श्री नामदेव महाराजांचे आंधळे पांगुळ

विवेक मराठी    21-Jun-2020
Total Views |



pandharpur ashadhi ekadas

आज आपण श्री नामदेव महाराजांचे आंधळे पांगुळ पाहणार आहोत
. कोणत्याही पूजेच्या आरंभी आपण एक संकल्प करतो आणि तो संकल्प करताना असे म्हणतो की, जंबुद्विपे भरतखंडे... याचा अर्थ आपलं हे भारत राष्ट्र जे आहे ते जंबुद्विपामध्ये आहे. या जंबुद्विपामध्ये पंढरपूर नावाचे एक गाव आहे आणि हे नगर धर्माचे आहे. या गावचा एक पाटील आहे. या पाटलाचं नाव आहे विठोबा पाटील! हा पाटील कुणालाही विन्मुख पाठवत नाही.

जंबुद्वीपामाजी एक पंढपूर गाव ।

धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नांव ।

चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया ॥१ ॥

विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो।।धृ ।।

त्यामुळे जर आपण उपाशी असू आपल्याला भोजन हवे असेल तर आपण तेथे जाऊ. आपल्याला पोटभरून तेथे खायला मिळेल. त्यामुळे अशा विठोबाचा धर्म जागू दे आणि त्याच्या चरणी आपले सदैव लागू दे! अशी आपला लोकगायक विनंती करतो आहे.

ज्यासी नाही पंख पाय तेणे करावे ते काय ।

शुध्द भाव धरोनि पंढरपूरासी जाय ।

इच्छिले फळ देता यासी नवलाव ते काय ॥२ ।।

ज्याला पंख नाहीत तोडू शकतो का? आणि ज्याला पाय नाही तो चालू शकतो का? परंतु पाय ज्या कामासाठी आपल्याला मिळालेले आहेत ते काम जर आपण करत नसू तर त्याचा अर्थ आहे की, आपल्याला पाय असूनही आपण पांगळे आहोत. त्यामुळे आपल्याला जे पाय लाभलेले आहेत त्या पायाने आपण चालत चालत आणि वारी करत पंढरीच्या पांडुरंगाचं नाव आपल्या मुखाने घेत आपण जर वारकरी बनून पंढरपूरला गेलो तरच याचा उपयोग आहे... आणि त्या पंढरपूरला कसं जायचं आहे तर आपल्या मनामध्ये शुद्ध भाव हवा... पंढरपूरला गेल्यावर आपल्याला काय मिळेल? तर आपण ज्या गोष्टीची इच्छा करू ते फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. याच्यामध्ये नवल वाटावं असं काही नाही!

सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिडीला ।

मुष्ठी पोहे घेऊनी त्याचे भेटिलागी गेला ।

शुध्द भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला ॥३ ॥

अहो, आपल्याला सुदामा ब्राह्मणाची कथा माहीत आहे. हा सुदाम अतिशय गांजलेला होता आणि त्यांच्या मुलाबाळांना खायलाही काही नव्हतं आणि अशावेळी त्याला आठवलं की, द्वारकाधीश श्री कृष्ण आपला मित्र आहे आणि त्याची आपल्याला काहीतरी मदत होईल... सुदामा ब्राह्मण त्याला भेटायला द्वारकेला निघाला. परंतु राजाला भेटायला जाताना अथवा देवालयात जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये असं सूत्र आहे. त्यामुळे या सुदामा ब्राह्मणाने घरात शिल्लक असलेले मूठभर पोहे बांधून घेतले आणि तो आपल्या मित्राच्या भेटीला गेला आणि हे मूठभर पोहे थोडे असले तरी भगवान श्रीकृष्णाने ते स्वतः आनंदाने भक्षण केले, आपल्या राण्यांना त्या पोह्याचा प्रसाद दिला आणि नंतर अतिशय आनंदाने आपल्या मित्राला निरोप दिला. भगवान श्रीकृष्ण राजा झाल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारची त्याने मदत केली नाही असं त्याला वाटलं... परंतु जेव्हा तो आपल्या गावात परत आला तर तेथे संपूर्ण सुवर्णनगरी झाली होती आणि तो सुदामा ब्राह्मण त्या नगरीचा राजा झाला होता. कारण त्याने देवाकडे कुठलीही अपेक्षा केली नाही. जर देवाच्या मनात असेल तर आपल्याला नक्कीच तो काहीतरी मदत करील ही भावना मनात होती आणि देवाला सर्व ठाऊक आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे काही मागण्याची गरज नाही. आपला भा फक्त शुद्ध पाहिजे.

गण गोत्रज सर्व हासताती मज ।

गेले याचे येणे सांडियेली लाज ।

विणवितो शिंपीनामा संत चरणीचा रज ॥४ ॥

आता हा नामदेव शिंप्याचा असून, त्याच्या कुळात जन्माला आला असून आपला कामधंदा करायचे सोडून चोवीस तास भगवंताचे भजन करत राहतो, भगवंताच्या नामाचे कीर्तन करत राहतो हे पाहून लोकांना त्याचे हसू येत आहे आणि सर्व त्याची चेष्टा करत आहेत. हा काय माणूस आहे? याला लाज वाटत नाही... परंतु संत नामदेव महाराजांनी जे कार्य केलेला आहे ते आपण पाहतो की नामा तयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार’. संपूर्ण भारतभर भागवत धर्माची पताका फडकावणारे श्री संत नामदेव महाराज आहेत हे आपण लक्षात घेतले घेतले पाहिजे आणि श्रीसंत नामदेवमहाराज स्वतःला संतचरणरज म्हणवून घेत आहेत.