वांशिक विष भारतात नको

विवेक मराठी    20-Jun-2020
Total Views |
 भारतात अराजकतेचे वातावरण निर्माण करणे, हा भारतातील डाव्या लोकांचा छुपा अजेंडा आहे. जेव्हा कुठलेही संकट अथवा समाज विघातक घटना घडत असते, तेव्हा त्यांचा छुपा अजेंडा अधिक सक्रिय होत असतो. आताची परिस्थिती ही डाव्या मंडळींसाठी पोषक आहे. त्यामुळेच या मंडळींचे छुपे अंजेडे वेळीच ओळखून ते मुळापासून उखडून काढायला हवेत. आज अमेरिकेत चाललेल्या वांशिक वादाचा संबंध ते भारतात लावू पाहत आहेत. परंतु भारत व अमेरिकेचा इतिहास, आज असलेली दोन्ही देशांची वस्तूस्थिती पाहता एवढेच म्हणावेसे वाटते, हे वांशिक विष भारतात नको.


america_1  H x

अमेरिकेत एका पोलिसाने जाॅर्ज फ्लाॅइड या ४६ वर्षाच्या अॅफ्रो अमेरिकन व्यक्तीची मान दोन्ही पायात दाबून त्याची हत्या केली. त्याचा व्हिडिओ सर्व जगभर व्हायरल झाला. Black Lives Matter या शीर्षकाचे पोस्टर तयार करून युरोपातील अनेक देशांत तीव्र निषेध करण्यात आला. अमेरिकेत कृष्णवर्णीय रस्त्यावर उतरले आणि त्यांची एकजूट होऊन त्यांनी जबरदस्त आंदोलन सुरू केले आहे. निषेधाचे आंदोलन म्हटले की त्यात थोडीबहुत हिंसा होतेच. अमेरिकेतही तशी झालेली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलन आणि हिंसा थांबली नाही तर सैन्याला बोलाविण्याची धमकी दिली.

एका कृष्णवर्णीयाच्या हत्येचा एवढा प्रचंड उद्रेक होण्याचे कारण काय? जेव्हा असे उद्रेक होतात, तेव्हा त्यामागे अनेक कारणांची मालिका असते. अन्याय साठत साठत येतो आणि त्याचा स्फोट होण्यास कुठली तरी एक घटना कारणीभूत होते. अमेरिकेत कृष्णवर्णींयांवरील अत्याचारांचा जवळजवळ चारशे वर्षांचा इतिहास आहे. अगोदर त्यांना आफ्रिकेतून अत्यंत निर्दयपणे पकडून अमेरिकेत आणण्यात आले. त्यांना गुलाम करण्यात आले. त्यांना शेतीच्या आणि कष्टांच्या सर्व कामात जुंपण्यात आले. वस्तूप्रमाणे त्यांची खरेदी-विक्री होत असे. या गुलामीच्या काळातील अन्याय-अत्याचाराच्या कथा अंगावर काटा उभ्या करणाऱ्या आहेत. 'गुलाम जेव्हा माणूस होतो' या माझ्या पुस्तकात त्यातील अनेक कथा दिलेल्या आहेत. गुलामीच्या प्रश्नावरून अमेरिकेत गृहयुद्ध झाले. अब्राहम लिंकन यांनी १ जानेवारी १८६३ला गुलामीची प्रथा समाप्त करून टाकली. ('महामानव अब्राहम लिंकन' - विवेक प्रकाशन या पुस्तकात त्याचा इतिहास आहे.)

गुलामी कायद्याने संपली, पण ती लोकमानसातून गेली नाही. यानंतर जिमक्रो कायद्याचा कालखंड सुरू होतो. यात कृष्णवर्णींयांना सर्व सार्वजनिक ठिकाणी वेगळी वागणूक देण्याचे कायदे निघाले. त्याला 'सेग्रिगेशन' असे म्हटले गेले. त्याविरुद्ध १९५०च्या दशकात प्रचंड आंदोलने झाली. रोझा पार्क या तरुणीने आपले आसन गोऱ्या प्रवाशासाठी रिकामे करण्यास नकार दिला. तिला अटक झाली. त्याचा निषेध म्हणून माॅण्टगोमेरी शहरात बसेसवर बहिष्कार घालण्याचे शांततामय आंदोलन एक वर्ष चालले. त्याचा परिणाम म्हणून, वेगळेपण करणारे सर्व कायदे १९६४ साली रद्द करण्यात आले. 'आम्ही सर्व अमेरिकन' ही भावना निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. याचाच परिणाम म्हणून २००७ साली कृष्णवर्णीय बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले.

ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे अमेरिकन समाजातील वर्णद्वेष संपला नाही. ओबामा राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वीपासून कृष्णवर्णीयांवर पोलिसी अत्याचार मोठ्या प्रमाणात होतच राहिले, त्याच्या अनेक कथा आहेत. जाॅर्ज फ्राॅईड याची हत्या होण्यापूर्वी अशा घटनांची मालिका आहे. केवळ दोन नावे देतो. एका बागेत काही गोऱ्या लोकांनी अहमद अरबेरी या कृष्णवर्णीयाचा खून केला. ब्रिओन्ना टेलर या महिलेच्या घरात पोलीस घुसले. तपासणीदरम्यान तिला गोळ्या घालून ठार केले. या दोघांचे अपराध काही नाहीत. गोरा पोलीस बघितला की कृष्णवर्णीयाला भीती वाटते. या सर्व साठलेल्या अन्यायाचा स्फोट म्हणजे जाॅर्ज फ्लाॅइडची घटना आहे.

हा उद्रेक गोऱ्या समाजाविरुद्ध नाही. हा उद्रेक राज्यसंस्थेविरुद्ध आहे. जाॅर्ज फ्लाॅइडला मारणारा गोरा पोलीस शासकीय यंत्रणेचे प्रतिनिधित्व करणारा आहे. कृष्णवर्णीय राज्यसंस्थेकडून न्यायाची मागणी करीत आहेत. Black Lives Matter याचा अर्थ असा होतो की, आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. आम्हाला न्याय हवा. आम्हाला सुरक्षा हवी. यासाठी शासन यंत्रणेने जागरूक असले पाहिजे आणि न्यायाच्या तत्त्वाची अंमलबजावणी केली पाहिजे. जाॅर्ज फ्लाॅइडची हत्या करणाऱ्या पोलिसावर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला आहे. परंतु ही कारवाई एक सामान्य प्रशासकीय कारवाई आहे. प्रश्न राज्ययंत्रणेची मानसिकता बदलण्याचा आहे आणि हे काम अमेरिकेला करावे लागेल. गेल्या चारशे वर्षांचा कृष्णवर्णीयांचा इतिहास पाहता अमेरिकेची सर्वसाधारण इच्छाशक्ती हे काम घडवून आणील.

या प्रश्नाचे भांडवल करून भारतातील डावी मंडळी जातीय कलह आणि तेढ कसे वाढतील, या उद्योगाला लागलेले आहेत. डावी मंडळी असे करतील, याचे भाकित मी दोन महिन्यांपूर्वी एका लेखात केलेले होते. ते आपल्या खास शब्दावलीत विषय मांडतात की, भारतातील दलित, आदिवासी, अल्पसंख्य, भटके-विमुक्त यांच्यावरही असे अत्याचार होतात आणि त्यांच्या हत्या होतात. नरेंद्र मोदी यांचे शासन आल्यापासून त्यांनी याची काही कथानके तयार केली आहेत. त्यांच्या लेखातून त्यांचा हमखास उल्लेख होतो. नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या दंगलीचा उल्लेख केला जातो. या दंगलीत पोलिसांनी अल्पसंख्य मुसलमानांवर कसे अत्याचार केले, यांच्या कथा त्यांच्या लेखातून मांडल्या जातात. आवर्जून आकडेवारी दिली जाते की, गुन्हेगार म्हणून मुसलमानांना पकडले जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये घडलेल्या घटना शोधून शोधून मांडल्या जातात.

त्यांच्या विषयसूचीप्रमाणे राज्ययंत्रणा, पोलीस दल हे दलित, अल्पसंख्य मुसलमान वगैरेंच्या कसे विरोधात आहेत, हे मांडून आपल्याला राज्ययंत्रणेशी आणि पोलिस यंत्रणेशी संघर्ष करायचा आहे, असा या सगळ्या कथानकांचा अर्थ असतो. वेगळ्या भाषेत सांगायचे तर देशाला अराजकाच्या मार्गावर कसे नेता येईल, हा यामागचा छुपा अजेंडा आहे.


america_1  H x

या छुप्या अंजेड्याशी सर्व भारतीयांना संघर्ष करायचा आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. पहिली गोष्ट अशी की, भारतात अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्तातील काही जाती यांच्यावर जबरदस्त अन्याय होतात. महाराष्ट्रातील पारधी समाजावर जे पोलिसी अत्याचार होतात, त्यापुढे अमेरिकेतील कृष्णवर्णीयांवर होणारे अत्याचार हे अगदी भेंडीच्या भाजीसारखे वाटतील. याच्या कथा ज्यांना वाचायच्या आहेत, त्यांनी गिरीश प्रभुणे यांचे 'पारधी' हे पुस्तक वाचावे. अनुसूचित जातींच्या लोकांवर अनेक कारणांमुळे अन्याय-अत्याचार होत असतात. सवर्ण मुलींशी संबंध ठेवणे, लग्नात घोड्यावर बसणे, सार्वजनिक ठिकाणी पाणी भरणे, जमिनीचे वाद, मंदिर प्रवेश अशी असंख्य कारणे अत्याचारामागे असतात. या अत्याचारांचे कोणीही कसलेही समर्थन करीत नाही. संघाचा विचार करता संघ एकवटून अशा अत्याचारांच्या विरोधात ठामपणे उभा असतो. संघप्रेरणेने उभ्या राहिलेल्या सर्व संस्था अत्याचारांचा तीव्र निषेध करतात. असा विरोध करताना प्रस्थापित वर्गाला काय वाटेल, राज्यकर्त्यांना ते सोयीचे नाही, असला विचार संघ करीत नाही.

दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे अमेरिकेतील कृष्णवर्णीयांप्रमाणे भारतातील आदिवासी, दलित, भटके विमुक्त, अल्पसंख्य मुसलमान वेगळ्या वंशाचे नव्हेत. कृष्णवर्णीय हा वेगळा मानववंश आहे. ते वर्णाने काळे आहेत. काळा आणि गोरा हा भेद चटकन दिसतो. भारतातील आपण सगळे लोक मिश्र वंशाचे लोक आहोत. डॉ. बाबासाहेबांनी 'शूद्र पूर्वी कोण होते' आणि 'भारतातील जाती' या त्यांच्या प्रबंधात अनेक पुरावे देऊन ही गोष्ट मांडलेली आहे. आपण म्हणजे अनेक वंशांची सरमिसळ आहोत. त्यामुळे भारतातील प्रश्नांना वांशिक रूप देणे हा केवळ मूर्खपणा नसून एक प्रकारे बाबासाहेबांचा अपमानही आहे.

तिसरा विषय लक्षात घ्यावा लागतो, तो म्हणजे भारतीय मुसलमानांचा. भारतातील बहुतेक सर्व मुसलमान पूर्वी हिंदू होते किंवा भारतीय धर्माचे होते. त्यातील नगण्य स्वत:हून मुसलमान झालेले असतील, पण अन्य सर्वांना बाटवून मुसलमान केलेले आहे. असे सर्व हिंदू-मुसलमान आहेत. ते अरबी, तुर्की, सिरियन वंशाचे नाहीत. ते तुमच्या-आमच्याप्रमाणे भारतीय वंशाचे मुसलमान आहेत. म्हणून वांशिकदृष्ट्या आपण सर्व एक आहोत, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे.

जे प्रश्न आहेत, ते आपल्या सर्वांचे आहेत. ते एका विशिष्ट जातिवर्गाचे किंवा उपासना समुदयाचे नाहीत, ते आपल्या सर्वांचे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांकडे बघण्याचा हा आपला प्रारंभबिंदू आहे. गंगेचा उगम गंगोत्रीत होतो आणि ती बंगालमध्ये सागराला जाऊन मिळते. या तिच्या प्रवाहात मध्ये शेकडो नद्या येऊन मिळतात. अनेक ओढे, नाले येऊन तिला मिळतात, पण तिचे नाव बदलत नाही. उगमाच्या ठिकाणी ती गंगा असते आणि समुद्राला मिळतानादेखील गंगाच असते. जेवढी उगमाला पवित्र असते, तेवढीच सागराला मिळताना पवित्र असते, तसे आपण भारतीय आहोत.

अन्याय-अत्याचाराचे प्रश्न सर्वांचे आहेत आणि ते सर्वांनी मिळूनच सोडवायचे आहेत. आपल्याकडचे प्रश्न सामाजिक मानसिकतेशी जोडलेले आहेत. सामाजिक मानसिकता सामाजिक संस्कारानेच बदलता येते. हिंसेने ती बदलता येत नाही. प्रश्नाला जे कुणी जातीय आणि धार्मिक रूप देतात, ते समाजात जातीय आणि धार्मिक तेढ वाढवितात. हा एकात्मतेचा विचार मनात ठेवूनच देशभर आज लाखो संघस्वयंसेवक स्वत:चा प्राण धोक्यात घालून रस्त्यावर उतरलेले आहेत. सगळेच भारतीय माझे, मी त्यांचा, ते माझे बांधव, हीच भावना सर्वांच्या मनामध्ये आहे.

आपल्याला देश मोठा करायचा आहे, जातीय आणि धार्मिक अराजक निर्माण करायचे नाही. अमेरिकेत आज जो उद्रेक दिसतो, तो तेथील डावी मंडळी अराजकाकडे नेण्यासाठी करतील, पण तेथील सर्वसाधारण अमेरिकन माणूस ते होऊ देणार नाही, कारण तो देशभक्त आहे आणि देशाला बांधून ठेवणाऱ्या संविधानावर त्याची निष्ठा आणि प्रगाढ विश्वास आहे. आपण सर्वांनी त्यांच्या या गुणांचे अनुकरण करावे, यातच शहाणपण आहे.