घर शाळेत आणि शाळा घरात

विवेक मराठी    22-Jun-2020
Total Views |
@डॉ. श्रुती पानसे

ज्या मुलांना सध्या मोबाइल फोन, बऱ्यापैकी डेटा, लॅपटॉप, कॉम्प्युटर या सर्व सोयी उपलब्ध आहेत, त्या मुलांशी बोलल्यानंतर लक्षात येतं की त्यांना या ऑनलाइन शिक्षणाचा या काही दिवसांतच कंटाळा आला आहे. काही दिवसांनी असं चित्र स्पष्ट होईल की ऑनलाइन शिक्षण दिलेलं आहे, पण ते मुलांच्या मनापर्यंत - मेंदूपर्यंत पोहोचलेलं नाही. मग आपण यातून साध्य काय केलं? असा प्रश्न आपल्याला पडणारच आहे.


home education_1 &nb

सध्या मुलांच्या शिक्षणापेक्षा मुलांचं आरोग्य महत्त्वाचं आहे, या दृष्टीने मुलांच्या शाळा सुरू होणार नाहीत. पण मुलांचं शिक्षण थांबायला नको या हेतूने शिक्षण मंडळाने ऑनलाइन शिक्षण सुरू केलं आहे. वास्तविक हे शिक्षण सर्वदूर पोहोचणार नाही याची आपल्या सर्वांनाच माहिती आहे. स्मार्ट फोनचा अभाव, विजेचा अभाव, घरामध्ये एक फोन असून तो आई-बाबांकडे आहे आणि आई-बाबा नसतील तर घरात ते मूल फोनवर शिक्षण घेणार कसं, घरात फोनच नसेल तर काय, असे अनेक प्रकार त्यामध्ये आहेत.

ज्या मुलांना सध्या मोबाइल फोन, बऱ्यापैकी डेटा, लॅपटॉप, कॉम्प्युटर या सर्व सोयी उपलब्ध आहेत, त्या मुलांशी बोलल्यानंतर लक्षात येतं की त्यांना या ऑनलाइन शिक्षणाचा या काही दिवसांतच कंटाळा आला आहे. काही ठिकाणी दिवसभराची शाळा भरते, तर काही ठिकाणी मुलांना गणवेश घालून स्क्रीनसमोर बसण्याची सक्ती केलेली आहे. त्यात वयाने थोडी मोठी असलेली मुलं सहजपणे स्वतःला म्यूट करून, व्हिडिओ स्टॉप करून शिक्षकांसमोर बसतच नाहीत. त्यांनी स्क्रीनसमोर बसावं यासाठी आटापिटा करणारे पालकही दिसतात. आई किंवा बाबा आपापली कामं सोडून मुलाच्या आसपास राहतात, जेणेकरून मुलाचं लक्ष स्क्रीनकडे राहावं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांनी मोबाइलपासून लांब राहावं यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे आपणच मुलांना मोबाइलसमोर थांबण्याचे आदेश सोडू लागले आहोत. त्यामुळे काही दिवसांनी असं चित्र स्पष्ट होईल की ऑनलाइन शिक्षण दिलेलं आहे, पण ते मुलांच्या मनापर्यंत - मेंदूपर्यंत पोहोचलेलं नाही. मग आपण यातून साध्य काय केलं? असा प्रश्न आपल्याला पडणारच आहे.

home education_1 &nb
इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मुलांचं औपचारिक शिक्षण सुरू नाही, याचा अर्थ त्यांचा मेंदूही बंद आहे असा होत नाही. मुलांच्या मेंदूला चालना द्यायची असेल, तर आपण काय काय करू शकतो?
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही पद्धतींनी मुलांच्या बुद्धीला चालना देऊ शकतो.
- यात अर्थातच ऑनलाइनचा वेळ अत्यंत कमी, म्हणजे काही मिनिटांचा असेल. आज तुम्ही कोणते उपक्रम करा एवढं सांगण्यासाठीच शिक्षक त्यांना भेटतील.
- संध्याकाळी पुन्हा एकदा पाच-दहा मिनिटांत आज काय झालं याचा आढावा घेतील.
- मधल्या काळामध्ये मुलांनी शिक्षकांनी सांगितलेले उपक्रम करायचे आहेत.
- ही भेट रोज होणं शक्य नसेल, तर एक दिवसाआड किंवा दर आठवड्यालादेखील हे करता येईल.
- यातून मुलांना स्वयंअध्ययनाची सवय लागेल.
- या निमित्ताने मुलांना जे उपक्रम द्यायचे आहेत, ते केवळ लेखी आणि प्रश्नोत्तरांच्या संदर्भात नसावेत.
- सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जे योग्य आहे तसे उपक्रम आखले पाहिजेत.
- आत्ताच्या काळात मुलांची मन:स्थिती काहीशी कंटाळवाणी, काहीशी अनिश्चित, पालकांच्या आपापसातल्या संवादातून ज्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत त्याबद्दल थोडीशी तणावाची आहे, हे लक्षात घेऊन शिक्षकांनी मुलांचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने सकारात्मक बोललं पाहिजे, आनंदाने बोललं पाहिजे. ‘सर्वांच्या परीक्षेचा हा काळ संपून जेव्हा आपण शाळेत प्रत्यक्ष एकमेकांसमोर भेटू, तेव्हा…’ अशा आशयाची विधानं शिक्षकांच्या तोंडी असली पाहिजेत.
- पारंपारिक वर्ग पद्धतीमध्ये पाठ्यपुस्तक, लेखन, वाचन यांच्याशी जोडलेली कामं मुलं करत असतात. पण आता घरात असल्यामुळे घर आणि शिक्षण याच्याशी जोडलेले उपक्रम सुचवायला हवेत. घरात राहून मुलं काय काय शिकू शकतात याची यादी करून ती जर मुलांना दिली, तर मुलं ‘आमच्या शिक्षकांनी सांगितलं आहे’ म्हणून आवडीने करतील.
- आठवी ते दहावीच्या संदर्भात मुलांना काही धडे वाचून ठेवायला सांगता येतील. जे मुलांना कळणार नाही ते त्यांनी लिहून द्यावं. अशा पद्धतीने अभ्यास करता येईल.
- पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी पाठ्यपुस्तकांमध्ये जे विविधांगी उपक्रम असतात ते उपक्रम करायला सांगणं, त्या संदर्भातल्या सूचना देणं हे शिक्षकांनी अवश्य करावं. मात्र हा काळ सकाळी आणि संध्याकाळी मिळून दहा-पंधरा मिनिटांचाच असावा, याची खबरदारी घ्यावी.
- संध्याकाळी शिक्षक आपल्याला विचारणार आहेत हे लक्षात घेऊन मुलं त्यांना दिलेली कामं आनंदाने करतील. ते उपक्रम करण्यात मुलांना कंटाळा येणार नाही. त्यांना ओझं वाटणार नाही.
- दिवसभर ऑनलाइन बसून राहण्याचा ताण त्यांच्यावर येणार नाही. हा ताण त्यांच्या डोळ्यावर आहे आणि वाढत्या वयातल्या त्यांच्या शरीरावरही आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
- या लेखामध्ये बालवाडीसाठी ऑनलाइन शिक्षण हा मुद्दा फारसा विचारात घेणार नाही. याचं कारण ते असूच नये. परंतु बालवाडीसाठी मेंदूपूरक उपक्रम अवश्य काढावेत आणि पालकांशी शिक्षकांनी बोलावं.
- शक्य असेल तर शिक्षकांनी पालकांसाठी व्हिडिओ तयार करावेत.
- मुलांसाठी ऑडिओ क्लिप्स तयार कराव्यात.
- शक्य असेल तर मुलांच्या ईमेलवर किंवा व्हॉट्स ऍपवर शिक्षकांनी यादी द्यावी आणि पालकांनी ते करून घ्यावेत.
अर्थात असं सगळं म्हणत असताना ते पालक कसे आहेत, ते घर कसं आहे, पालकांवर स्वतःचे काही आर्थिक, मानसिक, कौटुंबिक ताण आहेत का, हेही विचारात घ्यायला हवं. असे ताण असण्याची शक्यता सध्या खूपच जास्त आहे. 'मुलं' हे खातं अनेकदा आईवर्गाकडे सोपवलेलं असल्यामुळे याचा अतिरिक्त ताणही तिच्यावर पडण्याचीच शक्यताच जास्त. त्यामुळे पालकांकडून अतिअपेक्षा करणं योग्य नाही. त्यापेक्षा जेव्हा केव्हा पुन्हा शाळा सुरू होईल, त्या वेळेला नव्याने उभारी घ्यावी.