कोरोनारोगावरील उपचार

विवेक मराठी    20-Jun-2020
Total Views |

corona_1  H x W

@डॉ. मिलिंद पदकी


 कोव्हीड १९ विषाणूंच्या रोगात सुरुवातीला ताप, खोकला, धाप लागणे ही लक्षणे दिसतात. लक्षणे फार तीव्र नसल्यास उपचार घरीच केले जातात - आपण सर्दीच्या किंवा 'फ्लू'च्या तापावर जे उपचार करतो, त्याच प्रकारचे आणि त्याच औषधांनी. ८०-९० टक्के लोक घरीच बरेच होतात. हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नसते. या रोगावर अनेक औषधांवर संशोधन चालू आहे.

RT-PCR या टेस्टने विषाणूची शरीरातील उपस्थिती सिद्ध करून कोविड-१९चे पक्के निदान केले जाते. लक्षणे दिसू लागल्यावर नाक-घशाच्या स्वॅबमध्ये विषाणू पकडला जाण्याची शक्यता चांगली असते, पण 'खोटे निगेटिव्ह' रिझल्ट्सही येऊ शकतात. त्यामुळे 'निगेटिव्ह' रिझल्ट्स मिळाल्यास, पण डॉक्टरांना रोगाचा संशय असल्यास ती टेस्ट पुन्हा एकदा करून घेणे योग्य ठरते.

सुरुवातीला ताप, खोकला, धाप लागणे ही लक्षणे दिसतात. लक्षणे फार तीव्र नसल्यास उपचार घरीच केले जातात - आपण सर्दीच्या किंवा 'फ्लू'च्या तापावर जे उपचार करतो, त्याच प्रकारचे आणि त्याच औषधांनी. ८०-९० टक्के लोक घरीच बरेच होतात. हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नसते. या रोगावर अनेक औषधांवर संशोधन चालू आहे. ते सापडेपर्यंत पुढील सुरुवातीचे उपचार घरी किंवा हॉस्पिटलमध्येही चालू आहेत -


Treatment of Corona virus

• विश्रांती घेणे.
• पाणी आणि इतर पेये पिणे. पाण्याच्या कमतरतेने लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात.
• घरी राहणे, कामावर, शाळेत किंवा बाजारात न जाणे. इतरांना आपल्यापासून संसर्ग होऊ नये याची काळजी घेणे.
• घ्ररातही एकाच खोलीत राहणे.
• आपण आजारी आहोत हे इतरांना सांगणे, म्हणजे तेही योग्य काळजी घेतील आणि दूर राहतील.
• शिंक किंवा खोकला आल्यास तोंडावर रुमाल किंवा मास्क पाहिजे.
• आपले हात सतत (दिवसातून ४-५ वेळा, साबणाने, एक पूर्ण मिनिट लावून) धुणे.
• आपली कपबशी, जेवायची भांडी, टॉवेल वगैरे स्वतःसाठीच राखून ठेवणे. इतरांना न देणे. त्यातून संसर्ग होऊ शकतो.
• आपला हात लागतो, त्या जागा - दरवाजाची कडी, टेबलाचा पृष्ठभाग हे जंतुनाशकाने (Disinfectantने) साफ करत राहणे.

रोगाचे स्वरूप

विषाणूचा संसर्ग झाल्यापासून लक्षणे सुरू व्हायला २ ते १४ दिवस लागू शकतात. अनेक लोक या काळात बरेही होतात. संसर्ग झाल्यापासून जर रोगाच्या दिशेने वाटचाल चालू असेल, तर रोगलक्षणे दिसू लागायला सर्वसाधारणपणे चार-पाच दिवस लागतात. ९७.५ टक्के लोकांमध्ये ११.५ दिवसांत लक्षणे नक्कीच दिसतात. ही लक्षणे ताप, खोकला, घशात खवखव, थकवा आणि अंगदुखी या प्रकारची असतात. काहींना भूक न लागणे, उलटीची भावना आणि डायरिया होऊ शकतो. वास आणि चव कमी किंवा नष्ट होणे हेही घडू शकते. हॉस्पिटलमधील रोग्यांना धाप लागू लागणे (जे सुमारे ५ ते ८ दिवसांत घडते) हे रोग बळावू लागण्याचे लक्षण आहे.

पुढील घटक असणाऱ्या व्यक्तींना कोविड-१९ हा रोग तीव्र होण्याचा धोका असतो - ६५ वर्षांपेक्षा अधिक वय, हृदयविकार, फुप्फुसांचे दीर्घ मुदतीचे विकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा!

लॅब टेस्ट्स - लिम्फोसाइट्स या रक्तातील पांढऱ्या पेशींचे कमी होणे, डी-डायमर वाढणे, सी-रिऍक्टिव्ह प्रोटीन (CRP) वाढणे, फेरायटिन वाढणे.
तीव्र रोगात हृदयाला, मूत्रपिंडाला आणि यकृताला हानी पोहोचू शकते. हृदयाची लय बिघडणे, स्नायूंचे विघटन होणे, रक्तवहिन्यांत रक्त साकळणे आणि शॉक हे दिसते. आपली इम्यून सिस्टीम 'सायटोकाइन्स' नावाची लहान प्रथिने स्रवते, ज्याने उच्च ताप आणि सूज (Inflammation) निर्माण होते.


Treatment of Corona virus

तीव्र श्वसनविकाराचे स्वरूप पुढीलप्रमाणे -
१. रक्तातले प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे श्वसनसंस्थेची वेगाने हानी सुरू होणे.
२. हे हॉस्पिटलमध्ये दखल झाल्यापासून एक आठवड्यात घडते.
३. छातीच्या एक्स-रेने त्याचे निदान पक्के होते.
४. रक्तातले घटलेले प्राणवायूचे प्रमाण हे हृदयविकारातून आलेले नाही, याची डॉक्टर उपचारांच्या दृष्टीने खात्री करून घेतात.

ज्यांच्यात कोविड-१९चा न्यूमोनिया दिसतो, त्यांच्यातील सुमारे ४२ टक्क्यांची वाटचाल, तसेच अतिदक्षता कक्षामधल्या (ICUमधल्या) ६१ ते ८१ टक्क्यांची वाटचाल तीव्र श्वसनविकाराच्या दिशेने चालू असते. मिनिटाला ३०पेक्षा अधिक वेगाने धाप चालू असणे आणि रक्तातले प्राणवायूचे प्रमाण ९२ टक्क्यांच्या खाली गेलेले असणे ही त्याची लक्षणे आहेत.

उपचार
१. प्राणवायू पुरविणे.
२. पोटावर झोपविणे
३. डेक्झामिथाझोन हे 'स्टीरॉइड' जातीचे औषध (आत्ताच प्रसिद्ध झालेल्या याच्या उत्तम रिझल्ट्सबद्दल खाली आणखी तपशील दिलेले आहेत.)
कोरोना (कोविड-१९)वरील उपचार - १५ जून २०२०पर्यंतचे रिझल्ट्स -
मोठी बातमी : डेक्झामिथाझोन हे १९६१ सालापासून वापरात असलेलय 'स्टीरॉइड' जातीच्या औषधाचे उत्तम रिझल्ट्स. जेव्हा विषाणू वाढत असतो आणि त्याविरुद्ध आपली इम्यून सिस्टिम अजून 'खवळलेली' नसते, तोपर्यंतच विषाणुनाशक औषधाचा चांगला उपयोग होतो हे आता आपल्याला माहीत आहेच. त्यानंतर इम्यून सिस्टिमला शांत करणे हेच मोठे काम होऊन बसते. त्या संदर्भात इंग्लंडमधून हे नवे, आशादायक रिझल्ट्स आले आहेत, ते असे -

डेक्झामिथाझोन दिल्यावर गंभीर आजारी लोकांतील मृत्यूचे प्रमाण -

ऑक्सिजनवर नसलेले : नित्याचे उपचार : १३% मृत्यू. डेक्झामिथाझोन + नित्याचे उपचार : १६%. म्हणजे इथे उपयोग नाही.

ऑक्सिजनवर असलेले : नित्याचे उपचार : २५% मृत्यू. डेक्झामिथाझोन + नित्याचे उपचार : २०%. म्हणजे इथे उपयोग आहे.

व्हेंटिलेटरवर असलेले : नित्याचे उपचार : ४१% मृत्यू. डेक्झामिथाझोन + नित्याचे उपचार : २७% : म्हणजे इथे उपयोग आहे.

डेक्झामिथाझोन हे गोळ्या आणि इंजेक्शन, दोन्ही स्वरूपांत वापरता येते. दोन्हीचे उत्पादन भारतात होते.

कोरोना कोविड-१९वरील उपचार : तीन मोठी औषधे ;
१. रेमडेसिव्हीर : हे विषाणुनाशक शिरेतून (IV - Intravenous) दिले जाते. ज्यांच्या घशात ट्यूब घातली आहे त्यांना १० दिवस, तर ट्यूब नसलेल्याना ५ दिवस.
मूत्रपिंडविकार असल्यास हे वापरले जात नाही. औषधाचा अमेरिकेतही तुटवडा आहे, त्यामुळे अति-आजारी असलेल्यांवर वापरले जात आहे, पण त्यामुळे विषाणू मारायची वेळ टळून गेल्यावर ते वापरले जात आहे असा मला संशय आहे. योग्य वेळी (लक्षणांच्या सुरुवातीला) वापरले गेल्यास सहा दिवसांत रोगी बरा होतो.

२. टॉसिलीझूमॅब : ही या आपल्या इम्यून सिस्टिमने सोडलेल्या IL-6 नावाच्या सायटोकाइन जातीच्या प्रथिनांविरुद्धची ही अँटीबॉडी आहे. इम्यून सिस्टिमचे शमन करायला ती वापरली जाते. पण अफाट महाग आहे (१ डोस = ५००० डॉलर्स!). जर बॅक्टेरियांचे 'सुपर'इन्फेक्शन असेल, तर हे वापरता येत नाही. रिझल्ट्स चांगले आहेत.
३. बरे झालेल्यांचे सीरम : अजून एफ.डी.ए.ची पूर्ण मान्यता नाही. हॉस्पिटलमध्ये 'संशोधन' स्वरूपात वापरले जात आहे. सर्वसाधारणत: एक डोस पुरतो. रिझल्ट्स चांगले येत आहेत. रक्तगट मॅच करून वापरावा लागतो. अनेक चांगल्या अँटीबॉडी टायटरवाल्यांचे सीरम (रक्ताचा पेशी आणि क्लॉटिंग - प्रथिने काढून टाकल्यावर उरलेला पिवळट द्राव) एकत्र करून वापरले जाते. हे भारतात प्रचलित व्हायला अडचण येऊ नये.

व्हिटॅमिन / सप्लिमेंट स्वरूपाची, मोठे साइडइफेक्ट नसलेली औषधे : सूचना : हे रोग झाल्यावर वापरले जाणारे उपचार आहेत. आत्ता हे प्रतिबंधक उपाय म्हणून मांडलेले नाहीत! पण त्या प्रकारेही ती वापरली जाऊ शकतात, असे  मत दिसते.
१. झिंक (यावर दोन पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे ते पेशींच्या आवरणातून आत नेण्यास 'आयोनोफोर' नावाचे संयुग लागते. काही चांगली आयोनोफोर संयुगे म्हणजे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (याचे हृदयावर वाईट परिणाम असल्यामुळे हे डॉक्टरांच्या देखरेखीखालीच घेता येते), ग्रीन टी (किंवा त्यातले 'EGCG' हे संयुग) आणि क्वेर्सेटिन.
२. व्हिटॅमिन सी : तोंडावाटे किंवा शिरेवाटे (IV). एक ते सहा ग्रामपर्यंत. अजून आकडे नाहीत, पण अनेक डॉक्टर्स विश्वासाने हे वापरीत आहेत. चीनमध्ये मोठी मानवी चाचणी चालू आहे.
३. व्हिटॅमिन डी : दिवसाला १००० आय.यू. किंवा रक्तातले व्हिटॅमिन डी मोजून, त्यानुसार अधिक मोठा डोस.
४. एन-असेटील-सिस्टीन : एक ते सहा ग्राम, तोंडावाटे किंवा शिरेवाटे (IV). याने छातीतला द्राव पातळ होतो. अजून आकडे नाहीत, पण अनेक डॉक्टर्स विश्वासाने हे वापरीत आहेत.