आंधळे - पांगळे

विवेक मराठी    19-Jun-2020
Total Views |

हिंदू संस्कृतीत पुनर्जन्म मानला आहे. या जन्मात जर कोणीही चांगली दशा भोगत आहेत अथवा कोणी वाईट दशा भोगत आहे तर त्यांनी आपल्या पूर्वजन्मात जे काही केले आहे त्याचे ते फळ आहे असे मानले जाते. त्यामुळे माऊली ज्ञानोबाराय लोकगायकाच्या मुखातून येथे असे सांगत आहेत की, मी पूर्वजन्मीचे पाप केले त्याचाच हा सर्व विस्तार आहे आणि अजूनही या विषय सुखाची आहे ओढ मनातून दूर होत नाही. विषयसुख नाशिवंत असूनही आपण ते सेवन करण्यापासून परावृत्त होत नाही आहे. त्यामुळे आता सर्वत्र आपल्याला अंधार दिसतो आहे आणि आपण आंधळा झालो आहे असे या लोकगायकाला येथे वाटते आहे.


dnyaneshwarmauli_1 &

पूर्वजन्मी पाप केले ते विस्तारीले । विषय सुख नाशिवंत सेविता तिमीर कोंदले ।

चौऱ्यांशी लक्ष योनी फिरता दुःख भोगिले । ज्ञानदृष्टी हारपली दोन्ही नेत्र आंधळे ॥ १ ॥

धर्म जागो सदैवाचा जो बा पर उपकारी । आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी ॥धृ ।।

चौर्‍यांशी लक्ष योनी फिरल्यानंतर नरदेह लाभत असतो असे मानले जाते. परंतु या नरदेहाला येऊनही आपल्याला ज्ञान प्राप्त झाले आहे का? जर आपल्याला ज्ञानदृष्टी मिळालेली नाही तर आपले दोन्ही डोळे आंधळे झाले आहेत असे समजले पाहिजे. त्यामुळे आता आपण या सर्व आंधळ्यांना जो दृष्टी देतो, ज्ञानदृष्टी प्रदान करतो अशा विठोबाचे नामस्मरण केले पाहिजे. आता परोपकार हाच धर्म समजून त्याचे जागरण केले पाहिजे.

संसार दुःखमूळ चहुकडे इंगळ । विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ ।

काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ । कवणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ

आपण या संसारात आलो आहोत, प्रपंचात आलो आहोत, तो प्रपंच कसा आहे पहा बरं! तर प्रपंच हेच दुःखाचे कारण आहे आणि आपल्या चहूकडे इंगळ म्हणजे मोठे मोठे विंचू फिरत आहेत. त्यामुळे आपल्याला रात्रंदिवस तळमळत राहावं लागतं आणि मनाला काही केल्या विश्रांती मिळत नाही. आपल्या पाठीमागे काम, क्रोध आणि लोभ अशा प्रकारची कुत्री लागलेली आहेत. आता आपण कोणाला शरण जावे की जो आपल्याला निर्मळ दृष्टी प्रदान करील!

आपण आई माझी, बाप माझा, भाऊ माझा, बहिण माझी, मुलगा माझा, मुलगी माझी असे बोलत असतो. आपले सोयरेधायरे यांची आस करत असतो. परंतु,

काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप

तुका म्हणे तु सोडविना कोणी, एका चक्रपाणि वाचुनिया

असे म्हटलेले आहे. त्यामुळे आपण इतक्या लोकांची आशा करतो, इष्टमित्र आपले समजतो, पण खरी गोष्ट अशी आहे की, जोपर्यंत आपल्यापासून सर्वांना सुख मिळतं, सर्वांना आनंद मिळतो आणि मजा करता येते तोपर्यंत हा गोतावळा आपल्याभोवती जमा होतो आणि जेव्हा आपल्याला समोर काळ उभा राहतो तेव्हा त्यापासून आपली सोडवणूक करायला कोणी पुढे येत नाही.

माता पिता बंधु बहिणी कोणी न पवती निर्वाणी । इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी । एकला मी भोगी कुंभपाक जाचणी । तेथे कोणी सोडलिया एका सद्गुरु वाचोनी ॥४ ॥

जीवाने केलेल्या पापाचा परिणाम म्हणून शेवटी नरकात जाऊन कुंभीपा भोगावा लागतो आणि तिथे जीवाला फार मोठा जा होतो. तेव्हा या सर्व भवसागरातून केवळ आपल्याला सद्गुरु सोडवू शकतो, त्याच्याशिवाय आपल्याला सोडवणारा कोणीही नाही.

साधुसंत मायबाप तिही केले कृपादान । पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान ।

पुंडलीके वैद्यराजे पूर्वी साधिले साधन । वैकुंठीचे मुळपिठ डोळा घातले अंजन ॥५ ॥

संत हेच आपले खरे मायबाप आहेत आणि त्यांनी आपल्याला खरेखुरे कृपादान केलेले आहे. या संतांना आपल्याला पंढरपूरच्या वारीला नेलेले आहे आणि पंढरपूरची वारी करता करता त्या चंद्रभागा नदीमध्ये आपल्याला स्नान घडले आहे. ह्या चंद्रभागेच्या तीरावर फार मोठा वैद्य राहतो, तो म्हणजे भक्तराज पुंडलिक. त्याने फार मोठे काम करून ठेवलेले आहे. वैकुंठाचे निधान या ठिकाणी आणून ठेवले आहे. येथे आल्यानंतर आपल्या डोळ्यांमध्ये अंजन घातले गेले आहे आणि आपल्या डोळ्यात अंजन पडल्याबरोबर आपल्याला दृष्टी आलेली आहे.

कृष्णांजन एकवेळा डोळा घालिता अढळ । तिमिर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ ।

श्रीगुरु निवृत्तीराये मार दाखविला सोज्वळ । बापरखुमादेवीवरु विठ्ठल दिनाचा दयाळ ॥६ ॥

श्रीगुरुंनी दाखवलेला मार्ग कसा आहे? तो सुखरूप आहे. त्यामुळे या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय सांगतात आहेत त्यांचे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज यांनी त्यांना हा मार्ग दाखवलेला आहे आणि हा मार्ग दाखवल्यामुळे जो बापरखमादेवीवर विठ्ठलाला आपण शरणागत झालो आहोत आणि त्यामुळे आपला आंधळेपणा संपलेला आहे आणि आपल्याला दृष्टी मिळालेली आहे. अशीच दृष्टी सर्वांना लाभो, हीच या लोकगायकाची अपेक्षा आहे.

**