॥ विश्वजननी रखुमाई ॥

विवेक मराठी    19-Jun-2020
Total Views |

pandharpur ashadhi ekadas
अखिल जगताचे मायबाप असलेल्या या दांपत्याच्या भाळी हा वेगळं राहण्याचा शाप का बरं असेल?
आपापल्या परीने सगळ्यांनी याची संगती लावली आहे. म‌ालनींनी अोव्यांमध्ये तिची वेदना रेखली आणि आधुनिक कवींनाही तिची वंचना झोंबलीच. पण सर्वात गंमत वाटली ती वरदानंद भारती यांनी रचलेली दोन अप्रतिम अशी रुक्मिणीस्तोत्रं वाचताना.
आरंभी तिच्या देवीरूपाचं, तेजस्वितेचं, सौंदर्याचं, सामर्थ्याचं वर्णन आहे. तिला जगज्जननी, सर्वमंगलकरी म्हटलं आहे. पण या स्तोत्राचं ध्रुवपद आहे 'श्रीरुक्मिणीं स्वजनकल्पलतां नमामि।' अ‍ाणि शेवटच्या दोन कडव्यांत 'भीमातटे नतजनोद्धरणाय दक्षाम्' आणि 'स्वभक्तजनतारिणीम्' अशी विशेषणं तिला लावलेली आहेत.
जन नाही, स्वजन. भक्त नाही, स्वभक्त.
असं लिहिण्यामागचा काय हेतू असेल असा विचार केला की वाटतं, इथे पंढरपुरात तिच्याकडे फक्त त्या जगन्नियंत्याच्या सुगृहिणीच्याच रूपात पाहिलं जातंय. तीही तर विश्वमाता आहे! तिच्या मनात आपपरभाव कसा असेल! पण तूर्तास तिला विठुरायाचा संसार सांभाळायचा आहे. त्यामुळे ती 'स्व'जनकल्पलता आहे. भीमेच्या तिरावर येऊन जे नत होतात, त्या भक्तांच्या उद्धाराकरता ती कटिबद्ध आहे. पांडुरंगाची भक्ती करणार्‍या सार्‍या लेकरांना विठ्ठलाने तिच्या अोटीत घातलं आहे. त्यामुळे 'घरचं सारं पाहून मग आपल्या आवडीचं हवं ते करा' अशी 'मुभा' मिळालेल्या सासुरवाशिणीसारखी तिची गत आहे!
अरुणाताईंनी 'रुक्मिणी' कवितेत
'पाय दगडाचे केलेस अन् अोठही दगडाचे
बाई, तुझ्या कोनाड्यात आकांताचा पोत भडकलाच नसेल?
झाकलं नाहीस तरी उघडलंही नाहीस चव्हाट्यावर
संसाराचं श्रीफळ तुझ्या अोटीतून अलगद काढून घेतलं त्यानं
पण तू दळत राहिलीस तुझ्या दुःखाचा बुक्का शांतपणे
पंढरी काळीनिळी झाली त्याच्य‍ा उधळ्यानं.'
असं म्हणत तिच्या बाईपणाचा चटका दाखवला..
तर कोलटकरांनी त्यांच्या वामांगी कवितेत म्हटलं की तिला याची कल्पनाच नाही की तो तिच्या शेजारी नाही! तो असेलच असं समजून ती युगानुयुगे समोर पाहात उभी आहे. पण तो शेजारी नाही हे समजल्यावर ती म्हणते -
'आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगांचं
एकटेपण!'
अशी वंचित, पोळलेली, टाकलेली रुक्मिणी बाई म्हणून पटत असली, तरी आई म्हणून पचत नव्हती..
पण दुर्गाबाई 'पैस'मध्ये जी चार वाक्यं लिहून गेल्यात, त्यातून या जोडप्याच्या पायाखाली असलेली कर्तव्यनिष्ठेची वीट दिसली. दोघांची एकसारखी 'पोज', पायाखालची वीट याचा अर्थ उलगडला..
त्याचं नि तिचं भांडण होऊन ती इथे आली. मागोमाग तो आला. पण बोलाने बोल वाढता वाढता 'आता एकत्र संसार करणं नाही' असा बोल निसटून गेला. पुढे भांडण मिटलं, तरी आता शब्द फिरवणं शक्य नव्हतं. दुर्गाबाई म्हणतात,
"तेव्हापासून त्यांची देवळं वेगळी झाली. आलेल्या सुखाकडे, प्रेमाच्या पूर्तीकडे, जन्मोजन्मीच्या मोहाकडे विठोबा पाठ फिरवतो, तो देवमाणूस म्हणून. देवमाणूस म्हणूनच तो चिरंतन दुःखाचं आवाहन करतो. ते आटू देत नाही. सुखाच्या वरदानाहून कर्तव्याचा व सत्याचा रंग असलेले दुःख अधिक सुफळ असते. तीच सुफळता विठोबाच्या नि रुक्मिणीच्या कायम अंतरात आढळते.
पद्मावतीचा लोप झाला. निर्वाणासारखा कायम लोप. अस्तित्वाच्या सौंदर्याचे याहून अधिक समर्पक उद्गान ते कोणते?"
प्राणप्रिय सीतेचा त्याग करणार्‍या कर्तव्यदक्ष श्रीरामांचा उदात्त दुःखभोग इथे दोघांनीही स्वीकारलासा वाटला. द्वारकेत रंगात आलेला खेळ सोडून,
अगदी राधेचं प्रेमही मागे टाकून तो आला, तो काय रुक्मिणीशी तडजोड करून परत संसारात रमायला?
वाटतं, तिलाच जाणवलं असावं की द्वारका वसवून, उपभोगून झाली, आता या वैभवाच्या मखरातून उतरून त्याने तिथे जायला हवं - जिथे त्याची खरंच गरज आहे. त्याचा पाय निघत नाही म्हटल्यावर तीच निघाली. तो राधेच्या किंवा सोळा सहस्र नारींच्या पाशात असताना तिला उपेक्षित वाटत असेल, पण आपण निघूनच गेलो तर हरी आपल्या मागे येतो का, याचीही तिने परीक्षा पाहिली असेल!
आणि तो आलाच. पण आता तिला नको होता त्याचा सहवास. नको होता कोणत्याच निष्ठेचा पुरावा, बांधिलकीची वचनं. प्राजक्ताच्या फुलावरूनही कोपणार्‍या रुक्मिणीला या दीर्घ वाटेवर एकटीने चालताना जे सत्य उमगलं असेल, जेव्हा दिंडीरवनातल्या लोकसमूहाचं जगणं तिने पाहिलं असेल, तेव्हा तिच्याही मनातल्या लौकिक इच्छा, रुसवेफुगवे मावळले असतील..
तिच्यामागे आलेल्या त्यालाही इथे आल्यावर हेच वाटलं असेल की आता मी इथे पाय रोवून उभं राहायला हवं आहे. मग दोघांनी मिळून विश्वमातृत्वाचं एक अधिष्ठान उभं केलं. त्यांचं राजेपण त्यांनी उतरवलं.
सुवर्णमंचकावरून उतरून ते जमिनीवर उभे राहिले. दक्ष स्थितीत. दोन खात्यांमध्ये कारभार विभागून त्याचा कार्यभार पेलत.. स्वतंत्रपणे!
माहेरी आलेल्या लेकीला विचारा, तिचे लाडकोड पुरवण्यात दंग असलेल्या मायबापांना एकमेकांशी दोन शब्द बोलायला सवड नसते. संसारात लेकरं ही प्राथमिकता झाली की संसार असाच समांतर सुरू राहतो. दोघंही आपल्या वाट्याची कर्तव्यं करत राहतात.. तीही आनंदाने. हे तर सार्‍यांचंच माहेर! 'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते' तशी ती अवघ्यांच्या माहेराकरता नांदायला आली!
मान, अपमान, प्रेम, अधिकार या सार्‍याच्या पलीकडे जाऊन एक विशाल मानव्याची जाणीव जेव्हा दोघांच्या मनात जागी होते, तेव्हा त्या संसाराला सीमा उरत नाहीत. अशी दांपत्यजीवनाची उदाहरणं आपल्याकडे कमी नाहीत. रामकृष्ण परमहंस व शारदामाता हे या भावनेचंच तर आविष्करण आहे. शारदादेवींची त्यांनी त्रिपुरसुंदरी रूपात पूजा केली.
त्यानंतरच्या भावावस्थेत पूजा व पूजक एकाच आत्मभावात लीन झाले. दोघेही मग रामकृष्णांच्या कार्यात दंग राहिले.
अखेरपर्यंत.. स्वतंत्रपणे.समृद्ध आयुष्याकडे पाठ फिरवून एकमेकांच्या साथीने कुठल्यातरी दुर्गम भागात सेवा कार्यात रमलेली किती जोडपी आपल्याला दिसतात. 'लोककल्याणाकरता प्रपंच' या परंपरेच्या पायाशी विठोबा-रखुमाई या जोडीने रोवलेली बळकट वीट आहे!

आईपण वगळून बाईपणाचा शोध सुफळ व्हावा कसा?
मोनालिसाच्या हास्याचं गूढ उलगडण्यात पिढ्या खर्ची पडल्या नि शेवटी बहुधा ते मातृत्वाच्या चाहुलीचं हसू असावं असं वाटण्यापर्यंत तो शोध आलाच..
इथे तर सार्‍या भक्तांचं आईपण मिरवते आहे ती! त्याची तृप्ती तिच्या चेहर्‍यावरून अोसंडून वाहताना दिसते. जे वाट्याला आलं, त्याचा सहज स्वीकार आणि मग त्या कामात पूर्ण झोकून देणं हे साधलं तरच असं निर्मळ, दैवी हास्य उमलणार.
तिच्यासारखं चांदणी हसू आपल्याला हवं असेल, तर तिच्यासारखा सहज स्वीकार करण्याचा, मन विशाल करण्याचा मंत्र या विश्वमायेकडे मागायला हवा!