा विटेवरी ठाकला।
निळा म्हणे तेणे केला। बुद्धी माझिये प्रकाश।।

चराचर व्यापून उरणारा विठ्ठल विटेवर शोभून दिसतो आणि तोच आपल्या बुद्धीमधून प्रकाशमान होतो.

विठ्ठलाचे वर्णन करताना निळोबारायांना जीव आणि साक्षी, क्षर आणि अक्षर, जीव आणि ईश्वर, भोक्ता आणि अभोक्ता, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, सगुण आणि निर्गुण अशा विविध प्रकारे त्याचे अस्तित्व जाणवले. विठ्ठलाचे हे अनंतपण त्यांनी परस्परविरोधी भावबंधातून मांडले आहे.
निळोबारायांच्या काव्यरचनेची वैशिष्ट्ये या अभंगात प्रकट झाली आहेत. वारकरी परंपरेतील त्यांचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे.