कोरोना जैविक कचऱ्याचे आव्हान

विवेक मराठी    02-Jun-2020
Total Views |
@डॉ. सतीश नाईक

Corona organic waste chal 
सध्या एकाच विषयाने जगभर अनेकांची झोप उडवलीय. कोरोना किंवा कोविड-१९ म्हटलं की मनावर फक्त आणि फक्त दडपण येतं. रोज वाढणारी कोरोना झालेल्यांची संख्या आणि मृत्यूचा आकडा मन आणखी विषन्न करतोय. या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे वातावरणात निर्माण झालेल्या आणि होणाऱ्या प्रश्नांचा आढावा घेणं खूप महत्त्वाचं ठरेल.
यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अर्थातच जो वैद्यकीय कचरा निर्माण होतो आहे, त्याचं काय?
इथे महत्त्वाचे दोन मुद्दे निर्माण होतात. एक - तुमचं-आमचं घर. इथे वैद्यकीय कचरा निर्माण होण्याचं कारण नाही. तुम्ही-आम्ही काही रुग्ण तपासत नाही. जे काही होतंय त्यात हात धुणं, तोंडाला लावलेला मास्क किंवा मुखपट्टी आणि सॅनिटायझर इतकंच आपण वापरतोय.
 
यातला सॅनिटायझरने आणि साबणाने हात धुणं हा प्रश्न 'धुण्याशी' संबंधित आहे. त्यामुळे होणारं पाण्याचं प्रदूषण हा थोडा व्यापक मुद्दा होईल. कारण आपण जे काही पाणी वापरतो, ते व्यक्तिगत अथवा स्वतःपुरतं नसतं. अगदी गावातल्या विहिरीदेखील अनेक जण मिळून एक विहीर अशा वापरत असतात. साहजिकच त्या विहिरीचं पाणी या कोरोनाच्या प्रश्नामुळे दूषित होणार किंवा कसं, याबद्दल काहीच सांगता येत नाही. हा विषाणू वुहानच्या वेट मार्केटमधून प्रथम माणसात आल्याचं बोललं जातंय. तो माणसात नेमका कसा आला हे अजून गुलदस्त्यात आहे. पण ज्या अर्थी तो प्राण्यातून माणसात आलाय, त्या अर्थी त्याला प्राण्यांचं वावडं नाही. त्यामुळं विहिरीच्या पाण्यात असलेल्या जलचरांमध्ये त्याचा वावर किती काळ टिकू शकतो, त्या जलचारांमधून तो पुन्हा पुन्हा माणसात येऊ शकेल का, हे अज्ञात आहे. आपल्याकडे विहिरीच्या आसपास आंघोळ करणं, कपडे धुणं चालतं. त्याचा विषाणू वातावरणात किती काळपर्यंत राहू शकेल याच्याशी काय संबंध आहे किंवा कसं, हेदेखील स्पष्ट नाही. विषाणूने घर केलेल्या विहिरींचं पाणी प्यायल्यावर काय होईल याचाही अंदाज नाही.


corona_1  H x W

सॅनिटायझरने होणारं पाण्याचं प्रदूषण हा वेगळा मुद्दा आहे. त्यातली रसायनं पाण्याचं किती नुकसान करतात, त्याचा शेतमालावर परिणाम होईल का, हे या घडीला न समजलेले आणि त्यामुळे गौण वाटावे असे विषय आहेत.
आणखी एक अनुत्तरित प्रश्न म्हणजे

त दिवसातून अनेक वेळेला हात स्वच्छ धुवायला सांगतात. तेही किमान पंधरा ते वीस  सेकंद. इतका वेळ आणि इतक्या वेळेला हात धुवायचे म्हणजे तितकं पाणी हवं. आधीच देशात अनेक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे. पाण्याचा हा अपव्यय आपल्याला परवडेल का?
 
प्रश्न समजला, पण आपल्या पातळीवर आपण काय करू शकतो हे महत्त्वाचं. पहिली गोष्ट सॅनिटायझर वापरल्यानंतर हात धुवायला हवेत. तिथे फार पाणी वापरू नका. सॅनिटायझरची बाटली बहुधा प्लास्टिकने बनलेली असते. संपली की तिची नीट विल्हेवाट लावणं ही एक वेगळी समस्या असते. या बाटल्या भंगारवाल्याला दिल्या, तर त्या पुन्हा वापरल्या जातील, रीसायकल होतील. 

शहरांमध्ये या गोष्टी जरा निराळ्या असतात. तिथे स्थानिक संस्थांनी निर्माण केलेलं सांडपाण्याचं जाळं असतं. पण शेवटी सांडपाणी म्हटलं तरी ते समुद्राला जाऊन मिळतं. तिथे समुद्री जिवांवर या विषाणूचा उपद्रव काय आणि किती होईल हे सांगता येत नाही. आपल्याकडे मासे आणि इतर समुद्री प्राणी आपल्या आहारात असतात. त्यामुळे दूरदृष्टीने पाहायच्याच या बाबी आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपली सांडपाण्याची व्यवस्था, तिथले पाइप, गटारं स्वच्छ ठेवणं हेदेखील आव्हान आहे. ते माणसंच पेलत असतात. त्यांना कित्येकदा तर प्रत्यक्ष सांडपाण्यात उतरून काम करावं लागतं. त्यांना कोरोना होईल का, त्यांच्या जिवाचं काय हे पाहायला नको? समाजाचा एक घटक म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे आपलंच कर्तव्य आहे.

 
राहता राहिली गोष्ट मास्क किंवा मुखपट्टीची. मास्क असंख्य प्रकारचे आहेत. ते बनवताना वापरल्या जाणाऱ्या वस्तूदेखील तितक्याच भिन्न आहेत. जेव्हा हे मास्क कपड्यांसारख्या नैसर्गिक धाग्यांच्या बनलेल्या असतील, तेव्हा प्रश्न फक्त विषाणूंपुरता मर्यादित होतो. परंतु N-९५सारखे मास्क वेगळे असतात. त्यांच्या मध्ये थोडा प्लास्टिकचा भाग असतो. त्यामुळे ते फेकून देताना नेहमीची प्लास्टिक विल्हेवाटीची समस्या येते.

मास्कचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही एकदाच वापरायचे, तर काही धुऊन अनेकदा वापरायचे असतात. आपण विकत घेतलेला मास्क किती वेळा वापरता येतो, हे तो विकत घेताना विचारून घ्यावं आणि तितक्याच वेळा तो वापरावा.
 
मास्क कुठलाही असो, तो घातल्यावर वाटेल तसं वागता येत नाही. मास्क नाक आणि तोंड पूर्ण झाकेल अशा पद्धतीतच वापरायला हवा. चढवताना कानाच्या जवळ ज्या दोऱ्या असतात, त्या धरून चढवावा. काढताना तीच काळजी घ्यावी. चढवल्यानंतर नाकाला किंवा तोंडाला चुकूनही स्पर्श करू नये. खाज आली असेल तर प्रथम हात सॅनिटाइझ करावे आणि मास्कच्या वरून खाजवावं. नाकाला स्पर्श झाला असेल तर हात प्रथम सॅनिटायझर वापरून नंतर साबण व पाण्याने व्यवस्थित धुवावे. नाक आणि तोंड या माध्यमातून हा विषाणू शरीरात प्रवेश करतो, म्हणून ही काळजी घेणं अत्यावश्यक आहे.


Corona organic waste chal
हातात ग्लोव्ह्ज घातले असल्यास प्रथम ग्लोव्ह्ज काढून फेकून द्यावे. नंतर कानाच्या बाजूने मास्क काढावा. प्लास्टिक शील्डने चेहरा झाकणं चांगली पद्धत आहे. पण तोही काढताना आणि योग्य जागी ठेवताना काळजी घेणं क्रमप्राप्त आहे. काढला आणि कुठेही फेकून दिला असं करता येत नाही. प्लास्टिकवर हा विषाणू अधिक काळ टिकतो, असं काही पाहण्या सांगतात. वापरलेला मास्क फेकून देताना काळजी घ्यायलाच हवी.
 
बाहेर जाताना विनाकारण अधिक वस्तू अंगावर वापरणं तितकंसं योग्य नाही. जितक्या जास्त वस्तू अंगावर घेऊन बाहेर पडाल, तितके विषाणूला लपायला पृष्ठभाग जास्त. म्हणून घड्याळ, कमरेचा पट्टा, पेन, अनावश्यक चाव्या, एकापेक्षा अनेक मोबाइल अंगावर बाळगणं टाळावं. उगाच विषाणूला रुपयाची संधी का द्या!
 
काढलेले ग्लोव्ह्ज आणि मास्क जेव्हा फेकून द्यायची वेळ येईल, तेव्हा ते नीट फेकले गेले पाहिजेत. ग्लोव्ह्ज काढताना ते विशिष्ट पद्धतीने काढावे लागतात. यूट्यूबवर याचे मुबलक व्हिडियो उपलब्ध आहेत. ते जरूर पाहावे. वस्तू वापरण्याइतकंच महत्त्व आपण ती वापरतो कशी याला असतं. चुकीच्या वापराने काहीच साध्य होणार नाही. ना तुम्ही स्वतःला कोरोनापासून सुरक्षित राखू शकत ? वापरलेल्या वस्तू नीट प्लास्टिक पिशवीत ठेवाव्या. पिशवी उघड्यावर टाकू नये. कचरा गोळा करून ज्या डब्यात ठेवता, तो डबा झाकलेलाच हवा. त्याला कोणीही सहज स्पर्श करेल, विशेषतः मुलं हात लावू शकतील अशी ती जागा नसावी. बाहेर गर्दीच्या ठिकाणी वावरला असाल, तर घातलेले कपडे धुवायला टाकले पाहिजेत. थोडा वेळ गरम पाण्यात ठेवून मगच ते प्रत्यक्ष धुवायला घ्यावेत. शक्यतो काठीने बुडवणं चांगलं. सूर्यप्रकाशात हा विषाणू फार काळ टिकत नाही, म्हणून धुतलेले कपडे उन्हात वाळवणं उत्तम ठरेल.
 
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काही समस्या आहेतच. त्यादेखील आपल्याला सतावल्याशिवाय राहणार नाहीत. हाँगकाँगमध्ये कोरोनामुळे समुद्रात होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास केला गेला. त्यात लोकांनी फेकून दिलेल्या मास्कमुळे समुद्राचं आणि समुद्री जीवनाचं आताच नुकसान व्हायला लागलंय हे लक्षात आलंय. आपण म्हणतो, परंतु कोरोनाचा जैविक कचरा ही फार मोठी समस्या जगाला भेडसावणार आहे. वुहान शहरात २० फेब्रुवारीला एका दिवसात २०० टन जैविक कचरा जमा झाला. त्या वेळी त्या शहराची हा कचरा जाळण्याची क्षमता याच्या एक चतुर्थांश होती.
 
अर्थात वातावरणाच्या दृष्टीने कोरोनाच्या चांगल्या बाजूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पेट्रोल, डिझेल, कोळसा यासारख्या इंधनांचा वापर विलक्षण कमी झाला आहे. त्यामुळे कित्येक शहरं स्वच्छ झालीत. हवेतला कार्बन डाय ऑक्साइड कमी झालाय. ओझोन थर वाढतोय. त्यामुळे दमा, फुप्फुसांचे आजार प्रचंड कमी झालेत. रस्त्यावर वाहनं नाहीत. अपघात खूप कमी दिसताहेत. हे फायदे आहेत खरे, परंतु फक्त एकाच विचाराने मन विषण्ण होतं - असले फायदे होण्यासाठी लोकांचे जीव जायला हवेत का? याच्याशिवायदेखील वातावरणाचं रक्षण आपण करू शकत नाही का? विचार नक्कीच करायला हवा.