राजू शेट्टींचा स्वाभिमानी यू-टर्न

विवेक मराठी    20-Jun-2020
Total Views |

raju_1  H x W:
आगामी काळात महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्याची निवड करण्यात येणार आहे. या निवडीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव शरद पवार यांनी चर्चेत आणले. जणू काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून ही उमेदवारी घोषित करण्यात आली, अशी चर्चा सुरू झाली होती. पण कुठेतरी माशी शिंकली आणि "दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करून एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधान परिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते. याबाबत कोणीही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू नये" अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विधान परिषद नेमणुकीबाबत आपली भूमिका घोषित केली. गेले काही दिवस राजू शेट्टी यांच्या नावाची चर्चा चालू होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राजू शेट्टी यांना संधी देण्याची घोषणा केली आणि समाजमाध्यमांतून जोरदार चर्चा सुरू झाली. "हातकणंगलेच्या राजू शेट्टीची जात कोणती आहे?" असा जाहीर सवाल करणारे शरद पवार जेव्हा बेरजेचे गणित करत राजू शेट्टी यांना विधान परिषदेसाठी संधी देण्याची घोषणा करतात, तेव्हा स्वाभाविक चर्चा होणारच होती. ती झाली, पण त्यानंतर राजू शेट्टींच्या राहुटीत जी खळबळ उडाली, त्यांची परिणती राजू शेट्टींनी माघार घेण्यात झाली असे म्हणायला हरकत नाही.

एका बाजूला 'गोविंदबागेत स्वाभिमान गहाण ठेवला' अशी होणारी टीका, तर दुसरीकडे रविकांत तुपकर, जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, महावीर अक्कोळे, अनिल पवार या सहकाऱ्यांनी उभारलेला बंडाचा झेंडा अशा कात्रीत सापडलेल्या राजू शेट्टींना आपली संघटना अबाधित ठेवण्यासाठी शेवटी समाजमाध्यमांतून उमेदवारी नाकारत असल्याचे जाहीर करावे लागले आणि आपल्या सहकाऱ्यांची मनधरणी करावी लागली. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात प्राबल्य असलेल्या राजू शेट्टींना आपली संघटना अबाधित राखण्यासाठी सत्तासुंदरीला आपलेसे करण्याच्या संधीचा त्याग करण्याची तयारी दर्शवली. सर्वसामान्य कार्यकर्ता व सहकारी यांनी आग्रह केल्यानंतर ते पुन्हा या संधीचा फायदा घेण्याचा विचार करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला, असे त्यांनी सांगितले आहे.
राजू शेट्टींनी जरी आज संघटनेची फूट रोखण्यात यश मिळवले असले, तरी त्यांचा उदयही संघटनेच्या फुटीतूनच झाला आहे, हे विसरता येणार नाही. शरद जोशी यांनी भाजपाशी जवळीक निर्माण केली आणि राजू शेट्टी, रघुनाथ पाटील यांनी शरद जोशी यांच्यापासून फारकत घेत वेगळी संघटना उभी केली. पण तीही फार काळ टिकली नाही. तिचीही दोन शकले झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते म्हणून राजू शेट्टींनी जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा असा राजकीय प्रवास केला. २०१४ साली ते महायुतीचे घटक पक्ष होते. महायुतीचे खासदार म्हणून ते हातकणंगले मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांच्या संघटनेचे सदाभाऊ खोत यांना फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्रिपद दिले गेले आणि राजू शेट्टींची संघटना फुटली. आपल्या सहकाऱ्यांनी मोठे होऊ नये, त्यांची राजकीय शक्ती वाढू नये यांची काळजी घेणाऱ्या राजू शेट्टींना सदाभाऊ खोत आपला स्पर्धक वाटू लागले. त्यातून राजू शेट्टींनी महायुतीला सोडचिठ्ठी दिली आणि राज्यातील फडणवीस सरकारविरोधी जी शेतकरी आंदोलने चालू होती, त्यात सहभाग घेतला. त्यांचा पुणे ते मुंबई आत्मक्लेश मोर्चा प्रसारमाध्यमांनी उचलून धरला होता. दीर्घकाळ संघटनेचे नेतृत्व आणि आमदारकी, खासदारकी भोगून राजू शेट्टींनी खऱ्या अर्थाने काय कमावले? हा संशोधनाचा विषय आहे. कारण कोणतेही ठोस आंदोलन आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देणारा विषय राजू शेट्टींनी हाताळलेला नाही. 'गुलाल तिकडे चांगभलं' अशी त्यांची राजकीय वाटचाल आहे. ज्यांनी जातीच्या आधाराने टीका केली, त्या शरद पवारांच्या वळचणीला जाऊन उभे राहण्याची वेळ राजू शेट्टींवर आली होती. मात्र सहकाऱ्यांनी उभारलेला बंडाचा झेंडा दिसताच राजू शेट्टींना आपण निवडणूक लढवणार नसून आपल्याला संघटना आणि सहकारी महत्त्वाचे आहेत असे जाहीर करावे लागले. दोन-तीन दिवस चर्चा करून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना त्यांनी आपल्याला मिळत असलेल्या नामनिर्देशित सदस्यपदाचे महत्त्व लक्षात आणून दिले असावे.
आपल्या संघटनेत आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा होऊ नये, त्यांची राजकीय शक्ती वाढू नये अशी काळजी घेणे ही त्या नेत्यांची राजकीय गरज असली, तरी त्यामुळे संघटनेचे तीनतेरा वाजू शकतात हे राजू शेट्टींनी रघुनाथ पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्या निमित्ताने अनुभवले आहे. पुन्हा विधान परिषद नामनिर्देशित सदस्यपदाच्या निमित्ताने संघटनेत फूट पडणे हे राजू शेट्टींना परवडणारे नाही. बदललेली परिस्थिती, मोदी सरकारची कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेली मदत व शेतकरी सबलीकरणासाठी लागू केलेले अध्यादेश हे शेतकऱ्यांना संघटनांच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करणारे ठरणार आहेत. पुढील काळात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सरकारविरोधी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. पण तरीही राजकीय अभिलाषेने भारावलेल्या सर्वच संघटनांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सदैव प्रयत्न करावे लागणार आहेत. अशा कालखंडात जर संघटनेची शकले झाली, तर ती राजकीय आत्महत्या ठरेल एवढे कळण्याइतपत राजू शेट्टी हुशार आहेत आणि म्हणूनच सत्तासुंदरीच्या कुशीत विसावण्यापेक्षा संघटना अभेद्य ठेवण्यासाठी ही संधी नाकारत असल्याचा स्वाभिमानी पवित्रा त्यांनी घेतला. आपल्या सहकाऱ्यांची सहानुभूती मिळवली आणि पुन्हा मूळपदावर येत विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून जाण्यासाठी ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत.
राजू शेट्टी राज्यपाल नियुक्त सदस्य होवोत. त्यांना आमच्या शुभेच्छा. पण या निमित्ताने एका जुनाट पद्धतीबाबत समाजाने आणि मा. राज्यपाल महोदयांनी विचार करावा, असे आम्हाला वाटते. ज्या बारा सदस्यांची नियुक्ती माननीय राज्यपाल महोदय करतात, ते बारा जण साहित्य, कला, संस्कृती, उद्योग, समाजसेवा अशा अराजकीय क्षेत्रातील असावेत, असे संकेत आहेत. दुर्दैवाने मागील काही वर्षांपासून हे संकेत धाब्यावर बसवून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, उपद्रवी नेते यांना या कोट्यातून विधान परिषदेवर आणले जाते. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती होत असली, तर त्यांना कला, साहित्य, संस्कृती या क्षेत्रांतील जाण असतेच असे नाही. आगामी काळात होणाऱ्या राज्यपाल नियुक्त सदस्याची निवड करताना राज्यपाल यांचा विचार करतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही