भाग्ये पंढरी पाहिली

विवेक मराठी    20-Jun-2020
Total Views |
 @देविदास पोटे 

भाग्ये पंढरी पाहिली।
दृष्टी विठ्ठली जडली।।

निपटचि लाचावली।
विठ्ठल जालीसे आपण।।

नवल देखावयाचा साक्षात्कार।
पहाट फुटली अनिवार।।

कोंदाटला विठ्ठलवीर।
अवनी अंबर हारपले।।

आजि निजबोध सोनियाचा जाला।
अस्त उदय अस्ता गेला।।

रामी रामदास विनटला।
हर्षे भरला त्रैलोक्य।।

-समर्थ रामदास स्वामी


ramdasswami_1  

परमेश्वर बाहेर कुठेही नसून तो आपल्या अंतरंगातच सामावलेला आहे, हे शाश्वत सत्य संतांनी वारंवार प्रतिपादन केले आहे. लोक मात्र देवाचा शोध घेत तीर्थस्थळी व्यर्थ भ्रमंती करीत राहतात. देवाचा ठाव घ्यायचा असेल, तर आपल्या अंतरंगात खोल उतरले पाहिजे.

या अभंगात संत रामदास म्हणतात, ‘‘माझे अनेक जन्मांचे भाग्य उदयाला आले आणि मी आतली पंढरी पाहिली. आतल्या आत्मस्वरूप अशा विठ्ठलाच्या रूपावर माझी दृष्टी खिळून राहिली. इतकी, की ती पूर्णपणे लालचावून वा मोहून जाऊन स्वत:च विठ्ठलरूप झाली.

आश्चर्यकारकरीत्या हा साक्षात्कार घडला. गुरुकृपेची अनिवार पहाट उगवली आणि त्यामुळेच ही किमया घडली. सर्वत्र विठ्ठलाचे रूप कोंदून राहिलेले मी पाहिले. त्याच्या तेजोमय प्रभेत पृथ्वी आणि आकाशा सामावून गेल्याची मी अनुभूती घेतली.

आज सोन्यासारखा तेजस्वी, लखलखीत आणि अनमोल असा आत्मबोध मला प्राप्त झाला. मायेच्या प्रभावाने चित्रावर होणाऱ्या प्रपंचाचे उदय आणि अस्त हे कायमचे अस्त पावले. तिन्ही लोक आनंदाने भरून गेले. त्या आनंदमय अनुभवाने मी तनामनाने संपन्न झालो.’’

संतांना अंतरंगातील परमेश्वराच्या अस्तित्वाची सखोल जाणीव होती. समर्थ रामदासही आपल्याला आतल्या पंढरीचे आणि आतल्या विठ्ठलाचे दर्शन झाल्याचे सांगतात, त्याचे कारण हेच आहे. तेजोमय सावळ्या परब्रह्माच्या आलेल्या अनुभूतीचे वर्णन त्यांनी नेमक्या शब्दात समर्थपणे केले आहे. विठ्ठलरूप पाहता पाहता माझी दृष्टी विठ्ठलच होऊन गेली, असे भक्तीच्या उत्कटपणाचे जिवंत वर्णन त्यांनी केले आहे.

समर्थ रामदास हे विठ्ठलभक्त होते हे अनेकांना ठाऊक नसते. ते नेहमी पंढरपूरला जात असत. महाराष्ट्राची संतपरंपरा महान आहे. गेल्या सातशे वर्षात विविध जातिबंध, धर्म यातून संतांची मांदियाळी तयार झाली आणि तिने महाराष्ट्रात भक्तीच्या माध्यमातून लोकजागृतीचे आणि लोकप्रबोधनाचे काम केले. मात्र आजही वारकरी आणि रामदासी पंथ यांमध्ये सख्य वा समन्वय नाही, ही खेदाची बाब आहे. पंढरपूरचा विठ्ठल आणि अयोध्येचा राम सर्वांना सन्मती देवो, अशी त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना.

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दिव्य अनुभूतीचे प्रत्ययकारक वर्णन समर्थ रामदासांनी या अभंगात केले आहे.