जाता पंढरीसी सुख वाटे जीवा

विवेक मराठी    20-Jun-2020
Total Views |

pandharpur ashadhi ekadas

@ देविदास पोटे

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटताचि।।

या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी।
पाहिली शोधुनि अवघी तीर्थे।।

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार।
ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठे।।

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक।
ऐसा वेणुनादी काला दावा।।

ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर।
ऐसे पाहता निर्धार नाही कोठे।।

सेना म्हणे खूण सांगितली संती।
यापरती विश्रांती न मिळे जीवा।।
- संत सेना महाराज


पंढरपूरचे माहात्म्य अपार आहे. पृथ्वीवरचे हे भक्तीचे आगळेवेगळे माहेरघर आहे. विटेवर उभा असलेला विठुराया हा पंढरीचा राजा असून तो सर्वांची काळजी घेणारा आहे. आपल्या भक्तांचे क्षेम तो वाहतो. त्यांची सर्व परींनी काळजी घेतो.

या अभंगात संत सेना म्हणतात, ‘‘पंढरपूरला गेल्यावर जिवाला वेगळेच सुख लाभते. पंढरीच्या विठ्ठलाला, म्हणजे केशवाला भेटले की अतिशय आनंद होतो. या सुखाला त्रिभुवनात उपमा नाही. सर्व तीर्थे शोधली, पण पंढरपूरचे माहात्म्य सर्वोपरी आहे. विठुनामाचा गजर आणि दिंड्या, पताका यांनी ही नगरी गजबजून जाते. देवाचे असे सेवक वा वैष्णव विश्वात कुठेही आढळणार नाहीत. चंद्राकार वाहणारी चंद्रभागा आणि परमभक्त पुंडलिक यासमान अवघ्या त्रैलोक्यात काहीही नाही. वेणुनादाच्या मंजुळ स्वरात रानात बालगोपाळांनी एकत्र येऊन केलेला काला हा अमृताहून गोड आहे. त्याला दुसरी उपमा नाही. कटीवर कर ठेऊन उभ्या असलेल्या विठ्ठलाचा निर्धार इतर कुठेही पहायला मिळणार नाही. ही खूण संतांनीच सांगितली आहे. विठ्ठलाच्या सहवासाशिवाय इतर कुठेही विश्रांती मिळणार नाही."

संत सेना यांचा हा प्रसिद्ध अभंग आहे. त्यांनी पंढरीचे माहात्म्य सांगितले आहे. पंढरपूर हे अनंत तीर्थांचे माहेर आहे. भक्तिसुखाची गोडी वेगळीच असते. मनाला सुख लाभणे म्हणजे आयुष्याला चैतत्याचा स्पर्श होणे. सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. धनसंपत्ती, सोनेनाणे, ऐश्वर्य यात सुख सामावेले आहे असे संसारी माणसाला वाटते. वस्तू असल्या की सुख आणि त्या नाहीशा झाल्या की दु:ख हे व्यवहाराचे गणित आहे. हे सुख क्षणभंगुर वा तात्पुरते असते. मात्र भक्तिरंगातून मिळणारे सुख अक्षय, अवीट असते. या सुखाला अंतपार नसतो. भक्तीचे सुख आयुष्याला कृतार्थ करते. धन्यतेचा अनुभव देते.

पंढरपूर हे तीर्थांचेही तीर्थ आहे आणि सावळ्या विठ्ठलाच्या भक्तिप्रेमाचे सुख अनुपमेय आहे, हे सूत्र संत सेना यांनी या अभंगात मांडले आहे.